मीनाक्षी मंदिर, मदुराई.मदुराई : तमिळनाडू राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्यातील    मीनाक्षी मंदिरासाठी ख्याती पावलेले औद्योगिक व सांस्कृतिक शहर, लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील मद्रास व कोईमतूर यांखालोखालचे हे तिसर्‍या क्रमांकाचे शहर (९,०४,३६२-१९८१) आहे. तिरू-  चिरापल्लीच्या नैर्ऋत्येस ११३ किमी. वरील हे शहर वैगई नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शहराच्या दक्षिणेला नारळीच्या मोठ्या  बागा आहेत. सस.पासून १०० मी. उंचीवरील या शहराच्या परि- सरात अन्नमलई, नागमलई व पसुमलई ह्या प्रसिद्ध टेकड्या आहेत. मदुराई हे दक्षिण रेल्वेवरील महत्त्वाचे प्रस्थानक असून वाराणसी- कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४९ रामनाथपुरमकडे जातो.  रामनाथपुरम् व मदुराई या दोन्ही जिल्ह्यांचे प्रधान कार्यालय मदुराई येथेच आहे.

शिवाच्या जटेतून या ठिकाणी अमृताचे थेंब पडले व अमृत हे मधुरांतील मधुर असल्याने या नगरीला ‘मधुरा’ असे नाव मिळाले व त्याचाच पुढे ‘मदुरा’ व ‘मदुराई’ असा अपभ्रंश झाला असावा. चैतन्यचरितामृतात मदुराईचा ‘दक्षिण मथुरा’ असा उल्लेख आहे.  मदुराई हे पूर्वीपासून धार्मिक, व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. टॉलेमीच्या मते मदुराई हे दक्षिण भारताचे व्यापारकेंद्र होते. ख्रिस्तपूर्व काही शतके ग्रीस व रोम यांच्याशी त्याचे व्यापारी   संबंध होते. कौटिलीय अर्थंशास्त्रामध्ये मदुराई हे तलम रेशमी वस्त्रे व मोती यांकरिता प्रसिद्ध असल्याचा उल्लेख आढळतो.

हे प्राचीन नगर ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते इ.स. अकराव्या शतकाच्या अखेरपर्यंत पांड्य घराण्याची राजधानी होती. तिच्या  भव्यतेमुळे व सौंदर्यामुळे तिला ‘दक्षिण भारताचे अथेन्स’ म्हणूनही संबोधिले जाते. या काळात मदुराई तेथील ‘तमिळ संघम्’ (तमिळ अकादमी) या विद्वतसमूहामुळे ख्यातनाम झाली. १३१० मध्ये मलिक काफूरने हे लुटले होते. १३२४ मध्ये मुसलमानांनी तिच्यावर कबजा मिळविला. १३७८ नंतर मदुराई विजयानगर साम्राज्याच्या आधि-पत्याखाली गेली. १५५० च्या सुमारास नायक घराण्याने या भागात आपली सत्ता स्थापून मदुराई प्रमुख केंद्र बनविले. सुमारे १०० वर्षे, विशेषतः तिरूमल नायकाच्या कारकीर्दीत (१६२३-५९) हे राज्य व   नगरी समृद्ध झाली. तथापि १६६० नंतरच्या काळात या प्रदेशावर मुसलमान, मराठे आणि म्हैसूरचा चिक्कदेव राजा यांची वक्रदृष्टी वळली  व तिचे चटके मदुराईलाही बसले. द. अर्काटच्या नबाबांनी १७३६ च्या सुमारास मदुराईवर आपला अंमल बसविला. १८०१ मध्ये या नबाबांनी वार्षिक तनखा व संरक्षण या शर्तीवर मदुराई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात  १९४० च्या पुढे मदुराई हे सविनय कायदेभंग चळवळीचे तसेच  राजकीय नेतृत्वाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून प्रसिद्धी पावले.

जुने शहर, टेप्पाकुलम् सरोवराकडील बागांनी व उन्हाळी बंगल्यांनी व्यापलेला भाग आणि वैगई नदीपलीकडे वसलेली नवी पेठ, असे  मदुराईचे तीन प्रमुख भाग पडतात. 

