मथुरा : भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि उत्तर प्रदेश   राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण, लोकसंख्या १,४८,९८४ (१९८१).  ते गंगा-यमुना नद्यांच्या दुवेदीत आग्र्याच्या वायव्येस सु. ५८ किमी.- वर यमुनाकाठी वसले आहे. दिल्ली-मुंबई मध्यरेल्वेवरील ते प्रमुख प्रस्थानक असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दिल्लीच्या दक्षिणेस सु. १४५ किमी. वरील एक मध्यवर्ती केंद्र आहे.

गोविंदजी (श्रीकृष्ण) मंदिरप्राचीन सप्त पुरांपैकी हे एक असून धर्म, दर्शन, कला, भाषा, साहित्य इत्यादी विविध क्षेत्रांत झालेल्या तेथील विकासामुळे मथुरेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला व्रजमंडल म्हणत. इ.स. पू. काळात हा प्रदेश शूरसेन जनपद या नावाने परिचित होता. मथुरा ही या जनपदाची राजधानी होती. या नगरीविषयी मधुरा, मधुपूर, मधुपुरी, मधुपिका, मधुपट्टना अशी भिन्न नामांतरे प्राचीन साहित्यात आढळतात. मधुरा वा मधुपुरी ही नावे मधू नावाच्या दैत्यावरून रूढ झाली असावीत. मथुरेच्या सभोवतालच्या जंगलास पूर्वी मधुबन म्हणत असत. विद्यमान मथुरेच्या नैर्ऋत्येस पाच किमी. वरील माहोली म्हणजेच मधुबन असावे, हे मत आता सर्वमान्य झाले आहे. हरिवंशात तसेच गरूड पुराणात मथुरेविषयी एक वैभवशाली नगरी म्हणून माहिती मिळते. त्यात मथुरेला यमुनातटिस्थित म्हटले आहे. दाशरथी रामाचा भाऊ शत्रुघ्न याने मधुपुत्र लवणाचा पराभव करून मथुरा ही नगरी वसविली. त्यानंतर या   स्थळाची अनेक स्थित्यंतरे वा परिवर्तने झाली असण्याची शक्यता आहे. मगधकडे जाणारे व्यापारी मार्ग व राजमार्ग प्राचीन काळी    मथुरेस एकत्र येत, त्यामुळे इंद्रप्रस्थ, श्रावस्ती, कौशाम्बी, वैशाली इ. नगरांशी मथुरेचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध होता.

