तिबेट : हिमालयाच्या उत्तरेस हिमालयाच्या आणि कुनलुनच्या रांगांनी वेढलेले, अल्पाईन काळात भूहालचालींनी निर्माण झालेले, अत्युच्च व विस्तीर्ण तिबेटचे पठार आहे. त्याचे क्षेत्रफळ २० लाख चौ. किमी. असून सरासरी उंची ४,२५० मी. आहे. त्याला ‘जगाचे छप्पर’ म्हणतात. जगातील अनेक महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान या पठारावर आहे. सिंधू, सतलज, त्सांगपो (ब्रह्मपुत्रा), काली, गंडक, कोसी, इरावती, सॅल्वीन, मेकाँग, यांगत्सी व ह्वांग हो या नद्या याच पठारावर उगम पावतात. तिबेटी लोक सिंधूला सेंग्गे खबाब म्हणजे सिंह मुखोद्‌भूत, सतलजला ग्लांगचेन खबाब म्हणजे गज मुखोद्‌भूत, सीमेजवळ भारतात उगम पावलेल्या गंगेला र्‌माव्या म्हणजे मयूर मुखोद्‌भूत, सीमेजवळ भारतात उगम पावलेल्या गंगेला र्‌माव्या म्हणजे मयूर मुखोद्‌भूत व ब्रम्हपुत्रेला र्‌तामचोग खबाब म्हणजे अश्व मुखोद्‌भूत म्हणतात. तिबेटचे तिबेटी नाव बोद, मंगोलियन–थुबेत, चिनी–तुफान, थाई–तिबेट, अरबी–तुब्बत व प्राचीन भारतीय नाव उत्तर कुरू किंवा त्रिविष्टप होते.

या पठाराचा आग्नेय, दक्षिण व नैर्ऋत्य बाजूचा सु. अर्धा भाग म्हणजे चीनचा तिबेट हा आजचा सित्सांग नावाचा पश्चिमेकडील स्वायत्त सीमाविभाग होय. त्याचे क्षेत्रफळ १२,२१,७०० चौ. किमी. व लोकसंख्या सु. १३ लाख (१९७१ अंदाज) आहे. त्याचा विस्तार सु. २७° उ. ते ३७° उ. व ७८° पू. ते १०३° पू. आहे. त्याच्या उत्तरेला चीनचा सिंक्यांग–ऊईगुर स्वायत्त विभाग, ईशान्येस चिंगहाई, पूर्वेला सेचवान प्रांत, आग्नेयीस युनान प्रांत व पश्चिमेस आणि दक्षिणेस भारत, नेपाळ भूतान व ब्रह्मदेश यांच्या सीमा आहेत. भारताच्या जम्मू–काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम व अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा तिबेटला लागून आहेत. तिबेटची दक्षिण सीमा अनिश्चित व वादग्रस्त आहे. १९५१ पूर्वी तिबेट हा जवळजवळ संपूर्ण स्वतंत्र असा देश होता व त्यावर दलाई लामांची सत्ता होती. तिबेटविषयी गूढ, कुतूहल नेहमीच वाटत आले आहे. पूर्वी लामांच्या धोरणामुळे आणि आज चीनच्या बंदीमुळे तिबेटमध्ये प्रवेश व संचार अशक्यच आहे. त्यामुळे हे गूढ वाढले आहे.

भूवर्णन : दक्षिणेकडील त्सांगपोचे खोरे, पूर्व आणि आग्नेय बाजूचा खोल घळ्यांचा खाम विभाग व उत्तेरचा पठारी चांगटांग, असे तिबेटचे तीन प्रमुख भाग होतात. त्सांगपोचे खोरे सर्वांत विकसित असून त्यातच ल्हासा ही राजधानी आणि शिगात्से व ग्यांगत्से ही प्रमुख शहरे आणि मानसरोवर व राक्षसताल सरोवरे आहेत. याच्या दक्षिणेला हिमालयाची सर्वांत उंच रांग असून तिच्यात तिबेट, नेपाळ सीमेवर जगातील सर्वांत उंच शिखर मौंट एव्हरेस्ट (८,८४७·६ मी.) व इतर कित्येक शिखरे ७,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. या खोऱ्याच्या पश्चिमेस सतलजचे खोरे आहे. त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) मानसरोवराजवळ उगम पावून सु. १,५०० किमी. पूर्वेस हिमालयाला समांतर वाहत जाऊन मग दक्षिणेकडे भारतात उतरते. हे खोरे सु. ३,६०० मी. उंचीवर असून त्सांगपोचा निम्मा भाग वाहतुकीस उपयोगी आहे. येथील जमीन सुपीक असून तिला त्सांगपोचा सिंचनासाठी लाभ होतो. तिबेटची बहुतेक वस्ती याच भागात आहे. त्सांगपो खोऱ्याच्या उत्तरेस कैलास पर्वतरांग असून तिच्यात ६,७१४ मी. उंचीचे कैलास शिखर आहे. ते हिंदू व बौद्ध धर्मीयांना अत्यंत पवित्र वाटते. पूर्वेकडील खाम विभाग दक्षिणोत्तर पर्वतश्रेणींचा व त्यांमधील घळ्यांतून वाहणाऱ्या नद्यांचा आहे. येथे खम्या लोक राहतात. याच्या उत्तर भागास चामडो म्हणतात. तेथे चामडो हे शहर आहे. कैलास श्रेणीच्या उत्तरेस चांगटांग किंवा ब्यांगथांग हा सरासरी ४,६०० मी. उंचीचा अत्यंत विस्तीर्ण व अत्यंत रुक्ष पठारी प्रदेश आहे. त्याच्या उत्तरेस कुनलुन पर्वत असून त्यात उलूमुझता हे ७,७२४ मी. उंचीचे शिखर आहे. या पठारावर नद्या नाहीत परंतु अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. त्यांत नामत्सो किंवा तेंग्रीनॉर २,४७० चौ. किमी. हे प्रमुख आहे. काही ठिकाणी उष्ण पाण्याचे झरेही आहेत. हा प्रदेश अंतर्गत जलवाहनाचा आहे. मात्र दक्षिण भागात सिंधूचा उगम आहे व पश्चिम सीमेवरून काश्मीरमधून काराकोरम व लडाख श्रेणींचे फाटे आले आहेत. त्या भागात गार्टोक हे शहर आहे. तिबेटमध्ये झिलिंग, यारब्रॉग्‌यू यांशिवाय इतर सरोवरही बरीच आहेत. चांगतांग हा प्रदेश पूर्वेस ३,६०० मी. पर्यंत उतरला गेला आहे. उंचच उंच पर्वतश्रेणी, त्यांतील उंचावरील खिंडी, अत्युच्च पठार, खोल घळ्या व त्यांतून वाहणाऱ्या नद्या आणि गोड्या व खाऱ्या पाण्याची विपुल सरोवरे ही तिबेटची भूरचनेची वैशिष्ट्ये आहेत.

तिबेट


मृदा : येथील दऱ्याखोऱ्यांतील मृदा जलोढयुक्त आहे. बहुधा सर्वत्र जाड्याभरड्या खड्यांवर वाऱ्याने वाहून आणलेल्या वाळूचे थर आढळतात. सेंद्रीय पदार्थयुक्त खतमातीच्या प्रमाणानुसार राखी ते मंद तपकिरी रंगाची मृदा आढळते. हे प्रमाण सामान्यतः कमीच असते.

खनिजे : स्वामी प्रवणानंद या भारतीय संशोधकाने पश्चिम तिबेटात कैलास पर्वत व मानसरोवर भागांत १९३०–४०च्या काळात शास्त्रीय संशोधन केले. त्यास सांकोरा भागात सोन्याचे मोठे क्षेत्र, मानसरोवराच्या पूर्व किनाऱ्यावर व राक्षसताल येथे रेडियम, लोखंड, टिटॅनियम, एमरी तर गेबुकजवळ शिसे व कुंग्रिबिंग्री खिंडीजवळ आर्सेनिक आणि सर्पेंटाइन व त्सेती सरोवराच्या काठी टाकणखारचे मोठे साठे आढळले. चीनने तिबेट व्यापल्यावर त्याच्या शास्त्रीय अकादमीला तेलयुक्त शेल, अस्फाल्ट, लोखंड, मॅग्नेशियम, मॅंगॅनीज, तांबे, शिसे, जस्त, मॉलिब्डेनम, अँटिमनी, मीठ, सोडा, ग्लॉबर्स सॉल्ट, गंधक, तुरटी, अभ्रक, बॅराइट, ग्राफाइट, संगजिरे, जिप्सम, जेड व चिनी माती ही खनिजे आढळून आली. मेकाँगच्या पश्चिम तीरावर चामडोच्या दक्षिणेस सु. ४० किमी. चा लोहयुक्त पट्टा सापडला. निंगजिनजवळ ग्राफाइट आणि चामडोच्या आसपास विपुल कोळसा आहे. तिबेट व चिंगहाई सीमेवर उत्तम प्रतीचे लोखंड योग्य खोलीवर आढळले आहे. नवनवीन खाणी सुरू करण्यात येत आहेत.