जुने शहर किल्ल्याच्या सभोवार वसलेले असून त्याच्या मध्यभागी मीनाक्षी मंदिर आहे. मंदिराजवळच चार अवनी मार्ग, मंदिराबाहेर  लगेचच चार चैत्री मार्ग आणि मंदिराच्या भिंतीच्या आत चार आदी   मार्ग आहेत. विश्वनाथ नायक या राजाने १५५९ मध्ये शहरासभोवती तटबंदी घालून, चौफेर मोठे खंदक खणून ७२ बुरूज उभारले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात हे तट अस्तित्वात    होते. ब्लॅकबर्न नावाच्या जिल्हाधिकार्‍याने १८४१ मध्ये शासनाच्या अनुमतीने या भिंती पाडून टाकल्या व त्या जागी घरे बांधली.

एका स्थानिक दंतकथेनुसार, मलयध्वज पांड्य राजाची मीनाक्षी ही कन्या होय. तिला जन्माच्या वेळी तीन स्तन होते व त्यांमुळे तिच्या मातापित्यांना भीती वाटली. तेव्हा एका परीने राजाला तिच्या भावी पतीच्या दर्शनाने तिचे वैगुण्य नष्ट होईल, असा दिलासा दिला.  वडिलानंतर मीनाक्षी पांड्य देशावर राज्य करू लागली. एकापाठोपाठ   एक देश जिंकून ती हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचली. तिने कैलासावर आक्रमण करण्याचे ठरविले, तेव्हा शिव अकस्मात तिच्या- समोर प्रकटला. ते दैदीप्यमान पुरूष-तेज पाहून मीनाक्षीला प्रथमच  लज्जा निर्माण झाली आणि तिचा मधला स्तनही अदृश्य झाला. पुढे तिचा शिवाशी विवाह झाला.


पांड्य राजांनी बांधलेली मूळची वास्तू मलिक काफूरच्या आक्र-मणात जवळजवळ नष्ट झाली. फक्त मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्ती तेवढ्या सुरक्षित राहिल्या. नायक राजांच्या कारकीर्दीत मंदिराची  पुनर्रचना करण्यात आली. मीनाक्षी मंदिरातील, सर्वांत अंतर्भागातील मूर्ती वगळता, इतर मूर्ती सोळाव्या शतकानंतरच्या आहेत. मीनाक्षी मंदिराला ‘वेल्ली अंबालम्’ (रजत मंदिर) असे संबोधण्यात येते. या मंदिराने एकूण ५-६ हे. क्षेत्र व्यापले असून मंदिरासभोवती उंच चिरेबंदी तट आणि चारी दिशांना दरवाजे आहेत. दक्षिणेकडील तटाची उंची ७.५ मी. असून त्याच्या आतील बाजूस लहानमोठी २७ गोपुरे आहेत. मंदिराचा तटवेष्टीत परिसर २५३ मी. लांब आणि २२२.५ मी. रूंद असून त्यात मुख्य मंदिर, अनेक मठ, सभामंडप, लहान देवालये, पवित्र जलाशय इ. वास्तू आहेत.

 मंदिराच्या अष्टशक्ती मंडपातील स्तंभांवर अष्टशक्तींच्या मूर्ती  रेखलेल्या आहेत. या मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस गणेश व षण्मुख यांच्या मूर्ती आहेत. या दारातून आत गेल्यावर तिरूमल नायकाचा एक मंत्री मीनाक्षी नायक याचा सभामंडप लागतो. हा सहा ओळींत उभारलेल्या एकसंध शिलास्तंभांनी तोलला आहे. यानंतरचा ‘मुदली पिल्लइ मंडप’ (कृष्ण मंडप) असून तो अनेक मोठ्या दगडी मूर्तींनी सुशोभित केलेला आहे. हा मंडप ओलांडला की,  ‘सुवर्णपद्म’ नावाचे एक कुंड लागते. यात स्नान करणे पवित्र मानण्यात येते. त्यात पूर्वी इंद्र स्नान करीत असे, अशी आख्यायिका आहे.   कुंडाच्या पश्चिम बाजूला असलेल्या मंडपात पिंजर्‍यांतून ठेवलेल्या   अनेक पोपटांच्या ओरडण्यावरून त्या मंडपाला ‘किलिकट्टी मंडप’ असे नाव पडले आहे. हा मंडप अनेक एकसंध ग्रॅनाइट शिलास्तंभांनी तोललेला असून त्या स्तंभांवर व्याली, पाच पांडव इत्यादींची उत्कृष्ट व मनोहारी शिल्पे खोदलेली आहेत. या मंडपातून पुढे गेले की, मीनाक्षी देवीची मूर्ती दृष्टीस पडते.

