तमिळनाडू राज्य : भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील राज्य. क्षेत्रफळ १,३०,०६९ चौ. किमी. लोकसंख्या ४,११,९९,१६८ (१९७१). विस्तार ८°  उ. ते १३° ५० उ. आणि ७६° पू. ते ८०° २१ पू. यांदरम्यान. याच्या पश्चिमेस केरळ राज्य, उत्तरेस आंध्र प्रदेश राज्य व कर्नाटक राज्य, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर व आग्नेय किनारा आणि श्रीलंका यांदरम्यान त्याचे पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात हे भाग आहेत.

भूवर्णन : या राज्याचे १५० मी. च्या समोच्चरेषेने पूर्वेचा सखल मैदानी प्रदेश व पश्चिमेचा पठारी, डोंगराळ प्रदेश असे दोन स्पष्ट भाग पडतात. पूर्वेकडील समुद्रकिनारा अगदी सरळ असून त्यावर त्याच्या लांबीच्या मानाने बंदरे थोडीच आहेत. त्यावर मद्रासची प्रसिद्ध मरीना बीच व इतर पुळणी तयार झालेल्या आहेत. सामान्यतः हा किनारा उद्‌गमनाचा आहे तथापि त्यावर महाबलीपुर, तंजावरचा काही भाग इ. ठिकाणी अधोगमनाने काही प्रदेश समुद्रात बुडल्याचाही पुरावा आढळतो. बऱ्याच ठिकाणी नदीमुखाजवळ वालुकाभित्ती निर्माण झालेल्या दिसतात. रामेश्वर द्वीप हे याचेच उदाहरण होय. मानारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांदरम्यान छोटीछोटी प्रवाळ द्वीपे बनलेली दिसतात. रामेश्वरच्या टोकाशी असलेले धनुष्कोडी आणि त्यासमोरचे श्रीलंकेचे तलाई मानार यांना जोडणारी जलांतर्गत खडकांची रांग म्हणजेच सुप्रसिद्ध रामाचा सेतू होय. यालाच ॲडम्स ब्रिज असेही नाव आहे. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत समुद्रकाठी सु. ३० ते ६५ मी. उंचीचे छोटे वालुकागिरी निर्माण झालेले दिसतात. त्यांना ‘तेरी’ म्हणतात. त्यांवरील ताडाच्या झाडांमुळे वाळू व माती धरून ठेवली जाते. किनाऱ्यावर खारकच्छही निर्माण झाले आहेत. मद्रासपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या मैदानी प्रदेशाची भूमी मुख्यतः कावेरीने व इतर नद्यांनी आणलेल्या जलोढाने तयार झाली आहे. कावेरीचा १०,४०० चौ.किमी. विस्ताराचा त्रिभुज प्रदेश हा एक अतिविस्तृत, सुपीक व समृद्ध प्रदेश आहे. मैदानी प्रदेशात विखुरलेले विशेषतः पालार आणि आड्यार नद्यांदरम्यान काही अवशिष्ट शैल दिसून येतात. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून आलेल्या पालार, पोन्नाइय्यार (पेन्नार), कावेरी, वैगई आणि ताम्रपर्णी या प्रमुख नद्या या मैदानी प्रदेशातून पूर्वेकडे वाहत जातात. त्यांशिवाय चेयूर, मोयार, भवानी, अमरावती, चित्तार, नोयिल, कूम, कोट्टेलियार इ. अनेक नद्या या राज्याचे जलवाहन करतात. पुलिकत सरोवराचा दक्षिण भाग या राज्यात येतो.

तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर उत्तरेकडे निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल प्रदेश आहे. तेथे भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील उत्तर सह्याद्री आणि पूर्वेकडील पूर्वघाट या श्रेणी एकत्र येतात. निलगिरीचे दोडाबेट्टा शिखर २,६३७ मी. उंचीचे आहे. निलगिरीच्या दक्षिणेकडील पालघाट खिंडीच्या दक्षिणेस दक्षिण सह्याद्रीच्या अन्नमलई व एलाचल रांगा दक्षिणोत्तर गेल्या असून पलनी टेकड्या हा त्यांचाच एक पूर्वेकडील फाटा आहे. केरळचा क्विलॉन व तमिळनाडूचा तिरुनेलवेली या जिल्ह्यांस जोडणाऱ्या शेनकोटा खिंडीच्या दक्षिणेस थेट कन्याकुमारी जिल्ह्यात १,६५४ मी. उंचीच्या महेंद्रगिरी डोंगराने दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.

दक्षिण सह्याद्रीच्या रांगा व मैदानी प्रदेश यांदरम्यानच्या पठारी प्रदेशावर तमिळनाडूचे डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावाडी (१,१६० मी.), शेवराय (१,६४७ मी) आणि कलरायन व पछिमलई या टेकड्या जलप्रवाहांनी अलग होऊन तुटक तुटक उभ्या आहेत. पलनी टेकड्यांच्या पूर्वेस वैगईच्या दोन्ही बाजूंस आंदीपट्टी व वरुषनाड या टेकड्या आहेत. कोईमतूरजवळ पठारी प्रदेशाची उंची सु. ४५० मी. आहे.


 मृदा : तमिळनाडूच्या मैदानी प्रदेशाचा बराचसा भाग नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने निर्माण झाला आहे. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील मृदा सुपीक गाळाची असून अतिशय उपजाऊ आहे. उत्तर भागात रेती आणि गाळमिश्रित लोम प्रकारची मृदा सापडते. या मृदेच्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली येतात. मध्यवर्ती भागात तांबडी मृदा आढळते. ही शेतीच्या दृष्टीने विशेष उपजाऊ नाही. मदुराई, रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत काही भागात काळी मृदा आहे. ही मृदा कापसाच्या पिकासाठी उत्तम असते. चिंगलपुट, तंजावर वगैरे भागांत लॅटेराइट–जांभा दगडाची मृदा आहे.

हवामान : विषुववृत्तापासून फक्त सु. ८८० ते १,५५० किमी दूर असल्याने हवामान उष्ण आहे परंतु समुद्रसान्निध्याचा फायदा मिळत असल्याने भारताच्या उत्तर भागांप्रमाणे हवामान विषम नाही. उन्हाळ्यात मे महिन्याचे सरासरी तापमान २१° से. व जास्तीत जास्त तपमान ४३° सें. आणि हिवाळ्यात जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान २४° सें. व कमीत कमी तपमान १८° से. असते. किमान मासिक सरासरी तपमान डिसेंबर वेल्लोरला १३·४° सें. व सेलमला १६° सें. असते. वार्षिक पर्जन्यमान स्थलपरत्वे ७० सेंमी ते १५० सेंमी असून किनारी प्रदेशात परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पावसाचे प्रमाण जून ते सप्टेंबरच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसापेक्षा जास्त असते. याच वेळी आवर्तांपासूनही काही पाऊस पडतो. एप्रिल आणि मे महिन्यांत थोडा पाऊस पडतो. त्यालाच ‘आम्र वर्षा’ म्हणतात, कारण आंबे परिपक्व होण्याच्या सुमारास हा पाऊस पडतो. पर्वतीय प्रदेशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून विशेषतः निलगिरी पर्वत भागात १०० ते २०० सेंमी पेक्षाही जास्त पाऊस पडतो. तमिळनाडू डोंगरांवर ६० सेंमीपर्यंत तर पालघाट खिंडीजवळच्या प्रदेशात १२० सेंमी. पाऊस पडतो. मैदानी प्रदेशात उत्तरेकडून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी असते. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अगदी कमी असते.

वनस्पती : राज्याचा १९७३-७४ मध्ये १५·५% प्रदेश वनाच्छादित होता. पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये आहेत. सागवान, रोझवुड, निलगिरी व चंदनाची झाडे जास्त आढळतात. कोईमतूर व निलगिरी पर्वत भागांत सागवानाची दाट जंगले आहेत. तसेच पर्वत भागात बांबूची वने आढळतात. रबराची झाडेही येऊ शकतात. नेली, एली, अगस्ती, नारळ, सुपारी, ताड, आंबा, फणस, वड, पिंपळ. इ. झाडे तमिळनाडूत आढळतात. १९७१-७२ मध्ये येथील अरण्यातून ३०,८१० घ. मी. इमारती लाकूड,२०,३३२ घ. मी. जळाऊ लाकूड १·५ कोटी रुपये किंमतीचा रबराचा चीक व १,३७० टन चंदनी लाकूड असे उत्पादन झाले. किनाऱ्यालगतच्या भागात नारळाची व ताडाची झाडे आहेत. आग्नेय किनारी प्रदेशात बाभळीची बने व इतर काटेरी वनस्पती आढळतात.

प्राणी : निलगिरी भागात व पर्वतप्रदेशात रानटी हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. वन्य प्राणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलई अभयारण्य राखून ठेवलेले आहे. तसेच कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकावरील पॉइंट कॅलिमियर येथे पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. तेथे स्थलांतरी हंसक येतात. गिंडी येथील राजभवनात काळवीट, चितळ व इतर छोट्या प्राण्यांसाठी राखीव उद्यान आहे. पुलिकत सरोवरावरही स्थलांतरी हंसक, बगळे, क्वाक, बदके, करकोचे इ. पाणपक्षी दिसतात. मद्रासच्या दक्षिणेस वेडंतंगल येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये आहे. तेथे पांढरा आयबेक्स क्वाक, स्पूनबिल, उघड्या चोचीचा बलाक, पाणबुडा, ढोक, बगळा, पाणकावळा इ. पक्षी विशेष आढळतात. इतरत्र नेहमीचे भारतीय पशुपक्षी, सर्प, कीटक वगैरे आढळतात.

दाते, सु. प्र. दाते, संजीवनी

इतिहास : पुराणाश्मयुगापासून नवाश्मयुगापयर्यंतच्या काळातील अवशेष तमिळनाडूत आढळतात. इ. स. पू. ३,००,००० वर्षांपूर्वी येथे मानवाची वस्ती होती आणि तो दगडांची हत्यारे वापरीत असे. रॉबर्ट ब्रूस फुट या संशोधकाने काही दगडी हत्यारांच्या आधारे असे दाखविले आहे, की हातकुऱ्हाड संस्कृती येथे त्या वेळी अस्तित्वात होती. इ. स. पू. ८००० च्या सुमारास येथील मानव खूप प्रगत झाला होता व त्याला जनावरे माणसाळविणे ही कला तसेच धान्य पिकविणे आणि गुळगुळीत दगडी हत्यारे वापरणे या गोष्टी माहीत होत्या. याशिवाय शवस्थाने व त्यांत असलेली हाडे, मातीची भांडी, हत्यारे इत्यादींवरून येथील मानवाची बरीच प्रगती झालेली दिसते. इ. स. पू. १००० च्या सुमारास आर्यांचे दक्षिणेस आगमन झाले. या सुमारास त्यांचे वसाहतीचे काम पुरे होऊन रामायण महाभारत काळांत मदुराईत पांड्यांचे राज्य होते, असे मानले जाते. व्याकरणकार कात्यायनाने आपल्या लिखाणात पांड्य हे पंडूचे वंशज असल्याचा निर्देश केला आहे. अर्जुनाची पत्नी चित्रांगदा ही पांड्य राजा चित्रवाहनाची मुलगी होती, असे काही तज्ञांचे मत आहे. तमिळ साहित्यात अगस्त्य ऋषी पृथ्वीचा भार सारखा करण्यासाठी दक्षिणेत गेला होता, अशी आख्यायिका आहे. अगस्त्य ऋषींना तमिळ देशाचा पिता आणि तमिळ व्याकरणाचा पहिला लेखक मानतात. दंतकथेप्रमाणे चेर, चोल व पांड्य ही राज्ये कोरकाई येथे राहणाऱ्या तीन भावांनी स्थापन केली. अशोकाच्या कोरीव लेखात पांड्य, चोल व चेर यांचा उल्लेख मौर्य राज्याच्या शेजारची मित्र राज्ये म्हणून आढळतो. अगदी दक्षिणेस वेळ्ळूर नदीपर्यंत पांड्य घराण्याचे राज्य होते. त्याच्या उत्तरेला पूर्वकिनाऱ्यावर कावेरीच्या खोऱ्यात चोल घराण्याचे व पश्चिमेस चेर घराण्याचे राज्य होते. ही तिन्ही राजघराणी द्रविड असून त्यांनी आर्यांच्या संस्कृतिप्रसारास मदत केली. म्हणून आर्यांनी त्यांना क्षत्रियत्व बहाल केले. तमिळ साहित्यातही या घराण्यांसंबंधी काही माहिती मिळते. त्यांचा कालक्रमानुसार संपूर्ण इतिहास ज्ञात नाही. तथापि काही पराक्रमी राजांची वर्णने आढळतात. या तिन्ही घराण्यांत सत्तास्पर्धा चालू होती. काही पाश्चात्य प्रवाशांच्या–उदा., प्लिनी, टॉलेमी इत्यादींच्या वर्णनावरून या राज्यासंबंधी माहिती मिळते तसेच पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या पुस्तकातही काही उल्लेख आढळतात.


