आशिया : क्षेत्रफळाने व लोकसंख्येने जगातील पहिल्या क्रमांकाचे खंड. आशिया खंडाने पृथ्वीच्या एक अकरांश तसेच एकूण भूभागाच्या एक तृतीयांश व आफ्रिकेच्या दीडपट क्षेत्र व्यापले आहे. आशियाचे क्षेत्रफळ बेटांसह ४,४६,००,८५० चौ. किमी. व लोकसंख्या एकून पृथ्वीच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश, सु. १९८·८ कोटी (१९६९) आहे. विषुववृत्ताच्या एक अंश उत्तरेस आशियाचा मलेशिया भाग येतो, तेथपासून रशियाच्या केप चेल्यूस्किनपर्यंत (७८ उ.) आशियाचा दक्षिणोत्तर सलग भूभागाचा पसारा असून पूर्वपश्चिम पसारा २६ पू. ते १७० प. इतका आहे. आशियाचा मध्यभाग महासागरांपासून सु. ३,२०० किमी. हून अधिक दूर आहे. ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या बाजूचा म्हणून ‘आसू’ नांव दिले तेच खंडाला रूढ झाले असून त्यात जगातील सर्वात उंच शिखर (एव्हरेस्ट), सर्वात खोल भूभाग (मृतसमुद्र), सर्वात जास्त तपमानाचे स्थान (जेकबाबाद), सर्वात कमी तपमानाचे स्थान (व्हर्कोयान्स्क), सर्वात जास्त पावसाचे समजले जाणारे ठिकाण (चेरापुंजी), सर्वात कमी पर्जन्यमानाचा वाळवंटी प्रदेश, जास्तीत जास्त दाट लोकवस्तीचा भाग (इंडोनेशिया, चीन, भारत), अगदी विरळ लोकवस्तीचा भाग (वाळवंटे, सायबीरिया) आढळून येतात. विविध लोक, वनस्पती व खनिज पदार्थ यांनी खंड समृद्ध असून जगातील मानवाची उत्पत्ती तसेच अनेक धर्माचे मूलस्थान आशियातच मिळते. आशिया खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर असून दक्षिणेस हिंदी महासागर आहे. पश्चिमेकडील अरबी समुद्र, तांबडा समुद्र व सुएझ कालवा यांनी आशिया आफ्रिकेपासून विभक्त झाला आहे. कॉकेशस पर्वतरांग, कॅस्पियन समुद्र, उरल नदी आणि उरल पर्वत ही यूरोप आणि आशिया यांमधील सीमा मानली जाते. पुष्कळदा यूरोप व आशिया मिळून एकच यूरेशिया खंड मानले जाते. भूमध्य, इजीअन, मार्मारा आणि काळा समुद्र हे नैर्ऋत्य आशिया व यूरोप यांना विभागतात. पूर्वेकडे बेरिंग सामुद्रधुनीने आशिया व अमेरिका वेगळे झाले आहेत. आशिया खंडाच्या पूर्वेस कॅमचॅटका द्वीपकल्प, कूरील बेटे, सकालीन बेट, जपान, रिऊक्यू, कोरिया, फिलिपीन्स आणि इंडोनेशिया यांमुळे पॅसिफिकचे ओखोट्स्क, जपान, पूर्व चीन, दक्षिण चीन व इंडोनेशिया समुद्र बंदिस्त झाल्याप्रमाणे आहेत.

या खंडात भारत, श्रीलंका (सिलोन), पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, सिक्कीम, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कॉटार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, येमेन, जॉर्डन, सिरिया, इझ्राएल, लेबानन, तुर्कस्तान, रशियाचा आशियांतर्गत भाग, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलीपीन्स, उत्तर व दक्षिण व्हिएटनाम, लाओस, ख्मेर (कंबोडिया), थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनाइ, इंडोनेशिया व मालदीव हे देश असून, ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँग, पोर्तुगीज सत्तेखालील माकाऊ व तिमोर बेटांचा भाग आणि अरबस्तानातील काही अशासकीय प्रदेश यांचाही त्यात समावेश होतो. ईजिप्तचा सिनाई भाग आशियातच मोडतो तसे काहींच्या मते सायप्रस बेटही आशियातच येते.

भूवर्णन : आशिया खंडाची घडण अतिशय जटिल स्वरूपाची समजली जाते. आशिया व आफ्रिका खंडे पूर्वी जोडलेली होती. तुर्कस्तान ते जपानपर्यंत गेलेल्या अनेक पर्वतरांगांच्या ठिकाणी पुराजीव व मध्यजीव कालखंडांत टेथिस हा मोठा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस अंगाराभूमी हा प्रतिकारी खडकाचा भूभाग होता तर दक्षिणेकडे गोंडवनभूमी हाही तसाच प्रदेश होता. टेथिसच्या भूद्रोणीमध्ये गाळाचे थर साठले आणि गिरिजनक हालचालींमुळे मध्यजीव कालखंडाच्या अखेरीस व विशेषत: नूतनजीव कालखंडात त्या भागावर दाब पडून तेथे वलीपर्वतांच्या अनेक मालांचा जटिल भूभाग तयार झाला. आफ्रिका व आशिया विभागले जाऊन अंगारा व गोंडवनभूमी एकत्र जोडल्या गेल्या. अरबस्तान, दक्षिण आफ्रिका व दख्खनचे पठार ह्या भागांना मात्र धक्का लागला नाही त्यांवर नंतरच्या काळातील थर साचले तरी मूळ गाभा कायम राहिला. तुर्कस्तानपासून पूर्वेकडे गेलेल्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे निर्माण झालेली आहेत. तुर्कस्तानच्या उत्तरेस पाँटस व दक्षिणेस टॉरस पर्वत असून त्यांच्यामध्ये ॲनातोलियाचे पठार आहे. पाँटस व टॉरस हे आर्मेनिया पर्वतमंडलात एकत्र येतात. तेथून पुढे उत्तरेकडून एल्बर्झ, खुरासान व दक्षिणेकडून झॅग्रॉस, मकरान पर्वतरांगा जातात. या दोन्हींच्या दरम्यान इराण-अफगाणिस्तानचे पठार आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेस जगाचे छप्पर म्हटले जाणारे पामीरचे पठार आहे. हे वस्तुत: एक पर्वतमंडलच आहे. याच्या सर्व दिशांस अजस्र पर्वतरांगा दूरवर पसरल्या आहेत नैर्ऋत्येस हिंदुकुश, त्याच्या दक्षिणेस सुलेमान, आग्नेयीस हिमालय व त्याच्या उत्तरेस काराकोरम, पूर्वेस कुनलुन व आस्तिन ता, ईशान्येस तिएनशान आणि वायव्येस ट्रान्सआलाई व हिस्सार या पर्वतरांगा आहेत. कुनलुन व हिमालय यांच्या दरम्यान तिबेटचे विस्तीर्ण पर्वतांतर्गत पठार आहे. तसेच कुनलुन व तिएनशान यांच्या दरम्यान ताक्ला माकान हे वाळवंटी पठार आहे. तिएनशानच्या ईशान्येस अल्ताई, सायान, याब्लोनाय, स्टॅनोव्हॉय, व्हर्कोयान्स्क, चेर्स्की, कोलीमा आणि अनादीर या पर्वतशाखा जवळजवळ बेरिंग समुद्रापर्यंत गेल्या आहेत. हिमालयाची रांग आग्नेयीकडे इंडोनेशियापर्यंत पसरली आहे ईशान्य भारतातील गारो, खासी, जैंतिया वगैरे टेकड्या, तसेच उत्तर ब्रह्मदेशातील, अंदमाननिकोबारमधील व इंडोनेशियातील पर्वत हे हिमालयाचेच विस्तार होत. कुनलुनचे फाटे चीनमध्ये गेले आहेत चीनमध्ये त्याला चिनलिंग (त्सिनलिंग) नाव आहे. आस्तिन ताच्या चीनमधील फाट्यास नानशान व मंगोलियातील फाट्यास शिंगान पर्वत म्हणतात. चीनमध्ये यूनान, सेचवान आणि मंगोलियात गोबी वाळवंट हे पठारी प्रदेश वरील पर्वतरांगांनी व्यापले आहेत.


पर्वतनिर्मितीचे चार प्रमुख कालखंड आशियात होऊन गेलेले आहेत. दोन कँब्रियनपूर्व ढालप्रदेश येथे स्पष्ट दिसतात. उत्तरेकडे अंगाराभूमी आणि कारा व चुक्‌ची समुद्रात निमज्जन पावलेला भाग यांच्या मानाने दक्षिणेकडील अरेबिया व द्वीपकल्पीय भारत यांना समाविष्ट करणाऱ्या गोंडवनभूमिप्रदेशावर गिरीजनक हालचालींचा परिणाम कमी झालेला दिसतो. त्या काळात हे भूप्रदेश खूपच विस्तीर्ण होते आणि त्या दोहोंमध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. दक्षिण चीनमध्ये व चिहली आखाताभोवतीही असा एक स्थिर प्रदेश होता. कँब्रियनपूर्व काळात आशियात कोणत्या गिरिजनक हालचाली झाल्या त्याची माहिती फारशी उपलब्ध नाही तथापि दक्षिण भारतात अशी हालचाल होऊन गेली असावी. कँब्रियन ते डेव्होनियन काळात आलेल्या कॅलिडोनियन हालचालींचा पुरावा सायान व अल्ताई पर्वतात दिसून येतो मात्र त्यांचा बराच भाग नंतरच्या व्हर्कोयान्स्क रांगेच्या बलीकरणामुळे झाकला गेलेला आहे. औटर मंगोलिया, इंडोचायना व हिमाचलप्रदेशातही ही हालचाल मोठ्या प्रदेशावर झाली असावी. कारा व चुक्‌ची समुद्रकेंद्रांभोवतीही सेव्हर्नाया झीमल्या व न्यू सायबीरियन बेटे येथे तिचे परिणाम दिसून येतात. कार्‌बॉनिफेरस ते ट्रायासिक काळात झालेली अल्ताइड गिरिजनक हालचाल अधिक विस्तृत प्रमाणावर होती. नॉव्हाया झीमल्याच्या पश्चिमेस कारा समुद्राभोवती पुन्हा वलीकरण झाले. आणि त्याचा परिणाम उरल पर्वतातही दिसून येतो. पश्चिम सायबीरियन मैदानावर नंतर साचलेल्या गाळथरांखाली यावेळच्या वळ्या असाव्यात आणि कझाकच्या उंच प्रदेशातील रचनाही या वळ्यांचाच विस्तार असावा. त्यांचाच संबंध पुढे अंगाराभूमीच्या नैर्ऋत्यभागातील अल्ताईस तार्बगाताई व झुंगेरियातील अला-तौ इ. वलीपर्वतश्रेणींशी दिसतो. मध्यआशियाचा बराच भाग यावेळी तयार झाला. पश्चिमेस फरगाना, तारीम व पूर्वेस ऑर्डास हे भाग स्थिर होते ते पुढे खचून तेथे द्रोणीप्रदेश तयार झाले व त्यांभोवती वलीपर्वतांच्या रांगा वर उचलल्या गेल्या. पूर्वपश्चिम गेलेले आस्तिन ता, नानलिंग व चिनलिंग पर्वत अल्ताइड हालचालींच्या अनुरोधानेच निर्माण झाले आणि हिमालयाचा काही भाग, ब्रह्मदेशाचा शान पठारप्रदेश व थायलंड, मलाया, पश्चिम बोर्निओ येथील पर्वतही त्याच प्रकारचे आहेत. चीनमधील स्थिरप्रदेशाभोवतीच्या फॉर्मोसा, जपान आणि कोरिया येथेही अल्ताइड वलीकरणच असावे. तथापि अतिपूर्वेकडील प्रदेशात ज्युरासिक-क्रिटेशस काळातील गिरिजनक हालचाली अधिक महत्त्वाच्या आहेत. या प्रदेशात मध्यभागात वलीकरणापेक्षा गटविभंग, ज्वालामुखीक्रिया आणि ग्रॅनाइटीकरण हे विशेषत्वाने दिसून येतात. अंगाराभूमी व चुक्‌ची स्थिरकेंद्र यांच्या दरम्यानचे ट्रायासिक-ज्युरासिक गाळाचे जाड थर वलीकरण पावून व्हर्कोयान्स्क व चेर्स्की रांगा निर्माण झाल्या. याचा परिणाम रशियातील सीखोटे आलिन, दक्षिण कोरिया व दक्षिण होन्शू येथपर्यंत जाणवला तसेच पूर्वचीन आणि ऑर्डास केंद्रांच्या दरम्यान शान्सी कोळसाक्षेत्राच्या वळ्या निर्माण झाल्या. पर्वतनिर्मितीच्या अखेरच्या अवस्थेत आधीच्या सर्व पर्वतश्रेणींच्या दक्षिणेस व पूर्वेस, अरेबिया व भारत यांच्या गिरिपिंडांस लागून पर्वतांची एक भली मोठी मालिकाच निर्माण झाली. अशा रीतीने टेथिस समुद्र नाहीसा होऊन तेथे निर्माण झालेल्या पर्वतश्रेणींनी उत्तरेचे व दक्षिणेचे ढालप्रदेश जोडले गेले. तुर्कस्तानात सुरू झालेल्या रांगा आर्मेनियाच्या गिरीमंडलात एकत्र येतात आणि आग्नेयीस पुन्हा दूर दूर जातात. कॅस्पियनच्या पलीकडे कोपेतदा म्हणून आलेला कॉकेशस या श्रेणींना ईशान्य इराणमध्ये मिळतो. उत्तरेकडे गेलेल्या कीर्थर आणि सुलेमान रांगा व पामीरचे गिरिमंडल यांवरून अफगाणिस्तान व बलुचिस्तान येथील पर्वतांवरील भारतीय ढालप्रदेशाचा परिणाम दिसून येतो. भारताच्या उत्तरेच्या हिमालयाच्या रांगा ईशान्येस एकदम दक्षिणेकडे वळून उत्तर ब्रह्मदेशात जातात आणि तेथून पुढे अंदमान-निकोबार बेटांतून इंडोनेशियाच्या सुमात्रामधील व इतर वक्राकार पर्वतरांगांपर्यंत त्या आढळतात. इंडोनेशियातील चापाकृती रांगा फॉर्मोसा व जपानमधून जाऊन कॅमचॅटकात पुन्हा मुख्य भूमीवर येतात. आशियातील अल्पाइन हिमालयीन पट्ट्यात विसाव्या शतकात तीव्र स्वरूपाचे भूकंप झाले आहेत. इंडोनेशियाच्या द्वीपमालिकेत अतिपूर्वेत दिसून येणारी जागृत ज्वालामुखीक्रिया व जमिनीला वारंवार बसणारे हादरे यांवरून या भागातील गिरिजनक कालखंड अद्याप संपलेला नाही असे दिसते.

आशियाच्या भूमीचा उंचसखलपणा विविधस्वरूपी असून उंच व सखल भागातील फरक फार मोठा आहे. अरेबिया व भारत यांची प्राचीन विशाल पठारे सावकाश उत्तरेकडे उतरत उतरत अनुक्रमे टायग्रिस-युफ्रेटीस व सिंधू-गंगा यांच्या आर्वाचीन काळातील जलोढ मैदानात मिळून जातात. या मैदानांचा भूप्रदेश त्रिभुज प्रदेशांच्या रूपाने एकसारखा वाढतच आहे. या मैदानांच्या पलीकडील बाजूस भूशास्त्रदृष्ट्या अगदी अलीकडे निर्माण झालेल्या अतिप्रचंड, उत्तुंग व विस्तीर्ण पर्वतश्रेणी एकदम खड्या उभ्या आहेत. त्यांच्याही पलीकडे जगाच्या छपरावरील उंच पठारे, गटपर्वत आणि द्रोणीप्रदेश आहेत. त्यांच्या उत्तरेला आशियाचा हा उंच प्रदेश संपून पूर्व सायबीरियापासून अटलांटिकपर्यंत गेलेला सखल मैदानांचा आणि बुटक्या पठारांचा रुंद प्रदेश लागतो. पूर्वेकडे या उंच प्रदेशाचे फाटे पॅसिफिकपर्यंत गेलेले असून फाट्यांफाट्यांमध्ये नद्यांनी गाळाची, सपाट पूरमैदाने तयार केलेली आहेत. ही पूरमैदाने अतिशय दाट लोकवस्तीने गजबजलेली आहेत.

