मैदान : (प्लेन). भूगोलातील या संज्ञेचा अर्थ सामान्यतः सखल सपाट व विस्तीर्ण भूप्रदेश असा होतो. ही लक्षणे अगदी काटेकोर नाहीत. सखल म्हणजे समुद्रसपाटीपासून सु. २०० मि पर्यंत उंचीचा प्रवेश असा संकेत असला, तरी अमेरिकेतील रॉकी पर्वत व मिसिसिपी नदी यांदरम्यानच्या ‘ग्रेट प्लेन्स’ या मैदानाची उंची पश्चिमेकडे सस. पासून १,५०० मी. पेक्षाही जास्त आहे. याउलट कॅस्पियन, मृत समुद्र यांच्याभोवतीचे प्रदेश, ॲटलास पर्वतापर्यंतचा दक्षिणेकडील काही प्रदेश, नेदर्लंड्‌सचा काही भाग हे तर सस. पेक्षा खालीच आहेत. सपाट म्हणजे अगदी थोडाही उंचसखलपणा नसलेली मैदाने क्वचितच असतात बहुतक मैदाने उतरती, थोडीशी उंचसखल, त्यांवरून काही ठिकाणी डोंगरांच्या ओळीही गेलेल्या असतात. विस्तीर्ण यालाही अमुकच क्षेत्रफळापर्यंतचा, असा काटेकोर अर्थ नाही. कित्येक मैदाने ऊर्मिल असली, तरी त्यांचा उतार मात्र सौम्यच असतो.

सर्व मैदाने सारख्याच प्रकारची असतील असेही नाही. ती कशी अस्तित्वात आली, यावरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. मैदानांचे प्रमुख वर्ग तीन : (१) भरीची मैदाने, (२) झिजेची मैदाने आणि (३) किनारपट्टीची मैदाने.

(१) भरीची मैदाने : गाळ मैदाने, हिमस्तरजन्य मैदाने, वायुजन्य अथवा लोएस मैदाने व सरोजन्य मैदाने, असे या वर्गीतील मैदानांचे प्रकार आहेत.

गाळ मैदाने : डोंगराळ भागांतून नद्यांनी आणि प्रवाहांनी वाहून आणलेला गाळ साचून गाळ मैदाने निर्माण होतात. डोंगराळ भाग संपला की, प्रवाहाचा वेग एकदम कमी होतो आणि त्याने आणलेले डबर डोंगरपायथ्याच्या प्रदेशात पंख्याच्या आकारात पसरत जाते आणि शेजारशेजारचे गाळपंखे एकमेकांत मिसळून जाऊन डोंगरपायथ्याची मैदाने निर्माण होतात. भारतात अशा मैदानांना ‘भाबर’ म्हणतात. निमओसाड प्रदेशात गाळपंखे विशेष चांगले दिसून येतात कारण तेथे मुख्य प्रवाह फक्त पावसाळ्यातच वाहतो. अशा मैदानांत जेथेजेथे प्रवाहांचे किंवा विहिरींचे पाणी मिळू शकते, तेथेतेथे गावे वसतात. हिमालयाच्या पायथ्याच्या मैदानात या प्रकारे गावे वसलेली आहेत. अमेरिकेच्या रॉकी पर्वताच्या पश्चिमेस ग्रेट बेसिन या प्रदेशात आणि कॅलिफोर्नियाच्या सॅन वाकीन व सॅक्रेमेंटो नद्यांच्या खोऱ्यांतही अशी गावे वसलेली आहेत.

नदीच्या मधल्या टप्प्यात तिचा वेग आणखी कमी होऊन तिने आणलेले डबर तिच्या तळावर व काठांवर पसरले जाते. पुराच्या वेळी नदीचे पाणी काठांवर लांबपर्यंत पसरते आणि पूर ओसरला म्हणजे गाळ बराचसा खाली बसून तेथे पूरमैदान निर्माण होते. प्रत्येक पुराच्या वेळी काठांवर अधिकच गाळ साचत जातो. मोठ्या खड्यांचा गाळ अगदी काठावर व बारीक गाळ दूरवर पसरला जाऊन काठांवर कित्येकदा पूरतट निर्माण होतात. तळाशी गाळ साठून तळ उंचावतो आणि पूरतटाबाहेरचा प्रदेश नदीतळाच्या उंचीपेक्षा कमी उंच राहून पाण्याच्या जोरामुळे पूरतट भंगण्याचा संभव असतो. हा प्रकार चीनच्या ह्‌वांग हो नदीबाबत प्रकर्षाने दिसून येतो.

थोड्याही अडथळ्यामुळे प्रवाह दिशा बदलतो आणि मग नदी नागमोडी वळणांनी वाहू लागते. वळण फारच तीव्र होऊन प्रवाह ते मोडून पुढे जातो आणि वळणाचा तुटलेला भाग चंद्राकृती सरोवर म्हणून राहतो. वळणांचा अंतर्वक्र भाग प्रवाहामुळे झिजतो आणि बहिर्वक्र भागावर गाळ पसरून तेथे सपाट गाळप्रदेश निर्माण होतो.

पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे पूरमैदानाचा प्रदेश उचलला गेला, तर प्रवाहाचे खननकार्य पुन्हा जोरात सुरू होऊन नदीत पूर मैदाने निर्माण होतात. त्यामुळे नवीन पूरमैदानांच्या पलीकडे आधीचे उत्थित मैदान पायरीसारखे दिसते. ही क्रिया वारंवर घडून अशा अनेक उत्थित मैदानांच्या वेदिका म्हणजे पायऱ्यापायऱ्या दिसून येतात.

नदीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवाहाचा वेग अगदीच कमी होतो. मुखाजवळ वेग जवळजवळ शून्य होऊन तेथे गाळ साठू लागतो. त्याच्या अडथळ्यामुळे प्रवाह दुभंगून दोन्ही बाजूंनी वाहू लागतो. ही क्रिया वारंवार घडून नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो [→ नदी त्रिभुज प्रदेश]. नदीच्या मधल्या व खालच्या टप्प्यांत पूरतट फुटल्यामुळे जसा अनर्थ ओढवतो, तसा नदीने प्रवाह बदलल्यामुळेही ओढवतो. हिमालयातून वेगाने येणारी कोसी नदी गंगेच्या मैदानात येताच तिचा वेग कमी होऊन तिने आणलेला गाळ तेथेच साचून तिचा प्रवाह आतापर्यंत शंभरांहून अधिक किमी. बाजूला सरकला आहे. ह्‌वांग हो नदी हल्ली जेथे समुद्राला मिळते, त्याच्या दक्षिणेस (शँटुंगच्या द्वीपकल्पाच्याही दक्षिणेस) पूर्वी ती समुद्राला मिळाली होती. काही वेळा नदीच्या प्रवाह मुद्दामच वळवून दुसरीकडे नेतात. रशियात अमुदर्या वळवून कॅस्पियनकडे नेली आहे.

अशी विस्तीर्ण गाळ मैदाने गंगा, सिंधू, ह्‌वांग हो, यांगत्सी, सिक्यांग, मेकाँग, इरावती, नाईल, काँगो, ॲमेझॉन, प्लेट, मरी-डार्लिंग, मिसिसिपी, टायग्रिस, युफ्रेटीस, पो इ. अनेक नद्यांच्या खोऱ्यांत निर्माण झालेली आहेत. हे प्रदेश अत्यंत दाट लोकवस्तीचे आहेत.

हिमस्तरजन्य मैदाने : हिमयुगाच्या काळात विस्तीर्ण भूप्रदेश बर्फाच्या थरांखाली गाडले गेले होते. कालांतराने या हिमस्तराच्या आघाडीचा भाग वितळून त्याखालील प्रदेश मोकळा होऊ लागला व हिमस्तर मागे मागे हटू लागला. तेव्हा त्याच्या घर्षणाने खालील जमीन सरकली जाऊ लागली. हा झिजेचा प्रकार होय. परंतु बर्फ वितळून त्यात अडकून राहिलेले खडकांचे तुकडे, दगडमाती वगैरे डबर मोकळ्या झालेल्या जमिनीवर पसरले जाऊन मैदानी प्रदेश बनला. त्यावर पसरले गेलेले दगडगोटे इ. पदार्थ त्या भागातल्या मूळच्या दगडगोट्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांत मोठमोठे घोंडेही असतात. या मैदानांच्या पृष्ठांवरील पदार्थ खालच्या मूळ खडकांपेक्षा वेगळे असतात. ही टिल मैदाने सौम्य ऊर्मिल, लांब-रुंद व बुटक्या टेकड्या आणि उथळ, खोलगट भाग एकाआड एक अशी बनलेली आसतात. त्यांतील पाण्याला बाहेर पडता आले नाही म्हणजे तेथे पाणथळ व मूर (जीर्णक भृ) प्रदेश निर्माण होतात. हा प्रकार इंग्लंडच्या उत्तर पेनाइन मूरलँडमध्ये व अमेरिकेच्या न्यू इंग्लंड राज्यात दिसून येतो. हिमनदीने आणलेले हिमोढ तिच्या बाजूंवर व विशेषतः तिच्या मुखाशी वितळणाऱ्या बर्फाच्या भागात अर्धचंद्राकृती बांधाच्या रूपाने पसरतात. यातही अनेक प्रकारचे लहानमोठे दगडगोटे आढळतात. उत्क्षालित मैदानांवर खडे, वाळू व माती यांची थरांवर थर असतात. त्यांत लहान दगडधोंडेही अडकलेले असतात. अशा प्रदेशांत खड्डे व खोलगट भागात प्रथम साचलेले बर्फ वितळून तेथे पाण्याने भरून गेलेले हिमगर्त दिसून येतात. हे प्रदेश शेतीच्या दृष्टीने निरुपयोगी असले, तरी तेथे बटाट्यासारखी पिके चांगली येतात.


