गेंट : बेल्जियममधील इतिहासप्रसिद्ध औद्योगिक शहर व दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या १,४६,२२७ (१९७२). पूर्व फ्लँडर्स प्रांताची ही राजधानी स्केल्ट व लीस नद्यांच्या संगमावर, ब्रुसेल्सपासून ५६ किमी. व उत्तर समुद्रावरील ऑस्टेंटपासून ६९ किमी. दूर असून कालव्यांनी त्या समुद्राशी जोडलेली आहे. सातव्या शतकातील सेंट बाव्होन व सेंट पीटर या मठांभोवती व फ्लॅडर्सच्या काउंट बाल्डविनने नवव्या शतकात बांधलेल्या किल्ल्याभोवती गेंट वाढत गेले. कापडधंद्यामुळे मध्ययुगापासून गेंटला औद्योगिक महत्त्व आले. बेल्जियमच्या पोलादव्यवसायाचे केंद्र आणि प्लॅस्टिक व रासायनिक व्यवसायांचे प्रमुख ठिकाण म्हणूनही गेंट महत्त्वाचे आहे. येथे मुख्यतः कोळसा, धातुके, इंधने व कापूस आयात होतात आणि फुले, रासायनिक पदार्थ, धातू इ. येथून निर्यात होतात. गेंटभोवती शेकडो फुलबागा असून दर पाच वर्षांनी येथे फुलांचे प्रदर्शन भरते. लेस तयार करणे, साखर शुद्ध करणे, कागद बनविणे, दारू गाळणे हेही येथील महत्त्वाचे अन्य व्यवसाय आहेत.

गेंटच्या श्रेणी म्हणजे व्यावसायिक संघ पूर्वीपासून फार प्रबळ होते. गेंटचे कामगार व व्यापारी यांच्यात आणि नागरिक व सत्ताधीश यांच्यात वारंवार तंटेबखेडे व बंडे होत असत. श्रेणींचे वर्चस्व नेहमी जाणवत असे. राज्यकर्त्यांशी कधी गेंटचा तह होऊन त्याला सवलती मिळत, तर अयशस्वी लढ्यानंतर या सवलती काढून घेतल्या जात. बेल्जियम स्वतंत्र होण्यापूर्वी स्पेन, ऑस्ट्रिया व फ्रान्स यांनी गेंटवर काही काळ स्वामित्व मिळविले होते. दोन्ही महायुद्धांत जर्मनांनी गेंट व्यापून तेथील ऐतिहासिक वास्तूंची नासधूस केली होती. आता गेंटला पुन्हा पूर्वरूप प्राप्त होत असून नवा औद्योगिक भाग वाढत आहे.

गेंटमधील जुन्या वास्तूंत सेंट बाव्होनचे कॅथीड्रल व जोगिणींचे मठ आणि त्यावरील शिल्प व चित्रे, प्राचीन किल्ला, भव्य घंटालय, गॉथिक शैलीचे नगरसदन, फ्लेमिश चर्चे, सेंट निकोलस व सेंट मायकेल ही चर्चे प्रेक्षणीय आहेत. येथील वस्तुसंग्रहालयेही लक्षणीय आहेत. फ्लेमिश चित्रकलेत गेंटला महत्त्वाचे स्थान आहे. व्हान आयिकची अप्रतिम चित्रे येथे आहेत. बेल्जियमचे प्रसिद्ध नाटककार व कवी मॉरिस माटरलिंक आणि कवी कारेल व्हान द व्हुस्टाइन गेंटमध्ये जन्मले.

देशपांडे, सु. र.