संगम काळात (पहिले ते तिसरे शतक) १९० मध्ये करिकाल या चोल राजाने राज्यविस्तार करून तोंडमंडलम् प्रदेश हस्तगत केला. त्याने व त्याच्या वंशजांनी दक्षिण अर्काटच्या प्रदेशात राज्य केले. त्याने पांड्य व चेर राजांचा पराभव केला. करिकालनंतर आलेल्या चोल व चेर राजांत संघर्ष चालू झाला. या संघर्षात चोलांनी चेरांचा पराभव केला. तिसऱ्या शतकापर्यंत चोल, पांड्य व चेर राज्ये समृद्ध स्थितीत असून तिसऱ्या शतकाच्या अखेरीस त्यांना उतरती कळा लागली. तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पल्लव घराण्याने कांजीवरम् येथे राज्य स्थापन केले. पल्लव राजांना चोल, चेर, पांड्य या राजांशी झगडावे लागले. या घराण्याचे पूर्व पल्लव व उत्तर पल्लव असे कालानुक्रमे दोन भाग पडतात. पूर्व पल्लव राजे विद्येचे व शिल्पाचे भोक्ते होते. त्यांनी सर्व धर्मंपंथीयांना आदराने वागविले. पल्लवांच्या काळातच तमिळ वाङ्‌मयात काव्याची भर पडली. ३२५ ते ५०० पर्यंतच्या काळातील पल्लवांचा इतिहास अस्पष्ट आहे. सहाव्या शतकात कळभ्र जमातीतील अच्युतविक्कन्त आणि पुढे कुरूवन या राजसत्तेवर आकस्मित आलेल्या सत्ताधीशांनी पल्लवांची राजसत्ता नष्ट केली. एवढेच नव्हे, तर तमिळनाडूत धुडगूस घालून अनेक अधिराजांची सत्ता बळकाविली. त्यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध नाही. तथापि या राजांनी दक्षिणेतील कारभार विस्कळित केला व हिंदूंची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. पांड्य, पल्लव आणि बादामीच्या चालुक्य यांनी विस्कटलेली राजकीय घडी हळूहळू पुन्हा स्थिरस्थावर केली. यानंतर तमिळ देश पांड्य व पल्लव घराण्यांत विभागला गेला. या दोन्ही घराण्यांत सतत संघर्ष चालू असे. पल्लवांना दक्षिणेत पांड्य, चालुक्य आणि राष्ट्रकूटांशी लढावे लागले. तथापि पल्लव राजांनी संगीत, चित्रकला, स्थापत्यकला इ. सुधारणांकडे लक्ष दिले. या काळातील महाबलीपुर व कांजीवरम् येथील मंदिरे विशिष्ट वास्तुशिल्प शैलीत बांधली गेली. पल्लव राजांनी संस्कृत व भरताने प्रतिपादन केलेल्या नाटयशास्त्राला प्रोत्साहन दिले. या राजांची सत्ता ८१५ पर्यंत अस्तित्वात होती.

चोल राजा पहिला आदित्य याने पल्लव राजा अपराजित याचा पराभव करून दक्षिण अर्काटचा प्रदेश चोलांच्या सत्तेखाली आणला. आदित्याचे वडील विजयालय हा तंजावर येथील चोल घराण्याचा संस्थापक. तो पल्लवांचा मांडलिक होता. ८५० ते १२०० या काळात चोल राजांचा राष्ट्रकूट व कल्याणच्या चालुक्यांशी संघर्ष झाला. पहिला परांतक (९०७–९५५) याने चोल राज्याचा विस्तार केला. त्याने पांड्य राजाचा पराभव करून मदुराईचे राज्य हस्तगत केले. राष्ट्रकूट तिसरा कृष्ण याने चोल राजाचा पराभव केला (९४९). त्याच्या मृत्यूनंतर पहिला राजराज (९८५–१०१४) गादीवर येईपर्यंत (९८५) चोल राज्यात गोंधळ होता. यानंतर चोल राजांनी राष्ट्रकूट व पांड्य राजांशी लढून गेलेला मुलूख परत मिळविला. ८९० ते ९२० पर्यंत अस्तित्वात असलेले पांड्य राज्य काही काळ संपुष्टात आले. ते राज्य चोल राज्यात समाविष्ट केल्यावर पहिला राजराज चोल याच्या कारकीर्दीपासून चोलांच्या नवीन ऊर्जितावस्थेस सुरुवात झाली. राजराजाने गंगापासून म्हैसूर व बेल्लारी आणि चालुक्यांकडून काही प्रदेश जिंकून चोल राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले. चेर नौदलाचा पराभव करून त्याने श्रीलंकेचा उत्तर भाग व मालदीव बेटे यांवर विजय मिळविला व पूर्वी पल्लव नंदिवर्मन याने घालून दिलेली आरमाराची परंपरा पुनरुज्जीवित केली व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था अंमलात आणली. त्यानेच तंजावरचे बृहदीश्वर मंदिर बांधले. पहिल्या राजराजापासून चालू झालेला चोलांचा इतिहास हाच तमिळ देशाचा खरा इतिहास म्हणावा लागेल. १०७० च्या सुमारास चोल राजांची सत्ता नाहीशी होऊन दक्षिण अर्काटच्या भोवतालचा प्रदेश वेंगीच्या चालुक्यांच्या अंमलाखाली गेला. पहिला कुलोत्तुंग (१०७०–११२०) गादीवर आल्यापासून गोंधळलेली परिस्थिती काहीशी सुधारली. राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा न बाळगता सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १२७९ पर्यंत चोलांची सत्ता चालू होती. तिसऱ्या कुलोत्तुंगाच्या कारकीर्दीत (१२४७–७९) दक्षिणेतील पांड्य राजे व कर्नाटकातील होयसळ यांनी आपल्या हातात सत्ता घेतली. चोल राज्यातील सरंजामदार स्वतंत्र झाले. १२५८ मध्ये सुंदर पांड्य याने चोलांचा व १२६४ मध्ये होयसळांचा पराभव केला. पांड्य राजांतील प्रसिद्ध राजा जटावर्मन सुंदर पांड्य (१२५१–७०) व त्याचा मुलगा मारवर्मन कुलशेखर यांनी पांड्य राज्याचा विस्तार केला. कुलशेखरांच्या मुलांत गादीसाठी भांडणे झाली. यापैकी सुंदर पांड्य याने दिल्लीच्या मलिक काफूरची मदत घेतली. १२९२ मध्ये गादीवर बसलेला होयसळ राजा तिसरा बल्लाळ याने पांड्य राज्यात असलेल्या गोंधळाचा फायदा घेण्याचे ठरविले परंतु मलिक काफूरने दक्षिणेतील अनेक महत्त्वाची शहरे लुटली. मलिक काफूर परत गेल्यानंतर काही वर्षांनी घियासुद्दीन तुघलकाचा मुलगा मुहम्मद बिन तुघलकाने स्वारी करून मदुराईत मुसलमानांची सत्ता प्रस्थापित केली. १३३४ ते १३७८ पर्यंत राज्यात मदुराई मुसलमानांची सत्ता होती. या काळात हिंदूंचा अनेक प्रकारे छळ झाला, मंदिरे लुटली गेली. या वेळी पांड्य राजांनी सुलतानांना विरोध करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चौदाव्या शतकात तमिळ देशातील उत्तरेकडील प्रदेशात पांड्यांचे राज्य अस्तित्वात होते. मदुराई येथील सुलतानांची सत्ता चालू असतानाच विजयानगरचे हिंदू राज्य उदयास आले. बुक्करायाचा मुलगा कुमार कंपन याने १३७० च्या सुमारास सुलतानांचा पराभव केला. १३७८ मध्ये मदुराईचा मुलूख विजयानगरच्या राज्याला जोडला गेला. दुसऱ्या हरिहरच्या कारकीर्दीत (१३९८–१४०६) विजयानगर राज्याचा विस्तार दक्षिण हिंदुस्थानातील बहुतेक सर्व प्रदेशावर झाला होता.

विजयानगरचा १५६५ च्या तालिकोटच्या लढाईत पराभव झाल्यावर जिंजी, तंजावर, मदुराई वगैरे ठिकाणच्या नायक राजांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जाहीर केले. विश्वनाथ हा मदुराईच्या नायक घराण्याचा संस्थापक. या घराण्यातील शेवटची राणी मीनाक्षी १७३६ मध्ये मरण पावल्यानंतर मदुराईच्या नायक राजाची सत्ता नाहीशी झाली.