आशियाच्या विभागश: वर्णनाने वरील सर्वसामान्य स्वरूप अधिक स्पष्ट होईल : गंगा-सिंधूचे मैदान आणि द्वीपकल्पीय भारत : कार्‌बॉनिफेरसच्या अखेरीअखेरीस व क्रिटेशसच्या सुरुवातीस विभंगवेष्टीत द्रोणी खचून त्यात पाण्याबरोबर आलेले निक्षेप साठणे हे भारताच्या सांरचनिक उत्क्रांतीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. दगडी कोळशाचे जाड थर असलेल्या या गोंडवन खडकांचा सर्वात महत्त्वाचा प्रदेश दामोदर खोऱ्यात आहे. जबलपूरजवळचा सागरी पर्मोकार्‌बॉनिफेरस चुनखडक सोडला तर मध्यजीव तृतीयक काळात द्वीपकल्पाच्या फक्त कडेच्या भागातच सागरी क्रियेचा परिणाम दिसून येतो. द्वीपकल्पाच्या वायव्य भागात उत्तर क्रिटेशस व पूर्व अदिनूतन काळात दख्खनच्या लाव्ह्याचा उद्रेक होऊन सु. ५,००,००० चौ.मी. किमी. क्षेत्रावर बेसाल्टचे सपाट थर पसरलेले दिसतात. पश्चिमघाट ही दख्खन पठाराची पश्चिम कड अरबी समुद्रापेक्षा १,२०० ते १,५०० मी. उंच आहे. पूर्वेकडे सावकाश उतरत उतरत या पठाराचे तमिळनाडूमध्ये रुंद मैदानात रूपांतर होते. पूर्वेकडे सु. ९०० मी. उंचीच्या काही टेकड्या आहेत परंतु मैदाने व रुंद नदीखोरी हीच तेथील प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. दख्खन पठाराच्या ईशान्येस छोटा नागपूरचे पठार असून गंगेपलीकडील शिलाँगचे पठार हे द्वीपकल्पीय गटाचाच पृथक्‌स्थित भाग समजले जाते. दख्खन पठाराच्या उत्तरेस तापी व नर्मदा या नद्या आणि सातपुडा व विंध्य या पर्वतरांगा हा महत्त्वाचा विभाजक प्रदेश असून त्यांच्या उत्तरेला माळव्याचे लाव्ह्याचे विंध्य पठार व वायव्येस अरवली पर्वत आहे. नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने गेलेल्या अरवलीची उंची गंगेच्या मैदानाकडे कमी कमी होत जाते. खुद्द दिल्लीत त्याची एक कटकशाखा आली आहे. अरवली हा अत्यंत प्राचीन पर्वतांपैकी एक असून त्याच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या भूद्रोणीचे प्रथम उत्थापन व वलीकरण सु, ६० ते ७० कोटी वर्षांपूर्वी अल्गाँकियन काळात झाले. पूर्वी तो कुमाऊँ हिमालयापासून दक्षिणेस द्वीपकल्पीय पठारांच्या कडेपर्यंत पसरला होता. त्या प्राचीन काळी अरवलीची कित्येक शिखरे हिमरेषेपेक्षा उंच असून तेथून मोठमोठ्या हिमनद्या वाहत होत्या व त्यांतून कित्येक मोठमोठ्या नद्यांना पाणी मिळत होते. पुढे क्षरण विदारणादिकांमुळे अरवली प्राय:स्थलीरूप पावला. उत्तर मध्यजीव काळात त्याचे सु. १० कोटी वर्षांपूर्वी पुन्हा उत्थान झाले व उदेपूरजवळ सु. १,२०० मी. आणि दिल्ली व अहमदाबादजवळ सु. ३०० मी. उंची त्याला प्राप्त झाली. दुसऱ्या उत्थानानंतरच्या क्षरणचक्रात त्याचे क्वार्टझाइट खडक उंच कटकांच्या रूपाने उभे राहिले आणि छिंद या स्थानिक नावाने ओळखली जाणारी खोरी मऊ फायलाइटमधून कोरून निघाली. सांरचनिक दृष्ट्या अरवली आणि अपालॅचियन यांत साधर्म्य आहे.

द्वीपकल्पाच्या पूर्वकिनाऱ्यावर कन्याकुमारीपासून महानदीच्या त्रिभुजप्रदेशापर्यंत कावेरी, कृष्णा व गोदावरी या प्रमुख नद्यांनी बनविलेली गाळमैदाने व त्रिभुजप्रदेश आहेत. दक्षिण भारतात टेकड्या झिजून मागे सरकल्यासारख्या झाल्यामुळे तयार झालेली गिरितलमैदाने आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील कोकणच्या भागात लाव्हामैदाने आढळतात. पूर्वी तयार झालेली आणि नंतर उचलली गेलेली मैदाने निलगिरी व शिलाँग टेकड्या येथे आढळतात. दोन्ही किनार्‍यांवर उन्मज्जनाने तयार झालेली, खारकच्छ व पश्चजल यांनी युक्त मैदाने आहेत. कोकणाच्या उत्तरेस गुजरातचे गाळमैदान आहे. कॅम्ब्रियन काळाच्या सुरुवातीपासून भारतीय द्वीपकल्पप्रदेश हा एक अत्यंत स्थिर प्रदेश म्हणून वैशिष्ट्य पावलेला आहे. विभंग, भूमीच्या मोठ्या हालचाली आणि लाव्हाचे लोट यांनी त्याच्या पृष्ठाचे स्वरूप जटिल करून टाकलेले आहे. अलीकडे आणि पूर्वीही त्यावर अनेकदा भूकंप झालेले आहेत. या प्रदेशाच्या ऊर्मिल पृष्ठाचा काही भाग प्राचीन ग्रॅनाइट व नाइस यांनी बनलेला असून त्यावर मधूनच ग्रॅनाइटी टेकड्या उभ्या राहिलेल्या दिसतात. पश्चिम घाटात अनेक खिंडी असून त्यांतून किनारीप्रदेश व पठार यांत दळणवळण चालते. जोग, गोकाक, शिवसमुद्रम्, पापनाशनम् इ. लहानमोठे धबधबेही आहेत. निलगिरी आणि लंकेतील पर्वत ज्युरासिक उत्प्रणोदानंतर उचलले गेले असावेत.

गंगासिंधूचे मैदान हे जगातील एक अत्यंत विस्तीर्ण, सुपीक व सपाट मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या पायथ्याचा द्रोणीप्रदेश गाळाने भरून येऊन ते तयार झालेले आहे. त्याने बांगला देश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि पाकिस्तानातील पंजाब व सिंध यांचा मोठा भूप्रदेश व्यापलेला आहे. गंगेच्या मुखापासून १,६०० किमी. दूर असलेली दिल्ली फक्त २१९ मी. उंच आहे. हिमालयाच्या बाजूला गाळ व माती यांऐवजी भरड खड्यांची मैदाने आहेत. त्यांस पंजाब व हरियाणामध्ये भाबर व आसाममध्ये द्वार म्हणतात. अरवलीच्या पश्चिमेस खडकाळ, रूक्ष, हॅमाडा जातीचे मैदान आहे. तो पुष्कळदा भारतीय पठाराचाच भाग मानला जातो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हा गंगेच्या मैदानाचाच एक भाग समजता येतो कारण ब्रह्मपुत्रा गंगेस मिळते.


हिमालय : ही जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत अलीकडे निर्माण झालेली पर्वतसंहती आहे. ८,००० मी. पेक्षा उंच असलेली जगातील बहुतेक सर्व शिखरे हिमालयात आहेत. जगातील पूर्वपश्चिम पर्वतसंहतीपैकी ही सर्वांत लांब, सु. २,५०० किमी. असून तिची रुंदी सु. ४०० किमी. आहे. तिने ५,००,००० चौ.किमी. प्रदेश व्यापला आहे. सिंधूचा वरचा भाग व त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) यांच्या खोर्‍यांनी तिबेटचे पठार हिमालयाच्या श्रेणींपासून वेगळे केलेले आहे. नंगापर्वत (८,१२६ मी.) आणि नामचा बारवा (७,७५६ मी.) यांचे दरम्यान हिमाद्री (ग्रेटर हिमालय) ची रांग असून तिच्यात मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), मनास्लू (८,१५६ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), अन्नपूर्णा (८,०७८ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. हिमाद्रीच्या दक्षिणेस हिमाचल (लेसर हिमालय) पर्वताच्या रांगा आहेत. हा डोंगराळ प्रदेश सु. ७५ किमी. रुंद व ५,००० मी. पर्यंत उंच असून त्यात अनेक दिशांना गेलेल्या पर्वतरांगा आहेत. येथील दक्षिण उतार खडे व उघडे असून उत्तर उतार सौम्य व अरण्यमय आहेत. याच्याही दक्षिणेस शिवालिक रांगा असून त्यांची उंची ६०० मी. पर्यंत आहे. यातून दून नावाची सपाट तळाची सांरचनिक दऱ्याखोरी असून ती दाट लोकवस्तीची व लागवडीखाली आणलेली आहेत. हिमालयाला त्याची पूर्ण उंची गाठावयास ६० ते ७० लक्ष वर्षे लागली. त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या नद्या उंच उंच पर्वतांना भेदून गेलेल्या दिसतात. हिमालयाला पुरेशी उंची प्राप्त झाल्यानंतरच भारतात मोसमी प्रकारचे हवामान आले . हिमालय चंद्रकोरीच्या आकाराचा असून तो दक्षिणेकडे बहिर्वक्र आहे. त्याची दक्षिण सीमा ३०० मी. उंचीची असून अवघ्या १५० किमी. मध्ये तो ८,००० मी. उंची गाठतो. त्यात अनेक हिमाल (हिमक्षेत्रे) असून त्यांतून हिमनद्या व जोरदार जलप्रवाह उगम पावतात. हिमालयाच्या निरनिराळ्या भागांना काश्मीर-हिमालय, पंजाब-हिमालय वगैरे निरनिरळी नावे आहेत. आसाम-हिमालयाच्या दक्षिणेस भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवरून जाणाऱ्या पातकई व इतर रांगांचा समावेश पूर्वाचल या पर्वतश्रेणीत होतो. हिमालयाचे भारतातील सर्वोच्च शिखर नंदादेवी (७,८१७ मी.) हे कुमाऊँ हिमालयात आहे.

अरबी गिरिपिंड व इराकचे मैदान : तांबड्या समुद्राच्या अनुरोधाने आणि मध्यअरेबियात कँब्रियनपूर्व खडक पुष्कळच उघडे पडलेले दिसतात. मध्यजीव व तृतीयक कल्पातील सागरी थरही आहेत. हे खडक सामान्यत: फारसे विचलित झालेले नाहीत. जॉर्डनच्या पश्चिमेस मात्र त्यांस बाक आलेला व विभंग झालेला आढळतो. तसेच तुर्कस्तान, इराण व ओमान यांच्या जवळपासही थोडासाच फरक पडलेला दिसतो. प्रमुख सांरचनिक वैशिष्ट्य मात्र तृतीयक कालातील खचदरी हे होय. यात तांबडा समुद्र, मृतसमृद्र व जॉर्डनचे खोरे यांचा समावेश होतो. जोरदार विभंगक्रियेबरोबरच ज्वालामुखीक्रिया होते त्यामुळे येमेनमधील सु. ३,७०० मी. उंचीचा लाव्हाजन्य प्रदेश, सु. २,८०० मी. उंचीचा उत्तर हेजाझ व सु. १,८०० मी. उंचीचा दक्षिण सिरीयाचा प्रदेश निर्माण झाला. अरेबियाचे पठार त्याच्या पश्चिमेकडील उंच कडेपासून इराकच्या मैदानाकडे व इराणच्या आखातावरील ऊर्मिल किनारीप्रदेशाकडे सावकाश उतरत जाते. थोडाबहुत पाऊस पडताच वाहणाऱ्या अनेक प्रवाहांचे मार्ग दिसतात आणि पूर्वी केव्हातरी येथील हवामान अधिक आर्द्र होते हे बऱ्याच गोष्टींवरून दिसून येते. तथापि टायग्रिस, युफ्रेटीस आणि भूमध्यसमुद्राला मिळणाऱ्या काही नद्या एवढ्याच बारमाही आहेत. इराकचा उत्तरेकडील व पश्चिमेकडील थोडा भाग सोडला तर बाकीचा सर्व प्रदेश म्हणजे टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांचे सखल खोरेच आहे. ते ५०० मी. पेक्षा अधिक उंच नाही.

तुर्कस्तान, इराण आणि अफगाणिस्तान हे देश आणि बलुचिस्तान येथे बरेचसे वलीपर्वत व गटपर्वत असून त्यांत अनेक द्रोणीप्रदेश आहेत. त्यांपैकी काही प्रदेश अंतर्गत जलवाहनाचे आहेत. उत्तर इराणमध्ये एल्बर्झ (अत्युच्च शिखर देमाव्हेंड ५,६६९ मी.) व कोपेत दा (२,९९१ मी.) हे पर्वत अफगाणिस्तानाच्या ईशान्येस हिंदुकुश पर्वताला मिळतात. दक्षिणेस झॅग्रॉस पर्वत अधिक रुंद असून त्यात कित्येक शिखरे ४,२७० मी. पेक्षा अधिक उंच आहेत. दक्षिण इराणमध्ये याची दिशा वायव्य-आग्नेय असून त्याची शाखा ओमानमध्ये जाते व पुढे तो बलुचिस्तानातून उत्तरेकडे वळतो. झॅग्रॉसच्या जवळपासच मध्यपूर्वेतील प्रमुख तेलक्षेत्र आहेत. या दोन पर्वतश्रेणींमध्ये सीस्तान, लूट इ. क्षारयुक्त द्रोणीप्रदेश असून काही ज्वालामुखीही आहेत. तुर्कस्तानची रचना जटिल असून त्यात अतिनूतन काळातील ज्वालामुखी मौंट आरारात (५,१६५ मी.) आहे. तेथून भूमध्यसमुद्राकडे जाणारे व त्याच्या किनाऱ्यांनी जाणारे टॉरस व अँटिटॉरस पर्वत असून काळ्या समुद्राच्या काठाकाठाने पाँटिक पर्वत जातो. सभोवतीच्या पर्वतरांगांमुळे अनातोलियाच्या पठारावर कित्येक द्रोणीप्रदेश निर्माण झालेले आहेत. त्यांतील काहींमध्ये तूझ आणि वान सारखी अत्यंत क्षारयुक्त पाण्याची सरोवरे तयार झालेली आहेत. काळ्या समुद्रावरील झाँगूल्डाकजवळ महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी आहेत. इतरत्र क्रोम आणि मँगॅनीज यांचे साठे आहेत. अगदी अलीकडच्या काळातही (१९७१) येथे मोठमोठे भूकंप झालेले आहेत. त्यांवरून या प्रदेशाची अस्थिरता अजून संपलेली नाही हे दिसून येते.

मध्य आशिया : तिबेट पठाराची सरासरी उंची ४,८७५ मी. आहे. त्याच्या दक्षिणेस काराकोरम पर्वताचे मौंट गॉडविन ऑस्टिन उर्फ के-टू हे एव्हरेस्टच्या खालोखाल ८,६११ मी. उंचीचे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर भारतात आहे. पामीर आणि तिएनशानमध्ये ६,००० मी. पर्यंत उंची आढळते तर चीनच्या चिंगहाई प्रांतातील त्साइदाम या दलदलीच्या प्रदेशाची उंची फक्त २,७५० मी. आहे. ताक्ला माकानच्या ईशान्येकडील तूर्फान या द्रोणीची उंची तर समुद्रसपाटीच्या खाली सु. ३०० मी. आहे. केवळ समुद्रसपाटीच्या उंचीपेक्षा येथे उंचीचा फरक लक्षवेधक आहे. बरेच द्रोणीप्रदेश हे बंदिस्त जलवाहनक्षेत्र आहेत. गोबीच्या वाळवंटासारख्या ईशान्येकडील द्रोणीप्रदेशांवर वाऱ्याच्या विदारण कार्याचा बराच परिणाम झालेला आहे.

आशियातील रशियाचा सखल प्रदेश: यात मुख्यत: येनिसे नदीच्या पश्चिमेचा मध्यजीव व तृतीयक निक्षेपांचा, वलीकरण न झालेला, उरल पर्वतापर्यंतचा सायबीरियाच्या मैदानाचा प्रदेश येतो. तथापि लीना व येनिसे यांच्या दरम्यानचा सु. १,००० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाचा समावेशही यातच होतो. येथील बराच प्रदेश दलदलीचा आहे. आग्नेयीस अल्ताई व सायान श्रेणींच्या पायथ्याशी कुझनेट्स्क व मिनुसिन्स्क द्रोणीप्रदेशात पुराजीवकालीन कोळसा आहे. मैदानी प्रदेशाच्या दक्षिणसीमेवर कझाक प्रदेश सु. ३०० मी. उंचीचा आहे. येथे अंतर्गत जलवाहनाचे बरेच द्रोणीप्रदेश असून दक्षिणेस किरगीझ स्टेपच्या बाजूस हवामान अधिकाधिक कोरडे होत जाते. याच भागात कॅस्पियनच्या पूर्वेचा तुराणी मैदानी प्रदेश येतो. यात किझिल-कुम व कारा-कुमसारखे वाळू, माती यांचे अल्कली मरुप्रदेश आहेत. सिरदर्या व अमुदर्या यांच्या पट्ट्यात थोडेसे ओलीत होते. कॅस्पियनच्या उत्तर किनाऱ्याजवळच्या प्रदेशात खनिजतेलक्षेत्रे आहेत.