 मथुरेविषयी प्राचीन वाङमयातून बरीच माहिती मिळते. ग्रीक प्रवासी मोगॅस्थिनीझ, चिनी प्रवासी फाहियान, यूआनच्वांग तसेच  टॉलेमी, अल्-वीरूनी इत्यादींच्या प्रवासवर्णनांत मथुरेविषयी उल्लेख आढळतात तथापि मथुरेचा प्राचीन इतिहास पौराणिक दंतकथा व आख्यायिकांनी भरला आहे. प्राचीन काळी मथुरेवर सोम व सूर्य या  दोन्ही वंशांनी राज्य केले. त्यांतील यादव वंशाची सत्ता दीर्घकाळ होती. या वंशातील श्रीकृष्णाची कारकीर्द प्रसिद्ध असून कृष्णाने कंस-   वध करून मथुरेला प्रजापीडक राजाच्या अत्याचारापासून मुक्त केले तथापि पुढे श्रीकृष्णाला आपल्या सर्व अप्तांसह मथुरा सोडावी लागली. त्याने द्वारका ही नवीन नगरी वसवली आणि तेथे तो बलरामासह राहू लागला. त्यानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला. मौर्यानंतर शुंग वंशाचे आधिपत्य (इ.स.पू. १८५-७३) या भागावर होते. शुंग-काळात मथुरेवर परकीय आक्रमणे झाली. त्यानंतर शक-कुशाणांच्या अंमलाखाली मथुरा गेली (इ. स. पू. ७३-इ. स. २२०). त्यावेळे पासून मथुरेचा विश्वसनीय वृत्तांत कुशाणांचे अभिलेख व मुद्रा यांमुळे  ज्ञात झाला आहे. त्यांत रंजुवुल, शोंडास इ. क्षत्रपांची नावे मुद्रांवर आढळतात. याशिवाय त्यावेळेचा एक सिंहशीर्ष स्तंभ उपलब्ध झाला असून त्यावरील लेखात स्तूप व संघाराम या वास्तू रंजुवुलाच्या कार-कीर्दीत बांधल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. शोंडासाच्या कोरीव लेखात  त्याच्या कोशाध्यक्षाने पुष्करणी, कूप व आराम निर्माण केल्याचे लिहिले आहे. त्यानंतर मथुरा नागवंशी राजांच्या सत्तेखाली आली. मथुरेतील कित्येक नागराजे आपल्या नावापुढे ‘दत्त’ हा शब्द लावीत. नागांच्या काळात शैव संप्रदायाचा प्रसार होऊन श्वेतांबर जैनांनीही स्कंदिल  नावाच्या आचार्याच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरविली होती. पुढे गुप्तवंशाची सत्ता (३२१-५५५) मथुरेवर होती. गुप्तकाळात फाहियान  या चिनी प्रवाशाने या स्थळास भेट दिली आणि इथे बौद्ध धर्माचा  प्रभाव असल्याचे नमूद केले आहे. बहुतेक परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत मथुरेला देवतानगर म्हटले असून वासुदेव कृष्णाची पूजा तेथे प्रचलित असल्याचा उल्लेख मिळतो. इ.स. पाचव्या शतकात मथुरेवर हूणांनी आक्रमण केले आणि बौद्ध स्तूप, जिनालये, हिंदू मंदिरे यांची नासधूस केली. पुढे हर्षवर्धन (कार. ६०६-६४७) व गुर्जर प्रतीहार (इ. स. ८-११ वे शतक) आणि गाहडवाल या दोन वंशांच्या कारकीर्दीत इथे सांस्कृतिक क्षेत्रांत फारशी प्रगती झाली नाही परंतु बौद्ध, जैन व हिंदू धर्मांतील पूजा-अर्चा यथास्थित चालू होती. महंमूद  गझनीने १०१७ मध्ये केलेल्या भारतावरील स्वारीत येथील मंदिरांचा उच्छेद केला. त्यानंतर मुहम्मद घोरी याने ११९३ मध्ये कनौजवर स्वारी केली आणि जयचंद याचा पराभव केला. तेव्हा मथुरा प्रथम मुसल- मानी अंमलाखाली गेली पुढे पेशवे काळात मराठ्यांची काही काळ   सत्ता वगळता (१८०२ पर्यंत), मथुरा मोगली सत्तेखाली होती.   ब्रिटीश व दुसरा बाजीराव यांत झालेल्या १८१८ मधील सालबाईच्या तहाने मराठ्यांचा मुलूख ब्रिटिश सत्तेखाली आला. परिणामतः मथुरा ब्रिटीश अंमलाखाली आली.

 मथुरेवर मौर्य ते ब्रिटिश या प्रदीर्घ काळात विविध राजवंशांनी राज्य केले. त्यांतील शुंग-कुशाण आणि गुप्त या काळात मथुरेत ललितकलांचा विकास झाला. कुशाण काळात इतर कलांबरोबर मूर्तिकला अधिक विकसित झाली आणि इ. स. सातव्या शतकापर्यंत वैदिक, बौद्ध व   जैन हे तिन्ही धर्म लोकप्रिय होते. त्यांचे कलावशेष उत्खननांत विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.