सोळाव्या शतकात तंजावर येथे शिवाप्पा नायक स्वतंत्र झाला. त्याच्या वंशातील नायक राजांनी तंजावर जिल्ह्यात अनेक गड व वैष्णव मंदिरे बांधली. मदुराई आणि तंजावर येथील नायकांत नेहमी लढाया होत. १६६२ मध्ये मदुराईच्या चोक्कनाथाने तंजावरच्या विजयराघव नायकाचा पराभव करून तेथे आपला सुभेदार नेमला. विजयराघवाच्या मुलाच्या अनुयायांनी त्याला गादीवर बसविण्यासाठी विजापूरच्या सुलतानाची मदत मागितली. यापूर्वीच शहाजी प्रथम दक्षिणेत गेला. त्याने तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मुलूख काबीज केला आणि तंजावर त्याच्या जहागिरीचा एक भाग झाला. सतराव्या शतकाच्या मध्यास आदिलशाही सुलतानाच्या ताब्यात बराच प्रदेश होता. तंजावरच्या अळगिरीला हाकलून देण्यासाठी आदिलशाही सुलतानाने शिवाजीचा भाऊ व्यंकोजी (एकोजी) याला धाडले. व्यंकोजीने तंजावरचा किल्ला हस्तगत करून आदिलशाही सुलतान मरण पावताच तंजावरचे राज्य हस्तगत केले आणि तंजावर येथे मराठ्यांची सत्ता स्थापन झाली (१६७६). तंजावरच्या राजांनी कला, वाङ्‌मय आणि संगीत कलेला उत्तेजन दिले. १६७७ मध्ये शिवाजीने कर्नाटकात स्वारी करून जिंजी व त्या भोवतालचा प्रदेश काबीज केला. एवढेच नव्हे, तर व्यंकोजीशी बोलणी करून राज्याचा निम्मा वाटा मागितला. १६९८ पर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात राहिला. तंजावरची मराठ्यांची गादी ब्रिटिशांनी खालसा केली. १६९८ मध्ये मोगलांनी जिंजी व त्याभोवतालचा प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश दक्षिणेतील मोगल सुभेदारांच्या ताब्यात असून तेथील कारभार अर्काटचे नबाब पाहत असत. दक्षिणेतील सुभेदार निजामुल्मुल्क स्वतंत्रपणे वागू लागताच अर्काटचे नबाबही स्वतंत्रपणे वागू लागले. १७४० मध्ये मराठ्यांनी कर्नाटकावर स्वारी केली. चंदासाहेबाला अटक केले. मराठ्यांच्या यशामुळे निजामुल्मुल्क याने १७४३ मध्ये स्वारी केली. त्याने अन्वरुद्दीन खानाला अर्काटचे नबाब नेमले. १७४४ च्या सुमारास अर्काटच्या नबाबाच्या जागेसाठी मुहम्मद अली व चंदासाहेब हे हक्क सांगू लागले. यांच्यातील भांडणात मद्रासच्या किनाऱ्यावर वसाहत करून राहिलेल्या इंग्रज व फ्रेंच यांनी फायदा घेतला. याच संघर्षातून इंग्रज व फ्रेंच यांची मद्रासच्या परिसरात दोन युद्धे झाली. पहिले कर्नाटकचे युद्ध १७४४ ते १७४८ पर्यंत चालू होते. यूरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यात एक्स–ला–शपेलचा १७४८ चा तह होताच हिंदुस्थानातील पहिले युद्ध थांबले. या तहानुसार मद्रास इंग्रजांच्याकडे राहिले. यानंतर दुसरे युद्ध १७४९ मध्ये सुरू होऊन ते १७५४ मध्ये थांबले. १७६३ च्या पॅरिसच्या तहानुसार फक्त पाँडिचेरी फ्रेंचांना मिळाली. बाकीचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. इंग्रज आणि हैदर व टिपू यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांनी कर्नाटकचा प्रदेश हस्तगत केला. १८५५ पर्यंत इंग्रजांनी बहुतेक छोट्या जहागिऱ्या खालसा केल्या.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या होमरूल चळवळीपासून तमिळनाडूत राजकीय आंदोलने सुरू झाली. सर्व चळवळीत मद्रासच्या रहिवाशांनी भाग घेतला. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रासचा गव्हर्नर मद्रास इलाख्याचा राज्यकारभार कौन्सिलच्या मदतीने करी. या काळात रयतवारीचे एक मोठे बंड झाले आणि ब्रिटिश सरकारने रयतांवरील कराचा बोजा सकृतदर्शनी कमी केला. विसाव्या शतकात लो. टिळक व म. गांधी यांच्या चळवळींस इथे काहीसा प्रतिसाद मिळाला, तरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तमिळनाडू राज्याने विशेष अशी काहीच भरीव कामगिरी केली नाही. राजाजी, कामराज, सुब्रह्मण्यम् वगैरे काही थोड्या व्यक्ती सोडल्या असता नाव घेण्यासारख्या व्यक्ती तमिळनाडू राज्यात झाल्या नाहीत. तथापि मद्रास इलाख्यामधील आंध्र प्रदेशाने व विशेषतः रामानंदतीर्थ यांनी सिंहांचा वाटा उचलला.

गोखले, कमल

राज्यव्यवस्था : ब्रिटिशांकित हिंदुस्थानात मद्रास प्रेसिडेन्सी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मद्रास प्रांतामध्ये सध्याच्या केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील प्रदेश समाविष्ट होता. १९४६ मध्ये मद्रास प्रांतात काँग्रेस पक्षास बहुमत मिळाले व आंध्र केसरी टी. प्रकाशम् त्या वेळी मुख्यमंत्री झाले. स्वातंत्र्योत्तर काळात आंध्रमध्ये भाषावर प्रांतरचनेसाठी चळवळ सुरू झाली. पोट्टी श्रीरामलू यांनी आमरण उपोषण सुरू केले व त्याची फलश्रुती म्हणून ऑक्टोबर १९५३ मध्ये भाषिक तत्त्वावर स्वतंत्र आंध्र राज्याची निर्मिती झाली आणि तो मद्रास प्रांतातून विलग करण्यात आला. पुढे १९५६ च्या राज्यपुनर्रचना विधेयकानुसार सभोवतालच्या तीन राज्यांतील तमिळभाषिक प्रदेशांचा समावेश मद्रास राज्यात करण्यात आला. त्याज केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्यातील चार तमिळभाषिक तालुके घेऊन कन्याकुमारी जिल्हा तयार करण्यात आला. तसेच केरळमधील क्विलॉन जिल्ह्यातील शेनकोट्टा तालुका तिरुनेलवेली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला आणि मद्रास प्रांतातील मलबार हा प्रदेश केरळ राज्यास, तर दक्षिण कॅनरा व कोल्लेगाल हे कोईमतूर जिल्ह्यातील तालुके तत्कालीन म्हैसूर राज्यास जोडण्यात आले. अशा रीतीने फक्त तमिळभाषिकांचे मद्रास राज्य अस्तित्वात आले. पुढे १९६९ मध्ये तमिळनाडू असे त्याचे नामांतर करण्यात आले.


भारतीय संघराज्याचे तमिळनाडू हे एक घटक राज्य आहे. राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीनुसार मंत्रिमंडळाच्या साहाय्याने मुख्यमंत्री राज्यकारभार पाहतात. मंत्रिमंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. विधिमंडळ द्विसदनी असून विधानसभेचे २३५ व विधानपरिषदेचे ६२ सदस्य होते (१९७६). राज्यातून लोकसभेवर ३९ व राज्यसभेवर १८ सदस्य निवडले जातात. द्रविड कळघम व द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन प्रादेशिक पक्षांची वाढ रामस्वामी नायकर व अण्णादुरै यांच्या नेतृत्वाखाली १९५४ नंतर झाली. १९५४ मध्ये कामराज हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले व पुढील ९ वर्षे ते या पदावर होते. इंग्रजी भाषा अवगत नसलेले हे भारतातील पहिले व एकमेव मुख्यमंत्री. आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे मंत्रिमंडळ लहान व सुटसुटीत होते. देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या व्यक्तींचा त्यात समावेश होता. कामराजांनी शिक्षणप्रसाराला विशेष चालना दिली. ३०० लोकसंख्या असलेल्या लहान लहान खेडेगावांत प्राथमिक शाळा सुरू केल्या. तसेच त्यांनी वीजपुरवठा विस्तृत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणजे तमिळनाडूमध्ये लहान लहान खेड्यांमध्येही वीज खेळू लागली आहे. १९६७ पर्यंत राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार होते. मात्र त्या साली द्रविड मुन्नेत्र कळघम या प्रांतीय पक्षाने अण्णादुरै यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फ्रंटतर्फे मंत्रिमंडळ बनविले आणि ते मुख्यमंत्री झाले. १९६९ च्या काँग्रेस पक्षातील दुफळीनंतर संघटना काँग्रेस व काँग्रेस (नव) असे दोन पक्ष झाले व काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. अण्णादुरैनंतर १९६९ मध्ये. द्र.मु.क. चे करुणानिधी मुख्यमंत्री झाले आणि १९७१ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून मुख्यमंत्री झाले. पुढे द्र. मु. क. मध्ये दुही होऊन त्याचे द्र. मु. क. (अण्णादुरै) आणि द्र. मु. क. (करुणानिधी) असे दोन पक्ष झाले (१९७४). ३१ जानेवारी १९७६ रोजी सुरुवातील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे करुणानिधींच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार राष्ट्रपतींनी बरखास्त करून राष्ट्रपती राजवट तेथे जारी करण्यात आली. १९७६ च्या विसर्जित विधानसभेत द्र. मु. क. १७१, संघटना काँग्रेस १३, अण्णादुरै द्र. मु. क. १३, काँग्रेस ६, स्वतंत्र ५, कम्युनिस्ट ८, फॉर्वर्ड ब्लॉक ७, मुस्लिम लीग ६, तमिळ अरसू कळघम १, अपक्ष ३ व पुरस्कृत १ असे भिन्न पक्षांचे बलाबल होते. द्र. मु. क., अण्णादुरै द्र. मु. क. व तमिळ अरसू कळघम हे प्रादेशिक पक्ष असून द्र. मु. क. पक्षाचे राज्यात संख्याबळ व बहुमत आहे. हे प्रादेशिक पक्ष हिंदी भाषेविरोधी, उत्तर भारताविरोधी व केंद्रीय सरकारविरोधी पक्ष असून काही दिवसांपूर्वी संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा विचारही पक्षांतर्गत प्रसृत झाला होता. १ एप्रिल १९७६ पासून तमिळनाडूतील प्रगती ब्रिगेड ही संघटना बरखास्त करण्याचे तमिळनाडू सरकारने ठरविले आहे. ही संघटना द्र. मु. क. पक्षाच्या राजवटीत फेब्रुवारी १९६८ मध्ये स्थापन झाली. ही संघटना राजकीय व स्थानिक नेतृत्व विकसित करण्याच्या आणि मनुष्यबळाचा अधिक चांगला उपयोग करण्याच्या हेतूने स्थापन झाली असली, तरी तिच्यातील स्वयंसेवकांची नोंदणी राजकीय भूमिकेतून होत असे. राज्य सरकार सालीना १४ लक्ष रु. या संघटनेसाठी खर्च करीत असे. गेल्या आठ वर्षांतील या संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आल्यावर असे आढळून आले, की या संघटनेकडून सेवाकार्य नाममात्र होत होते. मे १९७६ मध्ये राज्य वक्फ मंडळाची मुदत संपत असून त्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या सोयीकरता राज्याची १४ जिल्ह्यांत विभागणी केली असून १९७४ मध्ये पुदुकोट्टई हा आणखी एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. राज्यात ८४ नगरपालिका व एक महानगरपालिका आहे. अलीकडे त्रिसूत्री पंचायतपद्धतीचा स्वीकार केला आहे व जमीनवसुलीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाविकासमंडळ, तालुका विकास समिती आणि ग्रामपंचायती या संस्थांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय अधिकार असून ते या संस्थांच्या कार्यास मार्गदर्शन करतात व त्यावर नियंत्रण ठेवतात. बहुतेक खेड्यांतून वीजपुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा इ. सोयी उपलब्ध असून यांबाबतीत राज्यात प्रगती झाली आहे. मद्रास हे राजधानीचे ठिकाण असून तमिळ ही जिल्हापातळीपर्यंत प्रशासनाची भाषा आहे. मद्रास या राजधानीत उच्च न्यायालय आहे.

देशपांडे, सु. र.

आर्थिक स्थिती : या राज्यातील एकूण जमिनीपैकी सु. ४९% जमीन लागवडीखाली आहे. शेतीयोग्य जमिनीपैकी सु. ४१% (कमाल जमीनधारणा मर्यादा प्रत्येक कुटुंबास १५ हे. आहे) जमिनीला जलसिंचनाने पाण्याचा पुरवठा केला जातो. तांदूळ, कापूस, तंबाखू, ऊस, भुईमूग आणि कॉफी ही महत्त्वाची पिके असून भरड धान्ये थोड्याफार प्रमाणात होतात. या राज्याच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या गाळाच्या सुपीक भागात शेतीचा जास्त विकास झाला आहे.


आंध्र प्रदेशापासून विलग होण्यापूर्वी तांदुळाच्या उत्पादनात या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागत असे परंतु हल्ली तांदूळ उत्पादनाचा बराचसा भाग आंध्र प्रदेशात विलीन झाला आहे. त्यामुळे उत्पादन पूर्वीपेक्षा कमी झालेले आहे. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात भाताच्या शेतीचा बराच विस्तार झाला आहे. तंजावर, चिंगलपुट व द. अर्काट ह्या जिल्ह्यांमध्ये विस्तृत प्रमाणावर भाताची शेती केली जाते. वर्षातून रब्बी आणि खरीप भाताची दोन पिके घेतली जातात.