 पॅसिफिक किनारी प्रदेश : यात पूर्वसायबीरिया ते मलायापर्यंत अनेक प्रकारचे प्रदेश आहेत. लीना नदीच्या पूर्वेस व्हर्कोयान्स्क व चेर्स्की रांगा सु. २,५०० मी. उंच आहेत. कॅमचॅटकात सु. ५,००० मी. उंचीचे जागृत ज्वालामुखी पर्वत असून दोन दक्षिणोत्तर पर्वत रांगांमध्ये कॅमचॅटका नदीचे सखल खोरे आहे. अमुर नदीच्या दोहोबाजूंचा प्रदेश सु. २,४०० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. चीनमध्ये पुनर्युवीकरण झालेले विभंग गटपर्वत व अगदी अलीकडे तयार झालेली गाळमैदाने आहेत. मांचुरिया हे क्षरणजन्य मैदान असून त्याच्याभोवती ग्रेटर खिंगन, जेहोल व लिआउडुंग हे गट आहेत. लिआउडुंगच्या दक्षिणेस समुद्रापलीकडे शँटुंग द्वीपकल्प त्याच प्रकारचे आहे. कोरियामध्ये विच्छिन्न पठारे व मध्यजीवकालातील वलीपर्वत आहेत. आग्नेय चीनच्या भागात बरेच विभंग असून त्याच्या पश्चिमेच्या विस्तृत वलीकृत प्रदेशातही विभंगक्रिया झालेली आढळते. पोयांग व तुंगतिंग सरोवरे व सिक्यांगचे खोरे चिकणमाती व स्लेट यांच्या सांरचनिक द्रोणींमध्ये वसलेली आहेत. पश्चिमेकडे दोन रुंद पायरीसारखे टप्पे नद्यांच्या खोऱ्यांनी खोलवर विच्छिन्न झालेले असून ते सु. १,८०० मी. उंचीच्या पश्चिम यूनान पठारापर्यंत उतरतात. त्याच्या फाट्यांमध्ये सेचवानचे लालखोरे असून त्याच्या उत्तरेस त्सिंगलिंग शानच्या ४,००० मी. पेक्षा उंच रांगा पसरल्या आहेत. या रांगामुळे चीनचे उत्तर व दक्षिण असे दोन प्रमुख विभाग येतात. ऑर्डास पठार हे चीनच्या वायव्येस पर्मियन काळापासूनचे अनम्य पठार असून त्यावर लोएसचे व भूजन्य निक्षेपांचे जाडजाड, विक्षुब्ध न झालेले थर आहेत. नद्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पसरलेले लोएसचे थर खोऱ्यांच्या तोंडाशी बसतात. ते पीत नदीने (हृोंगहो) वाहून नेऊन चीनच्या उत्तरेचे मैदान तयार झालेले आहे. पीत नदीचे आणि यांगत्सेचे मैदान ही अतिशय अर्वाचीन आहेत. त्यात सरोवरे आणि वेगवेगळ्या दिशांनी वाहणारे फाटे पुष्कळ आहेत आणि अनर्थकारी पूर ही नेहमीचीच बाब आहे. यूनानचे पठार चीनच्या दक्षिणेस ब्रह्मदेश व इंडोचायना यांतील शान पठारापर्यंत विस्तारलेले आहे. त्यात साल्वीन आणि मेकाँग नद्यांनी खोलवर कोरून मार्ग काढले आहेत. डोंगरांचे फाटे दक्षिणेकडे गेलेले असून त्यांच्या दरम्यान चाऊ फ्राया आणि मेकाँग यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. येथे डोंगरांची उंची ३,००० मी. पेक्षा अधिक क्वचितच असते आणि डोंगराळ मलायात सर्वाधिक उंची फक्त २,१९० मी. आहे.

द्वीपमालिका : सुमात्रापासून जपानपर्यंतचा पट्टा अत्यंत अस्थिर आहे. इंडोनिशियामधील ज्वालामुखींची मालिका, बेटांची दुहेरी रचना आणि गुरुत्वाकर्षणातील अनैसर्गिक फरक यांवरून येथे गिरिनिर्मितीची क्रिया अद्याप प्रथमावस्थेत आहे असे मानतात. मलाया व पश्चिम बोर्निओ यांना समाविष्ट करणाऱ्या मध्यजीवकालीन भूमिगटाने तृतीयककालीन वलीकरणाला अडथळा केला असावा. तृतीयककालीन निक्षेपांत पेट्रोलियम आहे. बहुतेक उंच शिखरे ज्वालामुखींचे शंकू असून त्यांपैकी जावामधील पुष्कळशी शिखरे ३,००० मी. पेक्षा उंच आहेत. जपानमध्ये ज्वालामुखीक्रियेबरोबर वलीकरणापेक्षा विभंगच अधिक झालेले दिसतात. पूर्वेकडील वलीकृत थरांवरील ओबडधोबड बाह्य पर्वतांचा पट्टा विभंगाने खंडित झालेला आहे तर पश्चिमेकडील आतला पट्टा अर्वाचीन गटविभागांचा व जागृत ज्वालामुखीक्रियेचा आहे. मध्य होन्शूमधून गेलेल्या खोल खचदरीत ३,७७६ मी. उंचीचा फूजियामा उभा आहे. या भागात खड्या उतारांच्या मानाने अलीकडील गाळमैदाने व त्यांना लागून आधीच्या भरडखड्यांचा पट्टा अशी भूरचना थोडीच आहे.

हवामान : आशियाचा अंतर्भाग कोणत्याही महासागरापासून ३,२०० किमी. पेक्षा अधिक दूर असल्यामुळे किनारीप्रदेश व खंडाचा अंतर्भाग यांच्या हवामानात मोठाच फरक पडतो. अंतर्भागाचे हवामान अत्यंत विषम आहे. मनुष्यवस्ती असलेल्या कोणत्याही इतर ठिकाणापेक्षा कमी तपमान आणि जगातील अत्यंत उच्च तपमानाच्या ठिकाणांपैकी काही ठिकाणे आशियात आढळतात. आशियाच्या अंतर्भागाचे हिवाळ्याचे तपमान त्याच अक्षांशातील इतर कोणत्याही भागाच्या हिवाळी तपमानापेक्षा कमी असते. मलायाच्या सतत पावसाच्या विषुववृत्तीय हवामानापासून तो नॉव्हाया झीमल्याच्या हिमक्षेत्रीय हवामानापर्यंत हवामानाचे बहुतेक सर्व प्रकार आशियात आढळतात. अगदी ढोबळ मानाने आशियाचे हवामान सांगावयाचे तर मोठा भूप्रदेश उन्हाळ्यात तापून त्यावर नीच भारमान निर्माण होते व समुद्रावरून बाष्पयुक्त हवा ओढली जाऊन उन्हाळी पाऊस पडतो हिवाळ्यात या प्रदेशावर उच्च भारमान निर्माण होऊन तेथून कोरडे वारे सभोवतीच्या प्रदेशाकडे उच्च भारमान निर्माण होऊन तेथून कोरडे वारे सभोवतीच्या प्रदेशाकडे जातात. बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात डोंगर असतील तर तेथे खूप पाऊस पडतो व डोंगराच्या वातविन्मुख बाजूवर पाऊस कमी पडतो भारतात या हवामानाचे मोसमी स्वरूप स्पष्ट असते, चीनमध्ये ते कमी स्पष्ट असते व इतरत्र मोसमी हवामानाची केवळ प्रवृत्ती दिसते. तथापि इतके सोपे आणि सरळ स्वरूप आशियाच्या हवामानाचे नाही. उत्तुंग हिमालयामुळे भारतातील मोसमी हवामानावर मोठाच परिणाम झाला आहे. तसेच नैर्ऋत्य आशियाचे हवामान भूमध्यसागरी असल्यामुळे तेथे उन्हाळा कोरडा जातो व पाऊस हिवाळ्यात येतो.

आवर्त आणि प्रत्यावर्त यांनाही आशियाच्या हवामानात महत्त्व आहे. अटलांटिकवरून यूरोपात शिरणाऱ्या आवर्त प्रत्यावर्ताच्या मानाने आशियातील गतिमान नीच व उच्च भारमान केंद्रे संख्येने कमी व आकाराने लहान असतात. अंतर्भागात जाईपर्यंत ती अगदीच दुर्बळ होतात परंतु पॅसिफिककडे येताना ती पुन्हा वाढतात आणि त्यामुळे चीन व जपान येथे बदलती हवा अनुभवास येते. पूर्व आशियात दक्षिण चिनी समुद्रावरून चीनच्या आग्नेय भागात आर्द्र आवर्त वारे ओढले जातात. हिवाळ्यात कमी जोरदार आवर्ते पॅलेस्टाइन, इराण व उत्तर भारत यांवरून जातात. तथापि आवर्ताचा मार्ग सामान्यत: उत्तर भागातूनच असतो. चीनच्या आग्नेय किनाऱ्याजवळ जोरदार विध्वंसक चक्रीवादळे होतात. भारतातही बंगालचा उपसागर व अरबी समुद्र यांवर एप्रिल व मे आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पुष्कळ विनाशकारी वादळे होतात.

आशियाच्या तृतीयांश भागावर पाऊस किंवा हिम या रूपांनी होणाऱ्या वृष्टीचा उगम अटलांटिकवरून येणाऱ्या आर्द्रतेत असतो. कित्येकदा हे बाष्प सु. साडेसहाहजार किमी. अंतर ओलांडून आलेले असते. आर्क्टिक महासागरापासून फारच थोडी आर्द्रता आशियाला मिळते. ती काही थोड्या किनारी प्रदेशासच मिळते. पॅसिफिकवरून येणारे बाष्प फारतर पूर्व मंगोलियापर्यंत व क्वचित् बैकल सरोवरापर्यंत येते आणि हिंदी महासागरावरून येणारे बाष्प हिमालयाच्या दक्षिणेस आणि सिंधूखोऱ्याच्या पूर्वेस मर्यादित प्रदेशासच वृष्टी देते. आशियाच्या फार मोठ्या भूभागाला महासागरीय बाष्पापासून वृष्टी मिळतच नाही. जी काही थोडी वृष्टी होते ती नद्या, खारी सरोवरे, दलदली यांच्या बाष्पीभवनामुळे होते. हे पाणीही कमी कमी होत चालले आहे आणि खंडांतर्गत हवामानाची तीव्रताही वाढत आहे.

विषुववृत्तापासून ईशान्येकडे अंतर्भागात जावे तसतशी वार्षिक सरासरी तपमानकक्षा वाढत जाते. सिंगापूर व कोलंबो येथे ती सु. १ सें. असते. कर्कवृत्ताजवळ ती ११ से. होते. मॉस्कोजवळ ती २५ से. असते. पेकिंग किंवा अरल समुद्र येथे ती ३३ से., बैकल सरोवराजवळ ती सु. ४२ से. तर व्हर्कोयान्स्कला ती ६४ से. असते. हवामानाच्या दृष्टीने प्रत्यक्ष तपमानापेक्षा ही कक्षाच महत्त्वाची आहे.

भारत व आग्नेय आशिया यांची द्वीपकल्पे व त्यांजवळची बेटे येथील हवामान उष्णकटिबंधीय व बऱ्याच भागांत बारमहा पावसाचे आहे. या मोसमी हवामानाच्या प्रदेशात प्रत्येक महिन्याचे सरासरी तपमान २० से. पेक्षा अधिक असते. किनाऱ्याजवळच्या प्रदेशात जवळजवळ बारमहा पाऊस असतो तर अंतर्भागात हिवाळा कोरडा जातो.


आशियाच्या अंतर्भागातील फार मोठा प्रदेश रुक्ष, वाळवंटी आहे व त्याभोवतीचा प्रदेश गवताळ आहे. येथे सर्वत्र उन्हाळा कडक असतो. अरेबिया, इराणचा सखल प्रदेश व थरचे वाळवंट येथे बारमहा कडक उष्णता असते तर मंगोलिया, सिंक्यांग व सोव्हिएट मध्य आशिया येथे हिवाळा कडक असतो.

चीन, जपान, उत्तर भारत व नैर्ऋत्य आशियाचा काही भाग येथील हवामान समशीतोष्ण असते. नैर्ऋत्य आशियाखेरीज बाकीच्या वरील प्रदेशात उन्हाळी मोसमी पाऊस असतो व हिवाळा सामान्यत: कोरडा जातो. उत्तर भारताचे हवामान हिमालयाचे संरक्षण, समुद्रदूरत्व व सखलपणा यांमुळे समशीतोष्णपेक्षा उष्णकटिबंधीयच अधिक आहे. दक्षिण जपान व यांगत्से खोरे येथे उन्हाळा अधिक कडक व पाऊस जवळजवळ वर्षभर असतो.

सोव्हिएट मध्यआशिया आणि ध्रुवीय प्रदेश सोडून आशियातील रशियाचा सर्व भाग, मांचुरिया व तुर्कस्तान येथे थंड समशीतोष्ण हवामान असते. पश्चिमेकडे अटलांटिकवरील वारे अधिक प्रभावी असतात. तेथे बारमहा पाऊस येतो व उन्हाळा सौम्य असतो. उत्तरेकडील भागात थंड, समशीतोष्ण, आर्द्र हवामान असते आणि उन्हाळा थोडे दिवस टिकतो. पूर्व सायबीरियात उन्हाळी पाऊस असतो, १० से. तपमान चार महिनेसुद्धा नसते व काही भागात हिवाळ्याचे तपमान शून्याखाली ३७-३८ से. जाते. नॉव्हाया झीमल्या येथे सतत हिममय हवामान असते, तर ध्रुवीय प्रदेशातील किनारी भाग टंड्रा प्रकारच्या हवामानाचा आहे. ईशान्य सायबीरिया व तिबेट येथे उंच पर्वतीय प्रदेशात हवामान टंड्रा प्रकारचे असते किंवा अतिथंड, कोरडे असते.

वनस्पती : विषुववृत्तीय प्रदेशात ६० ते ८० मी. पर्यंत उंच वाढणारे, सदाहरित, कठीण लाकडाचे वृक्ष असतात. ते सरळ उंच वाढत जातात व माथ्याजवळ त्यांना फांद्या फुटतात. बुंध्यापासून त्यांना आधारभिंतीसारखे फाटे फुटलेले असतात. एकाच जातीची अनेक झाडे जवळजवळ आढळत नाहीत थोड्या जागेत वनस्पतींच्या हजारो जाती आढळतात. ऑर्किड, नेचे, बांडगुळे, मोठमोठ्या वेली इत्यादींची गर्दी असते. तथापि अमेझॉन किंवा काँगो यांच्या खोऱ्यांतील अरण्यांप्रमाणे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही असे होत नाही. यामुळे जमिनीवरही झुडुपांची गर्दी असते झाडांच्या माथ्यावर माकडे, पक्षी, इत्यादिकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे काही भूमिचरही आढळतात. काही भागात हत्तीसुद्धा आहेत. मलायातील सेमांग किंवा श्रीलंकेमधील वेद्द यांसारख्या प्राथमिक अवस्थेतील माणसांनी या दाट अरण्यांचा आश्रय घेतला आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ त्रिभुज प्रदेशात कच्छ वनश्रीही आढळते. वाळूयुक्त किनाऱ्याजवळ सुरूची झाडे आढळतात आणि नारळीची झाडेही वाळूमिश्रित जमीनीवर व खाऱ्या हवेवर चांगली वाढतात. मोसमी हवेच्या प्रदेशात २०० सेंमी. पावसाच्या भागात सदाहरित, रुंदपर्णी वर्षावने आढळतात. १०० ते २०० सेंमी. पावसाच्या प्रदेशात उन्हाळ्यात पर्णहीन होणाऱ्या, रुंदपर्णी विशिष्ट मोसमी अरण्यांची वाढ होते. शाल व साग ही या अरण्यांतील महत्वाची, इमारती लाकूड देणारी झाडे होत. आंबा, चिंच, काजू, फणस इ. अनेक प्रकारची फळझाडेही दिसतात. कमी पावसाच्या भागात खैर, बाभूळ, बेल, कवठ, बोर, गोरखचिंच इ. झाडे दिसतात. वृक्षहीन भाग पावसाळ्यातच फक्त हिरव्या गवताने भरून जातो एरव्ही तो उजाड भासतो. काही गवताळ भाग आफ्रिकेच्या सॅव्हानासारखा असतो. ५० सेंमी. पेक्षा कमी पावसाच्या भागात जाड पानांनी निवडुंगाच्या जातीची झाडे वाढतात. समुद्र किनाऱ्याजवळ कच्छवनश्री, सुरू, नारळी, पोफळी इ. दिसतात. काही डोंगराळ भागात उंचावर पाइन, देवदार, चिनार, निलगिरी, ओक इ. वृक्ष आहेत. पाकिस्तान, भारत, बांगला देश, श्रीलंका, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, इ. शेतीप्रधान देशांत मूळची अरण्ये बरीच नष्ट झालेली आहेत. तेथे काही भागात बांबू, वेत, गवत इ. वनस्पती आढळतात. अगदी कमी पावसाच्या भागात मरुप्रदेशीय खुरट्या वनस्पती होतात.