वायुजन्य अथवा लोएस मैदाने : एखाद्या शुष्क प्रदेशातील बारीक कणांची माती वाऱ्याबरोबर उडून जाते व दुसऱ्या प्रदेशात साचून मैदान निर्माण होते. अशा मैदानास वातज, वायुजन्य अथवा लोएस मैदान म्हणतात. येथील माती रासायनिक दृष्ट्या अपघटित नसल्यामुळे ती अतिशय सुपीक व सच्छिद्र असते. वायव्य चीनमधील लोएस मैदाने सुप्रसिद्ध आहेत. रशिया, तुर्कस्तान व अमेरिकेतील मिसिसिपीचे खोरे यांतही अशी मैदाने आढळतात. स्टेप प्रदेशातील लोएस मैदानांची माती खूप खोलपर्यंत असते.

यांशिवाय आफ्रिकेतील सहारा विभागात आणि ऑस्ट्रेलियात वाळूची मैदाने आढळतात. वाऱ्याने वाळू वाहून जाते व तिच्या एकमेकींस समांतर अशा टेकड्यांच्या रांगा बनतात. बारखान म्हणून ओळखले जाणारे अर्धचंद्राकृती वालुकागिरी अशा प्रदेशात दिसून येतात. पाणी उपलब्ध असेल तेथे हे प्रदेश फार उपयुक्त असतात.

सरोजन्य मैदाने : जमिनीच्या खोलगट भागात पाणी साचून लहान मोठी सरोवरे बनतात. सरोवराला एखादी नदी येऊन मिळत असेल, तर ती मिळताच तिचा वेग नाहीसा होऊन तिने आणलेला गाळ सरोवराच्या तळावर साचू लागतो आणि कालांतराने त्या गाळाने सरोवर भरून तेथे मैदान निर्माण होते. सरोवराच्या पाण्याचा निचरा होण्यास वाट नसेल, त्यात नदीचे पाणी येत नसेल, तर ते शुष्क होऊन तेथे मैदान दिसू लागते. हिमानी क्रियेच्या किंवा शुष्क प्रदेशात अशी सरोजन्य मैदाने आढळतात. वायव्य यूरोप, कॅनडा व अमेरिकेतील मोठ्या सरोवरांभोवतीच्या प्रदेशांत अशी सरोवरे विखुरलेली दिसतात. शुष्क व निमओसाड भागांतील अंतर्देशीय जलनिःसारण प्रदेशांत खारी सरोवरे असतात.ती शुष्क झाली म्हणजे तेथे सपाट मैदाने तयार होतात. त्यांवर मिठाचे वा अन्य क्षारांचे थर दिसून येतात.

सरोजन्य मैदानांचा पृष्ठभाग नवोत्थित किनारी मैदानांसारखा अगदी सपाट असतो आणि त्यात गाळ, चिकणमाती, वाळू यांचे एकाआड एक थर आढळतात, येथील मृदा चांगली असते परंतु जलनिःसारण नीट नसल्यामुळे काही ठिकाणी पाणथळी आढळतात. जेथे पीट हा कोळशाचा प्राथमिक अवस्थेतील साठा आढळतो, तो भाग वनस्पतीच्या वाढीस चांगला असतो.

 अमेरिकेतील रेड नदीचे खोरे म्हणजे प्राचीन आगास्सीझ नावाचे सरोवर होते. ते आता गव्हाच्या उत्पादनाचे मोठेच क्षेत्र बनले आहे. भारतातील काश्मीर खोरे हे सरोजन्य मैदानाचे चांगले उदाहरण आहे.

(२) झिजेची मैदाने : विदारण व क्षरण या क्रियांमुळे ही मैदाने निर्माण होतात. वाहते पाणी, सरकता बर्फ, भूमिगत पाणी व वारा ही क्षरणकारके आहेत. त्यांच्या कार्यामुळे झिजेची मैदाने अस्तित्वात येतात.

स्थलीप्राय किंवा पाटकल्प मैदाने :डोंगराळ प्रदेश झिजूनझिजून तेथे एक सौम्य ऊर्मिल सपाट प्रदेश दिसू लागतो. त्यावर मधूनमधून अगदी कठिण दगडाचे मोनॅडनॉक नावाचे टेकडीवजा कमी झिजलेले भाग उरलेले असतात. येथे नदीने आधार प्रतल गाठलेले असते. जे काही उंचवटे मधूनमधून विखुरलेले असतात. ते पूर्ण झीज व पावलेले कठिण खडकांचे असतात. तथापि अगदी पूर्ण झालेले पाटकल्प जगात कोठेही दिसून येत नाहीत. आदर्श स्थलीप्रायांच्या जवळजवळ पोचलेला भूप्रदेश दक्षिण फिनलंडमध्ये आढळतो. नदी प्रदेशाला सपाट करीत असताना भूपृष्ठाची काहीतरी हालचाल होऊन ते वर उचलेले जाते मग क्षरणप्रक्रियेचे पुनरूज्जीवन होते. पाटकल्पामधून वाहणाऱ्या नदीला पुन्हा झिजवण्याचा जोर येत नाही. पाटकल्प भूमीवर विदारणामुळे आलेल्या आणि नदीने आणून टाकलेल्या खडक तुकड्यांचा खोल थर असतो. पाटकल्पाचा उतार मागे उंच प्रदेशापर्यंत पोचलेला असतो.

भारतातील अरवली पर्वताचा प्रदेश, मिसिसिपीच्या खोऱ्याचा वरचा भाग, ॲमेझॉनच्या खोऱ्याचा काही भाग, इंग्लंडच्या पूर्वेकडील प्रदेश, रशियाची मध्यवर्ती मैदाने ही पाटकल्पाची चांगली उदाहरणे आहेत.

पॅरिसच्या आणि लंडनच्याभोवतीचा अनुक्रमे सेन व टेम्स नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा जास्त कठिण खडक आणि सापेक्षतः मऊ थर एकाआड एक राहून बशीसारखा होतो. उंच कटक आणि सखल भाग यांच्या समक्रेंद्ररचनेमुळे ‘क्वेस्टा’ प्रकारची ही मैदाने तयार होतात.


नदीच्या सुरुवातीच्या भागात तिच्या वेगामुळे आणि जोरामुळे क्षरणकार्य वेगाने होऊन इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या दऱ्या व त्यांदरम्यान उंच, रुंद भूप्रदेश असे मैदानाचे रूप दिसते, तर तिच्या अंतिम अवस्थेत सौम्य उताराचे ऊर्मिल प्रदेश दिसून येतात.

चुनखडकाच्या व खडूच्या प्रदेशांत मैदानांच्या पृष्ठावर प्रवाह दिसत नाहीत. त्यामुळे नद्यांची खोरी आणि उंचसखल प्रदेश दिसून येत नाहीत. तेथे भूपृष्ठावर सर्वत्र खाचखळगे, गुहा आणि चुनखडकांचे वाकडेतिकडे कटक दिसतात. पाणी जमिनीखालून वाहते आणि वरचे छप्पर कोसळल्यामुळे नैसर्गिक पूल आणि विवरे दृष्टीस पडतात. अशा प्रदेशास ‘कार्स्ट भूमिस्वरूप’ म्हणतात. येथील मैदानांस ‘कार्स्ट मैदाने’ म्हतात. यूगोस्लाव्हियात एड्रिॲटिक समुद्राच्या किनाऱ्याला समांतर भागात ही कार्स्ट भूमिस्वरूपे प्रामुख्याने दिसून येतात.

अमेरिकेतील फ्लॉरिडा द्वीपकल्प, क्यूबा, यूकातान आणि दक्षिण फ्रान्स येथे प्रथम भूपृष्ठावर वाहणारे प्रवाह आणि सरोवरे दिसतात. नंतरच्या अवस्थेत विवरे व चुनखडक विरघळून झालेले विस्तृत प्रदेश बनतात. तेथे अधूनमधून शेतीही करता येते. त्यानंतरच्या अवस्थेत खरे कार्स्ट मैदान तयार झालेले दिसते.

हिमानी क्रियाजन्य मैदाने : हिमनदी किंवा हिमस्तर मागे हटत असताना भर कशी पडते, ते भरीची मैदाने या विभागात आले आहे. परंतु भरीपेक्षाही या क्रियेने होणारी झीज अधिक महत्त्वाची आहे. बर्फाच्या तळाला धारदार कडा व टोकेही असतात आणि त्यात खडकांचे ओबडधोबड तुकडेही अडकलेले असतात. त्यांचे खालच्या जमिनीवर घर्षण होऊन ती खरवडली जाते आणि तेथे मैदानी प्रदेश निर्माण होतो. उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग आणि यूरेशियाचा वायव्य भाग, ही या प्रकारची मैदाने होत. कॅनडातील लॉरेन्शिया मैदान व स्वीडन आणि फिनलंड येथील मैदाने या प्रकाराची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. ती ऊर्मिल असून त्यांवर सरोवरे आढळतात. उंच भागात जमिनीवर मृदा थोडीच असते आणि सखल भागात पाणथळी आढळतात. येथे अनेक रुतणी किंवा पंकिल खळगे आणि अनूप म्हणजे दलदली पुष्कळ आढळतात. येथील टेकड्या गोलाकार व खोरी रुंद असतात.त्यांचे तळ ओबडधोबड, झिजलेले व लांबट चरे पडलेले असतात.