जलसिंचनाखाली आलेल्या भागात मद्रास, द. अर्काट, तिरुनेलवेली व कोईमतूर हे जिल्हे ऊसाच्या लागवडीस महत्त्वाचे आहेत. कोईमतूर येथे भारत सरकारने ऊस संशोधन केंद्र स्थापन कले आहे.

नगदी पीक म्हणून या राज्यात तंबाखूच्या लागवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिगारेटी तयार करण्यासाठी लागणाऱ्या उच्च प्रतीच्या तंबाखूची लागवड होते. कोईमतूर, मदुराई आणि तिरुचिरापल्ली हे जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात महत्त्वाचे आहे. बेदसिंदूर या ठिकाणी सिगारेट आणि चिरूट तयार करण्याचा कारखाना आहे.

कापसाच्या उत्पादनात भारतात हे महत्त्वाचे राज्य मानले जाते. नगदी पीक म्हणून ओलितावर उच्च प्रतीच्या कापसाची विस्तृत प्रमाणावर लागवड केली जाते. रामनाथपुरम्, मदुराई, सेलम, तिरुनेलवेली आणि तिरुचिरापल्ली हे जिल्हे कापसाच्या उत्पादनात महत्त्वाचे आहेत.

या राज्यात नैर्ऋत्य भागात असलेल्या डोंगर उतारावरील भागात कॉफीची लागवड केली आहे. निलगिरी पर्वत कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. १९७३–७४ मध्ये ८,१५० टन कॉफीचे उत्पादन झाले. चहा, रबर यांचेही व्यापारी उत्पादन होते.

भुईमूग आणि तीळ या तेलबियांची लागवड आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. तिळाच्या उत्पादनात भारतात हे राज्य महत्त्वाचे आहे. तेलबियांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ५% जमीन तिळाच्या लागवडीखाली आणि ८४% जमीन भुईमुगाच्या लागवडीखाली आहे. यांशिवाय ज्वारी, रागी आणि बाजरी ह्यांची शेती थोड्याफार प्रमाणात होते.

राज्यात १९७३-७४ मध्ये तांदूळ ५५,९५,००० टन, ज्वारी ५,६२,५०० टन, बाजरी २,९६,९०० टन, रागी २,८६,९०० टन इतर कडधान्ये ३,०९,९०० टन, हरभरा ६,००० टन, तूर ४६,८०० टन, कापूस १८० किग्रॅ. ची एक अशा ३,४०,७०० गासड्या, भुईमूग ११,६२,००० टन, एरंडी ४,१०० टन, तीळ ४०,००० टन, मोहरी २०० टन, ऊस १,३५,९४,८०० टन, गूळ १३,७२,५०० टन, मिरच्या १,०९,२०० टन, सुंठ ६२० टन, हळद ३५,७०० टन, केळी १०,३२,७०० टन, वेलदोडे ४०० टन, चहा ५,६०,२०,००० किग्रॅ., तंबाखू १,८६,००० किग्रॅ., सुपारी १,८०० टन (१९७२-७३) असे प्रमुख उत्पादन झाले. पशुसंवर्धनाकडे लक्ष पुरविले जाते. भारतातील उत्तम जातीच्या गाई–बैलांत तमिळनाडूतील काही जातींचा समावेश आहे. पिण्यासाठी विशेषतः लहान मुलांसाठी गाईचे दूध वापरण्यावर काही लोकांचा कटाक्ष असतो. बारगुर व कोंगायम बैल शेतीच्या व इतर श्रमाच्या कामांसाठी उपयोगी म्हणून प्रसिद्ध आहेत. मुऱ्हा म्हशीच्या पैदाशीचे केंद्र अलमढी येथे स्थापन झाले आहे. दुग्धव्यवसायासाठी कोईमतूर, कोडईकानल, मदुराई, मद्रास, कन्याकुमारी, तिरुचिरापल्ली, तंजावर व चिदंबरम् येथे केंद्रे स्थापन झाली आहेत. त्यांची एकूण क्षमता १,८०,००० लि. असून १९७३-७४ मध्ये १,५८,७८५ लि. उत्पादन झाले. मद्रासला पशुवैद्यक महाविद्यालय आहे. किनारी प्रदेशात मच्छीमारी व्यवसाय महत्त्वाचा आहे. १९७४-७५ मधील मासेपकडीचा अंदाज १,६०,००० टन गोड्या पाण्यातील मासे व ३,१४,००० टन समुद्रातील मासे असा होता.


जलसिंचन : तमिळनाडू राज्यात शेतीच्या दृष्टीने पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने या राज्यात शेतीच्या विकासाच्या दृष्टीने जलसिंचनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन काळी बांधलेल्या आणि थोड्याशाच डागडुजीने आजही सुस्थितीत असलेल्या कावेरीवरील ग्रँड ॲनिकट व ताम्रपर्णीवरील आठ बंधारे यांवरून प्राचीन काळीही जलसिंचन योजनांना किंती महत्त्व दिले जात असे, हे लक्षात येते. या राज्यात नद्या आणि सरोवरे यांचा जलसिंचनासाठी फार वापर करतात. येथील मानवनिर्मित सरोवरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पावसाचे पाणी नद्यानाल्यांतून वाहून जाताना ते ठिकठिकाणी लहानमोठ्या तळ्यांत साठविलेले असते. त्यासाठी जरूरीपुरते मातीचे उंच बांध घातलेले असतात. या पाण्यावर ताडामाडांच्या बागा, तांदूळ, ज्वारी, कापूस, भुईमूग, तीळ व इतर तेलबिया, रागी, कुंबू इ. अनेक पिके काढतात. विशेषतः मदुराई–रामनाथपुरम् हा असा अद्वितीय तडागप्रदेश केवळ यांमुळेच उपजाऊ झाला आहे. अन्यथा जांभा व नीस दगडांच्या मृदांचा हा प्रदेश उजाडच राहिला असता. आता तो ४०% ओलिताखाली आहे. राज्याचा सु. ३३% भाग जलसिंचनाखाली आला आहे. या राज्यात बहुतेक कालव्यांद्वारे जमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. यादृष्टीने खालील योजना महत्त्वाच्या आहेत.

(१) मेत्तूर धरण योजना : १९३४ मध्ये या राज्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या कावेरी नदीवर मेत्तूरजवळ धरण बांधून त्यापासून काढलेल्या कालव्यांनी सु. ५,००,००० हे, जमीन ओलिताखाली आली आहे. अलीकडेच या जलाशयापासून आणखी कालवे काढून कोईमतूर आणि सेलम जिल्ह्यांतील सु. १८,००० हे. जादा जमीन जलसिंचनाखाली आणली आहे. या कालव्यांमुळे भाताच्या शेतीचा विस्तार होऊन भुईमुगाचीही भरपूर लागवड केली जाते.

(२) कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील कालवे : कावेरी नदीच्या कॉलेरून फाट्यावर बांध घालून त्यापासून सु. ६,४०० किमी. लांबीचे कालवे काढून सु. ४,००,००० हे. जमीन जलसिंचनाखाली आणली आहे.

(३) पेरियार बांध योजना : पेरियार नदीवर केरळ राज्यात बांध घालून तेथील पाणी सु. १७ किमी. लांबीच्या बोगद्यातून तमिळनाडू राज्याच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या वैगई नदीत आणून सोडले आहे. यामुळे वैगई नदीत बाराही महिने पाण्याचा पुरवठा भरपूर होतो. या नदीपासून सु. ४०० किमी. लांबीचे कालवे काढून ४०,००० हे. जमीन ओलिताखाली आणली आहे.

(४) लोअर भवानी योजना : ही बहुउद्देशीय योजना असून जलसिंचन व जलविद्युत् शक्ती निर्मिती हे दोन्ही उद्देश या प्रकल्पामुळे साध्य झाले आहेत. कावेरी नदीच्या वरच्या टप्प्यात १९५६ मध्ये भवानी नदीवर धरण बांधून त्यापासून १,२०२ किमी लांबीचे कालवे काढण्यात आले आहेत. सु. ९०,००० हे. जमीन पाण्याखाली आली आहे.

याशिवाय केरळ राज्याच्या सहकार्याने पेरंबीकुलम्–अलियार या बहुउद्देशीय प्रकल्पानुसार ८ नद्यांचा जलसिंचनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. त्यांपैकी सहा नद्या अन्नमलई टेकड्यांच्या भागातून वाहणाऱ्या आहेत. या प्रकल्पानुसार सु. १,००,००० हे. जमीन ओलिताखाली येईल.

स्वातंत्र्योत्तर काळात भवानी, अमरावती, वैगई, कृष्णगिरी, सठनूर व पुलांबडी–कट्टलई उच्च पातळी कालवा या महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.


खनिज संपत्ती : या राज्यात अनेक प्रकारचे खनिज पदार्थ सापडतात. मॅग्नेसाइटच्या उत्पादनात या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो. एकणू उत्पादनाच्या ८० ते ९०% मॅग्नेसाइटचे उत्पादन तमिळनाडूतूनच येते. सेलम जिल्ह्यात उच्च प्रतीच्या मॅग्नेसाइट धातूचे भरपूर साठे आहेत, तसेच या जिल्ह्यात लोहधातुकाचे विपुल साठे आहेत. परंतु उच्च प्रतीच्या लोहधातुकाचे साठे कमी आहेत. तिरुचिरापल्ली, द. अर्काट, निलगिरी, एरोड या भागांतही लोहधातुक सापडते.

जिप्समच्या उत्पादनात हे राज्य भारतात महत्त्वाचे आहे. भारताच्या जिप्समच्या एकूण उत्पादनाच्या ३०% जिप्समचे उत्पादन या राज्यातूनच मिळते. कोईमतूर, तिरुनेलवेली, तिरुचिरापल्ली हे जिल्हे जिप्समच्या उत्पादनात महत्त्वाचे आहेत.

या राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर मीठ तयार करण्याचा व्यवसाय चालतो. मिठाचे वार्षिक सरासरी उत्पादन ७ लाख टन असून कर्नाटक, प. बंगाल, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मीठ पाठविले जाते.

भारतातील चुनखडीच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास १२% उत्पादन तमिळनाडूतून मिळते व तेही प्रामुख्याने कोईमतूर, सेलम, तिरुनेलवेली आणि तिरुचिरापल्ली येथून मिळते.

सेलम जिल्ह्यात बॉक्साइट, तिरुचिरापल्ली जिल्ह्यात फॉस्फेट, कन्याकुमारी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातून, नेयवेलीजवळ लिग्नाइट प्रकारच्या कोळशाचे भरपूर साठे आहेत. नेयवेली प्रकल्पानुसार दरवर्षी या भागातून ३५,००,००० टन कोळशाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील १५,००,००० टन कोळसा नेयवेलीजवळ उभारण्यात आलेल्या औष्णिक विद्युत् केंद्रात वापरण्यात येईल. या केंद्रापासून २·५ लक्ष किवॉ. विद्युत् शक्तीचे उत्पादन होईल. याशिवाय ५,००,००० टन कोळसा युरिया खत कारखान्यात वापरण्यात येईल व त्यापासून १,५२,००० टन युरिया खताचे उत्पादन होईल. त्याचप्रमाणे लिग्नाइट कोळशाच्या भुग्यापासून भट्ट्यांना लागणाऱ्या विटा तयार करण्यात येतील. नेयवेली कोळसा उत्पादन प्रदेशाजवळ लोह–पोलाद उद्योग उभारण्याची योजना आहे. १९७३ मध्ये येथे ३३ लक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. याशिवाय क्रोमाइट, फेल्डस्पार, क्वार्ट्‌झ डोलोमाइट, वैदुर्य, कुरविंद, जस्त, अभ्रक, सोने, ग्राफाइट, पायराइट, स्टिअराइट इ. खनिजे कमी अधिक प्रमाणात सापडतात. १९७२ मध्ये या राज्यात एकूण सु. १५,८२,६३,००० रु. किंमतीच्या खनिजांचे उत्पादन झाले. येथील किनाऱ्यावरील वाळूत केरळप्रमाणेच मोनाझाइट हे अणुशक्ती उत्पादनास उपयोगी खनिज सापडते. महावलकुरिची जवळील वाळूत इल्मेनाइट हे खनिज सापडते. सध्या ते जपानला निर्यात होते.

