बॉस्टन : मॅसॅचूसेट्स राज्याची इतिहासप्रसिद्ध राजधानी. लोकसंख्या ५,६२,११८ (१९८०). हे न्यूयॉर्क शहराच्या ईशान्येस २९० किमी. मॅसॅचूसेट्स उपसागरावर वसलेले आहे. कॅबट, लोवेल, लॉज ही येथील प्रमुख उद्योजक घराणी. या घराण्यांतील लोकांनी कला आणि साहित्य यांना उदार आश्रय देऊन उत्तेजन दिले. त्यामुळे ‘अमेरिकेचे अथेन्स’ म्हणून बॉस्टनची ख्याती झाली. लोहमार्गांनी अमेरिका व कॅनडा यांतील मोठमोठ्या शहरांशी हे जोडलेले आहे. लोगन हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ असून जगातील प्रमुख नैसर्गिक बंदरांत बॉस्टनचा समावेश होतो.
प्यूरिटन पंथीय इंग्रज वसाहतकार एल्डर जॉन विंथ्रॉप व त्याचे सहकारी यांनी १६३० मध्ये हे वसविले. अमेरिकेत येणाऱ्या या पंथीयांचे हे प्रमुख केंद्र होते. इंग्लंडच्या लँकाशरमधील बॉस्टन या प्यूरिटनांच्या मूळ गावावरून या ठिकाणाला हे नाव पडले. ब्रिटिशांच्या वसाहतविषयक अन्याय्य धोरणांना विरोध करणारे केंद्र म्हणून अमेरिकन स्वातंत्र्याच्या इतिहासात या शहराला विशेष महत्त्व आहे. ब्रिटिशांच्या ‘स्टॅम्प ॲक्ट’ला येथेच विरोध करण्यात आला (१७६५). तसेच चहावरील कराच्या निषेधार्थ बॉस्टन बंदरातच जहाजातील चहा समुद्रात फेकून देण्यात आला होता (१७७३). ⇨बंकरहिलची लढाई येथेच झाली (१७ जून १७७५). मार्च १७७६ अखेर या शहराला ब्रिटिशांचा वेढा होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची (१७७५ – १७८३) सुरुवात येथे झाल्याने हे ‘स्वातंत्र्याचे जन्मस्थान’ म्हणून ओळखले जाते. या काळात बॉस्टन जलवाहतुकीकरिता प्रसिद्ध होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धोत्तर काळात येथे सुती वस्त्रोद्योग विकसित झाला. परंतु येथील जहाजे ब्रिटिश बंदरांत थांबत नसत. त्यामुळे बॉस्टनचे व्यापारी चीन व इतर अनोळखी देशांकडे वळले. बॉस्टनला हे वरदानच ठरले. त्यातच इटालियिन, आयरिश, कॅनडियन व इतर यूरोपीयांचे मोठ्या प्रमाणात या शहरी आगमन झाले. उत्तरोत्तर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत जाऊन शहराभोवती अनेक उपनगरे वसली. अमेरिकन यादवी युद्धात बॉस्टनने उत्तरेकडच्या राज्यांना पाठिंबा दिला. त्याच सुमारास लोहमार्गांमुळे अमेरिकेचा पश्चिम भाग पूर्वेशी सांधला गेला. येथील व्यापाऱ्यांनी लोहमार्ग व उद्योगधंद्यांत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्क व शिकागो यांचा वाढता प्रभाव, पश्चिमेकडील शहरांचा विकास तसेच स्थानिक भ्रष्टाचार, दोन महायुद्धे, १९३० च्या सुमारास आलेली मंदी या सर्वांमुळे बॉस्टन औद्योगिकीरणात मागे पडू लागले. बॉस्टन शहराचे प्रामुख्याने डाउनटाउन बॉस्टन, बॅक बे, बीकन हिल, नॉर्थ एंड, साउथ बॉस्टन, ईस्ट बॉस्टन, चार्ल्सटाउन, ब्रायटन-ॲल्सटन, रॉक्सबरी, डॉर्चेस्टर व जमेका प्लेन, साउथ-वेस्टर्न बॉस्टन असे विभाग पडतात. शहराचा कारभार चार वर्षांसाठी निवडलेला महापौर व दोन वर्षांसाठी निवडण्यात येणाऱ्या नऊ सदस्यांच्या नगर समितीमार्फत पाहिला जातो.