ब्रिटिश काळात मथुरेचे पुरातत्त्वीय दृष्ट्या प्रथम सर्वेक्षण अलेक्झांडर कनिंगहॅम याने केले. त्यानंतर याठिकाणी विविध विद्यापीठांनी तसेच भारत सरकारच्या पुरातत्त्वीय खात्याने अनेक उत्खनने केली. या उत्खननांत सापडलेले बहुतेक अवशेष मथुरेच्या पुरातत्त्वीय वस्तु-संग्रहालयात तसेच कर्झन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले असून काही दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात व लखनौच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेले आहेत.


येथील अवशिष्ट वास्तूंत फारच थोड्या प्राचीन वास्तू सुस्थितीत आहेत तथापि उपलब्ध अवशेषांत कुशाणकालीन वास्तुशिल्पांचे नमुने जास्त असून येथे सहा स्तूप होते. त्यांपैकी कंकाली टीला येथे दोन जैनबस्त्या (मंदिरे) व जमालपूर (हुविष्क विहार), भुतेश्वर, कत्रा केशवदेव (यशविहार) आणि यमुनेच्या काठी गुहा विहार असे चार   बौद्ध स्तूप होते. बौद्ध स्तूपांच्या बांधणीत वीट व दगड या दोन्ही माध्यमांचा उपयोग केलेला असून स्तूपाखाली चौथरा असे. स्तूपाचे विधान अंडाकृती लंबगोल आहे. शिखरावर छत्र आणि प्रदक्षिणेसाठी वेदिका असे. स्तूपाचा बाह्य भाग, तोरणे, वेदिकांचे कठडे आणि  प्रवेशद्वारे कोरीव नक्षीकाम व मूर्तीनी अलंकृत केलेली असत.  प्रवेशासाठी असलेल्या चारही बाजूंना अलंकृत तोरणद्वारे असत. या अलंकरणामध्ये लहान स्तूप, बोधिवृक्ष, बुद्धाच्या प्रतिमा, बोधिसत्त्वां- दिकांच्या मूर्ती, बुद्ध जीवनाशी निगडित कथांचे व जातकातील कथांचे शिल्पांकन आढळते.

 बहुतेक सर्व मूर्तिकाम बौद्ध स्तूपांच्या सुशोभनासाठी केलेले असल्यामुळे बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या मूर्तिबरोबरच यक्ष, यक्षी यांच्या सुबक  मूर्ती घडविण्याकडे कलाकाराने लक्ष दिले आहे. बुद्ध मूर्तीत हातापायांच्या तळव्यांवर चक्रे असून कपाळावर भुवयांच्या मधोमध उष्णीष (टेंगूळ) दाखविले आहे आणि कानाच्या पाळ्या मानवी पाळ्यांपेक्षा  खूपच लांब खोदल्या आहेत. छाती रूंद असून  वस्त्रांच्या चुण्या समांतर रेषांनी दाखविल्या आहेत. आसनाला तीन सिंह मूर्तीचा आधार दिला आहे. मागील बाजूस बोधिवृक्ष, चौरीधारी सेविका, यक्ष, यक्षी आणि बुद्धाची प्रभावळ आहे. बुद्धाच्या भूमिस्पर्श, अभय, व्याख्यान, धर्मचक्र-परिवर्तन इ. मुद्रा असून या मूर्तींना जास्तीतजास्त देवरूप देण्याचा प्रयत्न मथुरा शिल्पशैलीच्या कलाकारांनी केला आहे. त्यामुळे गांधार शिल्पांत आढळणारी परकीय छटा, सुडौल व ह्रद्य घडण या व्यक्तिचित्रणांत दिसत नाही तथापि यक्ष-यक्षींच्या पूजा प्राचीन    भारतात प्रचलित असल्याचे काही नमुने इथे आढळतात. मथुरे   जवळच्या परखाम खेड्यात सापडलेली भव्य दगडी मूर्ती ही इ. स. पू. चौथ्या शतकातील आहे, असे बहुतेक विद्वान मानतात. मथुरेच्या परिसरात सापडलेल्या एका अभिलेखावरून यक्ष राजा मणिभद्र याची  पूजा त्या काळी सर्वत्र रूढ असल्याचे दाखले मिळतात.