जलविद्युत् शक्ती : १९२८ पासून या राज्यात जलविद्युत् शक्तीच्या उत्पादनास सुरुवात झाली व आता या राज्यात जलविद्युत् शक्तीचा इतका विकास झाला आहे, की लहान लहान खेड्यांतही वीज खेळू लागली आहे. जलविद्युत् शक्तीच्या उत्पादनात या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.

या राज्यात जलविद्युत् शक्ती निर्माण करणारी १७ व औष्णिक शक्ती निर्माण करणारी ३ केंद्रे आहेत. एकूण विद्युत् निर्माण क्षमता १९७३ मध्ये २,१८५ मेवॉ. हाती. त्याचप्रमाणे चिंगलपुट जिल्ह्यात कल्पकम या ठिकाणी आण्विक शक्ती निर्माण करणाऱ्या केंद्राची उभारणी चालू आहे. शहरे आणि खेडी मिळून एकूण ६१,१०५ गावांना वीज पुरविली जाते (मे १९७४). कावेरीवरील मेत्तूर, पैकारा व ताम्रपर्णीवरील पापनाशम् ही विद्युत् उत्पादन केंद्रे जोडणारे वीजजाळे निर्माण केलेले आहे. पेरंबीकुलम्–अलियार योजनेपासून १८५ मेवॉ. विद्युत् शक्तीचे उत्पादन होईल.


उद्योगधंदे : वस्तुनिर्माण उद्योगांचा बराच विकास झाला आहे. सुतीवस्त्र उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग आणि यांत्रिक उद्योग, काड्यापेट्या तयार करण्याचा उद्योग हे प्रमुख उद्योग आहेत. यांशिवाय हस्तव्यवसायावर आधारित बरेच उद्योग या राज्यात चालतात.

सुतीवस्त्र उद्योगाचा या राज्यात बराच विकास झाला आहे. लहानमोठ्या एकूण २१० कापडगिरण्या आहेत. यांत कोईमतूर, मद्रास व मदुराई या ठिकाणी सुतीवस्त्र गिरण्यांचे स्थानिकीकरण झाले आहे. एकट्या कोईमतूर येथे ११५ गिरण्या आहेत. सु १४,००,००,००० किग्रॅ. सुती धाग्याचे व १५,००,००,००० मी. सुती कापडाचे उत्पादन होते. येथील हातमागावरील कापड प्रसिद्ध आहे. मद्रासला कृत्रिम धाग्याचे उत्पादन होते. कोईमतूर, सेलम, निलगिरी, तिरुनेलवेली, धर्मपुरी जिल्ह्यांत रेशमाचे उत्पादन होते.

साखर कारखाने : या राज्यात उ. अर्काट, द. अर्काट. तिरुचिरापल्ली आणि मदुराई या जिल्ह्यांत साखर कारखाने स्थापन झाले आहेत. १९७३–७४ मध्ये ३,३२,४०३ मे. टन साखरेचे उत्पादन झाले.

सिमेंट उद्योग : सिमेंट तयार करण्याचे या राज्यात तीन कारखाने आहेत. उत्पादनक्षमता १८,००,००० मे. टन कोईमतूर जिल्ह्यात मदुक्कराई, तिरुचिरापल्ली जिल्ह्यात दालमियापुरम् आणि तिरुनेलवेली भागात तिलाईउर या ठिकाणी सिमेंटचे कारखाने स्थापन झाले आहेत. या उत्पादनात राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

काड्यापेट्या कारखाने : काड्यापेट्या तयार करण्याचे एकूण आठ कारखाने आहेत. रामनाथपुरम्, चिंगलपुट, तिरुनेलवेली व उ. अर्काट जिल्ह्यांत हे कारखाने स्थापन झाले आहेत. दरवर्षी ६०,००,००० काडेपेट्या तयार होतात.

याशिवाय मद्रास, कोईमतूर व मदुराई या ठिकाणी लोकरी कापड, कोईमतूर येथे काच, मद्रास आणि सेलम येथे वनस्पती तूप, मेत्तूर व मद्रास येथे रासायनिक पदार्थ, मद्रासला मोटारगाड्या, कोईमतूर येथे सायकली तयार करण्याचे कारखाने स्थापन झाले आहेत. यांशिवाय खते, चिरूट, सिगारेट, रबर, चर्मोद्योग, कागद, रेयॉन ग्रेड पल्प, कापडगिरण्यांची यंत्रे, पंप, वीजयंत्रे, ट्रॅक्टर, टायर, ट्यूब, विटा, कौले, रेशीम व रेशमी कापड इ. उद्योगांचा विकास होत आहे. सेलम जिल्ह्यातील कावेरी, पल्लीपलायम् व एरोड येथे कागद गिरण्या आहेत.

या राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील नेयवेली लिग्नाइट, इंटीग्रल काच फॅक्टरी, हायप्रेशर बॉयलर प्लँट, हिंदुस्थान फोटो फिल्म कारखाना, शस्त्रक्रिया उपकरण कारखाना, हिंदुस्थान टेलिप्रिंटर्स, मद्रास रिफायनरीज, मद्रास फर्टिलायझर्स, जडवाहने, काही संरक्षण सामग्री, सेलम स्टील प्लँट इ. कारखाने आहेत.

या राज्यातून कमावलेली कातडी, कातडी सामान, सुती कापड व सूत, चहा, कॉफी, मसाले, अभियांत्रिकी व मोटारउद्योगावलंबित वस्तू निर्यात होतात.


सप्टेंबर १९७३ अखेर राज्यात एकूण ९,६६,६०० कामगार होते. त्यांचे १५,६०० शेती, पशुपालन, जंगल व मासेमारी १८,८०० खाणकाम ६२,१०० निर्मितीउद्योग ५०,५०० बांधकाम, ७५,००० वीज, वायू, पाणी व स्वच्छता ३५,७०० व्यापार–वाणिज्य,७५,४०० वाहतूक, दळणवळण, साठा,३३,००० विविध सेवा असे वर्गीकरण होते. मार्च १९७३ अखेर २,४०३ कामगार संघटना होत्या. १९७३ मध्ये ३०४ संप व टाळेबंद्या झाल्या.

वाहतूक व दळणवळण : राज्यातील एकणू ९२,८३० किमी. लांबीच्या सडकांपैकी ५२,६४३ किमी. पक्के रस्ते आहेत. मोटारींच्या ७८,४६३ रस्त्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग १,८५५ किमी. राज्य महामार्ग १,७२९ किमी. मोठे जिल्हारस्ते १३,८६४ किमी. इतर जिल्हारस्ते व ग्रामरस्ते १०,६८० किमी. पंचायतीकडील रस्ते ४२,७२० किमी. नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याकडील रस्ते ७,६१५ किमी आहेत. ३१ मार्च १९७४ रोजी मोटारवाहनांची संख्या १,६६,५१३ होती.

राज्यात ३१ मार्च १९७२ रोजी ४१,७३७ मोटारसायकली, २,१५७ ऑटोरिक्षा, ४,८९१ जीपगाड्या, ४८,७४८ खाजगी मोटारी, ९,४३४ टॅक्सी, १०,८०२ बसगाड्या, २०,४८९ मालवाहू मोटारी व ४,१५४ इतर वाहने होती.

मद्रास येथे द. रेल्वेचे मुख्य कार्यालय असून पेरांबूर येथे रेल्वेचे डबे बांधण्याचा कारखाना आहे.

भारतातील मोठ्या बंदरांत मद्रास व तुतिकोरिन यांची गणना होते. त्यांशिवाय कडलोर, नागापट्टणम्, रामेश्वर, पांबन, किलाकराई ही दुय्यम व इतर अनेक छोटी बंदरे आहेत.

आंध्र व तमिळनाडू राज्यांतून जाणारा बकिंगहॅम कालवा अंतर्गत जलवाहतुकीस उपयोगी आहे.

मद्रासचा मीनांबक्कम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिरुचिरापल्ली, कोईमतूर, मदुराई, रामनाड, तंजावर, वेल्लोर येथेही विमानतळ आहेत. कोईमतूर, मद्रास येथे विमानोड्डाण संस्था असून त्यांस शासकीय मदत मिळते. राज्यात १९७४ अखेर ९,४२२ ग्रामीण व १,५२४ नागरी डाकघरे तर १,६०४ तारघरे होती. नोव्हेंबर १९७४ अखेर दूरध्वनी केंद्रे १८ व दूरध्वनी यंत्रे ८५,८१० होती.

लोक व समाजजीवन : उपलब्ध पुराव्यानुसार या राज्याच्या सामाजिक इतिहासास इ. स. पू. पाचव्या शतकापासून प्रारंभ होतो. यापूर्वीदेखील रामायण, महाभारत इ. काव्यग्रंथांत पांड्य, चोल, तेर व पल्लव वंशाचे लोक या राज्यात वास्तव्य करीत होते, असे उल्लेख आढळतात. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वंशांचे लोक या राज्यात स्थायिक झाल्यामुळे या राज्यातील लोकांच्या सामाजिक जीवनावर भिन्न भिन्न वंशांच्या लोकांचा परिणाम झालेला दिसतो. एकूण लोकसंख्येपैकी बहुतांशी लोक तमिळ भाषा बोलणारे आहेत. तमिळ ही राज्यभाषा आहे. याशिवाय तेलुगू, मल्याळम्, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या भाषाही या राज्यात प्रचलित आहेत.


 प्राचीन संस्कृतीच्या दृष्टीने विचार केल्यास भारतातील गोदावरी नदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत द्रविड लोकांचे वास्तव्य आहे. काही विद्वानांच्या मतांनुसार अज्ञात काळापासून द्रविड लोक हे द. भारतातील मूळ निवासी आहेत. काही इतिहासकारांच्या मतांप्रमाणे द्रविड लोक मध्य आशियातून बलुचिस्तानमार्गे द. भारतात आले असावेत. सध्या द. भारतातील तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत राहणारे बहुतांशी लोक द्रविड मानले जातात. द्रविड लोकांमध्ये, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम् या प्रमुख भाषांशिवाय तुळू, कुर्गी, कोडगू, गोंड, तोडा, कोहा इ. भाषाही प्रचलित आहेत. हल्ली या राज्यात बोलल्या जाणाऱ्या तमिळ भाषेचे बलुचिस्तानात बोलल्या जाणाऱ्या ब्राहुई भाषेशी बरचे साम्य आढळते. एकूण लोकसंख्येच्या ८३·१% लोक तमिळ भाषा बोलणारे आहेत. १०% लोक तेलुगू बोलणारे आहेत. कन्नड भाषी सु. ३% आहेत. उर्दूभाषी २ टक्क्यांपेक्षा कमी व मल्याळम् भाषी १ टक्क्यांहून जास्त आहेत.