मंदिरासमोर ध्वजासाठी सुवर्णस्तंभ असून प्रदक्षिणेच्या मार्गात ज्ञान, क्रिया, बल इ. शक्तींच्या तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. काळ्या पाषाणाची मीनाक्षीची मूर्ती द्विभुज असून ती कमळात पूर्वा- भिमुख उभी आहे. याच आवारात मीनाक्षी मंदिराच्या उत्तरेस   सुंदरेश्वराचे (शिवाचे) मंदिर आहे. या मंदिरात ६३३ शैव संतांच्या मूर्ती तसेच एका जीर्ण कदंब वृक्षाचे खोड आहे. पूर्वी या जागी कदंब- वन होते, असे म्हणतात. यामुळेच मीनाक्षीचे ‘कदंबवनवासिनी’ असेही दुसरे नाव आहे. या मूर्तीच्या पूर्वेकडील बाजूस तिरूमल नाय- काचा पूर्वज मटटू वीरप्पा याने बांधलेला ‘वीर वसंत राय मंडप’    आहे. तिरूमल मंदिराच्या दक्षिण बाजूला ‘कल्याण मंडप’ (विवाह   मंडप) असून तेथे प्रतिवर्षी चैत्री पौर्णिमेला संपन्न होणारा सुंदरेश्वर व मीनाक्षी यांचा विवाह-सोहळा व रथोत्सव प्रसिद्ध आहे. याच वेळी येथे गुरांचा मोठा बाजार भरतो.

वीर वसंत राय मंडपाच्या उत्तरेस ‘सहस्त्रस्तंभ मंडप’ असून त्यांवर अप्रतिम कलाकुसर व नक्षीकाम करण्यात आले आहे. याच मंडपात ‘मंदिर कला संग्रहालय’ उभारण्यात आलेले आहे.

पूर्वेकडील गोपुरातील प्रवेशद्वारातून आत शिरले की, ‘पुदु मंडप’ (नवीन मंडप) लागतो. तिरूमल नायक राजाने बांधलेल्या या सभा-मंडपाची कलाकुसर अत्यंत प्रेक्षणीय आहे. याच्या काही स्तंभांवर तिरूमल नायक, त्याच्या राण्या व नायकाचे पूर्वज यांची पूर्णाकृती शिल्पे आहेत. या मंडपातील नृत्याच्या पवित्र्यात असलेली नटराजाची अतिशय प्रेक्षणीय मूर्ती आहे. याच मंडपात एक स्वरस्तंभ असून त्यातील उपस्तंभावर आघात केल्यास क्रमाने सा,रे,ग,म असे सप्तस्वर निघतात.

सुंदरेश्वराचे मूळ द्राविड नाव ‘छोक्कलिंगम्’ असून तो द्रविडांचा उपास्यदेव होता. आर्य-द्रविड संस्कृतिसमन्वयाच्या आंदोलनात    आर्यांनी त्याला शिवाचा अवतार मानून त्याचे ‘सुंदरेश्वर’ असे   नाव ठेवले. मीनाक्षी ही द्राविड शक्तिदेवता होय. आर्यांनी तिला   पार्वतीचा अवतार मानून सुंदरेश्वर शिवाशी तिचा विवाह घडवून  आणला. शैव, शाक्त व वैष्णव संप्रदायांना एकत्र आणून त्यांमधील परस्परकटुता कमी करण्याचा या विवाहामागील एक उदात्त हेतू आहे. मदुराईचा राजा तिरूमल नायक याने ही प्रथा पाडली.