 बौद्ध वास्तुशिल्पकामाच्या खालोखाल जैन धर्माशी निगडित मूर्ति-काम आढळते. येथील जैन मूर्तीत विशेषत्वाने तीर्थकरांच्या मूर्ती आहेत आणि त्याही मुख्यतः कंकाली टीला या भागात आढळतात.    जैन मूर्तिकामात आयागपट्टांचा (कोरीव शिळा) जास्त भरणा आहे.  लोणशोभिका हिचा आयागपट्ट त्या दृष्टीने वैशिष्टयपूर्ण असून तो  वेदिका, हर्मिका, छत्रे, तोरणे इत्यादींनी युक्त आहे. यातील अलंकरण विलक्षण सुंदर असून स्तंभ व स्तूप यांमधील भिन्न भंगांतील व विविध ढंगांतील स्त्रीमूर्ती तसेच गंधर्व-किन्नर, अंबिका, चक्रेश्वरी इ. जैन देव-देवता, यक्ष, यक्षी, कुबेर व त्याची स्त्री हारीती यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसते. नागमूर्तीत पुरूषाकार व सर्पाकार हे दोन्ही प्रकार असून नागकन्यांचीही शिल्पे आहेत. आयागपट्टांत या मूर्तिकामाव्यतिरिक्त भौमितिक रूपके आणि जैनधर्माशी संबद्ध असलेली त्रिरत्न चिन्हे तसेच पाने, फुले, पूर्णकलश, गजध्वज, कमलपुष्पे यांचेही रेखाटन आढळते. येथील पार्श्वनाथाची कुशाणकालीन मूर्ती मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. वरील दोन धर्मांच्या तुलनेने हिंदू धर्माशी निगडित मूर्तिकाम थोडे आहे. त्यांतील बहूतेक हिंदू देवदेवता कंकाली टीला येथील अवशेषांत उपलब्ध झाल्या. मथुरेला अनेक हिंदू मंदिरे गुप्तकाळात बांधण्यात   आली परंतु फारच थोड्या मंदिरांचे अवशेष सांप्रत अवशिष्ट आहेत.  मंदिरे शिखरयुक्त असत व मंडोवरावर विपुल शिल्पांकन असे. त्यात देवदेवता, यक्ष, यक्षी, किन्नर, सुरसुंदरी, वृक्षिका इत्यादींच्या प्रतिमा असत. दुसरा चंद्रगुप्त (कार. ३७६-४१४) याच्या काळात मथुरेच्या एका शिलालेखात एक शैव आचार्याने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केल्याचा  उल्लेख आहे. कत्रा केशवदेव या ठिकाणचे विष्णू मंदिर प्रसिद्ध असून एकूण हिंदू मूर्तिसंभारात ब्रह्मा, विष्णू, शिव, कृष्ण, बलराम, गणेश, कार्त्तिकेय इ. देव व पार्वती, महिषासुरमर्दिनी, सरस्वती, सिंहवाहिनी,  गंगा, यमुना आणि सप्तमातृका इ. देवता यांच्याबरोबरच इंद्र, सूर्य,   अग्नी इत्यादिकांच्या मूर्ती आहेत.

