पनामा कालवा विभाग: पॅसिफिक महासागरावरील बॅल्बोआ बंदरापासून कॅरिबियन समुद्रावरील (अटलांटिक महासागर) क्रिस्तोबलपर्यंत ८२ किमी. लांब व १६ किमी. रुंद पसरलेला विभाग भरतीरेषेपलीकडे ४·८ किमी. पर्यंत सार्वभौम सत्ता धरून या विभागाखाली एकूण १,६७६ चौ. किमी. क्षेत्र येते. पैकी जलक्षेत्र ७१२ चौ. किमी. व भूक्षेत्र ९६४ चौ. किमी. विभागाचा अक्षवृत्तीय विस्तार ८° ५२’ उ.ते ९° २५’ उ.व रेखावृत्तीय विस्तार ७९° ४८’ प.ते ८०° १’ प. असा आहे. १९७६ मध्ये विभागाची नागरी व लष्करी लोकसंख्या मिळून ४१,८०० होती व तीत ३७,४०० अमेरिकेचे नागरिक होते. बॅल्बोआ हाइट्स (३,१३९) हे प्रमुख शहर होय.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि पनामा प्रजासत्ताक यांमध्ये १८ नोव्हेंबर १९०३ मध्ये एक करार होऊन अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांना जोडणारा कालवा पनामा संयोगभूमीतून काढण्यास पनामा प्रजासत्ताकाने अमेरिकेला परवानगी दिली. या करारान्वये कालव्याच्या उभय बाजूंस सु. ८–८ किमी. रुंदीचा सार्वभौम भूमिपट्टा अमेरिकेला कायम वापरासाठी पनामाने बहाल केला. या क्षेत्रास ‘पनामा कालवा विभाग’ असे संबोधिले जाते. परतफेड म्हणून अमेरिकेने पनामाच्या स्वातंत्र्य रक्षणाची हमी घेतली आणि त्यास एक कोटी डॉलर देऊन दरसाल भाडे देण्याचे मान्य केले. १९७३ मध्ये हे भाडे २३ लक्ष डॉलर होते.

पनामा प्रजासत्ताकातील या विभागावर अमेरिकेची सार्वभौम सत्ता असून तो पूर्णतः संरक्षित विभाग समजला जातो व त्यावर अमेरिकेचा अध्यक्ष संसदेच्या संमतीने एक लष्करी प्रशासक नेमतो. हा प्रशासक तेथील सर्वाधिकारी समजला जातो.

या विभागाची भूपृष्ठरचना ओबडधोबड व डोंगराळ आहे. पूर्व-पश्चिम जाणारी प्रमुख पर्वतरांग पॅसिफिक किनाऱ्यालगत असून, हा विभाग बहुतांशी ज्वालामुखीनिर्मित आहे. तथापि सध्या एकही जागृत ज्वालामुखी नाही. हवामान उष्णकटिबंधीय असून त्यावर दोन्ही महासागरांचा परिणाम झालेला दिसून येतो. तापमान २३° से. पासून ३१° से. पर्यंत असते. आर्द्रता मात्र नेहमीच ७५% पेक्षा अधिक असते. वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण कॅरिबियन समुद्राच्या बाजूस ३३० सेंमी., तर बॅल्बोआजवळ १८० सेंमी. च्या जवळपास असते. एप्रिल ते डिसेंबर हा काळ पावसाचा असून अधिक वृष्टी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. फेब्रुवारी-मार्च हा लहान कोरडा ऋतू आहे. कॅरिबियन समुद्राच्या बाजूस सदाहरित वृक्ष आढळतात, तर पॅसिफिक महासागराच्या बाजूस पानझडी वृक्षांचे आधिक्य आहे. अधूनमधून उंच गवतही आढळते. विभागातील सर्व भूमी संरक्षित असल्याने कोणताही भूभाग सरकारकडून भाडेपट्ट्याने घ्यावा लागतो. त्यामुळे खाजगी व्यवसायाला वावच नाही. शेतीही अत्यल्प प्रमाणावर केली जाते. जहाज वाहतुकीसंबंधीचे आणि कालव्याशी निगडित व्यवसाय यांनाच परवानगी दिली जाते यामुळे कारखानदारीही नाही.

   