या राज्यात प्राचीन काळापासून जैन, बौद्ध, हिंदू (शैव, वैष्णव, शाक्त, कापालिक) इ. विविध धर्मांच्या लोकांचे वास्तव्य झाल्याचे दिसून येते. प्राचीन काळी हे लोक भूतप्रेत, वनस्पती, नाग इत्यादींची पूजा करीत असत. तंत्र व मंत्र यांवर त्यांचा फार विश्वास होता. पशूंचा बळी देऊन देवतांना प्रसन्न करण्यावर त्यांचा भर होता परंतु काळाच्या ओघात या लोकांच्या अंधश्रद्धा नष्ट होत जाऊन त्यांचे धार्मिक आचारविचार अधिक प्रगत व सुसंस्कृत झाले. प्राचीन काळापासून हे लोक शिवाची पूजा करीत आणि अजूनही द. भारतात व विशेषतः तमिळनाडूमध्ये शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. या राज्यातील मंदिरांच्या संख्येवरून त्याला ‘मंदिरांचे’ घर मानले जाते. मंदिर हे सामाजिक जीवनाचे आणि वस्तीचेही केंद्र असे. कित्येक मंदिराच्या विस्तीर्ण प्राकारात हजारो लोकांची वस्ती असे व मंदिरांच्या उंच आणि भक्कम तटबंदीचा उपयोग संरक्षणासाठी होई. या राज्यात एकूण १२५ मंदिरे आहेत. त्यांत शिवमंदिरांची संख्या जास्त आहे. बहुतेक लोक शिवाचे भक्त आहेत. तथापि १९६१ मध्ये सु. ३४,००० लोकांनी आपण निरीश्वरवादी आहोत असे नमूद केले आहे, ही नवीन प्रवृत्ती लक्षणीय आहे. १९७१ मध्ये राज्यातील ८९% लोक हिंदू, ५·७% मुस्लिम, ५·७% ख्रिश्चन, ४,३५५ शीख, १,१४८ बौद्ध, ४,१०९ जैन, ६,०८० इतर धर्मीय आणि ६९० लोक धर्म न नोंदलेले होते.

तमिळनाडूमधील लोक उत्सवप्रेमी आहेत. या राज्यात पोंगळ या सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या पर्वाला तमिळ भाषेत पोंगळ असे म्हणतात. सौर पंचांगानुसार पौष महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या तीन दिवसांच्या सणाला सुरुवात होते. कृषक वर्गात या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी शेतातील नवीन धान्य घरात येते. या नवीन धान्याचा वापर करण्यापूर्वी सूर्याला या धान्याचा नैवेद्य देतात. या दिवशी मृत्पात्रामध्ये खुल्या अंगणामध्येच तांदूळ, गूळ आणि दूध यांच्यापासून खीर (पायसम्) तयार केली जाते. प्रथम ती सूर्यदेवतेला अर्पण करतात व त्यानंतर घरातील सर्व लोक खीर खातात. दुसऱ्या दिवशी सस्यलक्ष्मीची आणि तिसऱ्या दिवशी पशुधनाची पूजा होते.

संध्याकाळी गाई आणि बैल सजवून त्यांची मिरवणूक काढतात. त्यात बैलांची शर्यती आयोजित करतात. वैकुंठ (मुक्कोडी) एकादशी हा धार्मिक उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला असतो. या दिवशी लोक श्रीरंगम्‌ची यात्रा करतात.

एकूण लोकसंख्येपैकी कृषिव्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त. त्यामुळे खेड्यांचे प्रमाण जास्त. खेड्यांत राहणाऱ्या लोकांचे जीवन पारंपारिक रूढींनुसार व्यतीत होताना दिसते परंतु अलीकडच्या काळात या राज्यात खाणी व उद्योगधंद्यांच्या विकासामुळे नवीन शहरे उदयास येऊन लोकांचे राहणीमान बरेच आधुनिक झाले आहे.

राज्याची १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ४,११,९९,१६८ होती. म्हणजे १९६१ पासून १९७१ पर्यंत लोकसंख्येत २२·३० टक्क्यांनी वाढ झाली. या राज्यात दर १,००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९७८ इतके आहे आणि लोकसंख्येती घनता दर चौ. किमी. ला ३१७ आहे. उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे शहरी लोकसंख्येचे प्रमाण ३०·२६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. सु. ४०% लोक साक्षर आहेत. एकूण पुरुषांपैकी ५६% व स्त्रियांपैकी २७% साक्षर आहेत. १९७२ मध्ये जन्मप्रमाण दर हजारी २४·४ व मृत्युचे प्रमाण दर हजारी ८·४ इतके होते. बालमृत्यूचे प्रमाण मात्र दर हजारी ५५ होते. ३२% लोक शेतीव्यवसायात, ३०% लोक शेतमजूर व ३८% लोक इतर व्यवसायांत गुंतले आहेत. या राज्यात अलीकडच्या काळात उद्योगधंद्यांचा झपाट्याने विकास झाल्याने सभोवतालच्या राज्यातून बरेच लोक स्थलांतर करून येथे येऊन राहिले आहेत. लोकांची प्रमुख भाषा तमिळ असून इंग्रजी जोडभाषा म्हणून वापरतात. हिंदीला होणारा मोठा विरोध हळूहळू सौम्य होत आहे. यांशिवाय तुळू, कुर्गी, कोडगू, गोंड, कोहा, तोडा इ. भाषाही बोलल्या जातात.


या राज्यात शहरी आणि ग्रामीण वसाहतींच्या स्वरूपात व रचनेत बरीच भिन्नता आढळून येते. तसेच हवामानानुसार घरांच्या बांधकामासाठी उपयोगात आणलेल्या बांधकामाच्या साहित्यात भिन्नता आढळते. सर्वसाधारणपणे खेड्यांतील घरांपैकी ६०% घरांची छप्परे गवत, पालापाचोळा, वेली आणि बांबू यांपासून तयार केलेली असतात. तसेच घरांच्या भिंती लाकूड, कच्च्या विटा व मातीच्या गिलाव्यापासून तयार केलेल्या असतात. शहरातील घरे मात्र पक्क्या विटा आणि सिमेंट यांपासून तयार केलेल्या भिंतीची आणि कौलारू छपरांची असतात. मोठमोठ्या शहरांत अत्याधुनिक सिमेंट–काँक्रीटची घरे आढळतात.

लोकांच्या अन्नात तांदूळ व उडीद यांस प्राधान्य असले तरी ज्वारी, बाजरी, मका, रागी, तूर इत्यादींचाही उपलब्धतेप्रमाणे उपयोग करतात. सामान्यतः खमंग, तळलेले, कडकडीत पदार्थ जास्त आवडीचे असले, तरी पोंगलसारखे किंवा पायसम्‌सारखे गोड पदार्थही खातात. फार मसालेदार पदार्थ खाण्याकडे प्रवृत्ती कमीच आढळते. कोरोमंडल किनारा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे कित्येक लोकांचे भात व मासे हेही अन्न असते.

बहुतांश लोक कृषक असल्यामुळे राहणीमान साधे असते. पुरुष मंडळी पांढऱ्या कापडाची लुंगी आणि सदरा घालतात, तर स्त्रिया हातमागावर विणलेल्या साड्या व झंपर घालतात. निलगिरी पर्वतभागातील तोडा वगैरे आदिवासी लोक झोपड्यांत राहतात व जंगलातून मिळणाऱ्या पदार्थांवर उदरनिर्वाह करतात. यातील काही जमाती फिरती शेती करतात.

सार्वजनिक आरोग्य : राज्यात ३० जून १९७४ रोजी ३६२ रुग्णालये, ६८४ ॲलोपथिक दवाखाने, ९९ आयुर्वेदिक दवाखाने, ॲलोपथिक रुग्णालयांत ३६,२४२ रुग्णशैय्या, आयुर्वेदीय रुग्णालयांतून ६०० रुग्णशैय्या, १९,०८८ परिचारिका व २१,९९२ नोंदलेले डॉक्टर होते. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता शिक्षणाची सोय गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे. मद्रासला मनोरुग्णालय व मानसिक दृष्ट्या मागासलेल्या व अपंग मुलांसाठी संस्था आहे. ८ रुग्णालयांतून कर्करोगावर उपचार केले जातात. अंधांसाठी सु. २० व मूक–बहिऱ्यांसाठी सु. १७ संस्था आहेत. कुष्ठरोग्यांसाठी २१ संस्था आहेत. देवी, कॉलरा, मलेरिया, क्षय इ. रोगांचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

समाजकल्याण : मद्रास व कोईमतूर जिल्ह्यातील पिलामेदू येथे समाजकार्य शिक्षणसंस्था आहेत. मद्रासला बालकल्याण संस्था व मद्रास आणि नागरकोईल येथे मुक्तिफौज केंद्रे आहेत. अंधांच्या शिक्षकांची अकादमी तिरुनेलवेली जिल्ह्यात पलायनकोट्टाई येथे आहे. मद्रासमध्ये ४ योग शिक्षणसंस्था आहेत. १९७३ मध्ये जननक्षम ७७ लक्ष जोडप्यांपैकी १८% जोडप्यांनी कुटुंबनियोजन केले आहे. १९७२–७३ च्या उद्दिष्टाच्या हे ३१·८% साध्य झाले आहे.

मद्रासच्या रामनाथपुरम् येथे विद्युत्–रासायनिक, मद्रासला क्षयरोग व संसर्गजन्य रोग, अड्यार, मद्रास येथे कातडी, कोईमतूर येथे वनस्पती व सेलम येथे हातमाग तंत्र, चिंगलपुट येथे कुष्ठ रोग, अशा संशोधन संस्था आहेत. कोडईकानल येथील खगोलीय भौतिकीय वेधशाळा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

भाषा–साहित्य : जगातील प्राचीन भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश होतो. अगस्ती ऋषींनी याच भाषेतून आयुर्वेद, शिल्पकला, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या विषयांचे ज्ञान दिले, असे मानले जाते.


तमिळ भाषेतून लिहिलेले साहित्य फार समृद्ध आहे. तमिळ साहित्याची सुरुवात इ. स. पू. ६०० ते ५०० दरम्यान झाली असावी असे मानले जाते. पांड्य वंशातील राजांनी तमिळ साहित्याच्या विकासासाठी बरेच उत्तेजन दिले.

तमिळ भाषेची शेंतमिळ आणि कोडुनतमिळ अशी दोन रूपे आहेत. शेंतमिळ ही साहित्यिक भाषा व कोडुनतमिळ ही लोकभाषा आहे.

तमिळ भाषेची स्वतंत्र लिपी आहे. भारतातील इतर भाषांच्या मानाने या भाषेत वापरण्यात येणाऱ्या शब्दांचे उच्चार आणि व्याकरण हे बरेच भिन्न आहे. तमिळ वर्णमालेत बारा स्वर व अठरा व्यंजने आहेत. सु. ३,००० वर्षांपूर्वी या भाषेतून काव्यरचनेला प्रारंभ झाला असावा. तमिळ वाङ्‌मयाची इयल (साहित्य), इशै (संगीत) आणि नाटकम् (नाट्य) अशी तीन वेगवेगळी अंगे आहेत. संत तिरुवळ्ळुवर यास तमिळ साहित्यात फार मोठे गौरवाचे स्थान आहे. त्याने ⇨ तिरुक्कुरळ या तमिळ काव्यग्रंथाची रचना केली. तमिळ साहित्यातील ⇨ शिलप्पधिकारम् हे महाकाव्य श्रेष्ठ मानले जाते. याशिवाय ⇨ मणिमेखलै ⇨ तिरुत्तक्कदेवरकृत जीवक–चिंतामणि, वळ्यापति व कुंडलकेशी हे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच या भाषेत पौराणिक व भक्तीवर साहित्याचीही बरीच निर्मिती झाली. ⇨ नायन्मार व ⇨ आळवार या अनुक्रमे शैव व वैष्णव संतांनी रचलेले भक्तिसाहित्य विशेष समृद्ध आहे. वात्सल्यरसप्रधान कवितांची रचना करणाऱ्या आळवार कवींमध्ये पॅरियाळवार (विष्णुचित्त) या कवीचे नाव फार आदराने घेतले जाते. श्रेष्ठ तमिळ कवी ⇨ कंबन ह्यांनी ⇨ कंब रामायण या महाकाव्याची रचना केली. आधुमिक तमिळ साहित्याच्या इतिहासात ⇨ सुब्रह्मण्य भारती या कवीला महत्त्वाचे स्थान आहे. या कवीने देशीय गीतगळ हे राष्ट्रीय काव्य लिहिले.

