गॉथिक शैलीतील सेंट लेओनार्ड चर्च, स्टटगार्ट.

स्टटगार्ट : जर्मनीच्या बाडेन-वर्टेंबर्ग राज्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक व्यापारी शहर. लोकसंख्या ६,१३,३९२ (२०११). हे फ्रँकफुर्टच्या आग्नेयीस १५३ किमी.वर नेकार नदीकिनारी वसलेले आहे. हे दळणवळणाचे केंद्र व लोहमार्गाचे प्रस्थानक असून ते लोहमार्गव रस्त्यांनी इतर मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच बंदर सुविधाही आहेत. यास सु. १२५४ नंतर शहराचा दर्जा मिळाला. तेराव्या शतकात विकसित झालेले हे शहर १३२० मध्ये येथील उमरावांचे मुख्य निवासस्थान बनले. १४८० नंतर यास वर्टेंबर्ग परगण्याच्या राजधानीचा आणि परगण्याचा दर्जा मिळाला. तीस वर्षीय युद्ध (१६१८—४८) व चौदावा लूई याच्या हल्ल्यात या शहराची हानी झालेली होती. एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर शहराची भरभराट झाली आहे. दुसर्‍या महायुद्धात शहराचे नुकसान झाले होते. या महायुद्धानंतर येथे बाडेन-वर्टेंबर्ग राज्याची राजधानी करण्यात आली. स्टटगार्ट हे जर्मनीतील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. येथे विद्युत् अभियांत्रिकी, मोटारगाड्या, यंत्रसामग्री, कापड उद्योग, छायाचित्रके निर्मिती, दृष्टीसंबंधी उपकरणे, लाकडी व चामडी कलाकुसरीच्या वस्तू , संगीतातील उपकरणे, रसायने, कागद, लोह-पोलाद वस्तू , मद्यनिर्मिती इ. उद्योग चालतात.

स्टटगार्ट शहर ‘पुस्तक केंद्र’ म्हणून प्रसिद्ध असून येथे २०० पेक्षा जास्त प्रकाशन संस्था आहेत. येथे तंत्र महाविद्यालय, कला संगीत अकादेमी, स्टटगार्ट विद्यापीठ (१८२९) इ. शैक्षणिक संस्था आहेत. येथे दरवर्षी वसंत ऋतूत ‘कॉनस्टॉटर फोक फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येतो.

येथील ऐतिहासिक वास्तूंची दुसर्‍या महायुद्धात हानी झाली होती. त्यांतील बहुतांश इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. येथे जुना राजवाडा ( तेरावे शतक ), गॉथिक शैलीतील सेंट लेओनार्ड चर्च (१४६३—७४) आणि रोमनेस्क राजवाडा (१४३६—९५), स्टिफ्टस्किर्चे चर्च ( पंधरावे शतक ), नगरभवन (१९५४—५६), दूरचित्रवाणी मनोरा (१९५५ उंची १९३ मी.), स्टटगार्ट लीडरहॉल (१९५४—५६), वर्टेंबर्ग स्टेट ग्रंथालय, स्टेट इंडस्ट्रियल म्यूझीयम, द स्टेट आर्ट गॅलरी, डायम्लेर-बेंझ, मर्सिडीज-बेंझ, ऑटोमोबाइल म्यूझीयम, सॉलीट्यूड राजवाडा (१७६३—६७) व होहेनहेम राजवाडा (१७६८—८५) इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.