पनामा प्रजासत्ताकाच्या इतिहासातच कालवा विभागाचा इतिहास आहे. हा विभाग निर्माण केल्यानंतर ४ मे १९०४ रोजी तो अमेरिकेच्या प्रत्यक्ष ताब्यात आला. त्यानंतर १९०४–०६ ही वर्षे कालवा समुद्रसपाटीच्या पातळीचा का उच्च पातळीवरचा करावयाचा या वादातच गेली. याच वेळी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी जॉन स्टीव्हेंझ या दूरदर्शी व अनुभवी प्रशासकाची मुख्य अभियंता म्हणून नेमणूक केली. त्यानंतर नियामक मंडळातील मताधिक्य सागरपातळीच्या बाजूस पडूनही स्टीव्हेंझच्या ‘उच्च पातळीचा कालवा’ या अभ्यासपूर्ण अहवालावर अध्यक्ष रूझवेल्ट आणि संरक्षणमंत्री टॅफ्ट यांनी त्याची बाजू उचलून जून १९०६ मध्ये स्टीव्हेंझच्या योजनेस मान्यता दिली. पनामा कालव्याच्या घडणीतील हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय ठरला. त्यानंतर स्टीवेंंझने कामगारांसाठी घरे, आरोग्यसेवा, स्वच्छतासुविधा, रेल्वेचे दुहेरीकरण, यंत्रसामग्रीची मागणी या गोष्टी वेगाने करून १९१४ मध्ये कालवा पूर्ण केला. कालव्याच्या बांधणीचे अधिकांश श्रेय स्टीव्हेंझला द्यावे लागेल. कोरड्या ऋतूतील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी १९३५ मध्ये माडेन धरण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर कालव्याची क्षमता वाढविण्यासाठी जलपाशांमध्ये सुधारणा करण्यात आली. १९४७-४८ मध्ये विभागाच्या कारभारावर बरेच लक्ष केंद्रित करण्यात येऊन १ जुलै १९५१ पासून पनामा कालवा कंपनी व कालवा विभाग सरकार असे विभक्तीकरण करण्यात आले व कालवा स्वयंनिर्वाही व्हावा म्हणून पथकराच्या पद्धतीतही सुधारणा करण्यात आली. पनामा कालवा सुरू झाल्यानंतर हळूहळू अमेरिकेने आपले क्षेत्र वाढविण्यास सुरुवात केली. त्यात पनामाशी संघर्ष होऊ लागला. शेवटी १९३६ मध्ये करार होऊन पनामाने अमेरिकेला संरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त केले व यापुढे कालवा विभागाव्यतिरिक्त कोणताही प्रदेश न घेण्याचे आश्वासन अमेरिकेने पनामाला दिले. पुढे १९६० व १९६४ मध्ये कालवा विभागातील अधिसत्तेबाबत पनामाच्या विद्यार्थांनी बऱ्याच हिंसक दंगली केल्या व त्यांतूनच सर्व विभागात दोन्ही राष्ट्रांची निशाणे लावण्याचे अमेरिकेने मान्य केले. वाहतूक खूप वाढल्यामुळे पुन्हा एकदा सागरपातळीवरील कालव्याच्या कल्पनेने उचल खाल्ली, तेव्हा अमेरिकेने कालव्यासंबंधी सर्व बाबींचा १९७० मध्ये आढावा घेतला. 

कालवा विभागाचा सर्व कारभार पनामा कालवा कंपनी व कालवा विभाग सरकार यांच्या हातात आहे. या दोहोंचा प्रमुख हा कंपनीचा अध्यक्ष व विभागाचा गव्हर्नर असतो व त्याची नेमणूक अमेरिकेचा अध्यक्ष करतो. कालवा कंपनी कालव्याची व रेल्वेची देखभाल ठेवते, पथकर गोळा करते आणि सरकारला कर व भांडवली व्याज देते. विभागीय सरकार कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, जकात, बंदरे, रस्ते, आरोग्यसेवा, न्याय इ. गोष्टी सांभाळते. अमेरिकेच्या काँग्रेसने मंजूर केलेले कायदे येथे लागू होतात. येथे अमेरिकी डॉलर हेच कायदेशीर चलन आहे. तथापि व्यवहारात पनामाचे चलनही चालते. अमेरिकेमधील दोन बँकांच्या शाखा ह्या विभागातील आर्थिक व्यवहार सांभाळतात. शासनाच्या दृष्टीने बॅल्बोआ व क्रिस्तोबल हे दोन जिल्हे केलेले आहेत.

या विभागातील पनामा कालव्यास जगात महत्त्व आहे. त्याच्याशी येथील सर्व जीवन निगडित आहे. कालव्याव्यतिरिक्त पॅसिफिकवरील अँग्‍कॉनपासून अटलांटिकवरील क्रिस्तोबलपर्यंतचा ७६ किमी. लांबीचा प्रमुख दुहेरी लोहमार्ग दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. विभागात २३२ किमी. लांबीचे राजमार्ग असून सु. २०,००० मोटारी त्यांचा वापर करतात. येथे अमेरिकन सेनादलाने चालविलेले एक दूरध्वनी व एक दूरचित्रवाणी केंद्र आहे. एका करारान्वये पनामा सिटीचा टोकूमेन हा विमानतळ कालवा विभागासाठी वापरता येतो. १९७६ मध्ये सु. २,९०,००० हौशी प्रवाशांनी या विभागास भेट दिली. एकूण लोकसंख्येपैकी ८६% लोक अमेरिकेचे नागरिक असल्याने लोकांच्या चालीरीती, रिवाज, धर्म इ. गोष्टी अमेरिकेच्या राज्यांप्रमाणेच आहेत. विभागातील एकूण २० शाळांत १०,७८७ विद्यार्थी शिकत होते (१९७६). इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे. पनामा कालवा कंपनी व विभागीय सरकार यांच्यात १९७६ मध्ये ३,५४० व ९,४३८ लोकांपैकी बव्हंशी पनामाचे लोक होते. बॅल्बोआ हाइट्‌स व गॅम्बोआ ही विभागातील प्रमुख शहरे होत.

आठल्ये, द. बा.