पूंता आरेनास : द. अमेरिकेतील चिलीच्या मागायानेस या प्रांताची राजधानी. हे ब्रंझविक द्वीपकल्पात मॅगेलन सामुद्रधुनीवर अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यान वसले आहे. लोकसंख्या ६७,६०० (१९७५ अंदाज). पूंता आरेनास याचा अर्थ उजाड प्रदेश. हे राजमार्गाने अर्जेंटिनाशी, जलमार्गाने चिलीशी, तर द. अमेरिकेतील इतर मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. टिएरा डेल फ्यूगो या तेलक्षेत्राचे सान्निध्य, खुल्या बंदराची सुविधा, नौसेना, वायुसेना आणि भूसेना यांचे तळ इ. गोष्टींमुळे याची भरभराट झाली असून द. अमेरिकेच्या अतिदक्षिणेकडील ते एक मोठे शहर बनले आहे. मॅगेलन सामुद्रधुनीवर चिलीचा हक्क प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने होसे दे लॉस सांतोस मार्दोनेस याने हे वसविले (१८४९). पनामा कालवा सुरू होण्यापूर्वी (१९१४) या बंदरास विशेष महत्त्व होते. १९२७–३७ दरम्यान यास मॅगेलन हे नाव होते. मेंढपाळी हा याच्या परिसरातील महत्त्वाचा उद्योग असून येथून लोकर, कातडी, मांस यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. सुंदर इमारती व उत्तम वस्तुसंग्रहालय यांमुळे पर्यटकांचे हे आकर्षणकेंद्र बनले आहे.

शहाणे, मो. ज्ञा.