अबू सिंबेल : (इप्सांबूल). दक्षिण ईजिप्तमधील, आस्वानपासून २६५.६८ किमी. अंतरावरील, नाईल नदीकाठचे खेडे. दुसऱ्या रॅमसीझच्या काळी (इ.स.पू. १२५०) टेकडीवजा खडकामध्ये कोरलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध. याकोप बुर्कहार्त (१८१२) व बेलत्सोनी (१८१७) या संशोधकांनी वाळूत दडलेल्या या मंदिरांचा प्रथम शोध लावला. नंतर मार्येत या ईजिप्तविद्याविशारदाने ती पूर्णपणे उघडी केली (१८८९).

यांपैकी पूर्वाभिमुख मोठ्या मंदिराच्या गोपुरसदृश्य दर्शनी भागातील (३६ मी. लांब व ३२ मी. उंच) प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना, बसलेल्या रॅमसीझच्या २० मी. उंचीच्या दोन-दोन अतिप्रचंड मूर्ती आहेत. या मूर्तींच्या पायाजवळ राणीच्या व इतर राजकुटुंबियांच्या मूर्तीं कोरल्या आहेत. अशा भव्य मूर्ती केवळ राजाच्या मोठेपणासाठी नसत, तर राजामधील दैवी अंशाची भव्यता ठसविण्यासाठी असत. आतील खोदकाम ५६ मी. खोल आहे. त्यातील पहिल्या आयताकार दालनात ९ मी. उंचीचे ‘ओसिरीस’ (मानवाकारी स्तंभ) आहेत. भिंतीवर कादेश येथील तसेच इतर युद्धप्रसंगांची व धार्मिक विषयांची रंगीत खोदीव शिल्पचित्रे  आहेत. या दालनाच्या दोन्ही बाजूंस मिळून एकूण आठ लहानलहान खोल्या आहेत. दालनाला जोडलेल्या चार खांबांच्या अर्धमंडपापलीकडे गाभारा आहे. थीब्झची अमेन-रा, हीलिऑपोलिसची रा-हेख्ती व प्ता या गाभाऱ्यातील सूर्यदेवता-मूर्तीवर व राजा रॅमसीझच्या मूर्तीवर उगवत्या सूर्याचे किरण पडावेत, अशी या शैलमंदिराची सूचना आहे. ग्रीक, कॅरियन व फिनिशियन भाडोत्री सैनिकांनी आपापली नावे प्रवेशद्वारातील दक्षिणेकडील मूर्तीच्या पायावर कोरली आहेत. त्यांवरून प्राचीन भाषांच्या मूळाक्षरांची माहिती मिळते. या मंदिराच्या उत्तरेकडील घळीत हथोर देवतेचे मंदिर आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मिळून रॅमसीझच्या चार व त्याच्या नेफरतारी या राणीच्या दोन अशा सहा उभ्या मूर्ती आहेत. आस्वान धरणाखाली ही वास्तू बुडू नये म्हणून यूनेस्कोतर्फे यंत्रणा उभारून, ती खंडश: कापून तिची उंचावर पुन:स्थापना करण्यात आली.

दिवाकर, प्र. वि.


नेफरतारी राणीचे मंदिर, अबू सिंबेल.

अबू सिंबेल येथील उत्तुंग मूर्तीच्या स्थानांतराचे द्दश्य

अबू सिंबेल येथील भव्य मंदिराचे प्रवेशद्वार

मानवाकारस्तंभ-दालन, अबू सिंबेल.