हवामान : तिबेटचे हवामान अत्यंत विषम आहे. मे ते सप्टेंबर उन्हाळा असतो, तेव्हा तपमान ३२° से. पर्यंत जाते. ऑक्टोबर ते एप्रिल हिवाळा असतो तेव्हा किमान तपमान –४४° से. पर्यंतही उतरते. वार्षिक तपमान कक्षेपेक्षा दैनिक तपमान कक्षा पुष्कळदा मोठी असते. उन्हाळ्यातही रात्री पाणी गोठते, भारतीय मान्सूनमुळे त्सांगपो व खाम भागात पाऊस पडतो. ल्हासा येथे तो १५७ सेंमी. तर आग्नेय भागात ४०० सेंमी. पर्यंत पडतो. चांगटांग भागात पाऊस फारच कमी म्हणजे २० सेंमी. पेक्षाही कमी पडतो. मात्र तेथे कडक थंडी पडते व सतत जोरदार वारे घोंघावत असतात. उंच भागात पुष्कळदा हिमवर्षाव होतो. हिमालयात हिमरेषा (सदा हिमाच्छादित प्रदेशाची किमान उंची) सु. ४,८७५ मी. व उत्तरेकडे सु. ६,१०० मी. उंचीवर असते. तथापि एकंदरीत तिबेटची हवा कोरडीच आहे. दक्षिण व आग्नेय भागात हवा प्रसन्न व सुखकारक असते. सरासरी पाऊस ४५ सेंमी. पर्यंत पडतो. विषमता, कडक व कोरडी थंडी, बोचरे जोराचे वारे, अल्प पर्जन्य व हिमवर्षाव ही तिबेटच्या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. ल्हासा येथे १९३५ मध्ये हवामान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

वनस्पती : सतलजचे खोरे, चुंबी खोरे व खाम विभाग येथे दाट अरण्ये आहेत. १९५० ते ६०च्या काळात व्हार्निशोपयोगी वृक्ष, स्प्रूस, फर इ. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष, २७ ते ६१ मी. उंचीचे आणि १०५ मी. घेराचे पाइन वृक्ष आढळून आले. केवळ या भागात उपलब्ध होऊ शकणाऱ्या इमारती लाकडाचा अंदाज ९,९३,३३,००० घ. मी. होता.

दक्षिण व पूर्व या डोंगराळ भागांत दाट जंगल आहे. त्यात बिलो, पॉप्लर, ज्युनिपर, यू, सायप्रस, पाइन, बर्च, अक्रोड, फर, ओक, साग, बांबू, एल्म, बाभूळ व तत्सम काटेरी झाडे, चहाची झुडूपे इ. वृक्ष क्षुपे, नील पॉपी तसेच अनेक रानटी फुलझाडे व मॅग्नोलिया कमळ, पॅन्सी, डेझी, गुलाब, ऑर्किड, ओलिएंडर, ऱ्होडोडेंड्रॉन, ॲस्टर इ. अनेक फुलझाडे विपुल आहेत. ओंबू हे पाण्याजवळ वाढणारे तांबड्या फुलांचे झाड आहे. ख्रेसपा या टिकाऊ, भक्कम झाडापासून वाडगे वगैरे भांडी करतात. ग्लांगमा या विलो जातीच्या झाडापासून टोपल्या विणतात तर रिसिशिंगच्या बियांपासून व्हार्निश बनवितात. उत्तरेकडील रुक्ष पठारी प्रदेश तरुरेषेपेक्षा उंच असल्यामुळे तेथे विरळ खुरटे गवत उगवते.

प्राणी : येथे प्राणीही विपुर आहेत. त्यांत याक, किआंग म्हणजे रानगाढव, रानरेडा, रानडुक्कर, रानशेळ्या, रानमेंढ्या, कुरंग, काळवीट, हरिणे, कस्तुरीमृग, अस्वले, चित्ते, लांडगे, खोकड, तरस, वाघ, लांगूर, वानर, सायाळ, कोल्हा, बीझल, मार्टिन, लिंक्स इत्यादींचा समावेश होतो. सर्प, विंचू, सरडे, ससे, घुशी हे आहेतच. ट्राउट, कॅटफिश हे मासे, बेडूक, खेकडा, कासव, ऑटर हे जलचर आहेत. टेरियर आणि तिबेटन मॅस्टिफ हे कुत्रे प्रसिद्ध आहेत. विशेषतः मॅस्टिफ हा तापट व क्रुर कुत्रा शिकारीसाठी व पाठलागासाठी वापरला जातो. तिबेटातील पक्षी शिकार व विमाने यांस पुरून उरले आहेत. गरुड, गिधाड, घुबड, रानकोंबड्या, टार्मिगन, कोकिळ, महोका, मैना, रॉबिन, कबुतर, ससाणा, डोमकावळा, चिमणी, कावळा, नाइटिंगेल, गल, बगळा, बदक, हंस, शेल्डरेक, सिनॅमनटील, सिंगल्या इ. विविध पक्षी आहेत. ब्यालोंग हा बदकाएवढा आंधळा पक्षी आहे, तर शेती भागातील मॉर्स डेन्स या राखी रंगाच्या छोट्या पक्ष्याच्या चित्काराने लावणीच्या हंगामाची सूचना मिळते.

भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. ब.


 इतिहास : पारंपरिक दंतकथा व पुराणकथा सोडता ख्रिस्त पूर्व काळातील तिबेटचा विश्वसनिय इतिहास फारसा उपलब्ध नाही. राजकीय इतिहासाच्या दृष्टीने हा देश सु. दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा, असे सामान्यतः म्हणता येईल.

तिबेटच्या इतिहासाची माहिती मुख्यत्वे तिबेटी, चिनी, व बौद्धधर्मविषयक वाङ्‌मयातून तसेच प्राचीन प्रवासवर्णनांतून मिळते. अर्वाचीन काळात केलेल्या उत्खननांवरून व प्राचीन कोरीव लेखांवरूनही प्राचीन तिबेटसंबंधी काही माहिती मिळते. तथापि वाङ्‌मयीन पुराव्यांत आख्यायिका व दंतकथा अधिक असल्याने ते फारसे विश्वसनीय मानता येत नाही.