आज तमिळ साहित्याचा खूपच विकास झाला आहे. सध्या तमिळ भाषेत अनेक उत्तम ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचे संस्कृतमध्ये व भारतातील इतर भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. आरुमुग नावलर, नागनाथ, पंडितर, दामोदरम् पिळ्ळै, डॉ. स्वामिनाथ अय्यर, वेदनायकम् पिळ्ळै, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पुदुमैप्पित्तन्, कु. प. राजगोपालन्, ⇨ कल्कि(आर्. कृष्णमूर्ती), रंगनाथ, वे. सुब्रह्यण्य अय्यर, रा. राघवय्यंगार सोमसुंदर, डॉ. राधाकृष्णन् इ. साहित्यिकांचे वाङ्‌मय लोकप्रिय आहे.

ब्रिटिश राजवटीत मिशनरी लोकांनी आपल्या धर्मप्रचाराबरोबरच भारतीय भाषांचा अभ्यास करून त्यांचा विकास घडवून आणण्यात स्पृहणीय कामगिरी केली. रॉबर्ट डी. नोबिलिबस या ख्रिश्चन धर्मगुरूने तमिळ भाषेत दुषणाधिकारम् आणि आत्मनिर्माणम् नावाचे दोन ग्रंथ लिहिले. ⇨ रेव्हरंड बेस्की या धर्मगुरूने अविवेकपूर्ण गुरू नावाचे लहान मुलांना उपयुक्त असे पुस्तक लिहिले. ह्या सुमारास तांडवराय मुदलियार यांनी पंचतंत्राचा तमिळ भाषेत अनुवाद केला.

तमिळ भाषेतील प्रताप मुदलियार चरित्रम् ही पहिली कांदबरी ⇨ वेदनायकम् पिळ्ळै यांनी लिहिली. सुंदरम् पिळ्ळै या लेखकाचे मनोन्मणियम् हे प्रारंभीचे दर्जेदार नाटक होय. त्यानंतरच्या नाटकांमध्ये श्री. नारायणशास्त्रीकृत भोजराज चरितम्, श्री. संबंद मुदलियार यांची लीलावती, सुलोचना इ. नाटके प्रसिद्ध आहेत. तमिळ भाषेतील विश्वकोशही तयार झाला आहे. त्याचप्रमाणे तमिळ भाषेत जास्त खप असलेली अनेक नियतकालिके आहेत. आनंद विकटन्, कल्कि, कुमुदम्दिनमणि, कादिरि ही नियतकालिके विशेष प्रसिद्ध आहेत. कलैमंगल हे तमिळ भाषेतील दर्जेदार वाङ्‌मयीन नियतकालिक होय [⟶तमिळ भाषा तमिळ साहित्य].

वृत्तपत्रे: राज्यात १०४ दैनिके, ११९ साप्ताहिके, ३ त्रिसाप्ताहिके, १४६ पाक्षिके, ४६७ मासिके, ७९ त्रैमासिके, २८ द्वैमासिके व ११ वार्षिके निघतात. द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, द मेल ही इंग्रजी व थांती, दिनामलार, दिनमणि, नवमणि, नवशक्ती, स्वदेशमित्रन् इ. तमिळ दैनिके प्रसिद्ध आहेत.


शिक्षण : ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण मोफत आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. १९७३–७४ मध्ये ३७ पूर्वप्राथमिक शाळांतून २,०९० मुले, २,३०१ मुली व १३५ शिक्षक होते. २६,७२६ कनिष्ठ प्राथमिक शाळांतून २१,३२,२५३ मुले, १६,२६,८८७ मुली व १,०६,३३२ शिक्षक होते. ५,७७३ वरिष्ठ प्राथमिक शाळांतून १२,८०,०४५ मुले, ९,३३,९३६ मुली व ६६,८४३ शिक्षक होते. २,७१७ माध्यमिक शाळांतून १०,२०,१४१ मुले, ५,२९,३३२ मुली आणि ६२,९३३ शिक्षक होते. २४ उच्च माध्यमिक शाळांतून १०,१६७ मुले, १२,२४९ मुली आणि ८८२ शिक्षक होते. ९ केंद्रीय शाळांतून ५,३३८ मुले, २,८८८ मुली व ३५० शिक्षक होते. २० अँग्लो–इंडियन शाळांतून ११,४४५ मुले, २,६३४ मुली व ४४२ शिक्षक होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला जोडलेल्या २४ शाळांतून १०,७४२ मुले, ४,८०४ मुली व ६७५ शिक्षक होते. राज्यात मद्रास, अन्नमलईनगर, मदुराई व कोईमतूर येथे अनुक्रमे मद्रास, अन्नमलई, मदुराई आणि तमिळनाडू कृषी अशी चार विद्यापीठे आहेत. १९७३–७४ मध्ये राज्यातील १० वैद्यकीय महाविद्यालयांत ९,८८७ विद्यार्थी ३ कृषिमहाविद्यालयांत १,५१३ विद्यार्थी एका विधी महाविद्यालयात २,५४४ विद्यार्थी एका पशुवैद्यक महाविद्यालयात ८९४ विद्यार्थी १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांत ११,१९२ विद्यार्थी ३५ तांत्रिक शिक्षणसंस्थांतून ९,७६२ विद्यार्थी व १०७ तांत्रिकी, कला व औद्योगिक विद्यालयांतून १७,९१६ विद्यार्थी शिकते होते. मद्रास, मदुराई आणि वेल्लोर येथील वैद्यक महाविद्यालयांत औषधिशास्त्र मद्रासला दंतवैद्यक व पशुवैद्यक शिकण्याची सोय आहे.

कला–क्रीडा : तमिळनाडू राज्य भारतातील ललित कलांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. संगीत आणि नृत्य या कलांचा या राज्यामध्ये फार पूर्वीपासून विकास झाला आहे. या ललित कलांमधून राज्यातील धर्म, परंपरा व सामाजिक–सांस्कृतिक जीवन यांचे मनोज्ञ दर्शन घडते.

दक्षिण भारतातील परंपरागत नृत्यांमध्ये ⇨ भरतनाट्यम् हा एक प्रमुख नृत्यप्रकार मानला जातो. तमिळनाडूत या नृत्याचा विशेष विकास आणि प्रसार घडून आला. भरतनाट्यम् या नृत्यात विशिष्ट मुद्रा आणि अभिनय यांचा सुंदर मेळ पहावयास मिळतो. या नृत्याचे शास्त्रीय स्वरूप गती, स्वर, ताल, लय आणि राग यावर आधारलेले आहे. या नृत्यात मनोरम पदलालित्य व मान, हात, डोळे, ओठ, भुवया यांच्या हालचाली यांचे कलात्मक दर्शन घडते. भरतनाट्यम् या नृत्याखेरीज तमिळनाडूमध्ये प्रचलित असलेल्या प्राचीन नृत्यांमध्ये मूक अभिनययुक्त आणि नाट्यसंबद्ध अशा नृत्यांचा समावेश होतो. लोकनाट्यामध्ये मूकाभिनयाला विशेष महत्त्व दिले जाते. साहित्यिक नाटकांत ‘कुलु’व‘नाटकम्’हे प्रकार विशेष प्रचलित होते. तथापि भरतनाट्यम्‌च्या उदयाबरोबर हे प्रकार लुप्त झाले.‘कुरवंजी’ हा पारंपरिक नृत्यनाट्यप्रकारही वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. भरतनाट्यम्‌मध्ये तमिळनाडूतील अनेक स्त्रियांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांत ⇨ यामिनी कृष्णमूर्ती, कमला लक्ष्मण, ललिता, वैजयंतीमाला, पद्मिनी, रागिणी, कनका व हेमामालिनी या नर्तिका जागतिक कीर्तीच्या मानल्या जातात.

नृत्याप्रमाणे संगीतामध्येही तमिळनाडूची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. या राज्यात शास्त्रीय संगीताचा विशेष विकास झालेला आहे. ⇨ त्यागराज, ⇨मुथ्थुस्वामी दीक्षितर, ⇨श्यामशास्त्री यांसारखे श्रेष्ठ संगीतकार या राज्यात होऊन गेले. त्यांनी कर्नाटक संगीताच्या विकासाला मोठा हातभार लावला. वाद्यसंगीतामध्ये दक्षिणी वीणा या तंतूवाद्याला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या वाद्याची रचना शास्त्रीय संगीतास अनुसरूनच करण्यात आली आहे. सैद्धांतिक व प्रायोगिक दृष्ट्या या वाद्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. याशिवाय ‘घटम्(गोटुवाद्य),‘नागस्वरम्(एक प्रकारची शहनाई) इ. वाद्ये प्रचलित आहेत.‘नागस्वरम्’या वाद्याचा मंगल प्रसंगी उपयोग केला जातो. या वाद्याचे स्वर व लय अत्यंत मनोहारी असतात.‘मृदंगम्’ हे वाद्यही तमिळनाडूमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. चिट्टिबाबू व बालचंदर हे वादक वीणावादनात निपुण समजले जातात.

रंगभूमी : तमिळ रंगभूमीला दीर्घ परंपरा आहे. संगीत, नृत्य व काव्य यांचा सुसंवादी आविष्कार हे या रंगभूमीचे वैशिष्ट्य. पारंपरिक ‘भागवत मेळा’हे त्याचे एक उदाहरण होय. पद्यनाटकांची परंपरा तमिळमध्ये आढळते. अशा नाटकांचा आदर्श सुंदरम् पिळ्ळैच्यामनोन्मणियम्‌मध्ये आढळतो. पी. एस्. मुदलियार यांची नाटके विशेष उल्लेखनीय आहेत. पौराणिक आणि राजकीय प्रचारात्मक नाटके, हे तमिळ नाट्यसाहित्याचे वैशिष्ट्य आहे. वक्तृत्वपूर्ण भाषणे तमिळ रांगभूमीवर विशेष लोकप्रिय आहेत. टी. के. शण्मुगम्, एम्. जी. रामचंद्रन्, शिवाजी गणेशन् हे तमिळ रंगभूमीवरील विशेष लोकप्रिय नट होत. बॉइज कंपनीज,‘सेवा स्टेज’ तसेच टी. के शण्मुगम्, नवाब राजमणिक्कम्, मनोहरन् इत्यादींच्या नाट्यमंडळांचे तमिळ रंगभूमीवरील कार्य उल्लेखनीय आहे. चो हा प्रसिद्ध नाटककार असून तो स्वतः रंगभूमीवरील एक चांगला अभिनेताही आहे. सामाजिक व राजकीय उपरोध हे त्याच्या नाटकांचे वैशिष्ट्य होय. तथापि त्याची नाटके तात्कालिक महत्त्वाच्या विषयांवर आधारलेली असतात. भारतीदासन्, अण्णादुरै, एम्. आर्. राधा, डॉ. करुणानिधी, इंदिरा पार्थसारथी इ. नाटककार व नाट्यनिर्माते तमिळ रंगभूमीवर लोकप्रिय ठरले आहेत. तमिळमधील एकांकिका आणि नभोनाट्येही प्रगतिपथावर असल्याचे दिसते.  