मरुस्थली : ही ओसाड प्रदेशातील मैदाने होत. येथे विदारण, वायुजन्य क्षरण आणि खंडित पण वेगवान प्रवाह यांचा प्रभाव दिसून येतो. पाऊस, आर्द्रता यांच्या कमतरतेमुळे कायिक व रासायनिक विदारण थोडेच होते. पाऊस पडतो तेव्हा मात्र तो जोरदार व विनाशकारी असतो. कोरडी पडलेली प्रवाहपात्रे भरभरून वाहतात आणि भूमीची नासाडी करतात. वनस्पती फारशा नसतातच आणि त्यामुळे वायुजन्य क्षरण अधिकच तीव्र होते. बहुतेक मरुस्थलींमध्ये अंतर्वाही जलनिःसारण प्रवेश व त्यातील खोलगट भागात साचलेली खारी सरोवरे आढळतात. पाणी आटून ती शुष्क झाली म्हणजे, त्यांच्या पृष्ठावर मिठाचा थर येतो. वारा आणि त्याबरोबर वाहून जाणारे वाळूचे किंवा खडकाचे तुकडे यांच्या घर्षणाने तेथील उंचसखल भागाला कधीकधी विचित्र आकार प्राप्त होतात. काही वेळा तर विशिष्ट घर्षण प्रकाराने तेथील दगडगोट्यांवर साचलेला गंज वाऱ्याने घासला जाऊन ते गुळगुळीत व चकचकीत दिसतात.

(३) किनारपट्टीची मैदाने : सागरी लाटांच्या आघातांनी सुट्या झालेल्या आणि नद्यांनी आणलेल्या गाळाने व डबराने ही मैदाने बनतात. यांतील काही पदार्थ किनाऱ्यावर साठून तेथे पुळणी बनतात. बाकीचे किनाऱ्यापासून आत सागरतळावर थरांच्या रूपाने साठतात. ही समुद्रबूड जमीन होय. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे या उथळ सागरीतळाचे उत्थान होऊन तो पाण्याबाहेर किनारी मैदान म्हणून अस्तित्वात येतो. एका बाजूस कलणे किंवा वलीकरण या क्रिया न झाल्यास या मैदानाचे थर अगदी आडवे, क्षितिजसमांतर आढळतात. त्यात गाळ व माती वरच्या थरात, त्याखाली वाळू आणि त्याखाली ओबडधोबड खडे वगैरेंचे थर असतात. किनारी प्रदेश उंच असतो तोपर्यंत प्रवाहांच्या जोराने जाडाजुडा माल समुद्रात आतपर्यंत जाऊ शकतो परंतु नतंर क्षरणक्रियेने उंची कमी झाल्यास प्रवाह फक्त बारीक गाळ व रेती आतवर नेऊ शकतात. हे क्षरणचक्राला धरूनच आहे.

या मैदानांच्या पृष्ठावरील थर बहुधा एकसंध झालेले नसून सैल असतात, त्यामुळे ते सच्छिद्र असून भूमिगत पाणी त्यांतून सहज वाहू शकते. तथापि मातीच्या थराने सच्छिद्रता जाते आणि मग कारंजीविहिरींनी पाणी मिळू शकते. येथील उतार समुद्राकडे सौम्य असून जो जो समुद्रापासून दूर जावे, तो तो मृदा अधिकाधिक उपयुक्त होत जाते. या मैदानांचा किनारी भाग भरतीच्या वेळी पुष्कळदा पाण्याखाली जातो. मैदानांवर दलदली व खारकच्छ आढळतात.

सर्व भूंखंडांभोवती किनारी मैदाने आहेत परंतु जगातील सर्वांत मोठे किनारी मैदान सायबीरियाच्या उत्तर आणि पश्चिम भागात आहे. त्याची कमाल रुंदी १,५०० किमी. पर्यंत आहे. यूरोपात बेल्जियम, नेदर्लंड्स व जर्मनी येथे, उत्तर अमेरिकेत न्यूयॉर्कपासून फ्लॉरिडापर्यंत व तेथून पुढे मेक्सिकोच्या आखातापर्यंत किनारी मैदान आहे. त्याची रुंदी चार-पाच किमी. पासून ८० किमी. पर्यंत आहे. पूर्व किनाऱ्यापासून आत जेथे हल्ली धबधब्याची रेषा आहे, तेथपर्यंत पूर्वी किनारा होता. ॲपालॅचिअन पर्वतावरून वाहून आलेल्या गाळाने बनलेली समुद्रबूड जमीन वारंवार पावून हल्लीचे किनारी मैदान निर्माण झाले आहे. किंबहुना सबंध उत्तर अमेरिका खंडाचा मोठा भाग एकेकाळी किनारी मैदानच होता. हा भाग वारंवार उत्थान पावून आणि नंतर इतर कारकांचा परिणाम होऊन बनलेला आहे. वेगवेगळ्या काळांत निर्माण झालेल्या किनारी मैदानांचे पट्टे या अटलांटिक किनारी मैदानावर दिसून येतात.


उत्तर अमेरिका खंडाच्या प्रचंड मैदाने प्रदेशाने त्या खंडाचा मध्य भाग व्यापून टाकला आहे. हा प्रदेश वारंवार जलमय व उत्थित झाल्यामुळे तो खरोखरच किनारी मैदानासारखाच आहे परंतु नंतर क्षरणक्रियेने आणि उत्तरेकडे हिमानीक्रियेने त्याचे स्वरूप बदललेले दिसते. पूर्वींचे सागरी अवशेष या प्रदेशात सापडतात. रॉकी पर्वताजवळ या प्रदेशाची उंची सस. पासून सु. २,००० मी. आहे. तेथून सु. १,२००–१,३०० किमी. दूर असलेल्या मिसिसिपी नदीपर्यंत तो हळूहळू उतरत जातो. मिसिसिपीच्या पूर्वेस ॲपालॅचिअन पर्वतापर्यंत हा प्रदेश सु. ७० मी. पर्यंत उंचावत जातो. हा मिसिसिपीच्या पूर्वेचा मैदानी प्रदेश वृक्षरहित व खोलवर मुळे जाणाऱ्या गवताने भरलेला आहे. त्याला प्रेअरी असे नाव आहे. जगातील समृद्ध गवताळ प्रदेशात, मोठा गहू उत्पादक प्रदेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. [→ गवताळ प्रदेश].

मैदाने व मानवी जीवन : मैदाने, विशेषतः भरीची गाळ मैदाने, सुपीक असल्यामुळे तेथे शेती व्यवसाय चांगला चालतो नद्या पाणी पुरवितात किंवा कृत्रिम पाणीपुरवठा करता येतो. भूमी सपाट व गाळमातीची असल्यामुळे रस्ते, लोहमार्ग थोड्या श्रमाने व खर्चाने बांधता येतात. कारखाने व शहरे यांची वाढ होते. मानवी जीवन व संस्कृती संपन्न व प्रगल्भ होत जातात. म्हणूनच मैदानी प्रदेश हे मानवी संस्कृतीचे उगमस्थान मानले जाते. हे प्रदेश अत्यंत दाट लोकवस्तीचे असतात. किनारी मैदाने अरुंद असली, तर तेथे मानवी जीवन अंतर्गत सुपीक मैदानाइतके समृद्ध नसते, तथापि मत्स्यव्यवसायामुळे आणि काही ठिकाणी फळबागांमुळे तेही प्रदेश समृद्ध होतात. मात्र जगातील सर्वच मैदाने लोकवस्तीला अनुकूल आहेत असे नाही. फार उष्ण, फार थंड, फार पावसाचे किंवा अगदी रुक्ष प्रदेश मैदानी असूनही ओसाड व अविकसित राहतात, हे विषुववृत्तीय अरण्ये, सूचिपर्णी अरण्याचा उत्तर भाग, टंड्रा प्रदेश, सहारासारखी वाळवंटे किंवा ओसाड आणि निमओसाड प्रदेश यांवरून दिसून येते. खनिजांमुळे मात्र असे प्रदेशही ऊर्जितावस्थेस येऊ शकतात.