दंतकथेनुसार तिबेटमधील पहिला मानव माकड व राक्षसीण यांच्या संकरातून निर्माण झाला. चिनी इतिवृत्तकार तिबेटमधील चारसहा भटक्या टोळ्यांचा उल्लेख करतात. या टोळ्या पशुपालनावर उपजीविका करीत आणि त्यांना चिअँग म्हणत. चिअँग जमातीचे वर्चस्व इ.स. पू. २०० च्या सुमारास तिबेटवर होते. त्यांनी चीनच्या ईशान्येकडील काही मुलूख पादाक्रांत करून बॉन या नावाचा निसर्गपूजेवर आधारित धर्म प्रचारात आणला. निसर्गपूजेबरोबरच हे लोक भुताखेतांची आराधना करीत. ह्या जमातीने आपल्या राज्याच्या सीमा हिमालयाच्या पायथ्यापासून कोकोनार सरोवरापर्यंत वाढविल्या. यातील एक कर्ता पुरुष पुग्याल हाच तिबेटचा पहिला राजा असावा, असे तिबेटी दंतकथा सांगतात, परंतु बौद्ध धर्माच्या इतिवृत्तानुसार न्यात्‌रीत्सेन पो (न्यात्रीसेनपो) हाच ऐतिहासिक दृष्ट्या पहिला राजा होय. तो भारतातील मगध (बिहार) प्रदेशातील किंवा प्रसेनजित या कोसलवंशीय घराण्यातील असावा, असे एक मत आहे. त्याच्या कारकीर्दीत तिबेटात अनेक सुधारणा, मुख्यतः कृषिविषयक झाल्या. पुढे इसवीसनाच्या चौथ्या शतकात तिबेट हे एक सत्तासंपन्न राष्ट्र बनले. न्यातरीत्सेन पोच्या वंशातील सु. चाळीस राजांनी तिबेटवर राज्य केले. यांपैकी पहिल्या सत्तावीस राजांच्या कारकीर्दीविषयी फारशी माहिती मिळत नाही. मात्र अठ्ठाविसाव्या राजाच्या वेळी बौद्ध धर्मग्रंथ तिबेटमध्ये प्रविष्ट झाले आणि तेव्हापासून बौद्ध धर्माचा तेथे प्रसार झाला. बत्तीसावा राजा (काहींच्या मते तेहतिसावा) साँगत्सेन गाम्पो (६१७–६४९) हा पराक्रमी होता. त्याने राज्यविस्तार केला. तसेच बौद्ध धर्माच्या अध्ययनाकरिता आपल्या एका मंत्र्यास हिंदुस्थानला धाडले. त्याच्याच कारकीर्दीत तिबेटमध्ये बौद्धमठ, जोखांगचे प्रसिद्ध देवालय व पोताला राजवाडा यांच्या बांधकामास सुरुवात झाली. त्याने चीनवर स्वारी करून तेथील राजकन्येबरोबर विवाह केला, शिवाय नेपाळी राजकन्येशीही त्याने लग्न केले होते. चिनी राजकन्येने आपल्याबरोबर बुद्धाच्या मूर्ती आणल्या आणि त्यांकरिता मंदिरे बांधली. साँगत्सेननंतर त्याचा नातू माँगसाँग मांगत्सेन (६४९–६७६) हा गादीवर आला. तो अज्ञान असल्यामुळे ताँगत्सेन या विश्वासू मंत्र्याकडे कारभाराची सर्व सूत्रे होती. मांगत्सेन मरण पावला, त्या वेळी गादीला वारस नव्हता. म्हणून त्याचा मृत्यू तीन वर्षानंतर जाहीर करण्यात आला. त्याच्या राणीस त्याच्या मृत्यूनंतर मुलगा झाला. तो दुसाँग मांग्जे (६७९–७०४) हे नाव धारण करून गादीवर आला. तो एका युद्धात ठार झाला. त्याचा मुलगा त्रिदे त्सुगत्सेन (७०४–७५५) गादीवर आला. त्याने चिनी राजकन्येबरोबर विवाह करून चीनशी मैत्रीचे संबंध जोडले, पण राजकन्येच्या मृत्यूनंतर त्याचे चीनशी युद्ध झाले. त्याचा खून झाला आणि त्याचा मुलगा त्रिसाँग देत्सेन (७५५–७९७) गादीवर आला. आतापर्यंतच्या राजांचे धोरण चीनशी युद्ध व राज्यविस्तार एवढेच होते, पण देत्सेनने बौद्ध धर्मास राजाश्रय देऊन हिंदुस्थानातून पद्मसंभव या गुरूस बोलाविले आणि तिबेटमध्ये साम्ये या ठिकाणी तांत्रिक बौद्ध धर्माचे पीठ निर्माण केले. त्याच्या कारकीर्दीतच तिबेटी भाषा व बौद्ध धर्माचा विशेष प्रसार झाला. त्याने चीनचा पराभव करून थेट राजधानीपर्यंत धडक मारली आणि चीनवर खंडणी बसविली. या सुमारास तिबेटी लोकांचा तुर्की, अरबी वगैरे लोकांशीही संबंध आला. तिबेटची सर्वांगीण प्रगती त्याच्या कारकीर्दीत झाली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा मुनी त्सेनपो (७९७–८०४) गादीवर आला. त्याने शेती सुधारली, पण त्यासाठी जे धोरण अवलंबिले ते लोकांस पसंत पडले नाही. त्यामुळे त्याचा खून झाला. त्याला मुलगा नव्हता, तेव्हा मुतिग त्सेनपो या त्याच्या धाकट्या भावास गादीवर बसविण्यात आले. यासंबंधी इतिहासकारांत मतैक्य नाही. त्याचा दुसरा भाऊ सादनालेग (८०४–८१५) हा गादीवर आला. तो लहान असल्यामुळे चार मंत्र्याचे एक मंडळ राज्यकारभार करीत असे. या वेळी तिबेटी सैन्याचे अरबांशी युद्ध चालू होते. यांच्या मृत्यूनंतर रालपाचेन (८१५–८३६) हा गादीवर आला. त्याने तीन भारतीय पंडितांना बोलावून त्यांच्या मदतीस दोन भाषांतरकर्ते दिले. त्यांनी संस्कृतमधील बौद्ध वाङ्‌मयाचे तिबेटीत भाषांतर केले. चीनबरोबर त्याने शांततेचा तह केला. त्याचा कल बौद्ध धर्माकडे अधिक होता. त्यामुळे बॉन धर्मीय अनुयायांनी त्याचा खून केला आणि त्यांनी दर्म या (८३६–८४२) या बॉन धर्मीयास गादीवर बसविले. त्याने बौद्ध धर्माचे उच्चाटन करण्यास सुरुवात केली. त्यास बौद्ध धर्मीयांनी प्रथम विरोध केला व पुढे त्याचाही खून झाला. यानंतरचा सु. २०० वर्षांचा तिबेटचा इतिहास लहान लहान राज्यांची आपापसांतील भांडणे, बौद्ध धर्म व बॉन धर्म यांतील स्पर्धा आणि राजकीय अराजक यांनी भरलेला आहे. अखेर १२४७ मध्ये शाक्य पंथीय लामाची तिबेटवर नियुक्ती झाली.

चंगीझखानने १२०७ मध्ये चीनवर आपले साम्राज्य स्थापन केले. तिबेटने अगोदरच मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून खंडणी देण्याचे कबूल केले. परंतु चंगीझखानाच्या मृत्यूनंतर तिबेटने चीनची खंडणी बंद केली (१२२७). पुढे १२४७ मध्ये चंगीझखानचा नातू गोदान याने तिबेटवर स्वारी करून आपले आधिपत्य स्थापन केले. त्याने तिबेटमध्ये अस्तित्वात असलेल्या तीन पंथातून शाक्य लामास आपला राजप्रतिनिधी (व्हाइस रीजंट) नेमले. या राजप्रतिनिधीच्या द्वारा मंगोलिया तिबेटवर आधिपत्य गाजवीत होता. १३५१ मध्ये चँगचुब ग्यालत्सेन याने सर्व तिबेट आपल्या नियंत्रणाखाली आणला व मंगोलियाने नेमलेल्या प्रतिनिधींची सत्ता संपुष्टात आणली. मंगोलियातील युआन वंशाची सत्ता दुर्बल झाली होती. १३६८ मध्ये त्यांची चीनमधील सत्ताही मिंग घराण्याने उलथून पाडली.

पंधराव्या शतकात तिबेटवर पुन्हा मंगोलियाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. मंगोलियाचा एक राजपुत्र आल्तनखान याने सोनाम ग्यात्सो या लामाला ‘ता’ अथवा ‘दलाई’ हा किताब दिला. दलाई या शब्दाचा मंगोलियन भाषेत ज्ञानाचा महासागर असा अर्थ होतो. गुस्रीखान या मंगोल सेनापतीने १६४२ मध्ये तिबेटवर पूर्ण स्वामित्व प्रस्थापित करून दलाई लामाला धर्मप्रमुख म्हणून मान्यता दिली. आतापर्यंत करमापा पंथाचे धर्मगुरू राजाचे सल्लागार असत. आता त्यांचे स्थान गेलुग्‌पा पंथाच्या दलाई लामांना मिळाले. दलाई लामा हे पद अस्तित्वात आल्यापासून त्यांचे महत्त्व सतत वाढत गेले. पाचव्या दलाई लामाच्या काळात सर्व सत्ता त्याच्या हातात केंद्रित झाली. गुस्रीखानच्या वंशाकडे फक्त राजा हा किताब होता. पाचवा दलाई लामा हा महान पंचेन म्हणून ओळखला जातो. त्याने तिबेटमध्ये राष्ट्रीय एकता निर्माण करून शांतता प्रस्थापित केली. धर्मसत्ता व राजसत्ता यांचे एकीकरण त्यानेच घडवून आणले. तो १६८२ मध्ये मरण पावला.