आशिया - वनस्पती


चीन व जपान या समशीतोष्ण मोसमी हवामानाच्या प्रदेशात अरण्ये जवळजवळ नष्टच झाली आहेत. चीनमध्ये नानशान, चिनलिंग या व पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात थोडबहुत अरण्य शिल्लक आहे. तेथे रुंदपर्णी वृक्ष, काही सदाहरित वृक्ष व सूचिपर्णी वृक्ष यांचे मिश्रण आढळते. बांबू व तेल आणि रोंगण देणारी झाडेही सर्वत्र आहेत. जपानच्या दक्षिणभागात उबदार हवेतील रुंदपर्णी पानझडीवृक्ष, सदाहरित व सूचिपर्णी वृक्षांबरोबर मिसळलेले आढळतात. उत्तर भागात सूचिपर्णी व कठीण लाकडाची पानझडी झाडे आहेत. तुतीची झाडे हे चीन-जपानचे वैशिष्ट्य आहे.

 

मांचुरियाच्या विभागात स्प्रूस, सिल्व्हर फर, रेड पाइन, लार्च या सूचिपर्णी व ओक, ॲश, आल्डर, बीच इ. रुंदपर्णी वृक्षांची अरण्ये डोंगराळ भागात आहेत. सखल भागात सर्वत्र गवत आहे. मांचुरियन पाइन हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. 

तारीमखोर किंवा अरबस्थानातील रब-अल्-खली यांसारखे अगदी ओसाड प्रदेश जवळजवळ वनस्पतीरहितच आहेत. इतरत्र मरुप्रदेशीय विशिष्ट वनस्पती म्हणजे खुरटी, काटेरी झुडुपे, खुरटे गवत व मरुद्यानात खजूर व इतर पिके ही होतात.

पश्चिमेकडील भूमध्यसागरी हवामानाच्या प्रदेशात पावसाच्या प्रमाणानुरुप ऑलिव्ह, बदाम, अक्रोड, जर्दाळू, अंजीर, तुती, द्राक्षे वगैरे विशिष्ट वनस्पती होतात.

सायबीरियाचा नैर्ऋत्य भाग, मंगोलियाचे पठार व मध्य मांचुरियाचा सखल प्रदेश येथील ओसाड व निमओसाड प्रदेशांच्या सीमेवर स्टेपचा गवताळ प्रदेश आहे. याच्या दक्षिणेस उजाड वाळवंटी प्रदेश तर उत्तरेस सुपीक गवताळ प्रदेश आहे. त्याच्याही उत्तरेस सूचिपर्णी वृक्षांचा प्रदेश लागतो.

 

सायबीरियाचा थंड, समशीतोष्ण हवेचा प्रदेश सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांनी भरलेला आहे. येथील उत्तर वाहिनी नद्यांची मुखे बराच काळ गोठलेली राहात असल्यामुळे मोठमोठे प्रदेश दलदलीचे बनतात व त्यामुळे येथील वृक्षांचे लाकूड कमी प्रतीचे होते. या अरण्याचे फाटे दक्षिणेकडील डोंगराळ भागात गेलेले आढळतात. सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य उत्तरेकडे विरळ व खुरटे होत जाते. शेवटी अगदी उत्तरेकडील प्रदेश टुंड्रा प्रकारचा आहे. क्वचित् काही ठिकाणी विलो व इतर खुरटलेली झाडे दिसतात. इतरत्र शेवाळ, दगडफूल यांसारखी वनस्पती आहे. काही भाग उन्हाळ्याच्या अल्पकाळात फुलांनी बहरून जातो परंतु वर्षातून बराच काळ जमीन गोठलेलीच राहते.

प्राणी : हिमालयाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्राणी असे आशियातील प्राण्यांचे दोन वर्ग करता येतात. दक्षिण भारत, श्रीलंका, थायलंड, लाओस, ख्मेर, व्हिएटनाम व मलाया आणि इंडोनेशिया येथील अरण्यांत माकडे भरपूर आहेत तथापि आसाम, ब्रह्मदेश, आग्नेयीकडील द्वीपकल्पीय भाग व ग्रेटर सुंदा बेटे येथे गिबन, तर ओरांगउटान फक्त सुमात्रा व बोर्निओ येथे आढळतो. सिंह फक्त काठेवाडच्या सुरक्षित गीर जंगलात आहे. वाघ हिमालयापासून सुमात्रा, जावा व बालीपर्यंत आढळतो. बोर्निओ व श्रीलंकेमध्ये तो नाही. चित्ता व बिबळ्या सुमात्राखेरीज सर्व भागांत आहे, सिव्हेट व मुंगुस भरपूर आहेत. बॅजर्सपैकी रॅटेल भारताच्या डोंगराळ प्रदेशात आहे तो पश्चिमेस इस्त्राएलपर्यंत आढळतो. भारतात कोल्हे पुष्कळ आहेत. पट्टेदार तरस कोरड्या भागात दिसतो. हे दोघे पूर्वेकडील भागात दिसत नाहीत. गवा भारत व ब्रह्मदेश यांच्या डोंगराळ अरण्यात आहे. मलबारखेरीज भारतात सर्वत्र काळवीट व हरणे आढळतात. हिमालयाच्या दक्षिण भागात नीलगाय व चौशिंगा आहेत. काश्मीर, नेपाळ व सिक्कीम येथे कस्तुरीमृग आहे. सांबरही अनेक भागात आहे तसेच रानडुक्करही सर्वत्र आहेत. भारतातील एकशिंगी गेंडा फक्त नेपाळ व आसाम येथे आहे. दोनशिंगी गेंडा ब्रह्मदेश ते सुमात्रा व बोर्निओ येथे आहे. तेनासरीम, मलाया व सुमात्रा येथे तापीर आहे. भारतीय हत्ती आसाम, ब्रह्मदेश, कर्नाटक, श्रीलंका, सुमात्रा इ. अनेक भागात आढळतो. पक्ष्यांपैकी मोर हा भारतात सर्वत्र व जावात आढळतो. कबुतरे, पोपट, कावळे, चिमण्या, तित्तिर, कोकीळ, मैना, किंगफिशर, हॉर्नबिल, गरूड, घार, ससाणा, गिधाड हे पक्षी तसेच सुतार, तांबट इ. पक्षीही येथे आहेत. भारतात व सूलावेसीमध्ये रोलर आहेत. ड्राँगो, फ्लायकॅचर, बुलबुल, टेलरबर्ड, ऑरिओल, ब्रॉडबिल हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अनेक पक्षी स्थानांतर करणारे आहेत. परंतु हिमालयाच्या अडथळ्यामुळे ते उत्तरेस जाऊ शकत नाहीत. पूर्वेकडील दक्षिणोत्तर पर्वतरांगांच्या भागांतून मात्र ते जाऊ शकतात. फ्लोव्हर्स, गल, हेरॉन,  बदके, बगळे व करकोचे हेही तसेच होत. सुसरी व मगरी उत्तर भारतातील मोठ्या नद्या तसेच सुमात्रा, बोर्नियो येथे आढळतात. पाण्यातील व जमिनीवरील कासवेही सर्वत्र आहेत. खारी, सरडे, नाग, अनेक जातीचे विषारी व बिनविषारी साप, बेडूक, हे विपुल आहेत. माशांच्याही अनेक जाती समुद्रात व गोड्या पाण्यात आढळतात. कीटक, कोळी, विंचू, फुलपाखरे इ. प्राणीही भरपूर सापडतात. अपृष्ठवंशीय प्राणीही पुष्कळ आहेत.

आशिया प्राणी


टंड्रा प्रदेशात जमीन गोठलेली असल्यामुळे बिलवासी प्राणी येथे नाहीत. रेनडिअर, आर्क्टिक ससे, खोकड व लांडगे इ. प्राणी तेथे फक्त उन्हाळ्यात असतात. परंतु लेमिंग मात्र हिवाळ्यातही असतात. विलोग्राउज व टार्मिगन खेरीज बहुतेक पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे जातात. उन्हाळ्यात मात्र कीटक व पक्षी यांची गर्दी होते. ग्रे प्लोव्हर, सँडरलिंग, नॉट, सँडपायर इत्यादींची गुजराण डासांवर होते. ससाणे, स्कुआ वगैरे पक्षी लेमिंगवर गुजराण करतात. तैगा प्रदेशातील प्राणी म्हणजे तपकिरी अस्वल, लांडगा, ग्लटन, ऑटर, अर्मिन, सेबल, लिंक्स, एल्क, रेनडियर, ससा, खारी इ. होत. अनेक प्रकारचे पक्षीही विपुल प्रमाणात आहेत. नद्या सरोवरांतून मासे पुष्कळ सापडतात. स्टेपच्या गवताळ प्रदेशात जर्बोआ, मार्माट, पाइपिंगहेअर वगैरे बिलवासी

 

प्राणी पुष्कळ आहेत. अनेक प्रकारचे हरीणही गवताळ प्रदेशात राहतात. बस्टार्ड, क्वेल, ग्राउज, हॉबी इ. पक्षी आहेत. मोठ्या नद्यांतून लव्हाळे असतात. तेथे अनेक पाणपक्षी व टोळ राहतात. विशिष्ट परिस्थितीत टोळ फार मोठ्या संख्येने स्थलांतर करतात व वाटेत येतील त्या वनस्पती व पिके फस्त करून टाकतात. डोंगराळ प्रदेशात रानशेळ्या, रानमेंढ्या वगैरे असतात. तिबेटमध्ये याक आढळतो. मांचुरिया व पूर्वचीन येथे हरणांच्या विशिष्ट जाती आहेत. हिमालयातील स्नोमॅन हे अजून एक कोडेच आहे. चीनच्या मोठ्या नद्यांत मासे विपुल आहेत. आशिया मायनरमधील प्राणी इतर भूमध्यसामुद्रीप्रदेशातील प्राण्यांसारखेच आहेत परंतु इझ्राएल, सिरिया व अरबस्तान येथील प्राण्यांचे आफ्रिकेतील प्राण्यांशी साम्य आहे.

कुमठेकर, ज. व.

इतिहास व राजकीय स्थिती : आशिया हे जगातील सर्वात मोठे खंड असून त्याची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश म्हणजे सु. २०८ कोटी (१९७१) आहे. असिरियन, बॅबिलोनियन, सुमेरियन, सिंधू इ. प्राचीन अस्तंगत संस्कृत्या आणि हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्म याच खंडात उदयास आले. नैसर्गिक साधनसामग्रीची विविधता व समृद्धी या खंडात आढळते. परंतु जपानचा अपवाद सोडता सर्वच आशियाई देश अर्धविकसित आहेत. राजकीय अस्थिरता, दारिद्र्य, अज्ञान, रोगराई हे या देशांचे मोठे प्रश्न आहेत. राजकीय दृष्ट्या एकोणिसाव्या शतकापर्यंत यूरोपमधील घडामोडींवर या देशांचे भवितव्य अवलंबून होते, असे मानले जाई. विसाव्या शतकात आशिया राजकीय संघर्षांच्या केंद्रस्थानी आला आहे. परस्परविरोधी राजकीय ध्येयवाद वा विचारप्रणालींतील झगडा व यशापयश आज आशियातच ठरू पाहत आहे. आशियातील राष्ट्रांना आपल्या प्रभावक्षेत्रात ओढण्यासाठी बड्या पाश्चिमात्त्य राष्ट्रांत चुरस लागली आहे. अशा अस्थिर व बदलत्या आशियाई परिस्थितीत जागतिक सत्तासमतोलाचा प्रश्न गुंतलेला आहे.

धर्म, संस्कृती, भाषा, ऐतिहासिक परंपरा, आर्थिक व राजकीय स्थिती या घटकांच्या आधारे आशियाचे चार भाग पडतात : पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व पूर्व आशिया.

पश्चिम आशिया : तुर्कस्तान, इझ्राइल, सिरिया, लेबानन, इराक, इराण, जॉर्डन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान व इराणी आखातातील राज्ये या देशांचा समावेश पश्चिम आशियात करण्यात येतो. या विभागास मध्यपूर्व असेही संबोधण्यात येते. यूरोप व आफ्रिका या दोन खंडांना आणि भूमध्य व अरबी या दोन समुद्रांना जोडणारा पश्चिम आशिया हा एक दुवा आहे. अत्यंत प्राचीन काळापासून आशिया व यूरोप यांतील व्यापारमार्ग पश्चिम आशियातूनच जाते होते. भूमध्य समुद्र व अरबी समुद्र यांना जोडणारा सुएझचा कालवा या भागातूनच काढला आहे (१८६९). लष्करी दृष्ट्यागी पश्चिम आशियास अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच झारशाहीच्या काळापासून या भागात आपला शिरकाव करून घेणे हा रशियाच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक प्रमुख हेतू होता. याउलट राजकीय वर्चस्व आणि येथील तेलखाणी व त्यांवर अधिष्ठित असलेली अर्थव्यवस्था यांवरची आपली पकड बळकट करण्याचा ब्रिटिशांचा व फ्रेंचांचा प्रयत्न होता व अजूनही त्यांचा व अमेरिकेचा प्रयत्न आहे. अस्थिर राज्यव्यवस्था व मागासलेला समाज परंतु अत्याधुनिक तेलशुद्धाकरणाचे कारखाने, अतिसधन राज्ये पण मागासलेले लोक, असें या भागाचे काहीसे परस्परविरोधी स्वरूप आहे.

भौगोलिक दृष्ट्या या प्रदेशातील बराचसा भाग वालुकामय आहे. फक्त समुद्रकिनाऱ्याजवळ पुरेसा पाऊस पडतो. याशिवाय युफ्रेटिस, टायग्रिस व जॉर्डन नद्यांच्या खोर्‍यांत शेतीस उपयोगी जमीन आहे. तेव्हा उत्तर तुर्कस्तान, इराण आणि अफगाणिस्तान यांचे काही भाग पॅलेस्टाइन, लेबानन व उत्तर सिरियापासून इराकपर्यंतचा सुपीक अर्धचंद्राकृती भागच तेवढा मनुष्यवस्तीस पोषक आहे. परंतु हा प्रदेश तेथील समृद्ध तेलसाठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे. इराण, इराक, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, कॉटार इ. राज्यांत जगातील तीन पंचमांश तेलाचे साठे असावेत, असा कयास आहे. जगातील एक चतुर्थांश तेलाचे उत्पादन पश्चिम आशियात होते. तेल उत्पादनातील नफ्याचा अर्धा वाटा तेथील सरकारांना मिळत असला, तरी त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम फार कमी होतो. तेलाच्या उत्पादनास व शुद्धीकरणास लागणारे भांडवल, यंत्रसामग्री, उच्च श्रेणीचे तंत्रज्ञ हे बहुधा परदेशातूनच मागवले जातात आणि मिळणारा नफा तेथील राजे वा हुकूमशहा, त्यांचा परिवार व अंकित यांच्या चैनीसाठी व त्यांची सत्ता सुरक्षित ठेवणाऱ्या लष्करासाठी खर्च होतो. परंतु इझ्राएल व तुर्कस्तान यांसारखे तेलखाणी नसलेले येथील देशही औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात येथील इतर देशांपेक्षा पुढे आहेत. पश्चिम आशियातील ५६ टक्के तेलकंपन्या अमेरिकेच्या, २९ टक्के ब्रिटिशांच्या व ८ टक्के फ्रेंचाच्या मालकीच्या आहेत.

धर्म, भाषा व वंश यांबाबतीत या प्रदेशातील समाजजीवन बरेचसे एकजिनसी आहे. भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांकांचे प्रमाण प्रत्येक देशात २० टक्के किंवा त्याहूनही कमी भरेल. येथील ९५ टक्के लोक मुस्लिम आहेत. इझ्राएलमध्ये मात्र ८९ टक्के लोक ज्यू आहेत. सिरियात १३ टक्के, लेबाननमध्ये १९ टक्के व जॉर्डनमध्ये ६ टक्के लोक ख्रिस्ती धर्माचे आहेत. इराणमधील ८८ टक्के, येमेनमधील ५५ टक्के, इराकमधील ५० टक्के व लेबनानामधील १८ टक्के इस्लामी लोक शियापंथीय आहेत. इतर मुस्लीम देशांत बहुसंख्या लोक सुन्नीपंथीय आहेत. लेबानन, वायव्य इराण व इराक यांचा अपवाद वगळता इतरत्र राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. लेबाननमध्ये मात्र ख्रिस्ती व इस्लामी धर्मीयांचे प्रमाण सारखे असल्याने त्यांना राज्यकारभारात सारखा वाटा आहे. एकंदर हे लोक अरबी भाषिक व व्यापारी मनोवृत्तीचे असल्यामुळे एकात्मतेचा प्रश्न क्वचितच गंभीर बनतो. अलीकडच्या काळात इराकमध्ये ड्रूझिझ लोकांनी मात्र स्वायत्ततेसाठी चळवळ आरंभिली आहे.

