बाघ : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. लोकसंख्या ३,॰॰॰ (१९७१). धार जिल्ह्यात मांडूच्या नैऋत्येस सु. १३ किमी. वर बागनी नदीकाठी ते वसले आहे. नदीपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका तपकिरी वालुकाश्मात ही लेणी खोदलेली आहेत. गुहा क्र. २ मध्ये सापडलेल्या, माहिष्मतीच्या सुबंधू राजाच्या दानलेखावरून तसेच अजिंठा, कान्हेरी, उदयगिरी, जुनागढ येथील तत्कालीन शिल्पशैलीनुसार ह्या गुहांचा काळ इ.स.चौथे-पाचवे शतक ठरतो. त्यांचा शोध प्रथम १८१८साली लेफ्टनंट डेंजरफील्ड याने लावला. येथे एकूण नऊ गुहा असून त्या सर्व पश्चिमाभिमुख आहेत. त्यांची दक्षिणोत्तर लांबी सु. ६७५ मीटर आहे. त्यांपैकी काहींची बरीच पडझड झाली असली, तरी भित्तिचित्रे, शिल्पे व वास्तुशैली या दृष्टीने गुहा क्र. २, ४, ७ व ८प्रेक्षणीय आहेत. येथे बहुतेक सर्व विहार असून एकही चैत्यगृह नाही. या विहारांचा आलेख इतर बौद्ध विहारांसारखाच म्हणजे आयताकृती विधानामध्ये चौक व सभोवार उत्कीर्णित खोल्या असा आहे परंतु त्यांतील सर्वांत मोठया विहारात स्तंभांचा आलेख चौरसाकृती असून शिवाय मध्यभागीही स्तंभ उत्कीर्णित केले आहेत. खडक कच्चा असल्यामुळे ही स्तंभांची योजना करावी लागली असावी, असे तज्ञांचे मत आहे. या विहारांना जोडूनच एक शालागृहासारखी खोलीही आढळते. हे शालागृह ३॰ मी. लांब व १४ मी. रुंद असून ते मुख्य विहारांना सु. ७॰ मीटर लांबीच्या व्हरांड्याने जोडले आहे.

गणेशपट्टीवरील शिल्पकाम ,मध्यवर्ती द्वार .चौथी गुहा,बाघ.

गुहा क्र.१ ही गृहगुंफा या नावाने प्रसिद्ध असून तीत शिल्प व भित्तिचित्रे नाहीत. गुहा क्र. २ ला पांडव गुहा म्हणतात. या गुहेतील सभामंडपाचे स्तंभ कोरीव कामाने सजविलेले असून मंडपाच्या मागील बाजूस स्तूपमंदिर आहे. त्याच्या द्वारावरील दोन्ही बाजूंस बोधिसत्वांच्या मूर्ती आहेत. अंतरालयातील भिंतीवर चित्रकाम आढळते. गुहा. क्र. ३ मध्ये हत्ती व सिंह यांची भित्तिचित्रे असल्याने ती ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखली जाते. तिच्यातील मूर्तिकला व चित्रकला एकेकाळी महत्त्वाची असावी. आता तिची बरीच पडझड झाली आहे. गुहा. क्र. ४ ही ‘रंगमहाल’ या नावाने प्रसिद्ध असून तिची रचना गुहा क्र. २ प्रमाणेच आहे पण तीत अंतरालय नाही. हिच्या एका द्वारावर मकरवाहिनींच्या मूर्ती असून भित्तिचित्रणात जातककथांचे दर्शन घडते. गुहा क्र. ५ व ६ यांना विशिष्ट नावे नाहीत मात्र त्यांत विपुल भित्तिचित्रे आहेत. त्यांत पानाफुलांच्या नक्षीही आढळतात. गुहा क्र. ७, ८ व ९ यांची फारच पडझड झाली असून मूर्तींचे भग्न अवशेष दृष्टीस पडतात. एकूण येथील मूर्तिकलेत कमलासनावरील बुद्धाच्या व बोधिसत्वांच्या भव्य मूर्ती आहेत.

येथील विहार भित्तिचित्रांबद्दल प्रख्यात आहेत. भारतीय चित्रकलेच्या, विशेषत: बौद्ध धर्माच्या, इतिहासात बाघगुहांना अजिंठ्याप्रमाणेच महत्व प्राप्त झाले आहे. येथील चित्रकाराने ऐतिहासिक आलेखनाला प्राधान्य देऊन धार्मिक विवादातील गांभीर्य, करुणा व उन्मादक नृत्य इ. विषयांचे चित्रण केले. निसर्ग आणि मानव यांचे कलाकाम मोहक असून त्यांचे तंत्र अजिंठ्याप्रमाणे आहे. चित्रविषय भौतिक जीवनातील व जातककथांतून निवडलेले आहेत. मिरवणुकी, नृत्यप्रसंग, मिथुने व पूजाप्रसंग या सर्वांतील स्त्रीपुरुषांच्या आकृती रेखीव व लालित्यपूर्ण आहेत. येथील पद्मपाणी बोधिसत्त्वाची मूर्ती अजिंठ्याच्या मूर्तीइतकी सफाईदार नाही. हे खरे असले, तरी तज्ञांच्या मते ती अजिंठ्याच्या आधीची आहे. म्हणूनच ती अजिंठ्याच्या बोधिसत्त्वाइतकी रेखीव, कोमल व दर्शत नाही. ही त्रिभंगात उभी आहे. जागेची योजना नीट न झाल्यामुळे हिच्या उजव्या हाताचे कोपर व कटिभाग खोदण्यास जागा उपलब्ध झाली नाहीसे दिसते. हिचे नाक सरळ नाही व भुवया कोरीव नाहीत. याशिवाय विहारात बुद्धमूर्तीऐवजी स्तूप असल्याने काहींच्या मते हे विहार हीनयान बौद्धांचे असावेत तथापि या ठिकाणी हीनयान व महायान या दोन्ही पंथीयांचे वास्तव्य असावे, असे तेथील वास्तुशिल्पशैलीवरून दिसून यते.

 

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Ed, Marg, Vol. XXV, June, 1972, Bombay

2. Marshall, John and others, The Bagh Caves London, 1927.

देव, शां. भा.