 पाचव्या दलाई लामाच्या निधनानंतर तिबेटमध्ये गुस्रीखाननंतर आलेला मंगोल सत्ताधीश लाबझांगखान आणि तिबेटी लोक यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. लायझांगखानने सहाव्या दलाई लामाला अपात्र ठरवून पदच्युत केले (१७०५) व लामाच्या नेमणुकीची पद्धत मोडून स्वतःच नवीन लामाची नेमणूक केली. त्याच्याविरुद्ध बंड झाले, ते मोडून काढण्यासाठी त्याने चीनची मदत मागितली. चीनमध्ये या वेळी मांचू सम्राटांचे राज्य स्थापन झाले होते. त्यांनी १७२० मध्ये तिबेटमध्ये सैन्य पाठवून बंडाळी मोडली व नवीन दलाई लामाची प्रतिष्ठापना केली. मांचू सम्राटांनी ल्हासामध्ये आपले अंबान म्हणजे प्रतिनिधी नेमले. या वेळी चीनने तिबेटवर प्रभुत्व स्थापन केले ते पुढे १९१२ पर्यंत टिकले.

पाचव्या दलाई लामापासून बाराव्या दलाई लामापर्यंतचे लामा कर्तृत्ववान नव्हते, त्यामुळे देशात सतत अशांतता राहिली. साहजिकच चीनची अधिसत्ता अबाधित राहिली. तेरावा दलाई लामा हा कर्तबगार होता. त्याने खंबीरपणे देशात पुन्हा सुव्यवस्था निर्माण केली. तेव्हा मांचू सम्राटांनी सर्व अंतर्गत अधिकार त्याला दिले. १७९२ मध्ये नेपाळने तिबेटवर स्वारी केली. तेव्हा मांचू सैन्याने हे आक्रमण परतवून लावले परंतु पुढे मांचू सम्राटांच्या सत्तेलाच उतरती कळा लागली व १८४२ मध्ये लडाखशी आणि १८५८ मध्ये पुन्हा नेपाळशी झालेल्या लढायांत चीनची तिबेटला मदत मिळाली नाही. मांचू वर्चस्वाच्या काळातच परदेशी लोकांना तिबेटचे दरवाजे बंद करण्यात आले. [→ लामा पद्धति].

अठराव्या शतकात वॉरन हेस्टिंग्जनेही लामाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तथापि तिबेटी लोकांनी त्यास फारसे महत्त्व दिले नाही. म्हणून १८९३ मध्ये ब्रिटिशांनी चीनबरोबर तिबेटसंबंधी एक करार केला आणि लॉर्ड कर्झनने १९०३ मध्ये एक प्रतिनिधिमंडळ तिबेटला धाडले. या वेळी तिबेटने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रवेश करून व्यापारास सुरुवात केली होती व १८९३ पूर्वी त्यास सर्वत्र स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच मान्यता मिळाली होती. परंतु १९०३ मध्ये लामा पूर्व तिबेटमध्ये पळून गेला व त्याच्या गैरहजेरित संबंधित अधिकाऱ्यांबरोबर ब्रिटनने १९०४ साली एक व्यापारी करार केला. पण नंतर तिबेटी पोलीसदल व ब्रिटिश सैन्य यांमध्ये लढाई झाली. पुढे ब्रिटिशांनी यंगहजबंडच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पाठवून तिबेटवर लादलेल्या अटी रद्द केल्या आणि पूर्वी घेतलेला मुलूख परत दिला. ब्रिटिशांनी रशिया व चीन यांच्याबरोबर तिबेटसंबंधी दोन स्वतंत्र करार केले. या वेळी मांचू राजवटीने तिबेट हा आपलाच एक भाग आहे, असे गृहीत धरून त्याचे परराष्ट्रसंबंध व संरक्षण यांची जबाबदारी स्वीकारली. १९०७ मध्ये ग्रेट ब्रिटन व रशिया यांनी तिबेटवरील चीनचे अधिराज्य मान्य केले. १९११ मधील चिनी क्रांतीनंतर या धोरणात फारसा बदल झाला नाही. अंतर्गत धोरणात त्यांना स्वायत्तता होती. पण संरक्षण व परराष्ट्र धोरण यांवर चीनचे पूर्ण वर्चस्व होते.  १९१४ मध्ये सिमला येथे चीन, तिबेट व ग्रेट ब्रिटन यांची परिषद झाली. तिबेटची स्वायत्तता चीनकडून मान्य करून घेणे व तिबेट–चीन आणि तिबेट–भारत यांच्या सीमा ठरविणे हा ब्रिटिशांचा उद्देश होता. चिनी प्रतिनिधीने सिमला करारवर सह्या केल्या, परंतु नंतर चीनने या कराराला मान्यता देण्याचे नाकारले. ब्रिटिशांनी तिबेटशी स्वतंत्र करार करून ल्हासा येथे आपला प्रतिनीधी ठेवला. तथापि तिबेट चीनचे वर्चस्व धुडकाऊ शकला नाही. दुसऱ्या महायुद्धाचे वेळी चीन व ब्रिटन यांचे दडपण असताना तिबेटने तटस्थता पाळली. १९४६ मध्ये भारतात झालेल्या आशियाई परिषदेत तिबेटने स्वतंत्र राष्ट्र म्हणून भाग घेतला.