गेल्या शंभर वर्षाच्या पाश्चात्त्य संस्कृतिसंपर्कामुळे या प्रदेशात अनेक मूलभूत बदल घडून आले आहेत. वाढत्या सरकारी सत्तेमुळे व सुधारलेल्या दळणवळणांच्या साधनांमुळे भटक्या जमातींचे स्वातंत्र्य नामशेष होत चालले आहे. नवीन तेलशुद्धीकरण उद्योगामुळे किंवा जलसिंचित शेतीमुळे त्यांपैकी बरेच जण स्थायिक झाले आहेत. पाश्चात्त्य शिक्षण घेतलेला व पाश्चात्त्य संस्कार झालेला एक नवीन वर्ग निर्माण होत असून तो प्रामुख्याने लष्कर, सरकारी नोकरी किंवा इतर शहरी व्यवसायांत दिसून येतो. देशातील राजकारणातही या वर्गाचा फार मोठा वाटा आहे. त्याचबरोबर ज्याला पाश्चात्त्यकरणाचे पुरेसे फायदे मिळू शकले नाहीत, असा खालच्या दर्जाचा आणखी एक शहरी मध्यमवर्ग साम्यवादी किंवा मुस्लीम ब्रदरहुड यांसारख्या पक्षांतून आपली बंडखोर प्रवृत्ती प्रकट करीत आहे.


पश्चिम आशियात या शतकातच राष्ट्रवाद दृढमूल झाला. राष्ट्रवादाची जाणीव प्रामुख्याने शहरी लोकांतच आहे. याची चार वैशिष्ट्ये अभ्यासण्याजोगी आहेत: पाश्चात्त्य राजकीय सत्ता व संस्कृती यांच्या अतिक्रमणाच्या प्रतिक्रियेतून या प्रदेशात राष्ट्रवादाचा उदय झाला. ग्रीक सत्ता व तिची यूरोपीय समर्थक राष्ट्रे यांच्याविरुद्ध तुर्कस्तानात १९१८ मध्ये मुस्तफा केमाल पाशा याच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. इराक, जॉर्डन, लेबानन इ. देशांतील राष्ट्रवादाचा रोख ब्रिटिश व फ्रेंच अधिरक्षक सत्तेविरुद्ध होता. आज इझ्राएलला साम्राज्यवादी राष्ट्रांचा विशेषत: अमेरिकेचा हस्तक म्हणूनच पश्चिम आशियात हिणविले जाते. इराणमध्ये दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश व रशियन हस्तक्षेपामुळेच राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत झाली. ही पाश्चात्त्यविरोधी भावना आजसुद्धा या भागातील शिक्षित समाजात आढळते. ब्रिटिश व अमेरिकन लष्करी तळ उठविण्याविषयीच्या मागण्या, तेल कारखान्यांचे व सुएझ कालवा कंपनीचे ईजिप्तने केलेले राष्ट्रीयीकरण (१९५६) किंवा बगदाद कराराविरुद्धची (१९५५) भावना इ. गोष्टी या पाश्चिमात्त्यविरोधी दृष्टिकोनाच्या आधारे स्पष्ट होतात.

राष्ट्रवादाच्या तत्त्वानुसार राज्यकारभारात सामान्य जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रवाद्यांना बऱ्याच देशांत तेथील राजेशाहीविरुद्ध चळवळ उभारावी लागली. तेथील सर्वसत्ताधारी राजांना पाश्चिमात्त्य देशांचा पाठिंबा असल्यामुळे किंबहुना बऱ्याच राजांना पाश्चात्य देशांनीच गादीवर बसवले असल्यामुळे या चळवळीस आणखीनच धार आली. १९२२ मध्ये तुर्कस्तानच्या सुलतानास गादीवरून काढण्यात आले. १९५२ मध्ये ईजिप्तचा राजा फेअरो, १९५८ मध्ये इराकचा राजा फैजल, १९६२ मध्ये येमेनचा राजा अल्-बद्र यांना पदच्युत करण्यात आले. इराण व जॉर्डन येथे अनेक वेळा तेथील राजांस पदभ्रष्ट करण्याचे प्रयत्न झाले. परंतु फक्त सौदी अरेबिया व अफगाणिस्तान येथेच राजांचे आसन बळकट दिसते. राजेशाही नष्ट झाली, तरी इझ्राएल व लेबानन हे अपवाद वगळता कोणत्याच देशांत लोकशाही परंपरा खोलवर रुजल्या नाहीत. त्यामुळे या राजांची जागा बहुधा एखाद्या लष्करी हुकूमशहाने किंवा सर्वसत्तावादी पक्षानेच घेतल्याचे दिसून येते.

तुर्कस्तान व इझ्राएल या राष्ट्रांना अनुक्रमे ग्रीक आणि अरब यांविरुद्ध जय मिळाला असल्याने त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे व तेथील जनतेच्या निष्ठा राष्ट्राशी एकरूप झाल्या आहेत. इतरत्र अरबांची मनोवृत्ती द्विधा राहिली. सर्व अरब एक धर्म व एक भाषा यांनी जोडलेले असले, तरी त्यांच्या देशांच्या सरहद्दी साम्राज्यवाद्यांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे अरब ऐक्याची कल्पना, तर दुसरीकडे वांशिक हेवेदावे, राजकीय व आर्थिक हितसंबंध, विचारप्रणालींतील मतभेद अशा ओढाताणीत अरब ऐक्य एक दिवास्वप्न ठरू पहात आहे.

येथील राष्ट्रवादावर व एकंदर जीवनावर धर्माची फार मोठी पकड आहे. त्यामुळेच तुर्कस्तानातील ख्रिस्ती, अरब देशांतील ज्यू किंवा इझ्राएलमधील अरब यांना त्या त्या देशांच्या राष्ट्रीय भावनेशी एकरूप होता येत नाही. बऱ्याच देशांत इस्लामी कायदा सुधारून मुलकी कायदा बनविला असला, तरीही तेथील राष्ट्रीय राजकारणात धर्माशी निगडित असलेले पक्ष वर्चस्व मिळवू पाहत आहेत. उदा., मुस्लिम ब्रदरहुड (ईजिप्त व सिरिया) फिदाइयन-इ-इस्लाम (इराण) बाथ पक्ष (इराक व सिरिया), आंतरराष्ट्रीय राजकारणातही, विशेषत: इझ्राएलविरोधी धोरणाच्या संदर्भात, धर्मभावनेस वारंवार आवाहन करण्यात येते.

पश्चिम आशियात अनेक मोठी साम्राज्ये उदयास आली. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचे साम्राज्य सातव्या शतकातील इस्लाम धर्माचा प्रणेता मुहंमद पैंगबर व त्याच्या खलीफांनी उभारले. स्पेनपासून भारताच्या सीमेपर्यंत पसरलेले हे साम्राज्य जरी तेराव्या शतकात लयास गेले, तरी इस्लाम धर्म या भागात स्थिर झाला. तेराव्या शतकानंतर तुर्कांनी ऑटोमन साम्राज्य स्थापन केले. त्यातील सुलेमान राजाचे (१५२०–६६) साम्राज्य यूरोपातील हंगेरीपासून पूर्वेस पसरले होते. पंधराव्या व सोळाव्या शतकांत पाश्चिमात्त्य देशांनी आशिया व आफ्रिकेत वसाहती स्थापन करून या साम्राज्याच्या विस्तारास बांध घातला. औद्योगिक क्रांती व बदलत्या लष्करी तंत्राच्या संदर्भात यूरोपीय देशांचे सामर्थ्य वाढीस लागले व ऑटोमन साम्राज्यास उतरती कळा आली. ईजिप्तचा गव्हर्नर मुहम्मद अली (१८०५–४९) जवळजवळ स्वतंत्र झाला. एकोणिसाव्या शतकात लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी फ्रेंच व जर्मन तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली यासाठी व औद्योगिक प्रगतीसाठी पाश्चात्त्य शिक्षणाची हळूहळू वाढ झाली. पाश्चात्त्य शिक्षण घेतलेला हा नवीन वर्ग सम्राटाच्या अधिकारावर मर्यादा घालण्याची मागणी करू लागला. यातूनच १९०६ चे तरुण तुर्कांचे बंड उद्भवले व तुर्कस्तानचे नवे संविधान बनविण्यात आले. १९११–१३ च्या बाल्कन युद्धात तुर्कस्तानने आपला यूरोपमधील भाग गमावला. पहिल्या महायुद्धात जर्मनीबरोबर तुर्कस्तानच्याही वाट्यास अपयश आले.

तरुण तुर्कांच्या बंडानंतर राष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रभावाने तुर्की भाषा शिक्षणाचे माध्यम बनली, तसेच सरकारी नोकर्‍यांत व लष्करात तुर्कांना प्राधान्य देण्यात येऊ लागले. पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी तुर्कस्तानच्या फाळणीचे मनसुबे रचले व त्यानुसार सेव्हर तह (१९२०) तुर्कस्तानवर लादण्यात आला. परंतु मुस्तफा केमाल अतातुर्क नावाच्या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तुर्कांनी उठाव केला. ऑटोमन साम्राज्याचा अंत झाला व १९२२ मध्ये तुर्की लोकसत्ताक राज्य स्थापन झाले.

पश्चिम आशियातील देशांचे आधुनिक, संक्रमणावस्थेतील व पारंपारिक असे वर्गीकरण करता येईल. तुर्कस्तान, लेबानन व इझ्राएल यांना आधुनिक राष्ट्रे म्हणता येईल. या आधुनिक देशांत लोकशाही संस्था रूढ झाल्या आहेत. औद्योगिकरण व शहरीकरण बऱ्याच प्रमाणात झालेले आहे. साक्षरता व आधुनिक दळणवळणाची साधने प्रगत अवस्थेत आहेत. लोकांच्या निष्ठा या गट, कुळ, जातीजमाती यांपेक्षा राष्ट्रांशी अधिक निगडीत आहेत.

तुर्कस्तानने १९२२ नंतर पाश्चात्त्यीकरणाचे धोरण स्वीकारले. खलीफाला काढून टाकण्यात आले. शिक्षण निधर्मी करण्यात आले. पारंपारिक इस्लामी कायद्यांची जागा दिवाणी व फौजदारी कायद्यांनी घेतली. रोमन लिपी मान्य झाली व औद्योगिकीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर तुर्कस्तानने पाश्चात्त्य राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणास पाठिंबा दिला. तो नाटो व बगदाद या करारांचा सदस्य झाला. तेथे १९६० मध्ये लष्करी बंड होऊन नवे संविधान अंमलात आले.

पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंचांनी सिरिया महादिष्ट भाग म्हणून घेतला. फोडा आणि झोडा या नीतीनुसार त्यांनी सिरियाचे दोन भाग पाडले. त्यांतील ख्रिस्ती रहिवाशांचा भाग तोडून ट्रिपोली, बेरूत व सायडन बंदरांसह भागाला लेबानन असे नाव दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर (१९४६) तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय अधिकाराची विभागणी करण्यात आली. अध्यक्ष ख्रिस्ती तर पंतप्रधान मुस्लीम, मंत्रिमंडळातील व इतर अधिकाराच्या जागा ६:५ या प्रमाणात ख्रिस्ती व मुसलमानांना द्याव्यात असे ठरले १९३२ नंतर अरबांचे लोकसंख्येतील प्रमाण वाढले व अरब ऐक्याची भावना त्यांच्यात जागृत झाली. यामुळे येथील राजकीय समतोल वारंवार ढळतो व तंग परिस्थिती निर्माण होते. १९५८ मधील अशाच एका प्रसंगी अमेरिकेने हस्तक्षेप करून ख्रिस्ती लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण केले होते. 


यूरोपीय ज्यू जमातीच्या झीअनिस्ट म्हणजे यहुदी राष्ट्रीय आंदोलनाची परिणती म्हणजे इझ्राएल राष्ट्राची निर्मिती होय. तुर्कांनी पॅलेस्टाइन जिंकल्यानंतर निर्वासित ज्यूधर्मीय लोक यूरोपभर पसरले. परंतु त्यांच्यातील राष्ट्रीयत्वाची जाणीव नाहीशी झाली नाही. त्यातूनच तेओडोर हेर्तसल (१८६०–१९०४) च्या नेतृत्वाखाली झीअनिस्ट चळवळीचा उदय झाला. पॅलेस्टाइनमध्ये जगातील सर्व ज्यू लोकांसाठी त्यांना स्वतंत्र राज्य हवे होते. १९१७ मध्ये ब्रिटिश परराष्ट्रमंत्री बॅल्फुरने पॅलेस्टाइनमधील ज्यू लोकांच्या स्वतंत्र राज्याचे उद्दिष्ट मान्य केले. महायुद्धानंतर पॅलेस्टाइन हा ब्रिटिश महादिष्ट भाग बनला, तेव्हा वरील धोरणानुसार ज्यू लोकांचे पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणावर आगमन व्हावयास लागले. हिटलरच्या ज्यूविरोधी धोरणामुळे या स्थलांतरास अधिकच गती मिळाली. १९२० पर्यंत पॅलेस्टाइनमध्ये ९० टक्के अरब होते. १९४० मध्ये हे प्रमाण ६० टक्के झाले. साहजिकच पॅलेस्टाइनच्या अरब रहिवाशांनी या धोरणाला हिंसक मार्गांने विरोध केला. १९१९ ते १९४७ या कालखंडातील पॅलेस्टाइनचा इतिहास म्हणजे ब्रिटिश, ज्यू व अरब अशा त्रिपक्षीय हिंसाचाराची कथा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९४७ मध्ये पॅलेस्टाइनची फाळणी करण्याचा उपाय सुचविला पण तो अरबांना मान्य झाला नाही. ब्रिटिशांनी १४ मे १९४८ या दिवशी पॅलेस्टाइनमधून अंग काढण्याचे ठरविले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्यू लोकांनी स्वतंत्र इझ्राएलच्या स्थापनेची घोषणा केली. त्यावेळी शेजारच्या अरब राष्ट्रांच्या सेना पॅलेस्टाइनमध्ये घुसल्या पण त्या इझ्राएलच्या मुक्तिसेनेचा पराभव करू शकल्या नाहीत. जॉर्डनने मात्र नदीच्या पश्चिमेचा अरब प्रदेश व जुने जेरूसलेम शहर जिंकून घेतले व आपल्या राज्यास जोडले. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने १९४९ मध्ये युद्धतहकुबी झाली, तेव्हा लेबाननपासून दक्षिणेस सिनाई वाळवंटापर्यंत व समुद्रकिनाऱ्यापासून ते पूर्वेस एलात बंदरापर्यंतचा भाग इझ्राएल राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. १९४९ नंतरही अरब देशांनी त्यास मान्यता दिली नाही. त्याच्या जहाजास सुएझ कालव्यातून व अकाबाच्या आखातातून जाण्यास मनाई केली. या प्रश्नावरून १९५६, १९६७ व १९७२ मध्ये पुन्हा अरब राष्ट्रांबरोबर युद्धे झाली. या युद्धांत इझ्राएलला लष्करी यश मिळाले. १९६७ च्या युद्धात सुएझपर्यंतचा भाग व जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडील भाग, गोलान टेकड्या व जुने जेरूसलेम शहर एवढा प्रांत इझ्राएलने व्यापला होता. कायम शांतता प्रस्थापित करण्यासारखी राजकीय तडजोड झाल्याशिवाय हा भाग सोडण्यास इझ्राएल तयार नाही.

