माराकेश : मोरोक्वोतील एक प्रमुख ऐतिहासिक शहर व याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,३९,७२८ (१९८२). हे राबातच्या दक्षिणेस सु. ३२५ किमी. वर असून सस. पासून ४५७ मी. उंचीवर आहे. अटलास पर्वताच्या पायथ्याशी तेन्सिफत नदीच्या दक्षिणेस वसलेले हे शहर भोवतीच्या स्टेप प्रकारच्या प्रदेशात एखाद्या मरूद्वीपासारखे शोभते. 

यूसुफ इब्‍न ताश्‍फीन या बर्बर राज्यकर्त्याने (१०६१–११०६) १०६२ मध्ये आपली राजधानी म्हणून हे वसविले. काही राज्यकर्त्यांनी कधी फेझ, तर कधी मेकनेस या राजधान्या केल्या. राबात ही मोरोक्कोची विद्यमान राजधानी असली, तरी माराकेश हे राज्यकर्त्यांचे आवडते वसतिस्थान आहे. १९१२ ते १९५६ पर्यंत फ्रेंच संरक्षित प्रदेशात ते मोडत होते.

माराकेशचा 'पाशा'चा प्रासाद

येथे प्रामुख्याने मुस्लिमांची वस्ती असली, तरी त्यांत पर्वतीय व सहारातील लोकांचे मिश्रण आहे निग्रॉइडांचाही प्रभाव दिसून येतो. वायव्य भागात यूरोपीयांची वस्ती आहे. शहराच्या तटबंदीला अनेक सुंदर वेशी आहेत. अरुंद, वेडेवाकडे रस्ते, दाटीवाटीने बांधलेली घरे यांमुळे शहराचे जुने स्वरूप लक्षात येते. शहराच्या मध्यावरील एका प्रशस्त चौकात सकाळी पाव, टोपल्या, मिठाई आणि इतर उत्पादनांचा बाजार भरतो संध्याकाळी तेथे गोष्टीवेल्हाळ लोक, नर्तक, डोंबारी, गारूडी यांच्याभोवती बघ्यांची गर्दी होते. जवळच पितळी सामान, गालिचे, आभूषणे, कातडी सामान, मातीची भांडी यांचे छोटे कारखाने आहेत. घरे व शहराची तटबंदी तेथील विशिष्ट तांबूस मातीची असल्यामुळे शहराला ‘रेड सिटी ’ असे नाव पडले आहे. नव्या शहराचा विस्तार पश्चिमेस तटबंदीबाहेर झाला आहे. तेथे रूंद रस्ते, चौक, आधुनिक बाजारपेठ इ. सुविधा आढळतात.  शहराभोवती खजूर, द्राक्षे, ऑलिव्ह, जरदाळू, मोसंबी इत्यादींच्या बागा व मळे आहेत. माराकेश प्रांतातील गहू, सातू, लिंबूवर्गीय फळे, खजूर, जरदाळू, घेवडे, ऑलिव्ह या शेतमालाची आणि शेळ्यामेंढ्या, गुरे, तसेच कातडी, लोकर यांसारख्या उत्पादित मालाची हे शहर मोठी बाजारपेठ आहे. माराकेशच्या आसमंतात ग्रॅफाइट व तांबे यांच्या खनिजांच्या खाणी आहेत. यांशिवाय तेथे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग प्रक्रिया, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे इ. व्यवसाय चालतात. हे शहर साफी, कॅसाब्‍लांका, राबात, तँजिअर इ. बंदरांशी व मेकनेस, फेझ, मरकारा इ. शहरांशी रेल्वेने व रस्त्यांनी जोडलेले आहे. उत्तरेकडील मैदानावर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

माराकेश एक आकर्षक पर्यटन केंद्र आहे. बाराव्या शतकातील कुतुबिया मशीद व तिचा ६७ मी. उंचीचा मनोरा, कसबा हा किल्लेवजा भाग, राजवाडे व प्रासाद, ‘मेनारा’ ऑलिव्ह उपवन, चारशेपाच हेक्टरांची विविध फळांची अग्वेदल बाग, कारंजी, जुन्या-नव्या वस्तूंची बाजारपेठ, हिवाळी क्रीडांची सोय ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

कुमठेकर, ज. ब. गाडे, ना. स.