दुसऱ्या महायुद्धानंतर दलाई लामा व पंचेन लामा यांत धर्मसत्तेच्या बाबतीत तसेच बौद्ध मठांवरील आधिपत्यासाठी कलह निर्माण झाला. पंचेन लामा चीनला पळून गेला. चीनने त्याची मुख्य धर्मगुरू म्हणून नियुक्ती केली. त्यास राजकीय स्वरुप प्राप्त झाले. दलाई लामा हा अलोकितेश्वराचा अवतार अशी तिबेटी लोकांची श्रद्धा असल्यामुळे त्याचे वर्चस्व सर्वमान्य होते. पण चीनच्या हस्तक्षेपामुळे पंचेन लामास गैरवाजवी महत्त्व प्राप्त झाले. तेरावा दलाई लामा १९३३ अखेरीस मरण पावला. त्यानंतर चौदावा दलाई लामा सत्तेवर आला. तो लहान असल्यामुळे सत्ता रीजंटच्या हाती होती. त्या काळात तिबेट व चीनमधील संबंध मैत्रीचे राहिले, ब्रिटिशांचे तिबेटवर १९४७ पर्यंत वर्चस्व होते, पण भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने ब्रिटिशांची भूमिका नाकारली. १९५० मध्ये चिनी कम्युनिस्ट सैन्याने पूर्व तिबेट आपल्या ताब्यात घेतला. तिबेटने संयुक्त राष्ट्रांकडे वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. पुढे १९५१ मध्ये तिबेट व चीनमध्ये एक करार होऊन अंतर्गत कारभारात तिबेटला स्वायत्तता देण्यात आली आणि लष्करी व परराष्ट्र व्यवहार चीनकडे सोपविण्यात आले. या करारानुसार पंचेन लामा परत तिबेटमध्ये आला. पंचेन लामाने शिगात्से येथे वेगळे सरकार स्थापन केले. त्याचा चीनने पुढे तिबेटवर पूर्ण वर्चस्व निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला. १९५६ मध्ये तिबेटच्या स्वायत्त राज्यकारभाराविषयी  पूर्वतयारी करण्यासाठी चीनने एक समिती नेमली. तिचा प्रमुख म्हणून दलाई लामाची नियुक्ती झाली. प्रत्यक्षात सर्व सूत्रे कम्युनिस्ट पक्षाचा तिबेटमधील चिटणीस चँग क्यूहुआ याच्याकडे होती. समितीने काही सामाजिक सुधारणांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले व स्थानिक बौद्ध मठांचे वर्चस्व कमी केले. चिनी लष्कराच्या हालचालीच्या दृष्टीने अनेक मार्ग व रस्ते बांधण्यात आले. यामुळे तिबेटी जनतेने चिनी वर्चस्वास प्रथम विरोध केला. या उठावास पुढे उग्र स्वरूप प्राप्त झाले (१९५८). अनेक तिबेटी तरुणांना चीनमध्ये नेण्यात आले व असंख्य चिनी सैनिक तिबेटमध्ये घुसले. अखेर ल्हासा या राजधानीतच बंडाचा उठाव झाला. चिनी सरकारने दलाई लामास अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही अनुयायांसह दलाई लामा भारतात आश्रयार्थ आला (१७ मार्च १९५९). परिणामतः चीनने तिबेटी सरकार बरखास्त केले व एक स्वतंत्र समिती स्थापन करून त्याचे अध्यक्षपद पंचेन लामास दिले. तिबेटमध्ये चिनी लष्करी हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यांनी मठाची सत्ता नष्ट करून खाजगी मालमत्ता जप्त केली. बौद्ध मंदिरे केवळ शोभेच्या जागा झाल्या. लष्करी भरती सक्तीची केली, बाहेरच्या राष्ट्रांशी असलेला संपर्क पूर्णतः तोडण्यात आला. कोणत्याही परदेशीयास तिबेटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि सक्तीचे काम व शेती यांवर भर दिला. १९६१–६२ मध्ये तिबेटमध्ये दुष्काळ पडला. अनेक तिबेटी लोक भारतात आले. खुद्द तिबेटमध्ये गनिमी युद्धतंत्राने चळवळ चालू होती. पंचेन लामाने अपेक्षित सहकार्य दिले नसल्याने कम्युनिस्ट धोरणानुसार १९६४ मध्ये त्यास काढून टाकण्यात आले. भारताने दलाई लामास राजकीय आश्रय दिला. म्हणून चीन–भारत संबंध बिघडले व पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीस सुरुवात झाली (१९६६–६७). तिचे लोण ल्हासापर्यंत येऊन पोहोचले. स्थानिक लोकांकडून विरोध होत असतानाच चीनने लष्करी नियंत्रण अधिक कडक केले. तिबेट हा चीनचा एक स्वयत्त भाग आहे, असे जाहीर करून चीनने १९६९–७१ या काळात एक स्वतंत्र स्थानिक स्वराज्य समिती स्थापन केली. तीत १४ चिनी सभासद व तीन तिबेटी सभासद घेण्यात आले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी तिबेटची जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली. १९६३–७१ च्या दरम्यान तिबेटमध्ये एकाही परदेशीयास प्रवेश देण्यात आला नाही. तिबेटची मूळ संस्कृती आता जवळजवळ नष्ट झाली आहे.


राजकीय स्थिती : तिबेटचे पारंपारिक शासन धर्मसत्ताक असले, तरी तेराव्या शतकापर्यंत तेथे राजेशाही होती. पण १२५३ मध्ये फॅग्ज–पा हा धर्मगुरू चीनमधून तिबेटला परतला व तिबेटचा एकमेव राज्यकर्ता झाला. त्यावेळेपासून धर्मगुरूंचा कारभार सुरू झाला आणि पुढे या धर्मगुरूंचीच म्हणजे लामांची सर्वंकष सत्ता तिबेटमध्ये प्रस्थापित झाली. १९५९ मध्ये चौदावा दलाई लामा हद्दपार होऊन भारतात आश्रयार्थ आला आणि चीनचा तिबेटवरील अंमल सुरू झाला. त्यानंतर तिबेट हा चीनचाच एक स्वायत्त विभाग समजण्यात आला असून त्याची वेगळी प्रशासनव्यवस्था निर्माण झाली. दलाई लामांच्या कारकीर्दीत त्यांच्याइतकी सर्वंकष सत्ता असणारा जगात दुसरा शासक नव्हता. परंपरेप्रमाणे सत्ताधारी दलाई लामा मृत्यू पावल्यावर दुसऱ्या दलाई लामाची निवड पुनरावताराच्या तत्त्वानुसार केली जात असे. तो अज्ञात असेपर्यंत त्याच्यातर्फे वरिष्ठ लामांपैकी एक लामा रीजंट म्हणून सर्व देशाचा कारभार पाहत असे. सज्ञान झाल्यावर दलाई लामा राज्यकारभार चालविण्याकरिता दोन पंतप्रधानांची नेमणूक करी. यांपैकी एक धर्मगुरू व दुसरा सामान्य प्रशासक असे. त्यांना सिलॉन म्हणत. पंतप्रधानाच्या मदतीस चारजणांचे एक मंत्रिमंडळ असे. त्याला कशाग म्हणत. दैनंदिन कारभारासाठी सचिवालय असून अनेक सचिवांमार्फत सर्व प्रशासनव्यवस्था चाले. कशागशिवाय धार्मिक व्यवहारांसाठी यिगत्सांग नावाचे धर्मगुरूंचे एक स्वतंत्र मंडळ असे. दोन राष्ट्रीय सभांपैकी (त्सोंग्‌दू) एका सभेत सु. ३५० सभासद असत. दुसऱ्या सभेत पहिल्या सभेतील निवडक ६० सभासद असत. मंत्रिमंडळातील चार मंत्री सर्व विषयांची मांडणी करीत, कायद्याचा मसुदा तयार करीत व दलाई लामाकडे संमतीसाठी सादर करीत. ह्याशिवाय दोन शासकीय मंडळे होती. त्यांपैकी एक मंडळ सर्व धार्मिक व्यवहार व मठांची व्यवस्था पाही आणि दुसरे मंडळ नागरी प्रशासनव्यवस्था पाही. त्यांना अनुक्रमे द्रुंग–यिग चेनमो व त्सेपॉन म्हणत. अनेक वेळा राजकीय महत्त्वाच्या घडामोडींवर ह्यांच्या संयुक्त बैठका होत. राष्ट्रीय सभेच्या बैठकीच्या वेळी ही दोन मंडळे अध्यक्षीय जबाबदारी स्वीकारीत व प्रवक्त्याचे काम करीत. अखेरचा निर्णय दलाई लामाचा असला, तरी राष्ट्रीय सभेने संमत केलेले बहुतेक ठराव मान्य करण्यात येत.

धार्मिक बाबींची सर्व व्यवस्था व कारभार प्रमुख पुरोहित व चार लामांचे एक मंडळ ह्यांमार्फत चाले. प्रमुख पुरोहित दलाई लामाच्या खाजगी खजिन्याचे प्रमुख असे. प्रशासनाच्या सोयीसाठी तिबेटचे १५० जिल्हे व ७० उपजिल्हे यांत विभागणी केली होती. त्यांवर आठ राज्यपाल असत. मर्यादित क्षेत्रात ते निर्णय देत. जिल्ह्यावर जिल्हाधिकारी असे. सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका दलाई लामा व कशागमार्फत होत. खेड्यांवर ग्रामाधिपती असे. तिबेटचे सैन्य हे मुख्यतः अंतर्गत सुरक्षा राखण्याचे काम करी तसेच बाहेरील देशांतून येणाऱ्यास ते प्रतिबंध करी. १९१४ सालापासून लष्कराची पुनर्संघटना करण्यात आली. १९५९ च्या सुमारास तिबेटी  लष्कराची संख्या ८५,००० होती.

तिबेटमध्ये सुसंघटित अशी न्यायालय संस्था अस्तित्वात नव्हती. केवळ कायदे करणारे विधिमंडळही अस्तित्वात नव्हते. मात्र ही कामे मंत्रिमंडळच करीत असे. कोणताही खटला कोणत्याही अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येई. महत्त्वाचा वाद एखाद्या समितीकडे सुपूर्त करण्यात येई. एखाद्यास आपणावर अन्याय होतो असे वाटल्यास त्यास दलाई लामाकडे दाद मागण्याची मुभा असे.

तिबेटमधील पारंपारिक शासनव्यवस्थेचा १९५९ नंतर लोप झाला. १९६५ पासून तिबेट हा चीनचाच एक स्वायत्त विभाग मानण्यात आला असून त्याचा कारभार एका क्रांतिकारी समितीतर्फे चालतो. स्थानिक कम्युनिस्ट पक्षाचा नेता आणि तिबेटचा प्रमुख लष्करी अधिकारी या समितीचा प्रमुख अधिकारी असतो. हा स्वायत्त विभाग पुढील गटांनुसार विभागला आहे ल्हासा नगरपालिका मर्यादा (शिर) व पाच विशेष जिल्हे (च्यूऍन च्यू), त्याचे पुन्हा सत्तर उपविभाग (स्यन) केलेले आहेत.

