मक्दिसी, अल् : (सु. ९४३-सु. १०००). अरबी प्रवासी व भूगोलवेत्ता. जेरूसलेम येथे जन्म. पूर्ण नाव मुहम्मद इब्न अहमद अल्-मक्दिसी. याने सु. २० वर्षे जगभर प्रवास केला आणि बहुतेक सर्व इस्लामी राष्ट्रांना भेट दिली. फक्त तो भारत व स्पेन या दोन राष्ट्रांत गेला नाही. अहसन अत्-तक्सीम फी मारीफत् अल् अकालीम (द बेस्ट ऑफ क्लासिफिकेशन फॉर द नॉलेज ऑफ रीजन्स) या नावीचे मुस्लिम देशांवर लिहिलेले (सु. ९८५) त्याचे पुस्तक अतिशय प्रसिद्धी पावले. त्याने आपल्या वीस वर्षांच्या भ्रमंतीच्या कालखंडात ज्या ज्या देशांना भेटी दिल्या, (विशेषतः मुस्लिम राष्ट्रांना) त्या त्या राष्ट्रांमधील लोकसंख्या, रीतीभाती, चाली, आर्थिक जीवन इत्यादींची सविस्तर माहिती या पुस्तकात आढळते. इस्लाम धर्माविषयी दहाव्या शतकातील विस्तृत व समृद्ध माहिती असलेले हे पुस्तक सुविख्यात आहे.

गद्रे, वि. रा.