मथुरा शिल्पसंभारातील पूजामूर्ती वगळता येथील अवशेषांत व उत्खननांत काही कुशाणकालीन व्यक्तींचे पुतळे सापडले. या पुतळ्यांत वीम कडफिसस, कनिष्क आणि चाष्टन या राजांचे पुतळे रूबाबदार   असून कनिष्काचा पुतळा शीर्षरहित आहे. या तिन्ही राजांनी परिधान केलेल्या वस्त्रात परकीय-सिथियन-छटा असून अंगात ओव्हर कोट   आणि पायात घोळदार सुरवार आहे. कनिष्काने बूट घातला असून    हातात तलवार घेतली आहे. वीम कडफिसस सिंहासनाधिष्ठित असून कनिष्क समभंग स्थितीत उभा आहे. त्या मूर्तीवरील लेखामुळे ती कनिष्काची आहे, यात संदेह नाही. अशा प्रकारचे पुतळे या पूर्वी घडविल्याचे आढळत नाही आणि यानंतरही ही परंपरा टिकली नाही. वरील धर्माशी निगडीत वास्तू व मूर्ती तसेच पुतळे यांखेरीज ज्यांना पूर्णतः धर्मांतीत कला-ज्ञापके किंवा प्रतिमाने म्हणता येतील, अशा    काही मूर्ती वास्तू शोभनासाठी व अलंकरणासाठी घडविलेल्या आढळ-  तात. त्या तिन्ही धर्मांशी संबद्ध असलेल्या एकूण अवशेषांत मिळाल्या. त्यांत यक्षिणी, वृक्षी, शालभंजिका, पुष्पभंजिका, वृक्ष देवता, पुत्र- वल्लभा, मधुपान करणारी युगले, शुकधारी, कमलपुष्पा, अशोकपुष्पा- प्रचायिका इत्यादींचा समावेश होतो. यांतील बहुतेक मूर्ती उठावदार शिल्पांत खोदलेल्या असून त्या विलक्षण वेधक आहेत. त्यांचे त्रिभंग अवस्थेतील हावभाव विशेषतः डावा किंवा उजवा हात वर करून  झाडाची फांदी पकडणारी शालभंजिका, मकर किंवा गज यावर उभी  राहून वृक्षाशी झोंबणारी वृक्षदेवता, शुकाशी हितगुज करणारी सुर-   सुंदरी किंवा मद्यपानात धुंद झालेली-स्वतःचा तोल न सांभाळणारी- मद्यपी स्त्री इ. मनोवेधक आहेत. या सर्वच अप्सरा किंवा सुरसुंदरीच्या मूर्ती ‘समृद्धी’ किंवा ‘सुफलता’ या नावाने परिचित असलेल्या मूर्ति-संभारात मोडतात.

मथुरेच्या कलासंप्रदायातील अनेक मृण्मय मूर्तीही उत्खननांत सापडल्या आहेत. त्यांतील बहुसंख्य देवदेवतांच्या आहेत तथापि लोकजीवनाशी संबद्ध व लौकिक समजुतींची परंपरा पुढे चालू ठेव-    णार्‍या अशा काही आहेत. त्या लोककला या सदरातच मोडतात. त्यांच्यामुळे तत्कालीन नागरी व ग्रामीण जीवनावर प्रकाश पडतो. यांतील काही मूर्ती लक्षवेधक असून त्यांत पंखा घेतलेली स्त्री, रथयात्रेला निघालेला राजकुमार, आकाशात भ्रमण करणार्‍या किन्नर-किन्नरी, मुलाला मांडीवर घेऊन बसलेली माता अशा काही उल्लेखनीय आहेत.


भारतीय कला इतिहासात मथुरा कलासंप्रदायाला शिल्पशैली आणि रूपके या दोन्ही दृष्टींनी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मथुरा ही शैव, वैष्णव तसेच बौद्ध, जैन इ. विविध धर्मसंप्रदायांची   भूमी होती आणि हे सर्व संप्रदाय एकाच वेळी समधर्मसमभावाने तिथे नांदत होते. मथुरा शिल्पसंप्रदायाच्या परमोत्कर्षाचा काळ म्हणजे गुप्तकालखंडाच्या आरंभीची काही शतके किंवा स्थूलमानाने कुशाण कालखंड म्हणता येईल. खुद्द मथुरा आणि सारनाथ-श्रावस्ती यांच्या परिसरात या काळात विपुल शिल्पांकन झाले आणि समकालीन कला-प्रवाहांचे त्यात अनुकरण घडले तथापि हे अनुकरण फक्त तंत्र व शैली यांबाबतीत आढळत नाही. मथुरेच्या शिल्पकारांनी काही परकीय प्रतिमाने जवळजवळ जशीच्या तशी उचलली. त्यांत नेमिअन सिंहाशी झुंज करणारा ‘हेरॅक्लिज’ आणि मधुपान करणारी दृश्ये किंवा मद्यपी स्त्री-पुरूषांचे समूह ही ग्रीको-रोमन संकल्पना प्रमुख होती. त्याचप्रमाणे कनिष्क, वीम कडफिसस यांची वस्त्रप्रावरणे यांत इराणी किंवा सिथि- यन प्रभाव स्पष्ट जाणवतो तथापि ही रूपके अल्पकाळातच कालबाह्य ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे गांधार शिल्पशैली आणि मथुरा शिल्पशैली  या एकाच काळात (इ. स. यू. १००-इ. स. ५००) विकसित झाल्या परंतु गांधार शैलीचा फारच थोडा प्रभाव मथुरा शैलीवर पडलेला दिसतो. भारहूत, बोधगया, सांची येथील अनेक प्रतिमाने मथुरा शैलीने होती तशीच उचलली.

