ऑर्तीलिअस अब्राहम : (१४ एप्रिल १५२७–४ जुलै १५९८). बेल्जिअन भूगोलज्ञ व मानचित्रकलाकार. याचा जन्मअँटवर्प येथे झाला. लहानपणापासूनच अब्राहमला नक्षीकाम व खोदकामाचे शिक्षण देण्यात आले होते. १५४७ मध्ये तो अँटवर्पमधील सेंट ल्यूकच्या गिल्डमध्ये मानचित्रकलाकार म्हणून काम करू लागला. १५५४ च्या सुमारास त्याने पुरातनवस्तु, नाणी, नकाशे वगैरे जमविणे व विकणे ह्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यामुळे प्रसिद्ध मानचित्रकार ⇨मर्केटरशी त्याचे मित्रत्वाचे संबंध जडले. मर्केटरच्या प्रोत्साहनामुळे ऑर्तीलिअसने स्वत: नकाशे बनविण्यास सुरुवात केली. १५६४ मध्ये हृदयाच्या आकाराच्या प्रक्षेपणावरील जगाचा, १५६५ मध्ये ईजिप्तचा व १५६७ मध्ये आशियाचा असे नकाशे त्याने तयार केले. ह्यानंतर त्याने आपल्या संग्रही अस‌लेल्या नकाशांमधून निवडून काढलेल्या स‌त्तर नकाशांचा एक ॲटलास प्रसिध्द केला. ह्यामुळे ऑर्तीलिअसला खूपच प्रसिध्दी मिळाली. मुळ नकाशे ज्यांनी काढले होते, अशा ८७ लोकांचा ऋणनिर्देश त्याने केला होता. हे स‌र्व नकाशे त्याने होगेनबर्गकडून एकाच प्रकारच्या पध्दतीने बनवून घेतले होते. दिएस्त हा या ॲटलासचा प्रकाशक होता. १५७३ मध्ये आणखी स‌तरा नकाशांची भर घालून ऑर्तीलिआसने हा संग्रह परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. १५७९, १५८४, १५९०, १५९५, १५९५ व १५९८ मध्ये ह्याच्या वाढविलेल्या व सुधारलेल्या आवृत्त्या निघाल्या.एक लहान आकाराची आवृत्तीही ऑर्तीलिअसने काढली होती. त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ शंभर वर्षे ह्या ॲटलासच्या आवृत्त्या यूरोपभर प्रसारित होत होत्या. ऑर्तीलिअसला जुनी नाणी वगैरे जमविण्याचाही छंद होता.१५७३ मध्ये त्याने ह्या संग्रहाचा एक कॅटलॉग प्रसिध्द केला. स्पेनच्या राजाने १५७५सालीच त्याची आपला भूगोलशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक केली होती. त्याने मुख्यत: भूगोलविषयक काही पुस्तके लिहून प्रसिध्द केली.

शाह र. रू.