अफगाणिस्तान व सौदी अरेबिया यांचा समावेश पारंपारिक देशांमध्ये करता येईल. मागासलेला समाज, भटक्या जमाती व सर्वंकष राजेशाही हे या देशांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

पश्चिम आशियातील बहुतेक देश संक्रमणावस्थेत आहेत. जुनी समाजव्यवस्था व पारंपारिक संस्था मोडत चालल्या आहेत परंतु त्यांची जागा आधुनिक संस्थांनी वा व्यवस्थेने घेतलेली नाही. राजेशाही नष्ट झाली असली, तरी पक्षपद्धतीवर आधारलेली आधुनिक सरकारे स्थिर झालेली नाहीत. सोळाव्या शतकात पश्चिम आशियाचा अरब भाग ऑटोमन साम्राज्यास जोडला गेला. पहिल्या महायुद्धापर्यंत पॅलेस्टाइन, जॉर्डन व लेबानन हे प्रदेश सिरियाचाच भाग समजण्यात येत होते. अरब राष्ट्रवादाच्या चळवळीस अरबस्तानातील हेजॅझ प्रांताचा मुख्य शरीफ हुसैन व त्याची मुले फैजल व अब्दुल्ला यांचे नेतृत्व लाभले. १९१६ मध्ये ब्रिटिशांच्या प्रोत्साहनाने हुसैनने ऑटोमन साम्राज्याशी असलेला आपला संबंध तोडला व बंड उभारले. त्याचा मुलगा फैजल सैन्यानिशी दमास्कसमध्ये दाखल झाला व त्यास सिरियाच्या नॅशनल काँग्रेसने आपला राजा म्हणून जाहीर केले. परंतु ब्रिटन व फ्रान्स यांमधील साईक्सपिको करारानुसार व १९१७ च्या ब्रिटिश परराष्ट्र मंत्री बॅल्फुरच्या जाहीरनाम्यानुसार ऑटोमन साम्राज्याच्या अरब प्रदेशाची उभारणी करण्यात आली. त्यानुसार फ्रेंचांना महादिष्ट प्रदेश म्हणून सिरिया देण्यात आला, तर पॅलेस्टाइन, ट्रान्स-जॉर्डन व इराक हे प्रदेश ब्रिटिशांनी बळकाविले. अरबस्तानमध्ये इस्लाम धर्मातील वहाबी चळवळीचा नेता इब्न सौदने शेजारच्या टोळ्यांवर व हेजॅझवर प्रभुत्व मिळविले व सौदी अरेबिया हे राज्य स्थापन झाले. फ्रेंचांनी फैजलला सिरियातून काढल्यानंतर ब्रिटिशांनी त्यास इराकचा व त्याचा भाऊ अब्दुल्ला यास जॉर्डनचा राजा केले. अब्दुल्लाच्या बेदूइन सैन्यास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. १९४८ च्या इझ्राएल-अरब युद्धात या सैन्याच्या मदतीने अब्दुल्लाने जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडचा अरब प्रांत व जुने जेरूसलेम शहर जिंकून घेतले. यामुळे जॉर्डनमध्ये ट्रान्स-जॉर्डनचे बेदूइन लोक, जॉर्डनच्या पश्चिम तटाकावरील पॅलेस्टाइनचे लोक व १९४८ च्या युद्धात पॅलेस्टाइनहून आलेले निर्वासित राहतात. त्यांच्यातील परस्परसंघर्ष तेथील राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

इराकच्या राजांनी ब्रिटिशांच्या पाठिंब्याने १९२०–५८ पर्यंत राज्य केले. १९५८ मध्ये नासेरच्या अरब-एकतेच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकांनी इराकच्या राजाविरुद्ध बंड केले व जनरल अब्दुल करीम कासिम ह्याने तेथे लष्करी हुकूमशाही स्थापन केली. १९६३ मध्ये कर्नल अब्दुल आरेफच्या गटाने सत्ता काबीज केली. त्यानंतर लष्कर आणि सनातनी बाथ पक्ष यांनी संयुक्तपणे सत्ता वापरली. १९६८ मध्ये पुन्हा बंड होऊन अहंमद हसन-अल्-बक्र हा सत्तारूढ झाला, १९६३ नंतर इराकमधील खुर्द वंशाच्या लोकांनी स्वायत्त राज्यासाठी बंड उभारले.

युद्धोत्तर काळातील सिरियाचा इतिहास हा बंडे व सत्तांतरे यांनी भरलेला आहे. त्यांत लष्करचा व डाव्या गटांचा फार मोठा वाटा आहे. सिरियास रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी व आर्थिक मदत मिळते. इराकप्रमाणे येथेही लष्कर व बाथ पक्ष यांची संयुक्त सत्ता आहे. १९५६ मध्ये सिरिया व ईजिप्तचे एकीकरण होऊन संयुक्त अरब प्रजासत्ताक निर्माण झाले. ही एकता वरवरचीच होती. १९६१ मध्ये सिरिया, संयुक्त अरब प्रजासत्ताकातून बाहेर पडला. इझ्राएलशी लढा देण्यासाठी पुन्हा आता १९७१ मध्ये ईजिप्त, लिबिया व सिरिया यांचा संयुक्त संघ स्थापन करण्यात आला होता.

येथील देशांचे वांशिक हेवेदावे (उदा., जॉर्डनविरुद्ध सौदी अरेबिया), सत्ताधारी गटास अधिकारावर राहण्यासाठी लागणारी परराष्ट्रीय मदत, येथील अर्थव्यवस्थेवर असलेली पाश्चात्त्य तेलकंपन्यांची पकड, इझ्राएलविरोधी धोरणातून व्यक्त होणारे धर्म व सकल अरबराष्ट्रवाद यांचे आवाहन व या सर्व धोरणांमुळे लष्करास मिळालेले श्रेष्ठ स्थान व त्यांच्या गरजा यांसारख्या सर्व घटकांचा परिणाम परराष्ट्रीय धोरणावर झाला व होत आहे. लेबानन, इझ्राएल, इराण, जॉर्डन, सौदी अरेबिया यांचे धोरण पाश्चात्त्य देशांस अनुकूल आहे. याउलट इराक, सिरिया या देशांत रशियाने आपला प्रभाव वाढविला आहे. तथापि सर्व अरब देशांचे परराष्ट्रीय धोरण त्यांच्या अंतर्गत परिस्थितीसारखेच चंचल व अस्थिर आहे.

दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि श्रीलंका ही राष्ट्रे आणि नेपाळ, सिक्कीम व भूतान हे हिमालयाच्या पायथ्याजवळचे देश, या सर्वांचा मिळून हा भाग होतो. लोकसंख्या व भूभाग या दोन्ही दृष्टींनी यास उपखंड ही संज्ञा सार्थ वाटते. सु. ७० कोटी लोक या प्रदेशात वास्तव्य करतात. एकट्या भारताचीच लोकसंख्या ५४·७ कोटी (१९७१) आहे. आपल्या भौगोलिक स्थानामुळे प्राचीन काळापासून भारताचा प्रभाव आजूबाजूच्या प्रदेशांवर असल्याचे आढळते. उत्तरेस असलेल्या हिमालयामुळे व दक्षिणेस असलेल्या महासागराने या उपखंडास आशियाच्या इतर भागापासून अलग केले आहे. येथील धर्म, संस्कृती, इतिहास व समाज यांच्या आगळेपणाचे रहस्य यातच आहे. हिमालयातील वायव्य खिंडीतून अनेकवेळा परकीय आक्रमणे झाली. यांतूनच उत्तर भारतात मुस्लीम राजसत्ता स्थापन झाली. 


भौगोलिक दृष्ट्या या उपखंडाचे चार भाग पडतात. भारत हा विंध्य पर्वताच्या रांगांनी विभागला आहे. तसेच अरुंद समुद्र खाडीने श्रीलंकेस या उपखंडापासून अलग केले आहे. हिमालयाच्या रांगानी नेपाळ, सिक्कीम, भूतान यांचा वेगळेपणा राखला आहे. त्यामुळे इतिहास, भाषा, वंश आणि रीतिरिवाज यांसारख्या अनेक बाबतींत हे भौगोलिक प्रदेश एकमेकांपासून भिन्न आहेत. शिवाय वायव्य भारतास परकी आक्रमणास वारंवार तोंड द्यावे लागल्यामुळे या भागावर भारताबाहेरील संस्कृतीचा बराच प्रभाव दिसून येतो. या नैसर्गिक अडचणींमुळे भारतीय उपखंडावर ब्रिटिश साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी एकछत्री राज्य स्थापन होऊ शकले नाही.

बहुविध स्वरूपाची समाजरचना हा दक्षिण आशियाचा एक विशेष मानता येईल. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक वंश, अनेक जातीजमाती या व इतर अनेक घटकांनी समाजात वैविध्य आणले आहे. एकट्या भारतात १४ राष्ट्रीय भाषा संविधानाने मान्य केल्या आहेत. पाकिस्तानच्या पुश्तू, पंजाबी, उर्दू, सिंधी व बलुची ह्या प्रमुख भाषा आहेत, तर श्रीलंकेत सिंहली व तमिळ भाषिक लोक बहुसंख्य आहेत. भारतात व नेपाळात हिंदू, पाकिस्तानात व बांगला देशात मुसलमान व श्रीलंकेत बौद्ध लोक बहुसंख्य आहेत. इस्लाम, ख्रिस्ती, जैन, बौद्ध, पारशी व शीख हे भारतातील हिंदू धर्माहून इतर महत्त्वाचे धर्म आहेत. श्रीलंकेत व बांगला देशात हिंदू व ख्रिस्ती अल्पसंख्य जमाती आहेत. याशिवाय प्रत्येक धर्मात अनेक पंथ, संप्रदाय व जाती अस्तित्वात आहेत. ऑस्ट्रेलॉइड, द्रविड, आर्य, मंगोल इ. अनेक वंशांचे येथे मिश्रण झाले आहे. समाजशास्त्रज्ञांच्या मते भारताच्या प्रत्येक भाषिक भागात ४०० च्या वर जाती आहेत. या प्रत्येक घटकाच्या लोकांचा परस्परांतील वाढता संघर्ष हे येथील राजकारणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.

अनेक मोठ्या नद्या असलेला हा प्रदेश शेतीप्रधान आहे. भारतात ४९ टक्के जमीन शेतीस योग्य आहे. पाकिस्तानात (बांगला देशासह) हे प्रमाण २६·१ टक्के होते. परंतु दरवर्षी २·५ टक्क्यांनी वाढणारी लोकसंख्या व पारंपारिक शेतकी लक्षात घेता शेतीचे उत्पादन अपुरे पडते. भारतात २९.३४ टक्के, श्रीलंकेत ५८ टक्के, पाकिस्तानात १२·७ टक्के तर बांगला देशात १७·६ टक्के लोक साक्षर आहेत. भारतातील १९·८७ टक्के लोक शहरी भागात राहतात. पाकिस्तानात व बांगला देशात हे प्रमाण अनुक्रमे २२·५ टक्के व ५·२ टक्के आहे. बांगला देशाचे अर्थकारण ताग व चहाच्या उत्पादनावर, तर श्रीलंकेचे चहा, रबर व नारळांच्या बागांवर अवलंबून आहे. भारतात मात्र चहा-कॉफीव्यतिरिक्त लोखंड, दगडी कोळसा, मँगेनीज, अभ्रक, तेल, थोरियम इ. औद्योगिकीकरणास लागणारे खनिज पदार्थ पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. परंतु त्यांचा योग्य तितक्या प्रमाणात अद्याप उपयोग केला जात नाही. त्यामुळे अद्याप भारतात पुरेसे औद्योगिकीकरण झालेले नाही. दरडोई उत्पन्न भारतात फक्त ६९७ (१९६९) तर पाकिस्तानचे ३८२ (१९६९) रुपये होते. लोकसंख्येची वाढ इतकी मोठी आहे, की नियोजनपूर्वक आर्थिक प्रगती झाल्यानंतरही आर्थिक वाढीचे प्रमाण ४·६ टक्केच राहिले आहे. वाढते दारिद्र्य अज्ञान, सामाजिक कलह व या सर्व कारणांनी निर्माण होणारी राजकीय अस्थिरता हे या भागाचे प्रमुख प्रश्न आहेत.

भारताच्या काही भागात प्राचीन काळी काही गणराज्ये अस्तित्वात असली, तरी बहुतेक ठिकाणी राजेशाहीच प्रभावी होती. परंतु राजाच्या अधिकारावर सभा, समिती, जातिव्यवस्था, ब्राह्मणवर्ग, मंत्रिमंडळ, राजधर्म इत्यादींनी मर्यादा घातल्या होत्या. प्राचीन भारतात धर्मसंस्था व राज्यसंस्था एकमेकीपासून अलग होत्या. हिंदुधर्माचाच प्रसार करणे हे राज्याचे उद्दिष्ट नव्हते. हिंदुराज्ये ही बहुधा धर्मसहिष्णू होती.

इस्लाम धर्म जरी भारतात प्रथम अरब व्यापारांनी आणला, तरीही त्याचा प्रसार मुख्यत्वेकरून मुसलमानी सत्ता स्थापन झाल्यानंतरच झाला. जवळजवळ ७०० वर्षे मुसलमान राज्यकर्त्यांनी भारताच्या लहानमोठ्या भागांवर राज्य केले. या काळात सत्तेची जबरदस्ती, धन वा प्रतिष्ठेचा लोभ यांच्या योगाने अनेक लोकांनी मोठ्या संख्येने धर्मांतर केले. बऱ्याच इस्लामी राजांच्या धर्मांतरासंबंधीच्या आक्रमक धोरणामुळेही असा प्रकार घडून आला. इस्लामी राजांच्या असहिष्णू धोरणाने हिंदूंची मने एकंदर इस्लामी धर्म व लोक यांविषयी कलुषित झाली. मोगल साम्राज्याच्या सुरुवातीस हिंदूंच्या भक्तिधर्माने इस्लामी धर्म-विचारांवर बरीच छाप पाडली होती. हिंदू मुस्लिम विचारांचा हा समन्वय औरंगजेबाच्या कडव्या सनातनी धोरणामुळे टिकाव धरू शकला नाही. भारतीय वास्तू, शिल्प, संगीत, चित्रकला, भाषा, साहित्य इत्यादींवर या काळातील मुस्लिम राजवटींचा बराच मोठा प्रभाव दिसून येतो.

श्रीलंकेतील सिंहली लोक ३,००० वर्षांपूर्वी बंगालच्या भागातून तेथे आले असावेत. त्यानंतर ११ ते १३ व्या शतकांत दक्षिण भारतातील तमिळ राजांनी केलेल्या आक्रमणामुळे त्यांना मध्य व दक्षिण भागात सरकावे लागले. उत्तर व पूर्व लंकेत तमिळ लोकांचे वास्तव्य आहे. तमिळ व सिंहली लोकांच्या ऐतिहासिक संघर्षाचा हा वन्ही अजूनही विझलेला नाही.

भारतात व श्रीलंकेत ब्रिटिशांनी हळूहळू आपला अंमल बसविला. दीडशे वर्षाच्या ब्रिटिश वसाहतवादाचे भारतावर व श्रीलंकेवर फार दूरगामी परिणाम झाले. श्रीलंका व भारत प्रथमच एकछत्री अंमलाखाली आले. भारताच्या चतुःसीमा ब्रिटिशांनीच ठरवल्या. संपूर्ण देशात कायम स्वरूपाची सुरक्षितता व सुव्यवस्था निर्माण झाली. प्रशासनासाठी ब्रिटिशांनी नोकरशाहीची एक पोलादी चौकट उभी केली. पारंपरिक शिक्षणाऐवजी पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण व तेही इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात आले. हे शिक्षण घेतलेला आणि पाश्चात्त्य विचार व मूल्ये अंगी बाणलेला एक नवीन वर्ग भारतात व श्रीलंकेत निर्माण झाला. या दोन्ही देशांत राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व याच वर्गाने केले.

इंग्रजांनी भारतात व श्रीलंकेत हळूहळू लोक प्रातिनिधिक शासनसंस्था स्थापण्यास सुरुवात केली. स्वायत्त राज्यकारभाराची जबाबदारी क्रमशः शिक्षित वर्गावर टाकण्यात आली. या ऐतिहासिक प्रक्रियेतूनच भारत व श्रीलंका यांत संसदीय लोकशाहीचा पाया घातला गेला. अर्धे शतक अशा प्रकारची सरकारी यंत्रणा राबविण्याच्या या अनुभवामुळेच भारतात व श्रीलंकेत इतर देशांपेक्षा लोकशाही शासन अधिक बळकट होऊ शकले.

इंडियन नॅशनल काँग्रेस (१८८५) व सीलोन नॅशनल काँग्रेस (१९१९) या संस्थांच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून वेळोवेळी ब्रिटिश सरकारने शासन सुधारणाविषयक कायदे (उदा., १९०९, १९१९, १९३५ इ.) संमत केले. या कायद्यांनी भारतीय काँग्रेसचे समाधान झाले नाही. त्यामुळे सत्याग्रह, असहकार, कायदेभंग अशा मार्गांनी स्वातंत्र्याची चळवळ वाढत गेली. स्वातंत्र्यलढ्याच्या ओघात काँग्रेसमध्ये दोन महत्त्वाचे बदल घडून आले : (१) राष्ट्रीय चळवळ शिक्षित मध्यमवर्गापुरती मर्यादित न राहता मजूर, शेतकरी व तेल्यातांबोळ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे ती केवळ राजकीय प्रश्नांशीच जखडलेली न राहता, तिने सामाजिक व आर्थिक समस्यांकडे लक्ष वळविले. श्रीलंकेत मात्र राष्ट्रीय चळवळ सनदशीर मार्गास चिकटून राहिली. त्यामुळे राजकारणावरील शिक्षित मध्यमवर्गाचा पगडा टिकून राहिला. (२) राष्ट्रीय चळवळीतील मुसलमान नेत्यांस त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल काळजी वाटू लागली. पाश्चात्त्य शिक्षणाच्या संधीचा पुरेसा फायदा न घेतल्यामुळे हिंदूंच्या मानाने मुसलमान समाज सरकारी नोकऱ्यांत, व्यवसायांत व उद्योगधंद्यांत तसेच इतरही क्षेत्रांत मागे पडला होता. लोकशाहीत हिंदूंच्या बहुमतापुढे आपला निभाव लागणार नाही, या भीतीने त्यांना झपाटले म्हणून त्यांनी स्वायत्त लोकशाहीच्या स्थापनेस विरोध केला व त्यानंतर असे सरकार स्थापन झाल्यास अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून खटपट केली. यातूनच पुढे मुस्लिम लीगचा जन्म झाला (१९०६). जसजशी स्वराज्यप्राप्तीच्या मार्गात पुढची पावले टाकण्यात आली, तसतशी लीगच्या मागण्यांनी उग्र स्वरूपे धारण केली. इंग्रजांनी या फुटीर वृत्तीस उत्तेजन दिले.