 आणखी एक विशेष म्हणजे या मूर्तिकामासाठी वापरलेल्या दगड, सिक्रीच्या खाणीत उपलब्ध होणारा तांबड्या रंगाचा सिकता वालुकाश्म मूर्ती घडविण्यासाठी वापरलेला आहे. या पाषाणात बदामी रंगाचे   ठिपके व पांढर्‍या रेषा असे अंगभूत दोष आढळतात. म्हणून येथे घडविण्यात आलेल्या मूर्तीवर लेपन करून त्या रंगवीत असत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे तथापि खरोखरीच हा दगड एवढा वाईट आहे का? याविषयी मतभेद आहेत कारण मथुरा शिल्पशैली-तील काही मूर्ती अद्यापि सुस्थितीत आहेत आणि भारतीय मूर्तिसंभारा-तील कलात्मक उत्कृष्ट नमुने म्हणून त्यांचा आजही निर्देश होतो.

आधुनिक मथुरा हे अद्ययावत सुखसोयींच्या सुविधा लाभलेले एक मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशातील धान्य व्यापाराची मोठी बाजारपेठ   तेथे असून सभोवतालच्या परिसरात पिकणारा गहू, ज्वारी, कापूस,   ऊस, गळिताची धान्ये इ. माल विक्रीसाठी येतो. याशिवाय रसायने व कॅलिको छपाईचे मोठे कारखाने तेथे आहेत. माहोली या उपनगरीत वनस्पती तुपाच्या प्रक्रियेचा मोठा व्यवसाय चालतो. भारत सरकारने   येथे रशियाच्या मदतीने तेल-शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पावर १९८३ पर्यंत सु. २५० कोटी रूपये खर्च झाले    होते. भारतीय तेल महामंडळाच्या तेल व्यवसाय साखळीतील मथुरा हा पाचवा तेल-शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्याची उत्पादन क्षमता दरसाल ८ लाख ९ हजार टन नाप्था ३ लाख ५० हजार टन पेट्रोल २० लाख ४३ हजार टन डिझेल ६ लाख ५० हजार टन केरोसीन व १    लाख ८० हजार टन वायू एवढी प्रचंड आहे.