भारतीय मैदाने : भारतीय मैदान (गंगा-सिंधूचे मैदान) हे जगातील विस्तीर्ण मैदानांपैकी एक प्रसिद्ध व वैशिष्ट्यपूर्ण मैदान आहे. गंगा-सिंधूचे हे विशाल मैदान पश्चिमेस पंजाब व राजस्थानपासून पूर्वेस उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल राज्ये ओलांडून थेट गंगेच्या त्रिभूज प्रदेशापर्यंत ६,५२,००० चौ. किमी. विस्तारलेले आहे. त्याला जोडूनच ब्रह्मपुत्रा नदी गारो टेकड्यांना वळसा घालून दक्षिणेस वळते तेथपासून, पूर्वेस सदियापर्यंत ६०० किमी. पसरलेला ब्रह्मपुत्रा नदीचा चिंचोळा मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशाचा पश्चिमेकडील पंजाबच्या मैदानाचा भाग सामान्यतः नैर्ऋत्येकडे उतरता होत गेला असून त्याच्या सीमेवर सिंधूची उपनदी सतलज आहे. त्यापलीकडील सिंधूच्या मैदानाचा भाग पाकिस्तानात गेला आहे. पंजाबचे मैदान दक्षिणेस राजस्थानच्या मैदानात मिसळून गेले आहे. गंगेचे मैदान प्रथम दक्षिणेस, मग आग्नेयीस आणि नंतर पूर्वेस उतरत गेले आहे. ब्रह्मपुत्रेच्या मैदानास मिळाल्यानंतर ते बंगालच्या उपसागरापर्यंत दक्षिणेकडे उतरत गेले आहे. उत्तरेकडील पर्वतीय प्रवेश, पश्चिमेकडील अरवलीचा प्रदेश व पूर्वेचा राजमहाल व गारो टेकड्यांचा प्रदेश यांचा परिणाम स्थानिक उताराच्या दिशेवर झालेला दिसून येतो. याचा एकूण उतार अत्यंत सौम्य आहे. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाची उंची जवळजवळ समुद्रसपाटी इतकीच आहे तर पंजाबच्या मैदानाची उंची फक्त २०० मी. पर्यंतच आहे. यामुळे हे अगदी सपाटच वाटते.

भारतीय मैदान हे गाळ-मैदानाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्यांनी आणलेल्या गाळाने ते बनलेले आहे. त्याची खोली गंगेच्या भागात सर्वांत जास्त म्हणजे ४०० मी. आहे. पंजाब व राजस्थानात ती सर्वांत कमी आहे.

प्राचीन काळी हिमालय आणि भारताचा मध्यवर्ती उंच प्रदेश यांदरम्यान एक विस्तीर्ण खोल द्रोणीप्रदेश होता. तो गाळाने भरून येऊन प्लाइस्टोसीन कालखंड आणि रिसेंट काळ यांदरम्यान हे मैदान बनले आहे. हा द्रोणीप्रदेश मध्यवर्ती कठिण उंच प्रदेशाने हिमालयाच्या वलीकरणाला दिलेल्या रेट्यामुळे बनला असावा किंवा ती एक साधी खचदरीच असावी, असे समजले जाते. एकीकडे उंच होत जाणारा हिमालय आणि दुसरीकडे खचत जाणारे गाळ-मैदान यांत एक प्रकारचा समस्थायी समतोल साधला जात असावा. या मैदानाचा एक तृतीयांश भाग पश्चिमेच्या रुक्ष प्रदेशाने, दुसरा एक तृतीयांश भाग उत्तर प्रदेशाने व उरलेला भाग पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगाल यांत सारखा वाटला गेला आहे.

या मैदानाची उत्तरसीमा हिमालयाने रेखीव बनलेली आहे, तर दक्षिणसीमा मध्यवर्ती उंच प्रदेशामुळे असम बनलेली आहे. उत्तर सीमेवर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेले दोन स्पष्ट पट्टे दिसतात. हिमालयाच्या पायथ्याचा भाग जाडेभरडे खडे आणि अतिशय सच्छिद्र थर यांनी बनलेला असल्याने तेथे हिमालयातून आलेले छोटे प्रवाह जमिनीत गुप्त होतात. याला पंजाबात ‘भाबर’ म्हणतात. याच्या दक्षिणेकडील पट्‌ट्यात हे गुप्त प्रवाह बाहेर येऊन ‘तराई’ चा दलदलीचा अरण्यमय प्रदेश निर्माण झाला आहे. जुन्या गाळाने बनलेल्या प्रदेशास ‘बांगर’ म्हणतात व नवीन बनलेल्या सखल प्रदेशास उत्तर प्रदेशात ‘खादर’ व पंजाबात ‘बेत’ म्हणतात. ही नदीकाठची सखल पूरमैदाने होत.

राजस्थानचे मैदान हा पश्चिमेकडील वैराण प्रदेश आहे. हा पूर्व-पश्चिम ३०० किमी., दक्षिण-उत्तर ६४० किमी. पसरला असून त्याचे क्षेत्रफळ १,७५,००० चौ. किमी. आहे. याचा पश्चिम उतार सिंधू नदीकडे व दक्षिण उतार कच्छच्या रणाकडे आहे. पंजाबची कोरडी मैदाने दक्षिणेकडे या वैराण प्रदेशात मिळून जातात. सु. १,००० वर्षांपूर्वी हा प्रदेश असा रुक्ष नव्हता. राजस्थानच्या नद्या या प्रदेशावरून कच्छच्या रणाकडे वाहत होत्या. सु. अर्ध्याहून जास्त प्रदेशाची उंची १५० ते ३०० मी. असून बिकानेरच्या पूर्वेस असलेला सु. एकतृतीयांश भाग ३०० ते ५०० मी. उंचीचा आहे. जैसलमीरच्या पश्चिमेस लूनी नदीच्या मोठ्या वळणाच्या दक्षिणेस काही खडकाळ टेकड्या १,००० मी. पर्यंत उंच आहेत. तथापि बहुतेक भूमी १०० मी. पर्यंत उतरते व लूनीच्या खालच्या टप्प्यात सर्वांत कमी उंचीचा (फक्त २० मी.) प्रदेश आहे. हा प्रदेश गंगा-सिंधू मैदानाचा भाग असला, तरी येथील प्रदेशाचा विकास इतर मैदानांच्या विकासचक्रापेक्षा अगदी वेगळा आहे. याचे कारण असे, की येथे पृष्ठ प्रवाहांवर वाऱ्याचा प्रभाव मोठा आहे. परंतु पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, भूमिगत पाणी आणि अरण्य प्रदेश यांच्या तपशीलवार अभ्यासाने हे वाळवंट किंवा ओसाड प्रदेश नाही, असे दिसून आले आहे. विहिरी किंवा कालवे यांचे पाणी उपलब्ध असेल, तर येथे गहू, ज्वारी, बाजरी यांचे चांगले पीक येऊ शकते. मौसमी काळात येथे काही ठिकाणी उत्तम गवत उगवते आणि त्यावर गुरे व शेळ्या-मेंढ्या यांचे कळप बाळगता येतात. येथे स्थलांतरी वाळू आणि अगदी कमी पाऊस असला, तरी याला ‘थरचे वाळवंट’ या नावापेक्षा पूर्वी रूढ असलेले ‘मरुस्थली’ हे नाव जास्त अन्वर्थक आहे. याचा पूर्वभाग अधिक आर्द्र व कमी वालुकामय आणि ‘स्टेप’ प्रकारच्या वनस्पतींनी युक्त आहे. पर्मो-कार्‌बॉनिफेरस ते प्लाइस्टोसीन काळापर्यंत हा प्रदेश समुद्राखाली होता. नंतर प्लाइस्टोसीन काळात त्याचे उत्थान होऊन तेथे नेहमीचे भरणचक्र सुरू झाले. सरस्वती, दृशद्‌वती आणि सतलज या नद्यांनी हा प्रदेश उपजाऊ बनविला होता. हनुमानगढच्या पूर्वेस २५ किमी. ते अनुपगढच्या पश्चिमेस १५ किमी. या भागात सध्या घग्गर म्हणून ओळखले जाणारे सरस्वतीचे कोरडे पात्र आहे. सुरतगढच्या पूर्वेस १५ किमी. वर दुसरे कोरडे पात्र मिळते ते दृशद्‌वतीचे असावे. सतलज नंतर सरस्वतीला मिळाली आणि हनुमानगढच्या पूर्वेस १० किमी. असलेले कोरडे पात्र हे सतलजचे पूर्वीचे पात्र असावे, असे समजले जाते. या प्रदेशात तूर्त फक्त लूनी ही एकच नदी आहे. ती अजमेरच्या नैर्ऋत्येस ५ किमी. वर अनासागरमध्ये उगम पावून पश्चिमेकडे ४५० किमी. वाहत जाऊन कच्छच्या रणास मिळते. बलोत्रापर्यंत तिचे पाणी गोड असेते, परंतु मुखाजवळ ते अगदी खारट असते. मुखाशी पूर्वीच्या अधिक पाण्याच्या काळात बनलेला छोटासा त्रिभुज प्रदेशही आहे. तिला शुक्री नावाची प्रमुख उपनदी आहे. तसेच अरवली पर्वतावरून आलेले अनेक छोटे प्रवाहही तिला मिळतात. या प्रदेशात पाण्याचे इतके दुर्भिक्ष आहे की, या नदीवरही बिलाराजवळ जसवंत सागर हे धरण बांधून ५,००० हे. जमीन ओलिताखाली आणली आहे.


या प्रदेशात भूमिगत पाणीही खारे असते. तथापि काही ठिकाणी सच्छिद्र थरात गोडे पाणीही मिळते. येथे अनेक खारी सरोवरे असून त्यांत सांभर हे सर्वांत मोठे सरोवर आहे. ते जयपूरच्या पश्चिमेस ६० किमी. असून पाऊस पडतो, तेव्हा त्याचा विस्तार ३०० चौ. किमी. होतो. कोरड्या ऋतूत जमिनीवर मिठाचे खडे चकाकतात. सांभर गावाच्या वायव्येस ८० किमी. वर दिडवाना व बलोत्राच्या वायव्येस १० किमी. वर पचपाद्रा ही आणखी दोन खारी सरोवरे आहेत. बिकानेरच्या ईशान्येस ७० किमी. वर लुंकाराने सार ताल हे खारे सरोवर आहे. या सरोवरांपासून दरवर्षी सु. ४,८०,००० टन मिठीचे उत्पादन होते.

