फलटण : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्याचे प्रमुख ठिकाण इतिहासप्रसिद्ध निंबाळकर घराण्याच्या भूतपूर्व संस्थानाची राजधानी. लोकसंख्या २६,७७४ (१९७१). हे साताऱ्याच्या ईशान्येस महाड-पंढरपूर राज्यमार्गावर सु. ६० किमी. व पुण्याच्या आग्नेयीस सु. १०५ किमी. वर बाणगंगा नदीकाठी वसले आहे. साखर, द्राक्षे कापूस यांची ही मोठी बाजारपेठ असून शहराजवळश्रीराम सहकारी साखर कारखान १६ किमी.वर साखरवाडी येथेफलटण शुगर वर्क्सहा दुसरा साखर कारखाना आहे. यांशिवाय एक मद्यार्ककारखाना सरकी काढण्याच्या तीन गिरण्या शहरात आहेत. येथील नगरपरिषद (स्था. १८६८) शहराची आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा इ. सुविधा पुरविते. एक रुग्णालय, पशुरुग्णालय आणि प्राथमिक शाळा नगरपरिषदेच्या प्रशासनाखाली असून संस्थानी अंमलात प्राथमिक शिक्षण सक्तीचे होते. शहरात तीन माध्यमिक विद्यालये, एक महाविद्यालय इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एक शाळा आहे. यांशिवाय स्त्रियांसाठी एक प्रशिक्षण महाविद्यालयही आहे. शेवटचे संस्थानाधिपती मालोजीराजे यांच्या कारकीर्दीत (१९१६ – ४८) फलटण संस्थानाची आर्थिक राजकीय भरभराट झाली. संस्थान विलीन झाल्यानंतर येथेसर्वोदयनावाची एक योजना अंमलात आली आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या ३५ खेड्यांना तिचा लाभ मिळाला. फलटणचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. यादवकाळात (इ.स.पू. १०००

फलटणचे प्रसिद्ध श्रीराममंदिर

ते १४००) येथे अनेक मंदिरे बांधली गेली असून काहींचे भग्नावशेष अद्यापि आढळतात. महानुभाव साहित्यात त्याचापालेठाणअसा उल्लेख आढळतो. महानुभाव पंथीयांची येथे सु. ६७ मंदिरे असून फलटणला या पंथाचीकाशीम्हणून संबोधिले जाते. चैत्र महिन्यात या पंथाचीघोड्यांची जत्राया नावाने ओळखली जाणारी यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होते. शिवकाळात नंतर फलटणचे महत्त्व वाढले. येथील अवशिष्ट मंदिरांत जबरेश्वर, श्रीचंद्रप्रभू, श्रीज्ञानेश्वर, श्रीराम, त्रिजटेश्वर, नागेश्वर, श्रीदत्त इ. मंदिरे प्रसिद्ध आहेत. कालदृष्ट्या जबरेश्वर हे प्राचीन असून ते बाराव्या शतकात बांधले असावे. जबरेश्वर श्रीचंद्रप्रभू ही मूळची जैन मंदिरे असावीत. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ – १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह प्रवेशमंडप असून त्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वा कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्‌पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. छायाप्रकाशाच्या योजनेमुळे त्या अधिक आकर्षक वाटतात. येथील कामशिल्पेही उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या वास्तुशिल्पशैलीवर द्राविड, विशेषतः दक्षिणेकडील होयसळ शैलीची, छाप आढळते.

येथे रामनवमीला रामाचा मोठा उत्सव होतो आणि देवदिवाळीस (मार्गशीर्ष शु. १ ते ६ पर्यंत) रथाची भव्य मिरवणून निघते. श्रीरामाच्या मंदिराशेजारी बांधलेले दत्ताचे नवीन मंदिर, शिवाय अतिथिभुवन, शंकर मंडई, मुधोजी क्लब, व्हिक्टोरिया डायमंड, जूबिली ग्रंथालय यांसारख्या चौथ्या मुधोजीरावांनी बांधलेल्या लोकोपयोगी इमारती, त्याचप्रमाणे मालोजीराजे यांच्या काळात बांधण्यात आलेली सर्व शासकीय कार्यालयांसाठीची ‘अधिकारगृह’ ही भव्य वास्तू इ. प्रेक्षणीय आहेत.

देशपांडे,सु.र.