न्यासा सरोवराचे दृश्य

न्यासा सरोवर : पूर्व आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर. हे ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या दक्षिण भागात असून याच्या पश्चिमेस व दक्षिणेस मालावी, पूर्वेस व उत्तरेस टांझानिया आणि पूर्वेस मोझँबीक हे देश आहेत. याचा अधिकांश भाग मालावी प्रजासत्ताकात असल्याने यास ‘मालावी सरोवर’ही म्हणतात. याची दक्षिणोत्तर लांबी ५८४ किमी., रुंदी १६ ते ८० किमी. व व्याप्ती २९,६०४ चौ.किमी. आहे. न्यासा सरोवराचा पृष्टभाग समुद्रसपाटीपासून ४७२ मी. उंचीवर असून, उत्तर भागात त्याची कमाल खोली ७०४ मी. आहे. न्यासा सरोवराचे नाव बांटू भाषेतील न्यांझा – प्रचंड जलाशय – या शब्दावरून पडले आहे. त्याचे पाणी गोड व पिण्यायोग्य असून सरोवराला मिळणाऱ्या अनेक लहानमोठ्या नद्यांपैकी रूहूहू ही प्रमुख नदी आहे. सरोवराचे बहिर्द्वार दक्षिण भागात झँबीझीच्या शीरे या उपनदीमुळे बनले आहे. यामध्ये चीझूमूला व लीकोमा ही बेटे आहेत. कॅस्पर बोकॅरो या पोर्तुगीजाने १६१६ मध्ये सरोवराचा प्रथम शोध लावला. डेव्हिड लिव्हिंग्स्टन व जॉन कर्क या ब्रिटिश समन्वेषकांनी १८५९ मध्ये त्यासंबंधी प्रथम अचूक माहिती दिली. ६ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या महायुद्धाची नांदी सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरील एम्बाम्बा बे येथे उडालेल्या ब्रिटिश आणि जर्मन नाविक दलांच्या चकमकीतून झाली. मासेमारीच्या दृष्टीने न्यासा सरोवर महत्त्वाचे असून वार्षिक उत्पादन ७,००० टन आहे. सर्वाधिक उत्पादन टिलापिया माशांचे होते. न्यासा सरोवर जलवाहतुकीसही उपयुक्त असून त्याच्या किनाऱ्यावर पोर्ट जॉन्स्टन, कोटाकोटा, एन्गकाटा बे, मांडा, काराँगा, मंकी बे, एम्बाम्बा बे, चीपोका, मम्वाया वगैरे महत्त्वाची बंदरे आहेत.

गाडे, ना. स.