न्यायदानाची पद्धत बहुतेक पूर्वीचीच असून लष्करी शिस्तीवर अधिक जोर देण्यात आला आहे. सध्याची तिबेटी सैन्यसंख्या सु. ३,००,००० आहे. त्यामध्ये चिनी लष्करी दले अधिक प्रमाणात आहेत आणि त्या सर्वांचा मुख्य लष्करी अधिकारी चिनी आहे. त्याचे राहण्याचे ठिकाणी ल्हासा येथे आहे. तिबेटच्या सरहद्दीवरील प्रमुख शहरांत लष्करी छावण्या असून तिबेटी लोकांची सक्तीने लष्करात भरती करण्यात आली आहे.

देशपांडे, सु. र.

 

आर्थिक स्थिती : परंपरागत मोठ्या तिबेट प्रदेशाचा सु. ३०% भाग वस्तीस अयोग्य, १८% भाग भटक्या पशुपालकांचा, २५% भाग शेती व पशुपालन दोन्ही करणाऱ्यांचा, २२% भाग शेतकऱ्यांचा आणि ५% भाग जंगलात शिकार करणाऱ्या लोकांचा होता.


पशुपालन व शेती हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. पशुपालन मुख्यत: उत्तरेस चांगटांग भागात चालणारा व्यवसाय आहे. सु. ४ ते ५ हजार मी. उंचीवरील फिरते पशुपालक नोव्हेंबर ते मार्च या हिवाळ्याच्या काळात डोंगर पायथ्याशी आपल्या कळपासह येतात व याकच्या केसांच्या कापडाच्या मोठ्या तंबूत राहतात. एप्रिल ते ऑक्टोबर लहान तंबू बरोबर घेऊन ते चराईसाठी बाहेर पडतात. साडेतीन ते चार हजार मी. उंचीवरील पशुपालन व शेती दोन्ही करणारे अर्धफिरते लोक आपल्या दीड दोनशे कुटुंबांच्या खेड्यातून दोन तीन मजली दगडविटांच्या घरांतून राहतात व एप्रिल ते ऑक्टोबर चराईसाठी बाहेर पडतात. येथे झाडे, छोटी शेते, पाणचक्क्या इ. वैशिष्ट्ये दिसतात. शेतकऱ्यांची वस्ती अडीच ते साडेतीन हजार मी. उंचीवरील याच प्रकारच्या खेड्यांतून व घरांतून असते. वनप्रदेशातील लोक दगडी पायाच्या, स्लेटच्या छपराच्या लाकडी घरांतून राहतात. शिकार व वननिवारा यांस ते शेतीचीही जोड देतात. याक, मेंढ्या, घोडे व खेचरे, दोन मदारींचा उंट हे प्रमुख प्राणी पाळले जातात. खेचर, याक व उंट हे प्राणी माल वाहतुकीत महत्त्वाचे आहेत. मांस, दूध, लोणी, केस, कातडी व शेण यांचे विविध उपयोग करतात. धर्मदृष्ट्या लोक शाकाहारी असले तरी अन्नधान्यांच्या टंचाईमुळे ते आहारांत मांस स्वीकारतात. शेती सिंधू, सतलज, त्सांगपो यांच्या व पूर्वेकडील खाम प्रदेशाच्या दऱ्यांखोऱ्यात होते. जलसिंचनाची सोय अपुरी आहे. तथापि काही वेळा वर्षांतून दोन दोन पिके घेतात. जव सातू, राय, बकव्हीट, भरडधान्ये, घेवडे, अंबाडी, मोहरी ही मुख्य पिके आहेत. त्यांशिवाय भाजीपाला, गाजरे, बटाटे, वाटाणे, कोबी, मुळे, कांदे, लसूण, सलगम, टॉमेटो, सॉलीट, सेलरी, चिबूड, मिंट, एगप्लँट इत्यादींचे उत्पन्न येते. आग्नेय भागात थोडा तांदूळ होतो. चहा, साखर व तांदूळ हे अन्नपदार्थ आयात करावे लागतात. फळांच्या उत्पादनात पीच, अक्रोड, सफरचंद, जरदाळू, केळी इ. प्रमुख फळे आहेत. जवाच्या लाहीपिठात चहा आणि लोणी मिसळून केलेले ‘त्सांबा’ हे लोकांचे प्रमुख अन्न आहे. त्याला तूप, लोणी, चीज, दूध तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या, फळे व कंद यांची जोड असते. तसेच याक, शेळ्यामेंढ्या, डुकरे व कोंबड्या यांचे मांस आणि गहू यांचाही अन्नात समावेश असतो. तांदूळ काही लोकांपुरताच असतो. चहा व बार्लीपासून केलेले ‘चांग’ हे मद्य ही प्रमुख पेये आहेत. येथील शेती निर्वाहापुरती असून शेतीची पद्धत जुनी, प्राथमिक स्वरूपाची आहे. अलीकडे चीनने शेतीची आधुनिक अवजारे वगैरे वापरून व सिंचनाच्या सोयी वाढवून शेती सुधारली आहे. चीनने १९६५ नंतर १९७० पर्यंत या प्रांतात ७०० शेती कम्यून स्थापन केली आहेत.

उद्योग : परंपरागत हस्तोद्योग प्रसिद्ध आहेत. विणणे, रंगविणे, मूर्तिकाम, धातुकाम, गालिचे विणणे, कातडी कमावणे, भांडी तयार करणे, सोन्याचांदीची कारगिरी, सुतारकाम, शिवणकाम, उदबत्या तयार करणे हे जुने व्यवसाय आहे. त्यांसाठी कारागिरांस वाङ्‌मय व गणित यांचे ज्ञान आवश्यक असे. चीनने छोट्या उद्योगांस प्रोत्साहन दिले असून १९७२ पर्यंत (कापड, सिमेंट, कागद, रसायने, काड्यापेट्या व शेती अवजारे बनविणे) ६० छोटे उद्योग स्थापण्यात आले, नवीन तंत्राचा प्रसार आज होत आहे. १९५२ मध्ये ल्हासा येथे लोखंडाचा व लाकूडकामाचा, १९५७ मध्ये मोटार दुरुस्तीचा व १९५८ मध्ये कातडी कमावण्याचा असे कारखाने निघाले आहेत. उद्योगधंद्यासाठी भरपूर शक्ती तिबेटात उपलब्ध होण्याजोगी आहे. ब्रह्मपुत्रा, स्क्यिड, न्यांग इत्यादी वेगवान प्रवाहांपासून जलविद्युत् आणि कोळसा व जंगलातील लाकूड यांपासून औष्णीक वीज मिळण्याजोगी आहे. ल्हासा येथे जलविद्युत् केंद्र व शिगात्से येथे औष्णिक विद्युत् केंद्र आहे. १९७० मध्ये २६,००० तिबेटी औद्योगिक कामगार होते.

