तुंगभद्रा धरणतुंगभद्रा : द. भारतातील एक प्रमुख नदी आणि कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून वाहणारी कृष्णेची मुख्य उपनदी. लांबी सु. ६४० किमी. कर्नाटक राज्याच्या चिकमगळूर जिल्ह्यात शृंगेरीच्या नैर्ऋत्येस सु. २५ किमी. सह्याद्रीतील पुराणसिद्ध वराह पर्वतावरील १,४०० मी. उंचीवरील गंगामूळ येथून तुंग आणि भद्रा या दोन नद्या उगम पावतात. त्या तेथून ईशान्येस सु. १५० किमी. कूडली येथे एकत्र होऊन त्यांची तुंगभद्रा नदी बनते. तुंगेच्या काठी शृंगेरी, तीर्थहळ्ळी, शिमोगा ही ठिकाणे असून भद्रा नदी बाबा बुढण डोंगराच्या पायथ्याजवळून जाते. तिच्याकाठी बेंकिपूर, भद्रावती ही ठिकाणे आहेत. तुंगभद्रा पुढे हरिहर, होस्पेट, हंपी यांवरून ईशान्येकडे जाऊन आंध्र प्रदेशाच्या सीमेवर येते. नंतर सु. १० किमी. जाऊन ती पूर्ववाहिनी होते आणि कर्नाटक–आंध्र सीमेवरून सु. ५० किमी. जाऊन मग आंध्र प्रदेशात शिरते. कुर्नूलच्या पुढे संगमेश्वरम् येथे ती कृष्णेला मिळते. वरद, कुमुद्वती, हरिद्रा, हगेरी, वेदवती या तुंगभद्रेच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांसह तुंगभद्रा आणि भीमेसह कृष्णेच्या कर्नाटकातील भाग मिळून सह्याद्रीच्या पूर्वेच्या कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील निम्म्या प्रदेशाचे जलवाहन करतात. तुंगभद्रेचे पाणी मधुर असल्याने ‘गंगा स्नान आणि तुंगा पान’ अशी म्हण पडली आहे. नद्यांना बांध घालून शेतीला पाणीपुरवठा करण्याची पद्धत भारतात विशेषतः दक्षिणेकडे प्राचीन काळापासून रूढ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस तुंग व भद्रा यांवर मिळून ३८ छोटे बांध होते. विजयानगरच्या राजांनी हंपीजवळ तुंगभद्रेवर अनेक बांध घातले होते. त्यांपैकी १० बांध या शतकाच्या सुरुवातीस चालू होते. ब्रिटिशांच्या आमदनीत कृष्णा–तुंगभद्रा संगमाच्या अलीकडे एका बांधाने तुंगभद्रेचे काही पाणी वळवून कुर्नूल–कडप्पा कालव्यात सोडले आहे. परंतु तुंगभद्रेचे पाणी खरोखर कारणी लागले ते तुंगभद्रा प्रकल्पामुळे, हा बहूद्देशी प्रकल्प आंध्र प्रदेश व कर्नाटक यांच्या सहकार्याने त्यांच्याच फायद्यासाठी उभारलेला आहे. १९०३ सालीच तयार झालेली ही योजना सध्याच्या स्वरूपात उभी रहाण्यास १९५६ साल उजाडले. कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट पासून सु. ८ किमी. वरील मल्लापुरम् येथे तुंगभद्रेला २,४४१ मी. लांब व ४९·३३ मी. उंच धरण बांधले असून त्याच्या दोन्ही बाजूंच्या कालव्यांचा लाभ एकूण ३·३२ लाख हे. जमिनीला १९७३-७४ अखेर व्हावयाचा होता. दोन्ही बाजूंकडील व पायथ्याच्या विद्युत् गृहांतून एकूण सु. १ लाख किवॉ. वीज उपलब्ध होत आहे. तसेच धरणाच्या ‘पंपा सरोवर’ या जलाशयातील पाणी बोगद्यातून पलीकडे पेन्नार नदीत सोडणे हे या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पामुळे रायलसीमा विभागाचे पाण्याअभावीचे दैन्य दूर होऊन तेथे भात, कापूस, भुईमूग, ऊस इ. पिके भरपूर निघू लागतील.

तुंगभद्रेच्या परिसरात शृंगेरी येथे आद्य श्रीशंकराचार्यांचा मठ आहे. हंपीजवळ विजयानगरच्या साम्राज्याचे अवशेष आहेत. हरिहर हे औद्योगिक केंद्र व होस्पेट, कुर्नूल इ. महत्त्वाची शहरे आहेत. इकडील वेदपाठी लोकांचे उच्चार प्रमाण मानले जातात.

यार्दी, ह. व्यं.  कुमठेकर, ज. ब.