काँग्रेसने १९३७ च्या प्रांतिक मंत्रिमंडळात लीगला स्थान न दिल्याने व लीग ही मुस्लिमांची एकमेव प्रातिनिधिक संस्था आहे, हे अमान्य केल्याने, लीगने १९४० च्या लाहोर येथील मेळाव्यात फाळणीची व पाकिस्ताननिर्मितीची मागणी केली. धर्मभावनेस आवाहन केल्यामुळे व जातीय दंग्यांनी निर्माण केलेल्या असुरक्षित परिस्थितीमुळे युद्धोत्तर प्रांतिक निवडणुकांत लीगला मुस्लिम लोकवस्तीच्या प्रदेशात बरेच यश मिळाले व भारताची फाळणी अनिवार्य ठरली. १९४७ मध्ये भारतास व नंतर १९४८ मध्ये श्रीलंकेसही स्वातंत्र्य मिळाले.

फाळणीनंतर भारतात सु. १० टक्के मुसलमान व पाकिस्तानात १३ टक्के हिंदू अल्पसंख्याक म्हणून उरले. भारताने धर्मनिरपेक्ष राज्यपद्धती स्वीकारून संविधानात अल्पसंख्यांकांच्या हिताच्या रक्षणाची तरतूद केली आहे. पाकिस्तानचा जन्मच मुळी धर्माच्या अधिष्ठानावर झाल्यामुळे तेथील राजकारणावर आणि परराष्ट्रीय धोरणावर धर्माचा पगडा आहे. पाकिस्तान इस्लामी राज्य बनले. श्रीलंकेत सुरुवातीस भारताप्रमाणे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन झाले, परंतु १९५६ नंतर तेथील राष्ट्रवादास जातीयतेचे वळण लागले व १९७२ च्या नव्या संविधानात बहुसंख्यांकांच्या बौद्ध धर्मास राष्ट्रीय धर्माचे स्थान देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत, पाकिस्तान व श्रीलंका यांनी संसदीय लोकशाही स्वीकारली. भारतात व श्रीलंकेत आतापर्यंत अनुक्रमे पाच व सात वेळा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. पाचही निवडणुकांत काँग्रेस पक्षाने आपले बहुमत सिद्ध केले व १९४७ पासून सतत याच पक्षाचे केंद्रीय सरकार भारतात आहे. श्रीलंकेत मात्र १९५६ मध्ये डडली सेनानायकेच्या युनायटेड नॅशनल पक्षाने आपले बहुमत गमावले व त्यानंतर १९६५–७० हा काळ सोडल्यास सिरिमाओ बंदरनायकेचा श्रीलंका फ्रीडम पक्षच अधिकारावर आहे. श्रीलंकेत हे दोन पक्षच प्रमुख आहेत. पाकिस्तानात मात्र प्रथमपासून १९७० पर्यंत निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. काँग्रेससारखा लीग हा सुसंघटित पक्ष नसल्याने व त्याच्या दुर्बल नेतृत्वामुळे लीग शक्तिहीन बनली. १९५४ नंतर हळूहळू सत्तेचे राजकीय पक्षाकडून लष्करी अधिकाऱ्यांकडे हस्तांतर झाले. १९५८ मध्ये जनरल आयूबखानाने औपचारिकपणे लष्करी हुकूमशाही जाहीर केली. १९६० मध्ये जरी नियंत्रित लोकशाही अंमलात आली, तरीही खरी सत्ता लष्कराकडेच राहिली. १९६९ मध्ये आयूबखानास अध्यक्षपद सोडावे लागले. त्यानंतर याह्याखानाच्या हाती सर्व सत्ता केंद्रित झाली. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील पराजयानंतर मात्र पाकिस्तानी लष्करास दुय्यम स्थान मिळून राजकीय पक्ष पुन्हा डोके वर काढू पहात आहेत. नव्या संविधानाप्रमाणे झुल्फिकार अली भुट्टो हे पंतप्रधान आहेत.

येथील देशांपुढे प्रामुख्याने तीन प्रश्न आहेत: (१) आर्थिक प्रगती (२) आधुनिकीकरण (३) राष्ट्रीय एकात्मता.

पहिल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी भारताने पंचवार्षिक योजनांचा अवलंब केला आहे. १९५० नंतरच्या चार योजनांच्या कालखंडात भारताने बरीच औद्योगिक प्रगती केली आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ८,६५० (१९४८-४९) वरून २७,९३० कोटी रुपये (१९६८-६९) इतके वाढले आहे (हे आकडे चालू किंमतींवर आधारित आहेत). शेती-तंत्रात सुधारणा करून हरित क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तान, बांगला देश व श्रीलंका येथे मात्र औद्योगिकीकरणास मर्यादित स्वरूपाचा वाव आहे. त्यांचा भर रोजच्या व्यवहारोपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्यावर आहे.

आधुनिकीकरणासाठी शिक्षण व नागरिकीकरणावर भर दिला जात आहे. रेडिओ, वृत्तपत्रे इ. बहुजन माध्यमांचा उपयोग केला जात आहे. भारतात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी अस्पृश्यता हा कायद्याने गुन्हा मानण्यात आला आहे. अनुसूचित जातीजमातींसाठी विशेष शैक्षणिक व आर्थिक सवलती उपलब्ध आहेत. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारने समाजवादी समाजरचनेचे उद्दिष्ट मान्य केले आहे. त्यानुसार शेतीमालकीची व शहरी संपत्तीची कमाल मर्यादा ठरविण्याचे व महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. याउलट पाकिस्तानात खाजगी उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्यात आले आहे. तेथील उद्योगधंदे केवळ २२ कुटुंबांच्या हाती आहेत. १९७२ मध्ये मर्यादित प्रमाणात काही उद्योगांचे राष्ट्रीयीकरण व जमीनसुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. बांगला देश व श्रीलंका यांचा कल समाजवादी धोरणाकडे आहे.

या तिन्ही देशांत भाषावाद, प्रांतवाद व जातीयता या मोठ्या समस्या ठरल्या. महंमद अली जिना हयात असतानाच पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी बंगाली भाषेस राजभाषेचे स्थान मिळावे, म्हणून आंदोलन उभारले होते. पूर्व पाकिस्तानास आपल्या बंगाली बहुमताचा फायदा मिळू नये, म्हणून प्रयत्न करण्यात आले आणि पश्चिम व पूर्व पाकिस्तानास संसदेत समान प्रतिनिधित्व देण्यात आले. नोकरशाही व लष्करी अधिकारी या दोन राज्यकर्त्या गटांत पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांना १५ टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व कधीच मिळाले नाही. याचा परिणाम म्हणून पूर्व-पश्चिम विभागांतील आर्थिक विषमता वाढत गेली. पूर्व भाग पश्चिमी भागाची जवळजवळ वसाहत बनला. याला अनुलक्षूनच अवामी लीगने स्वायत्ततेची मागणी केली. १९७० च्या निवडणुकीत बंगाली लोकांनी अवामी लीगला भरघोस पाठिंबा दिला.पण याह्याखानाच्या लष्करी सरकारने बळजबरीने राज्य करण्याचा प्रयत्न केला. अवामी लीगच्या अनुयायांचा छळ केला व जनतेवर अत्याचार केले. जवळजवळ एक कोटी लोक भारतात निर्वासित म्हणून आले. याची प्रतिक्रिया म्हणून अवामी लीगने बांगला देशाचे स्वातंत्र्य जाहीर केले. बांगला देशाच्या सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यास भारताने सर्वतोपरी साहाय्य केले. यातूनच भारत-पाक युद्ध उद्भवले व पाकिस्तानाचा पूर्व विभागात पराभव होऊन बांगला देश स्वतंत्र झाला (१९७१). पाकिस्तानच्या इतर भाषिक भागांतही –उदा., वायव्य प्रांत, सिंध, बलुचिस्तान– स्वायत्ततेची मागणी केली जात आहे. १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तानची चार भाषिक प्रांतांत पुनर्रचना करण्यात आली. त्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न हा पाकिस्तानातील एक ज्वलंत प्रश्न आहे.

श्रीलंकेतही तमिळ लोक व सिंहली लोक यांच्या परस्परसंबंधाचा प्रश्न अत्यंत क्लिष्ट झाला आहे. १९५६ नंतर बंदरनायके यांच्या पक्षाने सिंहली भाषेचे व बौद्ध धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ठरविले. त्यास प्रत्युत्तर म्हणून तमिळ फेडरल पक्षाने तमिळ लोकांसाठी वेगळा स्वायत्त प्रांत मिळावा म्हणून मागणी केली. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी श्रीलंकेत अनेक वेळा आणीबाणी जाहीर करण्यात आली व लोकशाही हक्कांवर बंधने घालण्यात आली. १९७२ च्या नव्या संविधानात सिंहली भाषाच एकमेव राजभाषा व बौद्धधर्म हा राष्ट्रीय धर्म मानण्यात आला. तमिळ पक्षाने संविधान समितिवर बहिष्कार टाकला व संविधान अमान्य केले. श्रीलंकेत लोकशाही असल्याने या प्रश्नावर तडजोड होण्याची शक्यता दिसते.

भारतातही १९५४ नंतर भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न उफाळून वर आला. १९५६ मध्ये भारताची भाषावार पुनर्रचना करण्यात आली तरी पण प्रांताप्रांतांत सीमा तंटे व नदीच्या पाणीवाटपाचे तंटे निर्माण झाले. काही वन्य भागांत तेथील लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली. ईशान्य भारतात नागा व मिझो लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली. ईशान्य भारतात नागा व मिझो लोकांनी यासाठी सशस्त्र उठाव केला. भारताने साम व दंड या दोन्ही मार्गांचा अवलंब करून ही चळवळ मोडून काढली. नागा व मिझो लोकांसाठी स्वायत्त प्रदेश निर्माण केले. इतर प्रांतांतही (उदा., तमिळनाडू) प्रादेशिक स्वायत्ततेची जोरदार मागणी केली जात आहे.


आंतरराष्ट्रीय राजकारणात दक्षिण आशियास त्याच्या भौगोलिक स्थानामुळे महत्त्व आहे. परंतु भारत-पाक यांच्यातील तंट्यामुळे परकी देशांना हस्तक्षेप करण्यास वाव मिळाला. जम्मू आणि काश्मीर राज्यावरून दोन्ही देशांत १९४८ मध्ये युद्ध भडकले. काश्मीरच्या महाराजांनी व तेथील लोकप्रिय नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने भारतात विलीन होण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानला मानवला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली व सार्वमत अजमावण्याचे ठरले परंतु अनेक लहानसहान मतभेदांवरून व पाकिस्तानने व्याप्त प्रदेशामधून आपले सैन्य काढून न घेतल्याने सार्वमत घेण्यात आले नाही. १९५४ नंतर पाकिस्तान पाश्चात्य लष्करी संरक्षण संघटनांचा सभासद झाला आणि अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर त्याने शस्त्रास्त्रांची मदत मिळविली. त्यामुळे भारत-पाक संबंधास वेगळीच कलाटणी मिळाली. इस्लामी तत्वप्रणालीमुळे पाकिस्तानचा ओढा पश्चिम आशियाकडे जास्त आहे. इराण व तुर्कस्तान यांच्याशी निकटचे आर्थिक संबंध स्थापन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर, पाकिस्तान चीनचा मित्र बनला. १९६५ मध्ये पुन्हा एकदा काश्मीर जिंकण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला. १९७१ मधील बांगला देशच्या पेचप्रसंगातून उद्भवलेल्या युद्धात त्याचा पराभव झाला. तरीसुद्धा चीन व अमेरिकेच्या मदतीने भारतास विरोध आणि भारताच्या लष्करी सामर्थ्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने सोडला नाही. तथापि जून १९७२ मध्ये झालेल्या सिमला करारानुसार उभय देशांनी सर्व वादग्रस्त प्रश्न प्रत्यक्ष वाटाघाटीने सोडवावेत व शांततेस धोका निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई करू नये असे ठरले आहे. त्यानुसार १९७४ मधील भारत, बांगला देश व पाकिस्तान यांच्यात यशस्वी वाटाघाटी होऊन पाकिस्तानने बांगला देशास मान्यता दिली.

भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि श्रीलंकेने १९५६ नंतर अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. बड्या राष्ट्रांत मध्यस्थी करून जागतिक शांतता घडवून आणण्याचा प्रयत्न नेहरू सरकारने केला. भारताने पाश्चात्त्य वसाहतवाद व साम्राज्यवाद यांस कडवा विरोध करून आशियातील राष्ट्रवादास पाठिंबा दिला. यामुळे रशियाशी मैत्रीचे संबंध स्थापण्यास मदत झाली. एकंदरीत भारत व श्रीलंकेचे परराष्ट्रीय धोरण रशियाकडे कलले आहे.रशियाने काश्मीर प्रश्नावर व चीन आणि पाकिस्तान यांच्याशी झालेल्या संघर्षात भारताला पाठिंबा दिला. यामुळे भारत-रशिया मैत्री जास्तच दृढ झाली आणि तिचे पर्यवसान १९७१ मधील २० वर्षांच्या मैत्रीच्या औपचारिक करारात झाले. चीन व भारत यांच्यातील मैत्रीचे संबंध १९५९ नंतर बिघडले. चीनने भारताच्या सरहद्दीवरील बराच भाग आपला असल्याचा दावा केला व अक्साई चीन हा लडाखमधील भाग व्यापला. या प्रश्नावरून १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले. चीनने केलेल्या पाकिस्तानच्या पाठपुराव्यामुळे हे संबंध अधिकच दुरावले आहेत. एकंदर या प्रदेशातील राष्ट्रांच्या परराष्ट्रनीतीवर चीनचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो.

आग्नेय आशिया : ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, ख्मेर प्रजासत्ताक, दक्षिण व उत्तर व्हिएटनाम, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया व फिलिपीन्स या देशांचा समावेश आग्नेय आशियात करण्यात येतो. हा प्रदेश जरी यूरोपइतका मोठा असला, तरी याची लोकसंख्या सु. २० कोटी होती. यातील फक्त इंडोनेशियाचीच लोकसंख्या १० कोटींहून अधिक आहे. इतर देशांची लोकसंख्या त्यांच्या विस्ताराच्या मानाने अत्यंत कमी आहे. येथील बहुतेक भाग दाट अरण्यांनी व्यापलेला आहे. शेतीस उपयोगी पडणारी जमीन १६ ते २० टक्केच आहे. असे असले तरी सर्वसाधारणपणे हा प्रदेश कृषिप्रधान आहे, असेच म्हणता येईल एवढेच नव्हे, तर अन्नधान्याची निर्यात करणारा हा आशियातील एकमेव प्रदेश आहे. भात व लाकूड यांशिवाय जगातील ९० टक्के नैसर्गिक रबर, ५३ टक्के कथिल व ७५ टक्के खोबऱ्याचे उत्पन्न या प्रदेशातच होते. ब्रह्मदेशात व इंडोनेशियात तेलाच्या खाणीही आहेत. येथील देशांचे अर्थकारण विकसित देशांस केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मलेशिया व फिलीपीन्समध्ये औद्योगिकीरणाच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. परंतु अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याने व लोकसंख्या कमी असल्याने येथील लोकांचे दरडोई उत्पन्न भारताच्या व चीनच्या तुलनेने कितीतरी पटींनी अधिक आहे.

बौद्धधर्म हा या प्रदेशातील प्रमुख धर्म आहे. मलेशियात आणि इंडोनेशियात मात्र मुसलमान बहुसंख्य आहेत. फिलिपीन्समध्ये ९३ टक्के (१९६९) लोक ख्रिस्ती होते. या प्रदेशातील वांशिक विविधता लक्षात घेण्याजोगी आहे. मलेशियात ५० टक्के लोकच मलेय आहेत. या देशातील ३९ टक्के लोक मूळचे चिनी, तर ९ टक्के मूळचे भारतीय आहेत. ब्रह्मदेशातसुद्धा ९ टक्के लोक मूळचे भारतीय, ५ टक्के लोक चिनी व ७ टक्के इतर वंशाचे आहेत. इतर देशांतील समाजही असेच बहुजिनसी आहेत. शिवाय यांतील बऱ्याच देशांना स्वतंत्र राष्ट्र या नात्याने प्रथमच अस्तित्व लाभले आहे. त्यामुळे एकसंध राष्ट्रीयत्वाची जाणीव येथील लोकांत निर्माण करणे, हा येथील नेत्यांपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे.