सामान्यतः पश्चिम मरुस्थळी वालुकामय व पूर्व मरुस्थळी खडकाळ आहे. २६º उ. ते २९º उ. यांदरम्यान राजस्थानच्या सीमेवरील १०० किमी. रुंदीच्या पट्ट्याने वालुकामय ओसाड प्रदेशाचा तीन चतुर्थांशाहून अधिक भाग व्यापला असून येथे पाऊस १० ते २० सेंमी. पडतो. जिकडेतिकडे वालुकागिरी दिसतात. त्यांस तेथे ‘ध्रियन’ म्हणतात. जैसलमीरच्या मैदानावर खंडित, छोटे प्रवाह दिसतात. कोरड्या पात्रात भूमिगत पाणी सहज मिळू शकते म्हणून तेथे वस्ती झालेली दिसते जैसलमीरच्या उत्तरेस अनेक अंतर्वाही सरोवरे आहेत. ती बहुधा कोरडीच असतात. बारमेर भागात ५० ते १०० मी. उंचीचे बारखान वालुकागिरी आहेत. ते वाऱ्याने सहसा स्थलांतरित होत नाहीत. बारमेर ते भिमरलाई रेल्वे अशा अनेक बारखानांस ओलांडून जाते.

अरवलीच्या पश्चिमेचा बागर नावाचा ‘स्टेप’ प्रदेश पुढे मरुस्थलीत विलीन होतो. तेथे वालुकागिरी थोडे आणि छोटे प्रवाह पुष्कळ आहेत. येथील अधिक सुपीक भागांस ‘रोही’ म्हणतात. ते उत्तर व मध्य भागांत आढळतात. उत्तरेकडील गंगा मैदान आणि लूनीच्या खोऱ्यातील दक्षिणेचे गोडवार मैदान हे बांगर प्रदेशातील सर्वांत जास्त शेती उत्पादक भाग आहेत. त्यांना गंगा कालवा व लूनीच्या उगमप्रवाह यांचे पाणी मिळते. राजस्थाच्या सर्वांत उंच टेकड्या या भागात आढळतात. त्यांपैकी बऱ्याच टेकड्या वाळूखाली गाडल्या गेल्या आहेत. तथापि पूर्वीच्या नद्यांचा प्रभाव तेथे जाणवतो.

पंजाबचे मैदान : यमुनेच्या पश्चिमेपासून रावीपर्यंत पसरलेले हे मैदान दक्षिणेकडे उतरत गेले आहे. सिंधूच्या उपनद्या रावी, बिआस आणि सतलज यांनी आणलेल्या गाळाने निर्माण झालेले हे मैदान गाळाखाली गाडलेल्या अरवलीच्या उत्तर भागामुळे दक्षिणेकडे उतरते झाले असावे. लुधियाना आणि जलंदर जिल्ह्यांतून पश्चिमेकडे २०० किमी. गेल्यावर सतलज नैर्ऋत्येकडे वळते आणि भारतात आणखी १,१०० किमी. वाहते. नंतर ती पाकिस्तानात जाते, ती पूर्वी एक स्वतंत्र नदी असून यमुना तिला मिळत होती आणि तिच्या काठी समृद्ध वसाहती होत्या, असा पुरावा मिळतो. बिआस पंजाबमधून १५० किमी. जाऊन हरीके येथे सतलजला मिळते. तीही पूर्वी स्वतंत्रपणे पश्चिमेकडे रावी या येथील सर्वात लहान नदीकडे वाहत होती. सरस्वती व दृशद्‌वती यांचा उल्लेख पूर्वी आलाच आहे.

होशियारपूरच्या २०० ते २४० मी. उंचीच्या मैदानावरील बाकीचा प्रदेश अत्यंत सपाट आहे. बेत नावाचे सखल पूरमैदानाचे पट्टे सहज ओळखू येतात. नद्यांनी पात्र बदलल्यामुळे झालेले हे ‘बेत’ १ ते १२ किमी. रुंदीचे आहेत. बांगर हे थोडे उंच मैदानी भाग ५ ते १० मी. उंचीच्या वप्रांमुळे (ब्लफ) बेतापासून वेगळे झालेले आहेत. दोन नद्यांमधील सपाट प्रदेशाला ‘दुआब’ म्हणतात. रावी आणि बिआस यांदरम्यान बडी दोआबचा उत्तर भाग आहे. त्याच्या मध्यभागी अमृतसर आहे. बिआसकाठची पूरमैदाने दरवर्षी पुराखाली जात असल्यामुळे तेथे वस्ती विरळ आहे. बिआस व सतलज यांदरम्यान बिस्त दोआब हा पंजाबचा सर्वाधिक विकसित भाग आहे. याच्या दक्षिणेच्या माळवा मैदानात स्थिर वालुकागिरी आणि पाण्याखाली असलेली जमीन ही पंजाबच्या कोरड्या प्रदेशाची लक्षणे दिसून येतात. पूर्वेकडील मध्यमैदानाची सुपीक, हलकी व दमट मृदा आणि थोडा अधिक पाऊस यांमुळे तो भाग समृद्ध बनला आहे. दक्षिणेचे हरयाणा मैदान हे सरस्वती वाहत होती त्या काळात सुपीक व समृद्ध होते. भिवानी बागर आणि रेवारीचा उंचवट्याचा प्रदेश हा खोलवरची जलरेषा व स्थलांतरित वाळू यांमुळे निमओसाड आणि स्टेपसदृश प्रदेश बनला आहे.

गंगेचे विशाल मैदान : या मैदानात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यांतील मैदानी प्रदेश समाविष्ट आहेत. याचा विस्तार ३,७५,००० चौ. किमी. आहे. याच्या पश्चिम सीमेजवळून यमुना ८०० किमी. वाहते आणि अलाहाबाद येते गंगेला मिळते. यमुनेकाठी मथूरा हे श्रीकृष्णाचे आणि शरयूकाठी अयोध्या हे श्रीरामाचे जन्मस्थान आहे.

उत्तर प्रदेशात गंगेच्या उत्तरेच्या गाळमैदानाचे रोहिलखंड आणि अवध असे दोन पूर्व-पश्चिम भाग पडतात, तर बिहारमध्ये तिच्या उत्तरेचा आणि दक्षिणेचा असे दोन स्पष्ट भाग पडतात. पश्चिम बंगालमध्ये उत्तरेकडील मैदानात गंगेचा पूर्वीचा त्रिभूज प्रदेश आणि दक्षिणेकडील खोऱ्यात गंगेचा सध्याचा त्रिभुज समाविष्ट आहे.

हरद्वारपासून गंगा पूर्वेस १,२०० किमी. गेल्यावर राजमहाल टेकड्यांच्या बाजूने धुलिआनपर्यंत जाते. तेथे तिचा एक फाटा बांगला देशातून, तर दुसरा भागीरथी किंवा हुगळी नदीने पश्चिम बंगालमधून जाऊन सागर बेटाच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळतो. हा ३०० किमी. लांबीचा फाटा नदीचे पात्र बदलल्यामुळे भरपूर पाणी देणारा नाही. त्यामुळे कलकत्ता शहर व बंदर यांस पाण्याचा प्रश्न पडतो. त्यावर ⇨ फराक्का प्रकल्प हा उपाय आहे परंतु तो भारत व बांगला देश यांमध्ये वादविषय ठरला आहे.


गंगेला उजवीकडून यमुना व शोण या प्रमुख नद्या मिळतात तर डावीकडून शरयू म्हणजेच घागरा, गंडकी व कोसी या नद्या व अनेक इतर प्रवाह मिळतात. यमूनेला मध्यवर्ती डोंगराळ भागातून आलेल्या चंबळ, सिंध, बेटवा व केन या नद्या मिळतात. चंबळच्या काठी प्रवाहांनी खोलवर खोदलेल्या घळ्यांचे जाळे असून ही उत्खातभूमी दरोडेखोरांचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

उत्तर प्रदेशात गंगा व यमुना यांमधील दुआब हा सर्वांत मोठा, अत्यंत सुपीक, समृद्ध व दाट लोकवस्तीचा आहे. त्याचा वरचा भाग उत्तरेस हरद्वारपासून सहारनपूर २७४ मी., मीरत २२४ मी. व अलीगढ १८६ मी. असा दक्षिणेकडे हळूहळू उतरत गेला आहे. खादर आणि बांगर पट्टे स्पष्ट असून गंगेकडे बांगर पायऱ्यापायऱ्यांचा दिसतो. नदीपासून बांगर दूर गेले आहेत. तेथे मीरत व मुझफरनगर जिल्ह्यात दरवर्षी पूरमैदाने जलमय होतात. या वरच्या भागात पूर्व यमुना व अपर गंगा कालव्यांचे जाळे पसरले आहे. पर्जन्यमान दक्षिणेकडे ६० सेंमी., तर उत्तरेकडे १०० सेंमी. आहे. या दुआबाचा मध्यभाग २०० ते १०० मी. समोच्चरेषांदरम्यान येतो. कानपूर (१५० मी.) नंतर तो अधिक सपाट होत जातो. यात काही ठिकाणी काहीसे आडवे उंच भाग आहेत. यानंतरचा दुआबाचा खालचा भाग अत्यंत सपाट आहे.

