सेलम : भारताच्या तमिळनाडू राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या उपनगरांसह ९,१९,१५० (२०११). हे चेन्नईच्या नैर्ऋत्येस ३३२ किमी. तिरुमनीमूत्तूर नदीकाठी वसलेले आहे. हे बंगलोर, तिरुचिरापल्ली आणि कुड्डालोर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे केंद्र व लोहमार्ग प्रस्थानक आहे. शहराच्या नजिक कमलपूरम येथे विमानतळ आहे. शेला किंवा शेल्य यावरून याचे नाव ‘सेलम’ झाले असावे, हे येथील कोरीव लेखान्वये दिसून येते. मल्याळी परंपरेप्रमाणे छेरा राजाने येथे वास्तव्य केले होते. त्यावरून या ठिकाणास छेरा नाड असे म्हटले जाऊ लागले. छेरा नाडचा अपभ्रंश सेला नाड असा होऊन या ठिकाणास पुढे सेलम हे नाव रूढ झाले. हे रमणीय खोऱ्यात वसलेले असून त्याच्या भोवती शेवराय, नागरमलई, जेरूगुमलई, कंजमलई, गोडूमलई या टेकड्या आहेत. पूर्वी हे स्वतंत्र कोंगू नाडचा भाग होते. नंतर ते कोला, विजयनगर व मुस्लिम राज्यांच्या अखत्यारित होते. १७९७ मध्ये हे ब्रिटिशांच्या अंमलाखाली आले. येथे १८८६ मध्ये नगरपालिका व १९९४ पासून महानगरपालिका आहे.

हे जिल्ह्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. हातमागावरील व रेशीम विणकामाचे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मागावरील सुती धोतर व साडी, पांढरे रेशमी धोतर यासाठी हे प्रसिद्ध आहे. मेत्तूर धरण बांधल्यानंतर १९३७ पासून येथे बृहत्उद्योग भरभराटीस आलेले आहेत. येथे चांदीचे पैंजण, पितळेची भांडी, चामडे, विद्युत्‌साहित्य, रसायने, कापड, सुती व रेशमी गालिचे, पोलाद इ. उद्योग चालतात. शहराजवळ चुंबकाचे साठे आढळतात. येथे उच्चशिक्षणाची सोय असून येथील महाविद्यालये मद्रास विद्यापीठाशी संलग्न आहेत. तसेच पेरियार विद्यापीठ, विनायक मिशन विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या शैक्षणिक संस्था येथे आहेत. येथून दिनकरन, दिनमणि, दिनामलार इ. दैनिके प्रकाशित होतात.

येथील ख्रिस्त चर्च, रोमन कॅथलिक चर्च, जामा मशीद, नगरभवन, सुगवनेश्वर, वरदराज, कृष्ण, कोट्टई मरिअम्मन, मुनिप्पन, कन्निका परमेश्वरी, चौडेश्वरी, सौंदरराज शिवमंदिर, पलपत्रई, मरिअम्मन, थरमंगलम् कैलासनाथर इ. मंदिरे रामकृष्ण मिशन आश्रम, कुरंबपत्ती प्राणि-उद्यान, ॲना पार्क तसेच नजीकचे पनमरथुपत्ती सरोवर इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.