विठ्ठल मंदिर, देहू.

देहू : महाराष्ट्रातील एक पवित्र क्षेत्र. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात पुण्याच्या वायव्येय सु. २९ किमी. व देहूरोड रेल्वे स्थानकाच्या ईशान्येस सु ५ किमी. वर इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या ५,६३६ (१९७१). हे ठिकाण संत तुकारामाची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने विशेष प्रसिद्ध आहे. येथे विठ्ठल–रुक्मिणीचे मंदिर आहे.या मंदिरास लागून असलेल्या घाटास देऊळघाट म्हणतात. येथे गोपाळपुरा म्हणून एक भाग आहे. येथील एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली तुकोबांचे निर्याणस्थान दाखवितात. देहूहून तुकारामाची पालखी आषाढ शुद्ध एकादशीस पंढरपुरास व कार्तिक वद्य एकादशीस आळंदीस जाते. दरवर्षी येथे तुकारामाच्या निर्याणदिनानिमित्त फाल्गुन वद्य द्वितीयेस मोठी यात्रा भरते. देहूरोड रेल्वे स्थानकाच्या जवळच महत्त्वाचा लष्करी तळ असून याची गणना भारतातील मोठ्या लष्करी तळांत केली जाते.

गाडे, नामदेव