मदुराईमध्ये मुख्य मंदिराखेरीज अन्य काही मोठी मंदिरे आहेत. शहराच्या नैर्ऋत्य भागात ‘पेरूमल मंदिर’ हे सर्वांत मोठे मंदिर आहे. अन्य मंदिरांपैकी ‘शिव मंदिर’ (नानभैतरूवर-लाभदायी देव)  व ‘मरिअम्मन’ (वांदियूर-देवीरोगाची देवता) देवीचे मंदिर ही   प्रसिद्ध आहेत. मरिअम्मा देवीचे मंदिर हे वांदियूर टेप्पाकुलम् सरो-   वराच्या काठावरच उभारलेले आहे. वांदियूर टेप्पाकुलम् हा उत्तर- दक्षिण असा मोठा आयताकृती जलाशय असून तो तिरूमल नायकाने बांधला. हा जलाशय वैगई नदीशी एका कालव्याद्वारे जोडलेला आहे. जलाशयाच्या मध्यभागी एक चौरसाकार बेट असून त्यामध्ये एक  लहानसे श्वेतमंदिर आहे. मंदिराच्या सभोवार हिरवीगर्द झाडी व    फुलांनी डवरलेले वृक्ष असून, मंदिराच्या चारी कोपर्‍यांवर आकर्षक    मंडप आहेत. प्रतिवर्षी जानेवारी-फेब्रुवारी या काळात (तिरूमल नायकाच्या जन्मदिनी) टेप्पाकुलम् उत्सव मोठ्या थाटात साजरा  करण्यात येतो.


तिरूमल नायकाने बांधलेला राजप्रासाद हे मदुराईतील आणखी एक वैशिष्ट्य होय. भारतीय-इस्लामी शैलीत बांधलेल्या या प्रासादाचे  छत, कमानी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अदभुत मानल्या जातात. या प्रासादाच्या दोन्ही इमारतींमधील कमानींचे बांधकाम चुनाविटा यांनी केलेले आहे. राजवाड्याच्या दर्शनी भागाला ‘स्वर्गविलासम्’ असे नाव आहे. राजप्रासाद-वास्तुशैलीच्या दृष्टीने एवढी भव्य वास्तू दक्षिण भारतात अन्यत्र कोठेही नाही. सांप्रत या राजप्रासादाचा वापर शासकीय कार्यालयांकरिता करण्यात येतो.

ब्रिटीश काळात मदुराईची वैगई नदीच्या उत्तरेला व पश्चिमेला वाढ झाली. शहरातील जुनी व प्रमुख व्यापारपेठ मंदिराजवळ आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक यांच्याजवळ महामार्गावर नवी बाजार-  पेठ व हॉटेले, बॅंका यांच्यासारख्या सुविधा आहेत. किल्ल्याजवळही एक छोटी बाजारपेठ आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला औद्योगिक   वसाहती, रेल्वे कर्मचार्‍यांची वसाहत असून वैगई नदीच्या उत्तरेकडील भागात योजनाबद्ध निवासी क्षेत्रे आहेत.

मदुराईंमध्ये व उपनगरांत सूत-उत्पादन, कापड व वस्त्रोद्योग, वाहतूकसामग्री, तंबाखू, साखर यांसारख्या उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. रेशीम, तलम वस्त्रे तसेच हातमाग उद्योग हे देखील अतिशय महत्त्वाचे उद्योग येथे आहेत. पैकारा प्रकल्पामुळे मदुराईंच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. मदुराई-कामराज विद्यापीठाशी (स्था. १९६६) शहरातील सु. २५ महाविद्यालये संलग्न  आहेत. अमेरिकन कॉलेज (स्था. १८८१) हे सर्वांत जुने व प्रसिद्ध महाविद्यालय आहे. प्रथम विश्व तमिळ परिषद मदुराईत जानेवारी १९८१ मध्ये भरली होती.

मदुराईतील खड्याच्या अंगठ्या व नक्षीकाम केलेल्या बांगड्या   प्रसिद्ध आहेत. मद्रासमधून प्रकाशित होणार्‍या मोठ्या वृत्तपत्रांपैकी दोन इंग्रजी व चार तमिळ वर्तमानपत्रांच्या मदुराईंमध्ये आवृत्त्या  निघतात. येथे आकाशवाणी केंद्र आहे.

संदर्भ : Das, R. K. Temples of Tamilnad, Bombay, 1964.

गद्रे, वि. रा.