राव्हेना : इटलीमधील एमील्या-रॉमान्या विभागातील राव्हेना प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,३६,७८६ (१९८३). हे फ्लॉरेन्सच्या ईशान्येस १०४ किमी., एड्रिॲटिक समुद्र किनाऱ्याजवळ असून सस. पासून केवळ चार मी. उंचीवर, सपाट भूमीवर वसलेले आहे. ईशान्येस १० किमी. एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मारिना दी राव्हेना बंदराशी राव्हेना कालव्याने जोडले गेले. इटालियन हे येथील मूळ रहिवासी असून, इ. स. पू. १४०० मध्ये ॲक्वीलिया येथून ते दक्षिणेकडे आलेले असावेत. परंपरागत समजुतीनुसार या ठिकाणावर सुरुवातीला इट्रुस्कन व नंतर गॉल यांचा ताबा होता. रोमन बादशहा ऑगस्टस याने क्लासिस बंदर बांधले. इ. स. पहिल्या शतकात प्रसिद्ध रोमन नौसेना तळ म्हणून राव्हेना उदयास आले. ४०२ मध्ये पश्चिमेकडील होनोरीअस साम्राज्याची राव्हेना राजधानी बनविण्यात आली. त्या काळात येथे अनेक सुंदर स्मारके उभारण्यात आली. या पश्चिमी साम्राज्याच्या अस्तानंतर ऑस्ट्रोगॉथिक सम्राट ओडोएसर (कार. ४७६ – ९३) आणि थीओडोरिक (४९३ –५२६) यांच्या आधिपत्याखाली राव्हेना इटलीची राजधानी होती. ५४० मध्ये ही बायझंटिन इटलीची राजधानी बनली. ७५४ मध्ये फ्रँक लोकांनी राव्हेना ताब्यात घेऊन ते त्यांनी पोपला दिले. आठव्या शतकापासून राव्हेनाच्या अधोगतीस सुरुवात झाली. १२७८ नंतर ते धर्मप्रमुखांच्या अधिकाराखाली आले, तर १४४१ मध्ये ते व्हेनिसने आपल्या आधिपत्याखाली घेतले, परंतु १५०९ मध्ये ते पुन्हा पोप सत्तेखाली आले. १५१२ मधील युद्धात फ्रेंचांनी राव्हेना अल्पकाळ बळकाविले. १७५९ मध्ये राव्हेना सार्डिनिया साम्राज्याला जोडण्यात आले. १८६१ मध्ये या साम्राज्याचे रूपांतर इटलीच्या साम्राज्यात आले.

सध्या राव्हेना हे प्रमुख कृषी व औद्योगिक केंद्र आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरण, रसायने, कृत्रिम रबर, लाकडी सामान, सिमेंट, अन्नप्रक्रिया व तेलबिया प्रक्रिया हे येथील महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. राव्हेनातील बरीचशी स्मारके आज नष्ट झाली असली, तरी सेंट जॉन चर्च, गॅला प्लासिडिआची कबर (पाचवे शतक), सॅन ॲपोलीनर नुओव्होव, स्पिरिटो सँतो चर्च, बायझंटिन कलेतील सॅन व्हिटेल चर्च (सहावे शतक), आर्चबिशपचा राजवाडा, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, ललितकला अकादमी ह्या येथील जुन्या वास्तू प्रेक्षणीय आहेत.

चौधरी, वसंत