व्यापार : तिबेटमधून लोकर, याकच्या शेपट्या, कस्तुरी, अस्वलाचे पित्त, हरणाची शिंगे, मीठ, टाकणखार, अभ्रक, वनौषधी, याक, खोकड व मेंढ्या, मार्‌मॉट, लिंक्स यांची कातडी वगैरे निर्यात होत असत. तसेच लोकरीचे कापड, नमदे, ब्लँकेट, रग, धूप, वाळलेले मासे, खेचरे व तट्टे यांचीही काही निर्यात होई. चीनमधून चहा, चिनी मातीची भांडी, रेशीम इ. येत असत. नेपाळ व भूतान मधून तांदूळ व वाळविलेली फळे तिबेटला जात असत. मागणी व पुरवठा या तत्त्वावर खुला व्यापार होत असे. पूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांकडून व शासनाकडून कर्ज मिळत असे. १९५१ पर्यंत बँका नव्हत्या. चीनने पीपल्स बँक ऑफ चायनाच्या शाखा ल्हासा, शिगात्से, ग्यांगत्से, चामडो व गार्टोक येथे उघडल्या आहेत. अर्थसंकल्पाचा २९% भाग धर्म व शिक्षण यांवर २७% संरक्षणावर, २२% विकास कार्यावर, १०% आरोग्यावर, ४% शासकीय कामगार व ८% इतर कामांवर खर्च होत असे. सेवा किंवा वस्तुरूपाने कर भरता येई. आता तिबेटमध्ये चिनी चलन चालू आहे. पूर्वी सिक्कीममार्गे भारताशी मोठा व्यापार चाले. कस्तुरी, लोकर, सोने येई आणि धान्य, साखर, तांदूळ, तंबाखू, औषधे, इंधने व सुकी फळे, कापड, चहा मुख्यतः तिबेटला जाई. आज चीनशीच व्यापार होतो. ल्हासा ही प्रांताची राजधानी असून वस्ती ५०,००० आहे. शिवाय शिगात्सेस ग्यांगत्से ही इतर शहरे आहेत. ल्हासामध्ये आज वीज व दूरध्वनी सोई तसेच बऱ्यापैकी रस्ते आहेत. आज चिनी बंधनामुळे तिबेटची माहिती उपलब्ध होणे अतिशय कठीण बनले आहे.

वाहतूक व दळणवळण : पूर्वी लामांनी रस्ते व दळणवळण विकास मुद्दामच केला नव्हता. कारण आक्रमणाची व बाह्य जगाच्या संपर्काची भीती होती. प्रवास पायी अथवा जनावरांवरून होई. नद्या ओलांडण्यासाठी कातड्याने मढविलेल्या मोठ्या टोपल्या असत. व्यापारासाठी ल्हासाहून नागचूकामार्गे चिंगहाईकडे, चामडोमार्गे सेचवानकडे, कालिपाँग व याटुंगमार्गे भारताकडे, स्क्यिडग्राँगमार्गे नेपाळकडे व लेह आणि गार्टोकमार्गे काश्मीरकडे जाणऱ्या प्राचीन कारवान मार्गाचा वापर होई. आज राज्यसत्ता स्थिर करण्यासाठी रस्त्यांचा विकास वेगाने सुरू आहे. १९५४ मध्ये ल्हासा ते सेचवान हा २,८८० किमी. लांबीचा महामार्ग (पूर्वीचा ‘टी रोड’) पूर्ण झाला आहे. तसेच चिंगहाईकडे जाणारा महामार्ग व इतर अनेक दुय्यम मोटार मार्ग तयार झाले आहेत. कोकोनार खोऱ्यातून चिंगहाई प्रांताकडे, मानसरोवरमार्गे सिंधूच्या खोऱ्याकडे व चुंबी खोऱ्यातून जेलपला व नथुला खिंडीमार्गे सिक्कीमकडे जाणारे मार्गही आहेत. १९५६ पासून ल्हासा–पीकिंग विमानमार्गे चालू झाला आहे. चिंगहाई प्रांतातील जंगजोकडे विमाने जातात. चामडो, शिगात्से, डिंग्री व गार्टोक येथे लष्करी विमानतळ झाले आहेत. चिंगहाईमधील शीनिंगमार्गे शिगात्सेपर्यंत ३,६०० मी. उंच प्रदेशातून १,२९१ किमी.चा लोहमार्ग बांधण्याची योजना आहे. १९५१ पर्यंत ल्हासा, ग्यांगत्से, कालिंपाँग एवढाच तारायंत्र मार्ग होता. आता ५० डाकघरे व दूरसंदेशवहन केंद्रे झाली आहेत. त्यांत दूरच्या अंतर्भागातील व सीमेवरील प्रदेशांशी संपर्क साधणारी फिरती केंद्रेही आहेत.


लोक व समाजजीवन : तिबेट प्रांताची १९७० मध्ये लोकसंख्या १३ लाख होती असा अंदाज आहे. त्यात ५ लाख चिनी लोकांचा समावेश नाही. रस्ते, खाणी यांसाठी चीनमधून लक्षावधी मजुरांचे (कैदी) स्थलांतर तिबेटमध्ये सुरू आहे. १९५९ मध्ये सु. ८५,००० लोकांनी दलाई लामाबरोबर भारतात व नेपाळमध्ये स्थलांतर केले. लोक मंगोलियन वंशाचे असून पश्चिम भागातील लोक ठेंगू व पूर्व भागातील उंच आहेत. काही तिबेटी लोक भूतान, नेपाळ, सिक्कीम तसेच गढवाल, कुलू, स्पिटी–लाहूल व लडाख भागात आहेत.

समाजरचना : चिनी सत्तेपूर्वी समाजाचे लामा (धर्मगुरू), उच्च वर्णीय सरदार व शेतकरी बहुजनवर्ग असे तीन प्रमुख भाग होते. १९५१ मध्ये उच्चवर्णियांची संख्या केवळ १७५ कुटुंबे इतकीच होती. लामा किंवा धर्मगुरू होणे हे सन्मानाचे चिन्ह होते. ल्हासामध्ये तर निम्मे लोक धर्मगुरू होते. धर्मगुरू ब्रह्मचारी असत व त्यामुळेच अल्प साधनसंपत्तीच्या या देशात लोकसंख्येचा प्रश्न उग्र बनला नाही. बहुसंख्य लोक मात्र शेतकरी आहेत. काही श्रीमान लोकांस व धर्मगुरूंच्या कुटुंबियांसच आपले समाजवर्गीय स्थान बदलता येई. लोकांची घरे दगडमातीची असतात, तर भटक्या मेंढपाळांचे याकच्या केसांचे तंबू असतात. घरात खिडक्यांऐवजी लहान झरोके ठेवतात व वर तेलकट कागद चिकटवतात. स्वच्छता बेताचीच असते. श्रीमंताच्या घरांभोवती तटबंदी असे व बरीच घरे २ किंवा ३ मजली आढळतात. शेतकरी मेंढीच्या कातड्याचे कपडे वापरतात तर श्रीमंत लोक रेशमी कपडे वापरीत. स्त्रियांच्या वैशिष्ट्यपूर्ण शिरस्त्राणांसाठी तिबेट प्रसिद्ध होते.

तिबेटी लोकांची कुटुंबसंस्था व विवाहपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. समाजात एखादा लामा व एक ज्योतिषी हे विवाह यशस्वी होईल की नाही हे ठरवित. विवाहासाठी मंदिरासारख्या विशेष ठिकाणी जाणे अवश्य नसे. विवाहाचा करार होऊन तो अधिकृत रीत्या मान्य झाला म्हणजे वधुपक्ष वराच्या घरावर प्रार्थनेची निशाणे फडकावीत. याने वधूचा नवीन घरातील समान हक्क प्रस्थापित होई. सामान्यतः एकपत्नीत्व व एकपतित्वच रूढ असले तरी बहुपतित्व व बहुपत्नीत्व ह्या दोन्ही पद्धती कधीकधी मान्य असत. मालमत्तेचे हक्क सांभाळणे हे महत्त्वाचे मानले जाई. परिणामी काही वेळा पिता व पुत्र एकाच स्त्राशी विवाह करीत. मुलगा नसलेल्या घरातील सर्व बहिणी एकाच पुरुषाशी विवाह करीत वा मोठ्या भावाची पत्नी ही आपोआपच इतर भावांची पत्नी बने. अंत्यसंस्कारही असेच सोईप्रमाणे केले जात. काही वेळा मृताचे शरीर नदीत सोडून देत. शक्य असल्यास दहन करीत, विशेष पूज्य लामांचे देह जतन करून ठेवीत पण सामान्यतः मृत देह पारशी लोकांप्रमाणे गिधाडांचे स्वाधीन केले जात. अशा स्थानांस ‘जो–तोर’ म्हणत. सर्वसामान्यांचे आरोग्य थंड हवेमुळे चांगले असते. पण बाल–मृत्यूचे प्रमाण खूपच आहे. वैद्यकीय व्यवसाय लामांच्या हातात असून मुख्यतः वनस्पती औषधे वापरतात. पण त्याबरोबरच पिशाच्चबाधा दूर करणे इ. श्रद्धाही असत. १९६५ मध्ये १५ रूग्णालये व १४९ दवाखाने होते.