येथे कापड, कागद, छपाई, जहाजबांधणी, रसायने, यंत्रसामग्री, अणुप्रक्रिया, विद्युत्सामग्री, कातडी वस्तू इ. उद्योग विकास पावले आहेत. घाऊक व किरकोळ व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. येथून कागद, लोखंड, कातडी वस्तू, लोकर यांची निर्यात, तर साखर, मीठ, खनिज तेलपदार्थ, पोलाद यांची आयात होते.
एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून ग्रेटर बॉस्टन विशेष प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध हार्व्हर्ड विद्यापीठ येथेच आहे. शहरात व त्याच्या उपनगरांत सु. ५० महाविद्यालये असून बॉस्टन विद्यापीठ, सफोक विद्यापीठ तसेच सायमन, इमॅन्यूएल व एमर्सन महाविद्यालये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), वेल्स्ली महाविद्यालय (वेल्स्ली) अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१७८०) इ. शैक्षणिक संस्था आहेत. वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या प्रकाशनातही हे अग्रगण्य आहे. अमेरिकेतील पहिले वृत्तपत्र न्यूज लेटर (१७०४) हे येथून प्रकाशित झाले. ख्रिश्चन सायन्स मॉनिटर (१९०८) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वृत्तपत्र तसेच बॉस्टन ग्लोब (१८७२), बॉस्टन हेरल्ड अमेरिकन (१८२५), संडे ॲडव्हर्टायझर, रेकॉर्ड अमेरिकन ही अन्य काही प्रसिद्ध दैनिके येथून प्रकाशित होतात. बॉस्टन शहरात २० रेडिओ केंद्रे व ६ दूरदर्शन केंद्रे आहेत. राज्याचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणूनही त्याची ख्याती आहे. ‘बॉस्टन सिंफनी ऑर्केस्ट्रा’ (१८८१), ‘बॉस्टन पॉप्स ऑर्केस्ट्रा’, ‘न्यू इंग्लंड काँझर्व्हेटरी ऑफ म्यूझिक’ यांनी संगीत क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे. बॉस्टन बॅले व बॉस्टन ऑपेरा कंपन्याही विशेष प्रसिद्ध आहेत. म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स, इझाबेला स्टीवर्ट गार्डनर म्यूझीयम तसेच विज्ञान.पुरातत्त्वविषयक अन्यही संग्रहालये आहेत.
अमेरिकेतील पहिले मुक्त ग्रंथालय ‘बॉस्टन पब्लिक लायब्ररी’(१८१४) येथेच आहे. याशिवाय बॉस्टन ॲथिनीअम, स्टेट लायब्ररी इ. अन्य प्रसिद्ध ग्रंथालये आहेत. इतिहासाची साक्ष म्हणून अद्यापही पाहावयास मिळणारी अनेक स्थळे येथे असून त्यांत पॉल रेव्हरे हाउस (१७ वे शतक), क्रांतियुद्धाचे नेते जेथे विचारविनिमय करीत तो फॅन्येल हॉल (१७४२), क्राइस्टचर्च, ओल्ड नॉर्थ चर्च, ओल्ड साउथ मीटिंग हाउस, ओल्ड स्टेट हाउस, सोनेरी घुमट असलेले स्टेट हाउस यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहरात किंग चॅपेल, मदर चर्च, ट्रिनिटी चर्च ही प्रसिद्ध आहेत. बॉस्टन कॉमन हे २० हे. क्षेत्राचे उद्यान व बॉस्टन दीपगृह प्रसिद्ध आहे. शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वैशिष्ट्यांमुळे अनेक पर्यटक यास भेट देतात.
“