डाव्हाऊ : फिलिपीन्स द्वीपसमूहापैकी मिंदानाओ बेटावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ३,९२,४७३ (१९७०). हे मोठे शहर बेटाच्या आग्नेयीस डाव्हाऊ नदीच्या मुखाजवळ, डाव्हाऊच्या आखाताच्या वायव्येस असून ह्याच्या आसमंतात सोन्याच्या खाणी व अननसाच्या बागा आहेत. डाव्हाऊ बंदरातून खोबरे, मका,

डाव्हाऊ बंदराचे दृश्यतांदूळ व लाकूड फिलिपीन्समधील सेबूला जातात. केळीसारख्या झाडाची ‘अंबाका’ ही सोपटे बाहेरदेशी निर्यात होतात. ह्यांपासून दोर, वस्त्रे इ. बनवतात. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात येथे जपानी सैन्याशी घनघोर लढाया झाल्या. याच्या नगरपालिकेचा प्रदेश २,२१२ चौ. किमी. असून त्यात नारळीच्या बागा व भातशेते यांतून वसलेली अनेक गावे आहेत. येथे मिंदानाओ विद्यापीठ, फिलिपीनी स्त्रियांचे महाविद्यालय, मत्स्यसंवर्धन केंद्र, जवळच्या सामाल बेटावर मौक्तिक संवर्धन केंद्र असून व्यापारी व कारभारी विभागीय मुख्य कार्यालय आहे. येथे विमानतळ असून सडकांचीही चांगली सोय आहे. 

लिमये, दि. ह.