साकेत : उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते फैजाबाद जिल्ह्यात घागरा किंवा घग्गर (शरयू) नदीकाठी फैजाबादच्या ईशान्येस सु. १० किमी. वर वसले आहे. विद्यमान सजनकोटनामक स्थळी जे प्राचीन भग्नावशेष आढळतात, ते साकेत नगरीचेच होत. काही विद्वानांच्या मते साकेत हे अयोध्येचेच नाव असावे. बौद्घ पाली ग्रंथांतील उल्लेख पाहता ते अयोध्येहून वेगळे गाव असावे. बौद्घ वाङ्‌मयाचे व विशेषतः भारतविद्येचे अभ्यासक ⇨ टॉ रीस डेव्हिड्झ यांनीही साकेत व अयोध्या ही दोन भिन्न गावे असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमधील लंडन व वेस्टमिन्स्टरप्रमाणे ही जोडलेली (जुळी) गावे होती. पाली ग्रंथांनुसार अयोध्या ही प्रारंभी कोसल देशाची राजधानी होती. त्यानंतर साकेत व पुढे श्रावस्ती हे राजधानीचे ठिकाण झाले. साकेत हे इक्ष्वाकू राजवंशातील राजांच्या आधिपत्याखाली होते. पुराणांनुसार इक्ष्वाकू वंशातील ३१ राजांनी येथे राज्य केले. बौद्घ काळात प्रसेनजीत (इ. स. पू. सु. ७ वे व ६ वे शतक) या गौतम बुद्घाच्या समकालीन राजाने राज्य केले. गौतम बुद्घाने या स्थळी अंजनवन व कालकाराम नावाच्या विश्रामधामात काही दिवस विसावा घेतल्याचे उल्लेख आढळतात. जैन धर्मीयांचे हे पवित्र तीर्थस्थान असल्याचा उल्लेख जिनप्रभा सूरीलिखित विविध तीर्थकल्प ग्रंथांत मिळतो. इ. स. पू. दुसऱ्या शतकात दिमीत्रिअसच्या नेतृत्वाखाली बॅक्ट्रिअन ग्रीकांनी साकेतवर आक्रमणे केल्याचा उल्लेख तत्कालीन वाङ्‌मयात, विशेषतः पतंजलीच्या महाभाष्यात आढळतो. त्यावेळी पाटलिपुत्र येथे पुष्यमित्र शुंग (इ. स. पू. १८७–१५१) राज्य करीत होता. गार्गी संहितेतही (युग पुराणाचा भाग) यवनांनी साकेतवर स्वारी केल्याचे उल्लेख आढळतात. काही इतिहासकारांच्या मते मीनांदर (इ. स. पू. १११–९०) यानेही साकेतवर आक्रमण केले होते. अलीकडे उत्खननांत उपलब्ध झालेल्या नाण्यांवरून दिमीत्रिअसच्या आक्रमणास काही अंशी आधार मिळतो. गुप्त काळापर्यंत (इ.स. ३२१–३५६) साकेतचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व होते आणि त्यावर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर परकीय आक्रमणांना साकेत बळी पडले. पुढे बाराव्या शतकात मुसलमानांनी अनेक आक्रमणे या प्रदेशावर केली. शहाबुद्दीन घोरीने इ. स. ११९३ मध्ये कोसल जिंकून घेतले. तेव्हापासून १८५६ मध्ये तो प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत साकेत इस्लामी सत्तेखाली होते.

पहा : अयोध्या-१

देशपांडे, सु. र.