अंकारा : तुर्कस्तानची राजधानी. लोकसंख्या १२,०८,७११ (१९७०). अक्षांश ३९५५’ उ. व रेखांश ३२ ५० पू. १९३० पर्यंत ‘अंगोरा’ नावाने ओळखला जात असे. प्राचीन काळी याचे नाव ‘ॲनसायरा’ होते. तुर्कस्तानच्या ॲनातोलिया प्रदेशातील उत्तर मध्यावर समुद्रसपाटीपासून सु. अकराशे मी. उंच असलेले एक पठार आहे. या पठारावर वाहणाऱ्या‍ अंगोरा व चुबुक या छोटया नद्यांच्या संगमावर अंकारा वसले आहे. पठाराच्या उत्तरेस डोंगराळ भाग असून पश्चिमेस व दक्षिणेस सखल मैदाने आहेत. त्यामुळे येथील हवा कोरडी, खंडागर्त पण निरोगी आहे. येथील उन्हाळ्यातील तपमान सरासरी २२·०३० से.असते, तर हिवाळ्यातील ०·०९ से. असते. वार्षिक पर्जन्यमान सु. ३४·७ सेंमी. असते. मे व डिसेंबर हे येथील अधिक पावसाचे तर जुलै हा कोरडा महिना असतो.

 

इ.स.पू.२,००० वर्षापासून येथे हिटाइट लोकांची संस्कृती होती. त्यांचे अवशेष अंकारामध्ये आजही संग्रहलयात जपून ठेवले आहेत. ॲनसायरा हे नाव मात्र इ.स.पू.नवव्या शतकात फ्रिजिअन लोकांनी पाडले असावे असा तर्क आहे. इ.स.पू. तिसऱ्या शतकात ही केल्टिक लोकांच्या गॅलेशिया देशाची राजधानी होती. रोमनांनी पहिल्या शतकात त्यांचा पाडाव करून आपल्या गॅलेशिया प्रांताची ही राजधानी केली. रोमन व पुढे बायझँटीन साम्राज्यात अंकाराची खूपच भरभराट झाली. दळणवळणाचे व व्यापाराचे हे महत्वाचे केंद्र बनले, ऑगस्टच्या कारकीर्दीत संगमवराने बांधलेल्या एका देवळाचा भग्नावशेष जुन्या अंकरामध्ये सापडला असून त्यावर त्या काळचा इतिहास खोदलेला आहे. चौथ्या शतकातील ज्यूलियन सम्राटाचा एक स्तभं सापडला असून काही रोमन स्नानगृहेही येथे सापडली आहेत. बाराव्या शतकाच्या सुरुवातीस हे सेल्जुक तुर्कांनी जिंकले सु. ११५६ मध्ये निघालेले पहिले तुर्क नाणे येथेच पाडण्यात आले होते. १३६० मध्ये हा ऑटोमन साम्रज्याचा भाग झाला तैमूरलंगाने १४०२ मध्ये ऑटोमन सम्राटाचा अंकाराजवळच पराभव केला. १४३१ मध्ये अंकारा परत तुर्कांनी जिंकून घेतले. परंतु अंकाराचे महत्तव यानंतर दिवसेंदिवस कमी होत गेले. बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतच्या काळात बांधल्या गेलेल्या चार भव्य मशिदीमात्र आजही जुन्या अंकारामधील प्रक्षणीय स्थळे बनली आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत अंकारा फक्त अंगोरा जातीची जगप्रसिद्ध बकरी त्यांची मोहेर(लोकर) आणि रेशमी केसांची व रंगीबेरंगी डोळ्यांची अंगोरा जातीची मांजरे यांकरिता प्रसिद्ध होते.

 

केमालपाशाने १९२३ मध्ये ही आजच्या तुर्कस्तानची राजधानी बनविली व नव्या अंकारा शहराची आखणी होऊन झपाटयाने वाढ झाली. अंकराची लोकसंख्या १९२४ मध्ये ३५,०००, १९२७ मध्ये ७४,५५३, १९५० मध्ये २,८६,७८१, १९६० मध्ये ६,५०,०६७ व १९६५ मध्ये सु. ९,०२,००० इतकी झाली. रूंद रस्ते, वृक्षाच्छादित ऐसपैस पादचारी मार्ग व सुंदर इमारती यांमुळे अंकारा हे मध्यपूर्वेतील शानदार शहर झाले आहे. शासकीय कार्यालये, राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान, ऑपेरा हाऊस, संग्रहालये, अद्ययावत रूगणालये, क्लब्स, विश्वविद्यालय, परकीय दूतावासांच्या इमारती, रेसकोर्स, स्टेडियम, नभोवाणीक्रेंद्र, चित्रपटगृहे, राष्ट्रीय ग्रंथालय इ. वास्तूंनी अंकारास आधुनिकता आली आहे. तीस विविध प्रकारच्या संगमरवरी व रंगीबेरंगी दगडांनी बांधलेले केमालपाशाचे कबरस्तान आधुनिक तुर्की शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. अंकारा दळणवळणाचे व व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असून मोहेर, धान्य, सफरचंद, दाक्षे, तयार कापड, सिंमेट, कौले, मद्य व कातडी सामान इत्यादींकरिता प्रसिद्ध आहे.

 

शाह,र. रु

 तुर्कस्तानाची राजधानी अंकारा येथील युवक-उद्यान