ओरिनोको नदी : दक्षिण अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी  २,०४९ किमी. पाणलोटक्षेत्र ९ लक्ष चौ. किमी. पेक्षा अधिक. व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडील पारीमा पर्वतात १,०७४ मी. उंचीवर हिचा उगम होतो. सुरुवातीस ही पश्चिमवाहिनी असून सुरुवातीच्या ५० किमी. अंतरात ती ३०० मी. खाली येते. त्यामुळे तेथे अनेक द्रुतवाह आणि धबधबे आहेत. पारीमाला वळसा घालून ओरिनोको उत्तरेकडे सु. ३२० किमी. वाहते येथे ती व्हेनेझुएला आणि कोलंबिया या देशांची हद्द बनली आहे. त्यानंतर ओरिनोको पूर्ववाहिनी होते. दक्षिणेकडील गियाना पठार व उत्तरेकडील लानोजचा गवताळ प्रदेश यांच्यामधून वहात ती त्रिनिदाद बेटाजवळ अनेक मुखांनी अटलांटिकला मिळते. या त्रिभुजप्रदेशातील बेटांचे क्षेत्रफळ सु. १३,००० चौ. किमी. असून ओरिनोको मुखाची रुंदी ३२ किमी. आहे. उगमापासून १६० किमी. वर हिची रुंदी ५२ मी. असून कासीक्यारे नदी संगमाशी ४०२ मी. आणि स्यूदाद बोलिव्हार या ओरिनोकोवरील प्रमुख शहराजवळ तिची रुंदी ८ किमी. होते. ओरिनोकोच्या मधल्या टप्प्यात अनेक बेटे निर्माण झाली आहेत. व्हेनेझुएलाचा चारपंचमांश आणि कोलंबियाचा एकचतुर्थांश प्रदेश ओरिनोको नदीसंहतीने व्यापला आहे. ओरिनोकोच्या मधल्या आणि खालच्या टप्प्यांत तिला सात मोठ्या उपनद्या मिळाल्या आहेत. ब्राझील सरहद्दीवरून कारोनी, बेंत्वारी आणि कौरा या उपनद्या मिळाल्या असून त्यांपैकी कारोनी सर्वांत मोठी आहे. पश्चिमेच्या अँडीजवरून येणाऱ्या आपूरे, आरौका, मेटा आणि ग्वाव्ह्यारे या मोठ्या व महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ओरिनोको मुखापासून ८०० किमी. पर्यंत जलवाहतुकीस उपयुक्त असून तिच्या परिसरातील लोखंडखाणींमुळे हा मार्ग महत्त्वाचा आहे. स्पॅनिश वसाहतकालापासून ओरिनोकोबाबत संशोधन चालले असले, तरी ओरिनोकोच्या उगमाचा शोध १९५१ मधील समन्वेषणात लागला.

शाह,  र. रू.