गंगा-यमुना दुआबाच्या पूर्वेस रोहिलखंडाचे मैदान आहे. ते ३५,००० चौ. किमी. असून त्याचा उतार आग्नेयीस आहे. रामगंगा, गोमती आणि शारदा या तेथील प्रमुख नद्या असून प्रदेश २७४ मी. पासून १३२ मी. पर्यंत उतरत गेला आहे. येथे भाबर व तराई हे दोन पट्टे स्पष्ट दिसून येतात. हा भाग पूर्वेस अवधच्या मैदानात मिसळून जातो. अवध मैदानात खादर व बांगर प्रदेश स्पष्ट असून मुख्य उतार पूर्वेकडे असला, तरी काही भाग दक्षिणेकडे कललेला आहे. घागरा ही प्रमुख नदी असून तिचे रुंद पात्र वालुकामय आहे. तिचे पात्र ५५ किमी. च्या भागात वारंवार सरकलेले दिसते. येथे अनेक बांध व प्रवाह यांचे जाळे दिसते. राप्ती ही घागरेची उपनदी जास्त गाळ आणून प्रदेश समृद्ध करते. गोमती ही अनेक वळणांनी वाहणारी मंद नदी असून पुराच्या वेळीही काही ठिकाणी उंच तटांमधून तिचे पाणी वाहत राहते.

बिहारमध्ये राजमहाल टेकड्यांच्या शाखेमुळे हे मैदान पूर्वेकडे काहीसे निरुंद झाले आहे. बिहारमधील ८८,००० चौ. किमी. मैदानाचे गंगेच्या उत्तरेचा व दक्षिणेचा असे दोन वेगळ्या वैशिष्ट्यांचे भाग पडले आहेत. या मैदानाच्या दक्षिण सीमेजवळून गंगा वाहते. तिला उत्तरेकडून घागरा (शरयू), गंडक व कोसी या प्रमुख नद्या व इतर अनेक प्रवाह येऊन मिळतात. त्यामुळे नेपाळ-हिमालयाच्या पायथ्यासी जगातील अतिविस्तृत गाळ मैदानापैकी एक गणले जाणारे २,००० मी. खोल गाळाने भरलेले आणि ५४,४०० चौ. किमी. चे उत्तर सिहारचे मैदान आहे. त्याचा पश्चिमेकडील भाग आग्नेयीकडे व पूर्वेकडील भाग दक्षिणेकडे सरासरी दर चौ. किमी. ला २० सेंमी. इतका अतिसौम्य उताराचा आहे. छप्रा ते खगारीयापर्यंत गंगेला समांतर पाणथळी पसरल्या असून त्यांना ‘कोर’ हे स्थानिक नाव आहे. त्यांतील काही वर्षभर पाण्याने भरलेल्या असतात. यांच्या दक्षिणेकडील प्रवेश गंगेकडे चढत जातो. तेथे गंगेच्या काठावर पूर्वीच्या पूरतटांचे अवशेष दिसून येतात.राजमहाल टेकड्यांच्या पश्चिमेस दक्षिण बिहार मैदान १२० किमी. पर्यंत रुंद होत जाते. येथे उतार सरासरी दर किमी. ला ९ सेंमी. इतका कमी आढळतो. तो उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे आहे. येथे गंगेचा दक्षिण तटही उत्तर तटाइतकाच उंच आहे. त्याच्याबाहेर पाटण्याजवळ ‘जल’ व मोकामेहजवळ ‘तल’ नावाचे विस्तृत द्रोणी प्रदेश आहेत. याच्या दक्षिणेस छोटे उत्तरवाही प्रवाह पूर्वेकडे सरकलेले दिसतात.

उत्तर बंगालमध्ये पूर्वे हिमालयाच्या पायथ्यापासून त्रिभुज प्रदेशाच्या सीमेपर्यंत २३,००० चौ. किमी. मैदान आहे. त्याच्या पश्चिम भागात गंगेच्या व पूर्वभागात ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या वाहतात. पूर्व हिमालयातून येणाऱ्या तिस्ता, जलढाका व तोरसा यांसारख्या वेगवान प्रवाहांनी आणलेल्या उताराने हा भाग बनलेला आहे. त्याचा उत्तर भाग म्हणजे ‘द्वार’ प्रदेशाचा पश्चिम भाग होय. उत्तम जलनिःसारणामुळे हा भाग जेथे मृदा सुधारून घेतली आहे व इतर सोयी आहेत, तेथे चहाच्या लागवडीस आदर्श ठरला आहे. याच्या दक्षिणेचा भाग बारिंद मैदानाचा प्रदेश म्हणजे गंगेचा पूर्वीचा त्रिभुज प्रदेश होय. तो प्लाइस्टोसीन काळात बनलेला असून नंतर तेथे पायरीपट्टे निर्माण झाले.

बंगालचा द्रोणी प्रदेश हा प. बंगाल व बांगला देश यांचे बहुतेक गाळमैदान व्यापतो. हा अतिशय सपाट आणि सखल आहे. बहुतेक भाग गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे. मुख्य प्रवाहाला येथे अनेक फाटे फुटतात आणि उथळ भरतीचे खारे पाणी खळग्यांत असते. त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राभिमुख भागावर लाटांपेक्षा भरती-खाड्यांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे दंतुर किनाऱ्यावर वाळूचे बांध, पंकपाट, कच्छवनश्री (कांदळ), बेटे व छोटी भूशिरे यांची दाटी झालेली आहे. सुंदरबनचे दाट अरण्य आणि उत्तरेचे पूर्व भागीरथीचे मैदान ही एकमेकांहून खूपच भिन्न आहेत.

राऱ्ह मैदान हा भागीरथीच्या पश्चिमेचा प्रदेश त्रिभुज प्रदेशाचा भाग नसला, तरी तितकाच सपाट आहे. नैसर्गिक पूरतट व त्याला जोडणारे कृत्रिम सुरक्षा बांध हे पुराच्या वेळी कधी कधी भंग पावून सर्व प्रदेश जलमय होतो. ५० मी. सीमेच्या रेषेनंतर जुना गाळप्रदेश लागतो व प्रदेशाचे रूप बदलते. विदारण व क्षरण यांनी विदीर्ण केलेल्या प्रदेशावर जांभ्या प्रकारचे मृदा आढळते. पूर्ववाहिनी नद्यांनी नवीन गाळ पसरून सोपानसदृश पट्टे निर्माण केले आहेत.


ब्रह्मपुत्रेचे खोरे : भारतातील कोणत्याही नदीपेक्षा ब्रह्मपुत्रा जास्त पाणी वाहून आणते, परंतु वाळूने भरलेले उथळ पात्र त्याला पुरे पडत नाही. यामुळे उपनद्यांना विरोध होऊन त्या फुगतात आणि पूर ओसरल्यावर प्रदेशात दलदली माजतात. आसाममधील हे खोरे पूर्वेस सदियापासून पश्चिमेस धुब्रीपर्यंत ६०० किमी. पसरले असून वरचा व खालचा प्रदेश ७५ किमी. रुंद आहे. प्रदेश सपाट, सहज पोचता येणारा आणि सुपीक असला तरी वरचा भाग दलदलीचा, सपाट व वार्षिक पुराचा असल्यामुळे तेथे लोकवस्ती विरळ आहे. खालचा भाग पूरमैदानापेक्षा थोडा उंच असल्यामुळे तेथे अनेक गावे वसली आहेत. याच्या उत्तरेस गोआलपाडा जिल्ह्यात प्रभावी दिसणारा पूर्व द्वार हा सपाट पण दाट अरण्याचा व उंच गवताचा प्रदेश आहे. अरण्यतोडीच्या भागात विरळ वसाहती आहेत. दक्षिणेस उपजाऊ भूमीवर जलनिःसारण चांगले आहे. येथे ‘बिल’ नावाची मोटी गाळ-सरोवरे आहेत. आसाम खोऱ्यात गौहाती हे मोक्याच्या जागी वसले आहे. कोपिली ही ब्रह्मपुत्रेची एक उपनदी डोंगराळ भागातून ९० किमी. आल्यावर पुन्हा ९० किमी. वळणावळणांनी वाहते. हिच्या खोऱ्याच्या शिरोभागी लुमडिंग हे गाव असून तेथून रस्ते व रेल्वे धनसिरीच्या खोऱ्यात जातात. खालच्या भागात दाट लोकवस्ती आहे. धनसिरीमुख येथे ब्रह्मपुत्रेला मिळणारी धनसिरी ही दिमापूर येथे मोठी नदी बनते. गोलाघाट येथे तिचे खोरे ५० किमी. रुंद होते. तो भाग अतिशय सपाट व लोकवस्तीचा आहे.

