पिडना : ग्रीसच्या मॅसिडोनिया विभागातील एक प्राचीन शहर. हे सलॉनिक आखाताच्या किनार्‍यावर सलॉनिक-आधुनिक ⇨ थेसालोनायकी-शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४० किमी. वर वसले होते. सध्या हे शहर अस्तित्वात नसून त्याच्या शेजारीच उत्तर बाजूस किट्रॉस नावाचे गाव वसले आहे. इ. स. पू. ४११ पूर्वीचा या शहराबद्दल विशेष उल्‍लेखनीय पुरावा मिळत नाही. इ. स. पू. सु. ३५६ मध्ये हे मॅसिडोनियाच्या दुसर्‍या फिलिपने घेतले होते. 

ग्रीसमधील मॅसिडोनियाचा राजा पाचवा फिलिप आणि त्याचा मुलगा पर्सियस यांच्या साम्राज्यविस्ताराला आळा घालण्यासाठी इ. स. पू. २१५ ते १६७ या कालखंडात रोमला त्यांच्याविरुद्ध तीन युद्धे करावी लागली. रोमलाही इटलीच्या पूर्वेकडील भूप्रदेशात व पूर्व भूमध्य समुद्रात सत्ता स्थापन करावयाची होती. ग्रीक नगरराज्ये रोमकडे मुक्तियुद्धाचा नेता म्हणून पाहत. इ. स. पू. २१५ ते २०५ व इ. स. पू. २०० ते १९६ या काळातील दोन युद्धांत फिलिपचा पराभव होऊन त्याच्या साम्राज्यविस्ताराला तात्पुरता पायबंद बसला. पुढे पर्सियसने साम्राज्यविस्ताराचा कार्यक्रम पुन्हा हाती घेतला. रोमला मॅसिडोनियाविरूद्ध तिसरे व शेवटचे युद्ध करावे लागले (इ. स. पू. १७१-१६७). या युद्धात पिडना येथे निकाली लढाई झाली. रोमन सेनेचा सेनापती पॉलस होता. प्रत्यक्ष लढाईला कसे तोंड लागेल, हे ज्ञात नाही. उभय पक्षांच्या सेनांमधून वाहणार्‍या नदीतून एक घोडा निसटून गेला व लगोलग लढाई पेटली, अशी दंतकथा आहे. मॅसिडोनी ‘फॅलँक्स’ सेनेला अनुकूल अशा सपाट खुल्या रणांगणावर लढाई होऊनही रोमच्या ‘लीजन’ सेनेने १०० सैनिकांच्या बदल्यात एक तासाच्या आत सु. २०,००० मॅसिडोनी सैनिक मारले. मॅसिडोनी घोडदळ निष्क्रिय राहिले. रोमने मॅसिडोनियाचे राज्य खालसा केले. पर्सियसचा मृत्यू रोमच्या तुरूंगात झाला. डेलॉस येथे रोमने एक मुक्त बंदर उघडून रोड्‌झ बंदरातून होणार्‍या ग्रीक व्यापाराची गळचेपी केली. पुढील १०० वर्षांत रोमने ग्रीस, मॅसिडोनिया व आशिया मायनर इ. प्रदेशांत राज्यविस्तार केला. युद्धानंतर पिडनाचा हळूहळू र्‍हास होत जाऊन चौथ्या शतकात तर ते पूर्णत: निर्जन बनले परंतु त्याच्या र्‍हासाची निश्चित कारणे सांगता येत नाहीत.

दीक्षित, हे. वि.