साडो बेट : जपानमधील एक निसर्गसुंदर बेट. जपानमधील हे पाचव्या क्रमांकाचे मोठे बेट असून त्याची लांबी सु. ५६ किमी., रुंदी १९ किमी. व क्षेत्रफळ ८५७ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ६३,२३१ (२०११) आहे. जपानमधील होन्शू बेटाच्या पश्चिमेस ५१ किमी.वर जपानी समुद्रात हे बेट असून होन्शू-साडो बेटांदरम्यान साडो-कायक्यो (साडो) सामुद्रधुनी आहे. या बेटाच्या ईशान्येस व नैर्ऋत्येस अनुक्रमे पोत्सू व मानो उपसागर आहेत. बेटाचा उत्तरेकडील भाग पर्वतीय व ओसाड असून त्यातील किम्पोकू (उंची १,१८० मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे. तसेच बेटाच्या दक्षिण भागात उत्तरेकडील पर्वत श्रेणीला समांतर अशी कोसाडानामक पर्वतश्रेणी असून या दोन्ही श्रेण्यांदरम्यान कुनिनका ही सखल व सुपीक भूमी आहे. दोन समांतर पर्वतश्रेण्या, त्यांदरम्यानची सुपीक भूमी, वैशिष्ट्यपूर्ण तुटलेले कडे, घळ्या, पर्वतीय प्रवाह, कामो -को सरोवर अशी भूमीस्वरूपे या बेटावर आढळतात.

साडो बेटाला प्राचीन इतिहास आहे. इ. स. ७०२ मध्ये हा स्वतंत्र प्रांत होता आणि हा दर्जा १८७१ पर्यंत टिकून राहिला. तेथे जपानमधील प्रिफेक्चरची पद्घत रूढ झाली. मध्ययुगात (इ. स. तेरावे–सोळावे शतक) ते हद्दपारीतील गुन्हेगारांचे प्रमुख वसतिस्थान होते. या ठिकाणी हद्दपारीत अनेक मुत्सद्दी, विचारवंत व सम्रा टांना ठेवण्यात आले होते. त्यांपैकी जुन्तोकू तेन्नो (११९७–१२४२) हा सम्राट, निचिरन (१२२२–८२) हा बौद्घ धर्मगुरु-विचारवंत, फुजीवारा (१२९८), झिमी (१४३४) इ. मुत्सद्दी प्रसिद्घ होते. पूर्वी हे ‘आयलंड ऑफ रोमॅन्स’ म्हणून प्रसिद्घ होते.

या बेटावर इ. स. १६०१ मध्ये सोने आणि चांदीच्या खाणींचा शोध लागला. त्यामुळे साडो बेट भरभराटीस आले. त्याचा उल्लेख ‘सुवर्णपर्वताचे बेट’ असा होऊ लागला मात्र सोन्या-चांदीचे उत्पादन घटल्यानंतर मध्यवर्ती मैदानी प्रदेशातील कृषिव्यवसायाला ऊर्जितावस्था आली. हे मैदान भाताच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. बेटाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने भातशेती व मासेमारीवर आधारित आहे. येथील कॅटल आणि यलोटेल जातीच्या माशांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. खळ (मिसो) व बांबूच्या विविध कलात्मक वस्तू यांचीही निर्मिती या बेटावर होते. ऐकावा हे बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वांत मोठे नगर तसेच बेटाचे प्रशासकीय केंद्र आहे. ऐकावाच्या ईशान्येस २५ किमी.वर ऱ्योत्सू हे या बेटावरील प्रमुख बंदर व शहर आहे.

साडो बेटाच्या पूर्वेस होन्शू बेटावर नीईगाता शहर असून त्याचे बंदर म्हणूनही ऱ्योत्सू महत्त्वाचे आहे. ऐकावा या शहराजवळ पूर्वी सोन्याची खाण होती.

बेटावर टोकीनामक अत्यंत दुर्मिळ पक्षी-जाती असून तिचे हे एकमेव मूलस्थान असल्याचे पक्षितज्ज्ञ मानतात.पारंपरिक जपानी नृत्यासाठी हे बेट ख्यातनाम असून त्यातील साडो ओकेसा हे नृत्य अतिशय लोकप्रिय आहे. सौम्य हवामान, कॅमीलिआ व ऱ्होडोडेंड्रॉनसारखी सुंदर फुले व आकर्षक भूदृश्ये यांमुळे हे बेट महत्त्वाचे पर्यटनकेंद्र बनले आहे.

देशपांडे, सु. र.