पूर्वी शिक्षण मर्यादित व मुख्यत: लामा व उच्चवर्गापुरतेच मर्यादित होते. लामा होणाऱ्या मुलांस वयाच्या सातव्या वर्षीच मठात नेले जाई. इतरांसाठी शिक्षणाच्या सोई १९५९ नंतर चिनी सरकारने उपलब्ध केल्या १९५९ मध्ये जवळजवळ सर्व मठ बंद करण्यात आले. त्यांपैकी काही १९७२ मध्ये उघडण्यात आले. तसेच शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. १९७३ मध्ये २,००० प्राथमिक शाळा, १० माध्यमिक, ७ उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यांत १,२४,००० मुले शिकत होती.

सांस्कृतीक जीवन : तिबेटचे जीवन भारतीय व चिनी संस्कृतींनी प्रभावित झाले आहे. चित्रशिल्प व वास्तुशिल्प विशेष प्रगत आहेत, कला मुख्यतः धर्माशी संबद्ध आहे. बुद्धप्रतिमा चित्रांतून व शिल्पांतून जास्त आढळते. बॉन धर्मीयांच्या आदिम कलेत मात्र कला अधिक शारीर वासनामय व काही वेळा मैथुनमग्न आकार अभिव्यक्त करणारी आहे. वास्तुशिल्पावरील भारतीय प्रभाव विशेष लक्षणिय आहे. प्रचंड मठनिर्मितीत व बुद्धमंदिरांमध्ये भारतीय कलेचा विकास दिसतो. ल्हासाच्या सीमेवर गान–डेन, से–रा व ड्रे–पुंग हे तीन प्रचंड मठ प्रसिद्ध आहेत. सर्व वास्तुशिल्पांत ‘पोताला’ ह्या दलाई लामा निवासाचे शिल्प लक्षवेधी असून जागतिक वास्तुशिल्पांपैकी ही एक लक्षणीय इमारत आहे. दीर्घकाळपर्यंत ही जगातील सर्वांत मोठी इमारत होती व तीमध्ये १,००० दालनवजा खोल्या आहेत. चित्र, शिल्प यांच्या तुलनेत तिबेटी संगीत मात्र विशेष विकसित नाही. ढोल, घंटा, तुताऱ्या व बॅग पाईप हीच वाद्ये प्रमुख आहेत.

स्वागत, विवाह, मृत्यू अशा विशेष प्रसंगी पावित्र्याचे प्रतीक म्हणून लोकरीचा पांढरा गळपट्टा देणे आणि चांगल्या भाग्याचे लक्षण म्हणून घराच्या छपरावर, तंबूवर, डोंगरावर वगैरे ठिकाणी प्रार्थनाध्वज फडकावणे हे तिबेटी लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक संस्कार आहेत. टंका (कापडी गुंडाळीवरील धार्मिक चित्रे), धातूच्या मूर्ती व लाकडी ठोकळ्याचे छाप यांसाठी तिबेट प्रसिद्ध असे. प्रशांत, सामान्य व क्रुद्ध अशा तीन प्रकारच्या देवता या प्रकारांनी दर्शविल्या जात. त्यासाठी विशिष्ट रंगांचीही योजना असे. देवतांची विविध रूपे तसेच हावभाव दर्शविणारे गार व चाम हे लामांचे नृत्यप्रकार असत. नाट्य व संगीत यांतून प्राचीन दंतकथा, ऐतिहासिक घटना इत्यादींचे दर्शन होई. उत्सवप्रसंगी लोकगीते, लोकनाट्य वगैरे अनेक दिवस चालत. वर्षारंभ व बुद्धाच्या जीवनातील प्रसंग यांवर उत्सव आधारलेले असत. गाढ धर्मश्रद्धेबरोबरच अनेक शकुन, अपशकुन, भुतखेते आणि भ्रामक समजुती यांचाही लोकमानसावर मोठा प्रभाव असे.


धर्म : लोक मुख्यतः महायान बौद्धधर्मी आहेत. सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रवेश झाला तत्पूर्वी बॉन हा आदिम धर्म प्रचारात होता. पुढे तो बौद्ध धर्मातच समाविष्ट करण्यात आला. अकराव्या शतकात भारतीय पंडित ‘आतिष’ याने तिबेटी बौद्ध धर्मात बरेच बदल सुचविले. येथे धर्मगुरूस लामा म्हणतात. दलाई लामा हे धर्मप्रमुख होते. पंधराव्या शतकापासून दलाई लामाची प्रथा सुरू झाली. दलाई लामा हा बुद्धाचा किंवा अवलोकितेश्वराचा अवतारच मानला जाई. दलाई लामाचा शोध ही गोष्ट विशेष प्रसिद्ध आहे. दलाई लामाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आत्म्याने कुठे पुनर्जन्म घेतला आहे, याचा शोध सुरू होई. त्यासाठी भविष्यकथन, शकुन, पूर्वसूचन यांचा आधार घेत. शोधित बालकांची विविध प्रकारे परीक्षा करीत. त्यांच्या शारीरिक खुणांप्रमाणे मृत दलाई लामांच्या वस्तू ओळखणे इ. कसोट्यांचा त्यात समावेश असे. इतके करूनही अनेक बालके उरल्यास चिठ्ठ्या किंवा त्यासारख्या पद्धतींनी एक बालक निवडीत. त्यानंतर त्याचे शिक्षण सुरू होई व सज्ञान होईपर्यंत कारभारी व्यवहार पाहत. अठराव्या वर्षी दलाई लामा मोठ्या समारंभाने अधिकारावर येई. आजचे दलाई लामा हे चौदावे दलाई लामा आहेत. ते सोळाव्या वर्षीच अभिषिक्त झाले. १९५९ मध्ये नंतर ते भारतात राजकीय आश्रयास आले. दलाई लामांच्या खालोखाल पंचेन लामा महत्त्वाचे आहेत. पंचेन लामा त्राशि लुनपो या मुख्य मठाचे प्रमुख असत. ते अमिताभाचे अवतार समजले जात. १९५१ साली चिनी लोकांनी जी राज्यकारभार समिती बनविली होती तिचे दलाई लामा अध्यक्ष व पंचेन लामा उपाध्यक्ष होते. पण १९६४ मध्ये ही समिती रद्द करण्यात आली.

भाषा : तिबेटी भाषेचे ब्रह्मी भाषेशी साम्य असून ती इंडो–चीन समूहातील एकाक्षरी व स्वराधिष्ठित आहे. मूळाक्षरे सातव्या शतकात संस्कृतवरून स्वीकारण्यात आलेली आहेत. ३० व्यंजने व ५ स्वर असून लेखन जुने आहे व उच्चारपद्धतीत फरक पडत गेल्यामुळे लेखन उच्चारानुसार नाही. ल्हासाची बोली प्रमाण मानली जाते. १९६० पासून तिबेटवर चिनी भाषा लादण्यात आली आहे.

तिबेटी भाषेतील लेखन मुख्यत: धार्मिक स्वरूपाचे आहे. ‘मिला रेप’ हे तिबेटचे राष्ट्रकवी अकराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी एक लाख काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. अठराव्या शतकातील सहावे दलाई लामा यांची कविताही प्रसिद्ध आहे. पण विशेष प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे कंजुर हा बुद्ध वचनांचा संग्रह १०८ खंडांचा आहे आणि त्यावरील टीकेचा तेंजुर हा ग्रंथ २२५ खंडांचा आहे. हे खंड संपादित आहेत.

भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. ब.

संदर्भ : 1. Bell, Charles, Tibet : Past and Present, Calcutta, 1968.

   2. Richardson, H. E. Tibet and Its History, London, 1962.

   3. Shakabpa, T. W. D. Tibet: a Political History, London. 1967.

   4. Tsung–Lien Shen Shen–Chi Liu, Tibet and the Tibetans, Stanford, 1953.


दलाई लामाचा पोताला राजवाडा, ल्हासा

पारंपारिक वेषभूषेतील तिबेटी युवती

कलातत्मक तिबेटी चहापात्र, सु. १८ वे शतक

वर्षारंभीचे भिक्षूंचे नृत्य

तिबेटी लामा

तिबेटी लोकरीची भारताकडे निर्यात

याक द्वारे शेतीची नांगरणी

गालिच्याचे विणकाम : पारंपारिक तिबेटी गृहोद्योग

       जोखांग: तिबेटमधील पवित्र प्राचीन मठ