कच्छ, काठेवाड आणि गुजरातचे मैदान : हा पश्चिम किनारी मैदानाचाच उत्तर भाग होय. कच्छचे द्वीपकल्प हे उत्तरेचे आणि पूर्वेचे मोठे आणि लहान रण गाळात भरून येण्यापूर्वी एक बेटच होते. येथे काही भाग वालुकामय मैदान आहे. पाऊस व प्रवाह यांच्या अभावामुळे वाऱ्याचा परिणाम अधिक प्रभावी आहे. त्यामुळे पुष्कळ प्रदेश निमओसाड आहे. किनाऱ्यावरील वालुकागिरीच्या मागे किनाऱ्याला समांतर पूर्व-पश्चिम सु. ७५० किमी. रुंद सुपीक आणि लोकवस्ती असलेले मैदान आहे. कच्छच्या उत्तरेस रुंद, सपाट, ओल्या मिठाने भरलेला प्रदेश आहे. हे मोठे रण होय. ते गुजरातच्या मुख्य भूमीपासून ३२० किमी.वर सिंधूपर्यंत गेलेले असून १६० किमी. रुंद आणि २१,५०० चौ. किमी. क्षेत्राचे आहे. ते दोन-तीन जागी खचलेले आहे. हे ओसाड मैदान असून त्यावर बेटांसारखे पछम, खादीर व बेला यांसारखे काही खडकाळ भाग आहेत. सखल मैदानाच्या काही ठिकाणी गवत उगवते. बन्नी हा त्यात मोठा तृणभाग आहे. तो कच्छच्या भूमीवर ११४ किमी. लांब व २४ किमी. रुंद असून त्यात गुरे-मेंढ्या पाळणाऱ्यांची विरळ वस्ती आहे. दरवर्षी बनास व लूनी नद्यांच्या छोट्या प्रवाहांनी व समुद्राच्या पाण्याने कच्छचे रण जलमय होऊन जाते. मोठ्या रणाचा दक्षिणभाग आता त्याच्यापासून तुटला आहे. ते छोटे रण होय.

काठेवाडचे द्वीपकल्प : हे पश्चिमेस नल सरोवराच्या दलदलीपर्यंत असून त्याचा दुसऱ्या बाजूस काठेवाडचे मैदान सुरू होते. कच्छचे छोटे रण, खंबायतचे रण व नल सरोवर यांनी हे द्वीपकल्प पूर्वेस आणि ईशान्येस वेढलेले आहे. या किनारी मैदानापलीकडे ७५ मीटरची सम्मोच्चरेषा अंतर्भागातील उंचवट्याच्या प्रदेशाची सीमा आहे. किनारी प्रदेश सस. पासून थोडासाच उंच आहे. मध्यवर्ती डोंगराळ भागातून सर्व दिशांकडे प्रवाह वाहतात. इतरत्र गिरनार आणि गीर यांसारख्या ज्वालामुखीजन्य टेकड्या व कटक आहेत.

गुजरातचे मैदान : खंबायतच्या आखाताला लागून असलेले किनारी मैदान व त्याजवळची पूरमैदाने गुजरातमध्ये समाविष्ट आहेत. अरबी समुद्राचा एक फाटा खंबायतच्या आखातच्या उत्तरेकडून कच्छच्या छोट्या रणाकडे गेला होता तेव्हा काठेवाड मुख्य भूमीपासून अलग होते व येथील मैदानी प्रदेश पश्चिमेकडे समुद्रापर्यंत उतरत गेला होता. अजूनही या प्रदेशाचा सामान्य उतार पश्चिमेकडेच आहे आणि त्याची उंची १५० मी. पेक्षा कमी आहे. साबरमती नदीच्या मुखाजवळ उंची फक्त ११ मीटर आहे. मैदानाच्या उत्तर भागातून बनास व सरस्वती कच्छच्या छोट्या रणाकडे वाहतात. सरस्वती, मही, नर्मदा व तापी या खंबायतच्या आखातास मिळतात. महीच्या खालच्या भागात प्रदेशात घळ्या पडल्या आहेत. पहिले ६५ किमी. ती खडकाळ पात्रातून वाहते, नंतर १५ किमी. वालुकामय पात्रातून वाहते आणि शेवटच्या ७० किमी. मध्ये तिच्यावर भरतीचा प्रभाव असतो. किनाऱ्याजवळ पाण्याने वाहून आणलेले लोएसचे थर आहेत. तेथे पूर्वीच्या गाळाचे थर होते. लोएसच्या विदारणामुळे प्रदेश जास्त ओसाड बनला आहे. गुजरातच्या मैदानाच्या पश्चिम सीमेवर खाऱ्या दलदली असून त्या भरतीच्या वेळी पाण्याखाली जातात.

पश्चिम किनारपट्टीची अरुंद मैदाने : गुजरातमधील सुरतपासून थेट कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीच्या पश्चिमेस १,५०० किमी. लांबीची आणि १० ते २५ किमी. रुंदीची अरुंद पश्चिम किनारपट्टी गेलेली आहे. तिचे कोकण किनारपट्टी, कर्नाटक किनारपट्टी व केरळ किनारपट्टी असे तीन ठळक भाग पडतात. या किनारपट्टीवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून २०० ते ४०० सेंमी. पाऊस पडतो आणि कृत्रिम पाणीपुरवठ्याखेरीज शेती होऊ शकते. पुष्कळ ठिकाणी, विशेषतः त्रिवेंद्रम आणि कोचीन यांदरम्यान या मैदानावर वेदिका निर्माण झाल्या आहेत. कालव्यांनी जोडलेली काही अतिशय मनोहर सरोवरेही या किनारपट्टीवर आढळतात.

कोकण किनारपट्टी : गोव्याच्या उत्तरेपासून दमणपर्यंत ही किनारपट्टी ५०० किमी. लांबीची आहे. ती सामान्यतः समुद्रापर्यंत गेलेल्या डोंगर, सोंडा आणि सागरतटाचे कडे यांनी युक्त आहे. मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या अरण्यांवरून पूर्वी ही किनारपट्टी समुद्राच्या पातळीखाली गेली असावी असे दिसते. मुंबईच्या जवळपास प्रवाळाच्या किंवा प्रवाळ व शंखशिंपलेयुक्त चूर्णीय खडकांनी बनलेल्या उत्थित वेदिका दिसतात.

गोदावरीच्या उगमाजवळ उगम पावलेली वैतरणा नदी या प्रदेशाच्या उत्तर भागातून पश्चिमकडे वाहते. तिच्यामुळे पूर्वी एक व्यापारीमार्ग उपलब्ध झाला होता. तिच्या खालच्या भागात आगाशीजवळ दाट लोकवस्ती आहे. वैतरणेच्या उत्तरेस डहाणूजवळ सपाट व दलदली प्रवेश आहे. भोर घाटात उगम पावणारी उल्हास नदी १३० किमी. जाऊन कल्याणजवळ वसईच्या खाडीला मिळते. मुंबईच्या दक्षिणेस समुद्रात शिरलेल्या डोंगरी फाट्यांदरम्यान सुरक्षित व चकचकीत पुळणीचे छोटेछोटे उपसागर आणि बंदित जागा आहेत त्या पर्यटन व्यवसायाला उपयुक्त ठरण्याजोग्या आहेत. सह्याद्रीवरून येणाऱ्या अनेक प्रवाहांनी किनाऱ्यावर लहानमोठ्या खाड्या तयार केल्या. त्यांच्या आधारावर अनेक लहानमोठी बंदरे दीर्घकाल किनारी व्यापारास उपयुक्त ठरलेली आहेत. डोंगराळ प्रदेश व खडकाळ जमीन यांमुळे शेतीपेक्षा नारळ, सुपारी, आंबा, फणस, काजू इत्यादींच्या फळबागांस हा प्रदेश अधिक उपयुक्त ठरत आहे. मिठागरे व मत्स्यव्यवसाय यांसही हा प्रदेश पोषक आहे.


गोवा : निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश पर्यटन व्यवसायासाठीही जगप्रसिद्ध आहे. दोना पावलासारखे समुद्रावर डोकावणारे कडे आकर्षक आहेत. पणजी या राजधानीजवळचे जुवारी व इतर छोटे प्रवाह किनारी वाहतुकीस साहाय्यक आहेत. [→ गोवा, दमण, दीव].

कर्नाटक किनारपट्टी : हा २५५ किमी. चा प्रदेश दक्षिणेकडे रुंदावत जातो. गिरसप्पा किंवा जोग वा २७५ मी. उंचीच्या धबधब्यावरून खाली आलेली शरावती या भागातून वाहते. किनारा वालुकामय असून उभे कडे समुद्रावर डोकावतात. येथील मैदान २४ किमी. पेक्षा अधिक रुंद नसून काही ठिकाणी तर ते केवळ ८ किमी. रुंद आहे. [→ कर्नाटक राज्य].

केरळचा किनारी प्रदेश : हा जास्त रुंद व कमी डोंगराळ आहे. कननोर ते कन्याकुमारीपर्यंत ५०० किमी. चा प्रदेश सरासरी २५ किमी. रुंदीचा आणि १० ते ३० मी. उंचीचा आहे. नद्या लहान व उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या आहेत. पाऊस भरपूर आहे आणि तांदूळ व नारळ यांवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. किनारी सरोवरे व सिंधुतडाग (खारकच्छ) यांनी किनारा भरलेला आहे. खारकच्छ कालव्यांनी जोडलेली असून त्यांतून होड्यांनी मोठी वाहतूक चालते. क्विलॉन जिल्ह्यात किनारी सरोवरे आहेत. अष्टमुडी व ८० किमी. विस्ताराचे वेंबनाड ही सरोवरे रमणीय आहेत. [→ केरळ].