 चित्रपट : चित्रपटव्यवसायाला पूर्वीच्या मद्रास इलाख्यात १९१७ मध्ये सुरुवात झाली. कीचकवध, भीष्मप्रतिज्ञा हे पहिले पहिले चित्रपट होत. आर्. नटराज मुदलियार, आर्. व्यंकय्या, एस्. व्हिन्सेंट, इलीस आर्. डंकन, ए. नारायण, ठाकूर एच्. देसाई, चिमणलाल देसाई हे या व्यवसायातील निर्माते, प्रदर्शक, दिग्दर्शक, वितरक वगैरे होत. पहिला तमिळ बोलपट कालिदास हा १९३१ मध्ये मुंबईस तयार झाला. कलकत्ता, कोल्हापूर, मुंबई येथेच प्रथम तमिळ चित्रपट निर्माण होत. खुद्द मद्रासमध्ये श्रीनिवास कल्याणम् हा चित्रपट निर्माण झाला. स्थानिक तंत्रज्ञ तयार होऊन १९४३ पासून तमिळ चित्रपट मद्रासमध्येच तयार होऊ लागले. टी. पी. राजलक्ष्मी या पहिल्या महिला पटकथा लेखिका, निर्मात्या व दिग्दर्शिका होत. चिंतामणी, अंबिकापति हे त्यागराज भागवतर यांची भूमिका असलेले चित्रपट एकाच ठिकाणी दीर्घकाळ चालले. १९४४ चा हरिदास हा चित्रपट १३३ आठवडे चालला.

संगीत व नृत्य हे तमिळ चित्रपटांचे प्रमुख आकर्षण असते. पौराणिक चित्रपटांनंतर संतपट आणि मग सामाजिक चित्रपट आले. १९५२ च्या पराशक्ति चित्रपटाने शिवाजी गणेशन् हा अभिनेता प्रसिद्धीस आला. १९४८ नंतर तमिळ निर्मात्यांनी हिंदी चित्रपट काढून मोठे यश मिळविले. मॉडर्न थिएटर्स, जेमिनी स्टुडिओज यानंतर अनेक चित्रपट संस्था उदयास आल्या. होतकरू आणि उमेदीच्या नव्या निर्मात्यांनी वास्तव चित्रपट निर्माण केले. विनोदी चित्रपटही निघाले. १९४६ च्या भारतातील एकूण चित्रटांपैकी ११% मद्रासमध्ये तयार झाले. १९५९ मध्ये हे प्रमाण ४६% झाले व आजतागायत मद्रासचा प्रथम क्रमांकच आहे. १९६० मध्ये 

वीरपांड्यकट्टबोम्मन चित्रपटाला व शिवाजी गणेशन् या नटाला जागतिक चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला. एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी, बी. सरोजा, त्यागराज भागवतर, एस्. डी. सुब्बुलक्ष्मी हे उच्च दर्जाचे कलावंत आहेत. एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी या गायिकेला १९५४ मध्ये पद्मभूषण हा बहुमान मिळाला. शिवाजी गणेशन् व एम्. जी. रामचंद्रन यांची लोकप्रियता दीर्घ काळ टिकून आहे. तमिळ चित्रपट व राजकारण यांचे संबंध जवळचे आहेत. जेल्लिक्कट्‌टु किंवा मजुविराट्‌टु हा साहसी खेळ ग्रामीण भागात अद्यापही लोकप्रिय आहे. मालकाशिवाय कोणालाही न जुमानणाऱ्या, माजलेल्या, पुष्ट व रागीट बैलाच्या शिंगांना बांधलेले रंगीत वस्त्र किंवा नोटा काढून आणणे हे यातील साध्य असते. धीट व धाडसी तरुण अशा बैलाच्या वशिंडाला विळखा घालून, लोंबकळत ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात जिवालाही धोका असतो. कित्येकदा भयंकर जखमा होणे, बैलाने आतडी बाहेर काढणे किंवा प्राणही घेणे असा याचा शेवट होतो. स्पेनमधील बैलांच्या झुंजीचे वैभव व नेत्रदीपकत्व जेल्लिक्कट्‌टुमध्ये नसले, तरी साहस व धोका मात्र जास्तच आहे.

तमिळनाडूतील वास्तुकलेची परंपराही फार जुनी आहे. प्राचीन काळात द्रविड, वेसर आणि नागर या तीन प्रमुख वास्तुशैली प्रसिद्ध होत्या. द्रविड वास्तुशैलीची अनेक उदाहरणे तमिळनाडूमध्ये पहावयास मिळतात. या राज्यातील मंदिरे, गोपुरे, राजवाडे आणि अन्य वास्तूंवर द्रविड शैलीचाच प्रभाव प्रामुख्याने दिसतो. पल्लव राजांच्या काळात महाबलीपुर, कांचीपुरम् इ. नगरांतील वास्तू या शैलीतच घडविण्यात आल्या. विजयानगरच्या साम्राज्यकाळातील वास्तू भव्य नसल्या, तरी आकर्षक आहेत. त्यांच्या शिल्परचनेतील नक्षीकाम प्रशंसनीय आहे. मदुराई येथील नायक वंशाच्या काळात येथील वास्तुशैलीला जे रूप प्राप्त झाले, तेच पुढे बव्हंशी टिकून राहिले.

प्राचीन काळापासून तमिळनाडूमध्ये चित्रकलेचे जतन व जोपासना झाल्याचे दिसून येते. प्राचीन साहित्यात आणि वास्तूंमध्ये या चित्रकलेचे नमुने पहावयास मिळतात. प्राचीन काळातील निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी राजमहालांच्या व मंदिरांच्या भिंतींवर सुंदर रेखाचित्रे व कथनात्मक चित्रे काढून घेतली. पल्लव नरेश महेंद्र वर्मन याच्या काळातील भित्तिचित्रांचे अनेक नमुने महाबलीपुर, सित्तन्नवासल येथील गुहांतून आढळतात. ही वैशिष्ट्यपूर्ण शैली दक्षिणी चित्रशैली म्हणून ओळखली जाते. विजयानगर चित्रशैली ही विजयानगरच्या प्राचीन अवशेषांमध्ये तसेच कांचीपुरम् येथील एकांबरनाथ मंदिराच्या स्तंभांवर दृष्टोत्पत्तीस येते. देवदेवतांच्या चित्रांबरोबरच मानवी जीवनातील हर्षविमर्षादी विविध भावावस्थांचे उत्कट दर्शनही या चित्रांतून घडते. चोल शैली तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराच्या भिंतीवर दिसून येते. पल्लव चित्रकलेचे वैशिष्ट्यपूर्ण रूप सित्तन्नवासल येथे पहावयास मिळते. या व्यतिरिक्त विजयानगर, गोवळकोंडा येथील चित्रशैलीही दक्षिणेकडे लोकप्रिय झाल्या.


आधुनिक भारतीय चित्रकलेमध्ये ‘मद्रास स्कूल ऑफ आर्ट्स’या संस्थेने एक वेगळे स्थान प्रस्थापित केले आहे. या राज्यातील चित्रकारांमध्ये एस्. राओ, कुमारिल स्वामी व के. सी. एस्. पणीक्कुर यांची नावे उल्लेखनीय आहेत.‘मद्रास स्कूल ऑफ आर्ट्स’ या संस्थेचे प्रमुख श्री. डी. पी. रॉयचौधरी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत बहुमोल चित्रनिर्मिती केली आहे.

तमिळनाडू येथील मूर्तिकला प्राचीन काळापासून विकसित होत आली आहे. द्राविडी शिल्पशैलीचे दर्शन महाबलीपुर येथील रथ, गुंफा, विजयानगर येथील विरूपाक्ष मंदिर व वेरूळ येथील कैलास गुहा येथे घडते. या काळात तिरूमल नायकाने जी मंदिरे, महाल व गोपुरे निर्माण केली ती द्राविडी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुने मानले जातात. मदुराईचे मीनाक्षी मंदिर हे सतराव्या शतकातील द्राविडी वास्तुशैलीचे उल्लेखनीय उदाहरण आहे. या राज्यातील बहुसंख्य मंदिरांच्या भिंतींवर रामायण, महाभारत यांतील व दशावतारातील अनेक मूर्ती कोरलेल्या आढळतात. शिवमंदिरांच्या समोर वृषभाच्या मूर्ती व इतर मंदिरांच्या दारांवर सिंह, हत्ती व राक्षस यांच्या कोरीव मूर्ती दिसून येतात. वेल्लोर, मदुराई, विजयानगर आणि रामेश्वर येथील मंदिरांवर दक्षिणी शिल्पकलेचे उत्तम नमुने पहावयास मिळतात.

प्रेक्षणीय स्थळे : तमिळनाडू राज्यात ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक महत्त्वाची तसेच निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे अनेक आहेत. धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची शहरे तसेच तीर्थक्षेत्रे पुष्कळ आहेत. येथे देवळे अथवा गोपुरे पुष्कळ असल्यामुळे तमिळनाडू हे गोपुरांचे राज्य म्हणून ओळखले जाते. कांचीपुरम् येथील कैलास मंदिर या अतिप्राचीन मंदिराच्या रूपाने पल्लवकालीन उत्कृष्ट वास्तुकला पहावयास सापडते. महाबलीपुर येथे सातव्या–आठव्या शतकांतील सुंदर गुंफा पहावयास सापडतात. महाबलीपुर हे पल्लव राजांच्या काळी उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळचा दीपस्तंभ अजूनही येथे आहे. महाबलीपुर–चिंगलपुट रस्त्यावर ‘पक्षितीर्थ हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे परंतु खऱ्या अर्थी पक्षितीर्थ म्हणावे लागेल ते मद्रासपासून ७५ किमी. अंतरावर असलेल्या वेडंतंगल शहराला. कारण त्या प्रेक्षणीय स्थळी अनेक ठिकाणचे पक्षी येत असतात. चिदंबरम्, तिरुवन्नामलई येथील शिवमंदिरे प्रेक्षणीय आहेत.कुंभकोणम् येथे दर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरतो. मदुराई, रामेश्वर, कन्याकुमारी, धनुष्कोडी इ. ठिकाणेही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. विवेकानंद स्मारक व तीन बाजूंचा महासागर हे कन्याकुमारीचे प्रमुख आकर्षण आहे. समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असलेली निलगिरी, कुन्नूर, कोडईकानल, ऊटकमंड (उटी) ही थंड हवेची तसेच प्रेक्षणीय स्थळे आहेत. या सर्व ठिकाणी पर्यटन खात्याने विश्रांतीगृहे, अतिथीगृहे, हॉटेल इत्यादींच्या सोयी केल्या आहेत. मद्रास, कोईमतूर, तिरुचिरापल्ली इ. मोठी शहरे आहेत. मद्रास हे तमिळनाडूच्या राजधानीचे ठिकाण व भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरावरील महत्त्वाचे कृत्रिम बंदर असून आंतरराष्ट्रीय विमानमार्गावर आहे. येथे विविध स्वरूपाचे व्यवसाय केंद्रित झालेले आहेत. हे एक शैक्षणिक केंद्र असून उत्तम रस्ते व इमारती, चौकांमध्ये बसविलेल्या मूर्ती यांमुळे एक सुंदर शहर म्हणूनही ओळखले जाते. सध्या हे श्री. अरविंदो यांच्या अरविंद आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.

दाते, सु. प्र. दाते, संजीवनी

संदर्भ : 1. Sastri, K. A. N. The Culture and History of the Tamils, Calcutta, 1964.

            2. Sastri, K. A. N. A History of South India, Madras, 1958.

            ३. जोग, वि. वा. तमिळनाडचे संगमकालीन सुवर्णयुग, मुंबई, १९७५.

            ४. रेड्डी, बालशौरि, तमिलनाडु, दिल्ली, १९७०.

 


 

तमिळनाडू राज्य

 


 

स्वामी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी.

पांडव-रथांची भव्य शिल्पे, महाबलीपुर, ७ वे शतक.

उटकमंड : थंड हवेचे निसर्गरम्य स्थळ.

मरिना बीच, मद्रास.

मीनाक्षी मंदिर, मदुराई. अभिजात नृत्य-शिल्प, देवी मंदिर, चिदंबरम्, १३ वे शतक.

करगम् : पारंपारिक तमिळ नृत्य

रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना, पेरांबूर.

वेधशाळेतील सौरदुर्बिण, कोडाईकानल.

रथोत्सवाचे दृश्य

ॲल्युमिनियम कारखाना, मेत्तूर.