 मथुरा शहराची वाढ यमुनेच्या नदीकाठाने झाली. शहरात मोगल काळात व नंतर बांधलेल्या अनेक वास्तू आहेत. त्यांत तत्कालीन   मोगल राज्यपाल अब्द-अल्-नबीखान याने तांबड्या वालुकाश्मात  बांधलेली जुम्मा मशीद (१६६१) ही सर्वांत जुनी मशीद आहे. याशिवाय औरंगजेबाने अनेक हिंदू व बौद्ध प्राचीन वास्तूंचे मशिदीत रूपांतर केलेले नमुने पाहावयास मिळतात. तसेच हेरातचे मुस्लिम संत मुखद्दमशाह विलायतखॉं यांच्या स्मरणार्थ बांधलेली एक मशीद   आहे. यमुनेच्या उजव्या तीरावर राजा भगवान दास याने बांधलेला    चार मजली सती बुरूज (१५७०) आणि राजा मानसिंग (अंबर)   याने बांधलेला कंस का किला या वास्तू प्रसिद्ध आहेत. मथुरेतील    अनेक मंदिरांत भैरवनाथ, राम (१६००), राधेश्याम, द्वारकाधीश, गोवर्धननाथ (१८३०), रंगेश्वरनाथ, राजीवाला, बिर्ला इ. मंदिरे प्रसिद्ध असून यांतील बहुतेक तांबड्या वालुकाश्मातच बांधलेली आहेत आणि बहुसंख्य मंदिरे कृष्णाची आहेत. शिखांची तीन गुरूद्वारे  आणि काही जैन मंदिरेही आहेत. त्यांपैकी जम्बुस्वामी जैनमंदिर प्रसिद्ध आहे. याच्या जवळच अखिल भारतीय दिगंबर जैन संघाची इमारत आहे.

कत्रा केशवदेव या भागात बौद्ध अवशेष आढळले. हा शहराचा मध्यभाग असून यमुनेच्या काठी भिन्न काळात सुमारे १५० घाट बांध-ण्यात आले. सदर बाजाराजवळ यमुना बाग असून तिथे तांबड्या वालुकाश्मात परिखजी व मणिराम या दोन सावकारांच्या छत्र्या आहेत. त्यांवरील जाळीकाम व नक्षीकाम लक्षणीय आहे. अशाच प्रकारचे जाळीकाम पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराच्या छत्रीवर आहे. सांप्रत हे वस्तुसंग्रहालय डॅम्पिअर पार्कमध्ये नेण्यात आले आहे. मथुरा शैलीतील मूर्ती, अभिलेख आणि मुद्रा यांकरिता हे संग्रहालय प्रसिद्ध   आहे. डॅम्पिअर पार्कव्यतिरिक्त शहरात जवाहर बाग, गांधी पार्क, लेडीज पार्क, भगतसिंग पार्क इत्यादी उद्याने आहेत.

शहरात शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. धार्मिक क्षेत्र म्हणून मथुरेला प्राचीन काळी फार महत्त्व असल्याने तेथे वैष्णव पंथाचा प्रसार चैतन्य, वल्लभाचार्य, निंबार्क आणि माधवाचार्य यांनी केला तर हरिदास, हरिवंश, हरिराम व्यास इत्यादींनी ब्रजभाषेमध्ये काव्य रचना केली.

संदर्भ : 1. Agrawala, V.S. Masterpleces of Mathura Sculpture. Varanasi, 1965.

            2. Bachhofer, L. Early Indian Sculpture. 2 Vols., New York, 1929.

            3. y3wuohi, Esha Basanti, Ed. Uttar Pradesh District Gazetteers : Mathura, Lucknow, 1968.

            4. Puri. B. N.India Under the Kashanas. Bombay. 1965.

            5. Rosenfield, J.M.The Dynastic Arts of the Kushanas, Cambridge, 1967.

देशपांडे, सु. र.


डाव्या हातात फलपात्र व उजव्या हातात जलपात्र घेतलेली सेविका, कुशाण, मथुरा, इ.स. दुसरे शतक शालभंजिका, मथुरा, दुसरे शतक
पक्वमुद्रेची बाहुली, मथुरा, इ.स. दुसरे शतक माता व मुल, कुशाण, मथुरा, दुसरे शतक
अशोक वृक्षाखाली पुत्रवल्लभा, कुशाण, मथुरा, दुसरे शतक यक्षांचा राजा कुबेर, भारहूतच्या कठड्यावरील शिल्प, शुंगकाळ (इ.स.पू. १८५ ते ७५)
भारहूत येथील स्वर्गलोकांचे उत्थित शिल्प, शुंगकाळ भारहूत येथील प्रवेशद्वार आणि कठडा, शुंगकाळ