पश्चिम किनारपट्टीलगतची समुद्रबूड मैदाने : येथील सागरमग्न खंडभूमीची हद्द अरबी समुद्रात मुंबईपासून ३५० किमी. वर आहे. ५० मी. खोलीवर दोन स्पष्ट पायऱ्या किंवा वेदिका आहेत. तेथील खडक किनारपट्टीवर उंच भूमीकडे जाणारा वेदिकायुक्त ट्रॅप खडकच आहे. त्याची जाडी भूमीकडून सागराकडे व पुढेही वाढतच जाते. फ्लँड्रियनपूर्व समुद्रपीछेहाटीच्या वेळी समुद्रपातळी सु. ९० मी. खाली गेली, त्यापूर्वी हा सागरमग्न मंच मुख्य भूमीचाच भाग असावा. दक्षिणेकडे हा मंच ३० ते १०० किमी. पर्यंत अरुंद होत जातो. तिकडे या मंचावर काही बांध आढळतात. तेथील कमी खोलीवरून पूर्वी अनेक वेळा समुद्र हटला असावा असे दिसते.

पूर्व किनारपट्टी : ही किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीपेक्षा बरीच जास्त रुंद आहे आणि जास्त कोरडीही आहे. पश्चिम किनारा २२° उ. अक्षांशापासून कन्याकुमारीपर्यंत जवळजवळ सरळच आहे, तर पूर्व किनारा वळणावळणांचा आहे. तो १६° उ. अक्षांशापासून ईशान्येकडे वळलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक त्रिभुज प्रदेशही आहेत. येथे पश्चिम किनाऱ्यापेक्षा कमी पाऊस असून स्थलांतरित वाळूच्या टेकड्या व खार जमिनीचे पट्टेही अधिक आहेत.

आंध्र व तमिळनाडूमध्ये पूर्व किनाऱ्याला पायनघाट म्हणतात. ही किनारपट्टी कन्याकुमारीपासून उत्तरेकडे कृष्णा-गोदावरीच्या संयुक्त त्रिभुज प्रदेशापर्यंत १,१०० किमी. लांब व १०० ते ३०० किमी. रुंद आहे. त्यानंतर डोंगर जवळजवळ समुद्रापर्यंत आलेले आहेत, परंतु त्यानंतर बेऱ्हेमपूरच्या उत्तरेस ती पुन्हा रुंद होऊन चिल्का सरोवर, महानदीचा त्रिभुज प्रदेश व बलसोरचे किनारी मैदान यांतून गंगेच्या त्रिभुज प्रदेशात विलीन होते. येथे अनेक खारकच्छ व पश्चजल किंवा कोंडपाणी आहेत. त्यांतील काही बकिंगहॅम कालव्याने जोडलेले आहेत. मद्रासजवळचे पुलिकत सरोवर हे एक वैशिष्ट्यपूर्ण सागरतडाग असून त्याची पातळी पूर्वी अनेक वेळा बदलली असावी. सध्या ते श्रीहरिकोटा या बेटाने समुद्रापासून अलग झाले आहे. या बेटावर अलीकडे अवकाशविज्ञानविषयक प्रयोग व संशोधन चालते. समुद्राजवळचा किनारी भाग दलदलीचा व वालुकामय असल्यामुळे वस्तीला योग्य नाही. पूर्व किनारपट्टीवरील मैदानांचे उत्कल (ओरिसा), आंध्र व तमिळनाडू असे तीन विभाग आहेत. सुवर्णरेखा नदीच्या थोडे उत्तरेपासून ऋषिकूल्य नदीच्या थोडे दक्षिणेपर्यंत उत्कलचे मैदान (४०० किमी.) आहे. या भागात महानदीचा त्रिभुज प्रदेश आहे. त्यांच्या शिरोभागी कटक शहर आहे. गंगेच्या त्रिभुज प्रदेशापेक्षा हा त्रिभुज प्रदेश जास्त सरळ आहे. लाटांचा प्रभाव जास्त असल्यामुळे येथे वाळूच्या टेकड्या आहेत. कटजुरी ही महानदीची प्रमुख शाखा आहे.

महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस चिल्का सरोवर आहे. समुद्रात छोट्या उपसागराच्या तोंडाशी बांध साचून ते निर्माण झाले आहे. ही बांध काही ठिकाणी २०० मी. रुंद आहे. हे सरोवर ७० किमी. लांबीचे असून ते ईशान्येस रुंद व नैर्ऋत्येस निमुळते आहे. त्याला भार्गवी आणि दया या नद्या मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात याचे पाणी गोडे होते. याच्या दक्षिणेस आणि पश्चिमेस टेकड्या व बरीच खडकाळ बेटे आहेत. चिल्काच्या दक्षिणेस मैदानावर लहानलहान टेकड्या आहेत आणि त्या प्रदेशातून ऋषिकूल्य नदी वाहते.

आंध्र किनारी मैदाने : ही उत्कल मैदानाच्या दक्षिणेस पुलिकत सरोवरापर्यंत गेलेली आहेत. या मैदानाची उंची ५ ते ५० मी. आहे. या मैदानातून दख्खनच्या दोन मोठ्या नद्या गोदावरी व कृष्णा वाहतात आणि त्यांनी मुखाशी त्रिभुज प्रदेश बनविले आहेत. या दोन त्रिभुज प्रदेशांदरम्यान कोलेरू सरोवर आहे. त्याच्या जवळ एलुरू शहर आहे. जवळच्या डोंगरावरून आलेल्या प्रवाहाचे पाणी या सरोवराला मिळते व ते एकाच प्रवाहाने समुद्राला मिळते. कोलेरूच्या स्थितीवरून किनारी मैदान समुद्राकडे वाढत आहे, असा निष्कर्ष निघतो.

गोदावरी पोलावरम्‌जवळच्या घळईतून मैदानात येते. त्यानंतर तिच्या गौतमी गोदावरी आणि वसिष्ठ गोदावरी अशा दोन शाखा होतात, मुख्य त्रिभुज प्रदेश या दोन शाखांमध्ये आहे व त्यावरून गोदावरीच्या सात शाखा वाहतात. धवलेश्वरम् येथे नदी ओलांडणारा ॲनिकट बांधलेला आहे.


कणाश्म टेकड्यांतील खोल घळईतून विजयवाडा येथे कृष्णा मैदानात उतरते आणि ९० किमी. वर बंगालच्या उपसागराला मिळते. तिचे बहुतेक पाणी एकाच पात्रातून समुद्रापर्यंत जाते व तेथे तिच्या तीन शाखा होतात. विजयवाडा येथील ॲनिकटमुळे कालव्यांचे एक जाळेच तयार होते व सर्व त्रिभुज प्रदेशात त्यांचे पाणी मिळते.

तमिळनाडू मैदाने : आंध्र मैदानांच्या दक्षिणेची सर्व किनारपट्टी तमिळनाडू मैदानाची आहे. त्याची लांबी ६७५ किमी. आणि सरासरी रुंदी १०० किमी. आहे. येथील महत्त्वाचे भूमिस्वरूप म्हणजे कावेरीचा त्रिभुज प्रदेश होय. श्रीरंगम् बेटाने कावेरीचे दोन भाग केले आहेत. कॉलेरून ही उत्तर शाखा पाणी समुद्रापर्यंत वाहून नेते, तर दक्षिण शाखेला काढलेले अनेक कालवे प्रदेशाला पाणी पुरवतात. यामुळे हा प्रदेश म्हणजे दक्षिण भारताचे धान्यकोठार बनलेले आहे. कॅलिमीर भूशिराच्या दक्षिणेस मात्र त्रिभुज प्रदेशात दलदली भाग आहे.

पूर्व किनाऱ्याची समुद्रबूड जमीन : अरबी समुद्राच्या सागरमग्न खंडभूमीपेक्षा बंगालच्या उपसागराची सागरमग्न खंडभूमी पुष्कळच अरुंद आहे. मानारच्या आखाताच्या उत्तरेस आणि गंगेच्या मुखांच्या दक्षिणेस मात्र ती रुंद आहे. मानारच्या आखाताजवळ भूमीचे दोन अरुंद पट्टे-एक भारताच्या भूमीकडून व दुसरा श्रीलंकेच्या भूमीकडून आलेला-पाण्याखाली जेमतेम ४ मी. असलेल्या एका शैल मालेने जोडलेले आहेत. याला ‘रामाचा सेतू’ किंवा ‘ॲडम्स ब्रिज’ म्हणतात. उत्तर हिमानी काळातील समुद्रपातळीच्या वाढीचा हा निश्चित पुरावा मानला जातो. भारत व श्रीलंका यांना जोडणारा भूमीचा अरुंद पट्टा यावेळी पाण्याखाली गेला.

गंगेच्या मुखांच्या दक्षिणेचा उथळ जलमग्न प्रदेश हे अवसादी मैदान आहे. ते अंशतः वादळी व अंशतः सागरी उद्‌गमच आहे. संशोधनांती दिसून आले आहे, की या उथळ सागरतळावर पाण्याखाली बुडलेली एक खोल घळई आहे. ती बंगालमधून पूर्वी वाहत गेलेल्या भैरव या मोठ्या नदीचा पाणबूड भाग असावा. मुख्य भूमीपासून दूर समुद्रात असलेले वाळूच्या बांधाबांधांमधील प्रवाहमार्ग म्हणजे या नदीच्या पूर्वीच्या शाखा होत. [→ भारत].

पहा : झीज आणि भर त्रिभुज प्रदेश दुआब द्रोणी नदी पूर हिमोढ.

कुमठेकर, ज. ब.