हा प्रदेश जागतिक सागरी व्यापारमार्गावर असल्यामुळे येथे अनेक संस्कृतींचे मिश्रण झाले आहे. भारत व चीनच्या सान्निध्यामुळे येथील पारंपारिक संस्कृतीवर या दोन्ही देशांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. चीनचा प्रभाव इतर भागांच्या तुलनेने इंडोचायनात (लाओस, ख्मेर प्रजासत्ताक व व्हिएटनाम) जास्त आहे. भारतीय प्रभाव प्रामुख्याने धार्मिक-सांस्कृतिक आहे. या प्रभावामुळेच जावामधील शैलेंद्र (७८२–१४७४) व मजपहीत (१२९४–१५२०), सुमात्रा बेटावरील श्रीविजय (सु.४००–८००), जुन्या कंबोडियातील ख्मेर (५५०–१२९५) व अंकोर (८०१–१४३२), ब्रह्मदेशातील पेंगू (१२८७–१५३९) इ. राज्ये स्थापन झाली. परंतु ही राज्ये सुसंघटित होती, असे दिसत नाही. सामाजिक वा आर्थिक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. आग्नेय आशियातील आजच्या राज्ययंत्रणेचे स्वरूपही काहीसे दुर्बळ आहे. या राज्यांत बहुजनसमाज व राज्यकर्ता वर्ग यांच्यात बरीच तफावत होती. भारतीय संस्कृतीचा पगडा राज्यकर्त्या वर्गावर विशेषेकरून होता. अशाच प्रकारची तफावत ग्रामीण बहुजनसमाज व पाश्चात्त्य संस्कृतीने भारलेला नागरी वर्ग यांत आजही दिसून येते.

पाश्चात्त्य जगाशी धर्मप्रसार व व्यापार या कारणांनी सोळाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचा संबंध आला. त्याचा फिलिपीन्समधील समाजावर विशेष परिणाम झाल्याचे दिसून येते. स्पॅनिश लोकांनी या देशात ख्रिस्ती (कॅथलिक) धर्म व सरंजामशाही आणली. एकोणिसाव्या शतकात या प्रदेशात खऱ्या वसाहतवादाची सुरुवात झाली. ब्रह्मदेश, मलाया, सिंगापूर, उत्तर बोर्निओ यांचा ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्यात अंतर्भाव केला. इंडोनेशिया ही डच लोकांची वसाहत होती, तर इंडोचायनावर फ्रान्सचे राज्य होते. फिलिपीन्स बेटे अमेरिकेने १८९८ मध्ये स्पेनकडून जिंकून घेतली. येथील समाजावर व अर्थकारणावर वसाहतवादाचे दूरगामी परिणाम झाले आहेत. या चारही साम्राज्यवादी देशांनी निरनिराळी धोरणे स्वीकारली. ब्रिटिशांनी कार्यक्षम प्रशासनासाठी जुनी यंत्रणा मोडून तिच्या जागी नवी नोकरशाही आणली समान कायदे व प्रमाणबद्ध करपद्धती अंमलात आणली व पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीची सुरुवात केली. हे शिक्षण घेतलेल्या लोकांतच प्रथम राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली. क्रमाक्रमाने या देशांत राजकीय सुधारणा अंमलात आल्या. लोकशाही प्रातिनिधिक संस्था उदयास आल्या. उदा., ब्रह्मदेशात १९११ मध्ये द्विदल राज्यपद्धती अंमलात आली, तर १९३७ मध्ये सर्व प्रौढ पुरुषांना मतदानाचा हक्क देण्यात आला. अशा रीतीने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच राजकीय पक्ष, नेते व लोकशाही संस्था निर्माण झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात या लोकशाही पद्धतीचाच आदर्श तेथील नेत्यांनी आपल्या समोर ठेवला.


याउलट डच लोकांनी इंडोनेशियातील पारंपारिक अधिकारी वर्ग व त्याचे स्थान कायम ठेवून त्यांच्या साहाय्यानेच राज्य केले. तसेच पारंपारिक कायदा, रूढी, कुळांचे व गावांचे हक्क यांसारख्या सर्वच जुन्या गोष्टी जतन केल्या. पाश्चात्त्य शिक्षण फक्त मर्यादित स्वरूपात उच्च वर्गीयांना उपलब्ध झाले. या धोरणामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात इंडोनेशियन लोकांपुढे राज्यपद्धतीचा कोणताही स्पष्ट आदर्श नव्हता. राजकीय संस्थांबाबतही एक प्रकारचे अनिश्चिततचे वातावरण तेथे आढळते.

१८६२ ते ८४ च्या दरम्यान लाओस, कंबोडिया व व्हिएटनाम फ्रान्सच्या ताब्यात आले. इंडोचायनात, विशेषत: व्हिएटनाममध्ये, फ्रेंच संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डच लोकांनी इंडोनेशियन पारंपरिक संस्कृती कृत्रिम वातावरणात जतन करण्याचा प्रयत्न केला, तर फ्रेंचांनी यूरोपीय संस्कृतीचीच इंडोचायनात कृत्रिमपणे जोपासना केली.

अमेरिकेने सुरुवातीपासून स्वातंत्र्याचे उद्दिष्ट फिलिपीन्सच्या लोकांपुढे ठेवून पक्षस्थापनेस व राजकीय नेतृत्वास उत्तेजन दिले. १९०७ मध्ये लोकनिर्वाचित विधानसभेची स्थापना झाली. १९३७ मध्ये फिलिपीन्सला स्वायत्त संस्थानाचा दर्जा मिळाला व दहा वर्षांनी स्वातंत्र्य देण्याचे अभिवचन देण्यात आले. राजकीय नेतृत्वास मिळालेल्या या प्राधान्यामुळेच इतर कुठल्याही आग्नेय आशियाई देशांपेक्षा फिलिपीन्समध्ये लोकशाहीचे आसन अधिक स्थिर आहे. याउलट इतर देशांत राजकीय नेत्यांपेक्षा सरकारी अधिकारी वर्गास महत्त्व दिल्याने स्वातंत्र्योतर काळातसुद्धा राजकीय नेत्यांच्या मनात नोकरशाहीबद्दल एक प्रकारची अढी राहिली आणि कार्यक्षम प्रशासनास व नोकरशाहीस दुय्यम स्थान मिळाले.

पाश्चात्त्यांच्या आशियातील साम्राज्यस्पर्धेतून थायलंड बचावला. फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींच्या परिसरातील एक राज्य म्हणून त्यास मान्यता मिळाली. वसाहतवादाचा धोका टाळण्यासाठी तेथील राजांनी अनेक सुधारणा अंमलात आणल्या. पारंपारिक सरदार वर्गाचे आधुनिक नोकरशाहीत रूपांतर झाले. राजाचे अनियंत्रित अधिकार कमी झाले व सत्ता लष्करी अधिकारी, नोकरवर्ग व परदेशी शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी यांच्या हातात गेली. या तीनही वर्गांवर पाश्चात्त्य संस्कृतीचा फारसा परिणाम झाला नाही किंवा पारंपरिक राज्यव्यवस्थेत खंड पडला नाही त्यामुळे लोकशाही पद्धतीबद्दल येथे इतर देशांइतकी ओढ नाही व पाश्चात्त्य देशांबद्दल आकसही नाही.

या प्रदेशाशी पाश्चात्त्य देशांचा संबंध व्यापाराच्या संदर्भात आल्यामुळे येथील शहरे व्यापाराची व प्रशासनाची केंद्रे बनली. उद्योगधंद्यांसाठी निर्माण झालेली शहरे कमी आहेत. बुद्धिजीवी व शिक्षित वर्ग शहरातच राहतो. शहरी जीवनाच्या आकर्षणाने ग्रामीण भागातून शहरांकडे बरेच स्थलांतर होत असले, तरी या सर्वांना आर्थिक जीवनात सामावून घेण्याची ताकद शहरांत नाही. पाश्चात्त्य शिक्षण घेतलेला व ग्रामीण भागातून आलेला बेकार असे दोन शहरी वर्ग या देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे भागीदार आहेत.

या प्रदेशाच्या परंपरेत व्यापारी व मजूरवर्गास फारशी प्रतिष्ठा कधीच नव्हती. त्यामुळे वसाहतवाद्यांनी रबराचे मळे, खाणींतील उत्पादन किंवा अन्नधान्याचा व्यापार इ. आर्थिक कार्यास चालना दिल्यानंतर येथील जनतेतून त्याला लागणारा कर्मचारी वर्ग निर्माण होण्याऐवजी परदेशातून त्या वर्गाची आयात झाली. मूळच्या चिनी व भारतीय लोकांचे वर्चस्व किरकोळ व्यापार, सावकारी व्यवसाय, कुशल मजुरी इ. क्षेत्रांत आहे. येथील समाजात स्थायी मध्यमवर्ग निर्माण होणे कठीण झाले. येथील शिक्षित वर्गाचे ध्येय उद्योगधंद्यांत पडण्याचे नसून सरकारी नोकरी मिळविण्याचे असते.

वसाहतवादाप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धातील जपानी आक्रमणाने येथील राजकारणात महत्त्वाचे बदल घडवून आणले. युद्धात जपानने संपूर्ण आग्नेय आशिया पादाक्रांत केला. प्रत्येक देशात स्वातंत्र्य मिळविण्याची नवी ईर्षा उत्पन्न झाली, यासाठी नवीन नेते उदयास आले व त्यांना जपानने प्रोत्साहन दिले. या देशांत मुक्तिसैन्य उभारण्यास जपानने मदत केली. युद्धकाळात जपानच्या प्रोत्साहनाने व्हिएटनाम, ब्रह्मदेश, इंडोनेशिया व फिलिपीन्स या देशांतील नेत्यांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. युद्धानंतर अनुक्रमे फ्रेंच, ब्रिटिश, डच यांनी आपल्या वसाहती पुन्हा मिळवून सत्ता स्थापण्याचा प्रयत्न करताच स्वातंत्र्ययुद्ध भडकले. महायुद्धामुळे दुर्बळ झालेले पाश्चात्त्य देश पुन्हा युद्ध करून यश मिळविण्याच्या परिस्थितीत नव्हते, त्यामुळे थोड्याच कालावधीत ब्रह्मदेश, इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशांना स्वातंत्र्य मिळाले.

इंडोचायनात मात्र अमेरिकेच्या मदतीमुळे फ्रेंचांनी राष्ट्रवादी प्रवृत्तीशी बराच काळपर्यंत लढा दिला. हा लढा प्रामुख्याने उत्तर व्हिएटनाममध्ये हो-चि-मिन्हच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टधार्जिण्या संघटनेशी दिला. शेवटी १९५४ मध्ये द्येन ब्येन फू येथे फ्रेंच सैन्याचा पराभव झाल्यानंतर जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत वाटाघाटी होऊन हे युद्ध थांबले व लाओस, कंबोडिया व व्हिएटनाम यांना स्वातंत्र्य मिळाले. जिनिव्हा येथील करारानुसार व्हिएटनामची सतराव्या अक्षांशावर उत्तर व दक्षिण अशी तात्पुरती फाळणी करण्यात आली. दोन वर्षानंतर सर्व देशात निवडणुका घेऊन व्हिएटनामच्या एकीकरणाचा प्रश्न व नवे सरकार बनविण्याचा प्रश्न सोडवावा असे ठरले. परंतु अमेरिकेची सहानुभूती असलेल्या सरकारच्या ताब्यातील दक्षिण व्हिएटनाममध्ये व्हिएट-काँग नावाची संघटना स्थापन झाली व तिचा दक्षिण व्हिएटनामी सरकारशी गनिमी लढा सुरू झाला. १९४८ च्या सुमारास आशियाई देशांत सशस्त्र क्रांती करून सत्ता बळकावण्याच्या आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेच्या योजना होत्या. ब्रह्मदेश, इंडोनेशिया व मलाया या देशांत अशा प्रकारच्या उठावाचे निष्फळ प्रयत्न झाले. त्यांमागे चीनचा व रशियाचा हात आहे, असे अमेरिकेच्या लक्षात आले. तेव्हा या साम्यवादी कारवायांना आळा घालण्यासाठी तिने आग्नेय आशियाई देशांची संरक्षक फळी (सीटो) उभी केली. पाकिस्तान, थायलंड, फिलिपीन्स हे आशियाई देश या संघटनेत सहभागी झाले. दक्षिण व्हिएटनाममधील गमिनी लढा हा उत्स्फूर्त नसून साम्यवादी उत्तर व्हिएटनामच्या प्रेरणेने चालू आहे, असे मानून या संघटनेतर्फे अमेरिकेने दक्षिण व्हिएटनामच्या सरकारला मदत केली. १९६४ नंतर अमेरिकेने या धोरणास अनुसरून उत्तर व्हिएटनामवर बाँबहल्ले करण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये व्हिएट-काँगला मिळणारा शस्त्रपुरवठा व मनुष्यबळ लाओस व कंबोडियातील मार्गाने येत आहे, असे वाटल्यावरून या दोन्ही देशांत अमेरिकेने क्रांती घडवून आणली. त्यामुळेच तेथे अमेरिकाधार्जिणी सरकारे स्थापन झाली. साहजिकच या युद्धात हे दोन्ही देश ओढले गेले. तथापि १९७३ मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने उत्तर व दक्षिण व्हिएटनाममध्ये शस्त्रसंधी होऊन तेथे शांतता प्रस्थापित झाली.

मलाया व इंडोनेशिया या देशांतही साम्यवादी पक्ष बरेच बलवान होते. मलायात या पक्षाने गनिमी लढा दिला परंतु ब्रिटिशांच्या मदतीने मलायाच्या सरकारने त्यांचे बंड मोडले. इंडोनेशियात १९६० नंतर अध्यक्ष सूकार्नोने साम्यवादी पक्षास सत्तेत सहभागी करून घेतले. याने समाधान न होऊन १९६५ मध्ये साम्यवादी पक्षाने राज्यक्रांती घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यात इंडोनेशियन सैन्याने हजारो साम्यवाद्यांची कत्तल केली व सूकार्नोस पदच्युत केले.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रदेशातील बहुतेक देशांनी लोकशाही राज्यपद्धती स्वीकारली आहे. परंतु लोकशाही यशस्वी करण्यात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. युद्धकाळात जपानविरुद्ध व त्याचप्रमाणे एरवी साम्राज्यवादी सरकारविरुद्ध शस्त्रे वापरण्याचा अनुभव लोकांना होता. सरकारविरुद्ध सशस्त्र प्रतिकार करण्याची ही प्रथा अनेक देशांत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही चालू राहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय चळवळीत पुढाकार घेतलेल्या संघटनांच्या हातात सत्ता आली. परंतु स्वातंत्र्यपूर्वकाळातील एकी या संघटनांत राहिली नाही. जनतेतील वेगवेगळ्या गटांच्या हितसंबंधाचा समन्वय साधून अर्थपूर्ण व्यावहारिक धोरण आखण्याची शक्ती या पक्षांत नव्हती. त्यामुळे अनेक देशांत या संघटना फुटून अनेक दुर्बल पक्ष निर्माण झाले. उदा., ब्रह्मदेशात ॲन्टी फॅसिस्ट पिपल्स फ्रिडम लीग हा पक्ष १९५८ साली दुभंगून त्याच्या नेतृत्वात फूट पडली व या नेत्यांतील वैमनस्य व स्पर्धा हेच पक्षीय राजकारणाचे सूत्र बनले.

लोकांच्या अपेक्षांची पूर्ती अशा लोकशाही नेतृत्वाकडून न झाल्यामुळे लोकांत नैराश्य पसरले व लोकशाही यंत्रणेबद्दल एक प्रकारचे औदासीन्य निर्माण झाले. यामुळेच ब्रह्मदेशात १९६० मध्ये लष्करप्रमुख ने वीनने अधिकारसूत्रे आपल्या हातात घेतली व लष्करी राज्य सुरू झाले. इंडोनेशियात १९५० नंतरच्या दहा वर्षाच्या काळात आठ मंत्रिमंडळे गडगडली. १९५५ च्या निवडणुकीत चार प्रमुख पक्ष पुढे आले: नॅशनॅलिस्ट पक्ष, माजुस्मी, नदलतुल-उलमा व साम्यवादी. कोणत्याच पक्षास निर्णायक बहुमत न मिळाल्यामुळे अध्यक्ष सूकार्नोने मार्गदर्शित लोकशाहीची कल्पना मांडली. याला विरोध होताच १९६० मध्ये त्याने प्रमुख पक्षांवर बंदी घातली आणि सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. ह्या वेळेपर्यंत साम्यवादी पक्ष व लष्कर या दोन बलवत्तर शक्ती राजकारणात निर्माण झाल्या होत्या. १९६५ नंतर साम्यवादी पक्षाचा अस्त झाला. सूकार्नोस निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले सत्ता लष्कराचे हाती केंद्रित झाली. ब्रह्मदेश, थायलंड, द. व्हिएटनाम, लाओस, ख्मेर प्रजासत्ताक या देशांतही लष्कराचा राजकारणावर बराच मोठा प्रभाव आहे. या सर्व देशांत पक्षांच्या मानाने तेथील लष्कर बरेच मोठे व सुसंघटित आहे. ब्रह्मदेश व इंडोनेशियातील सैन्य मुक्ती आंदोलनातूनच निर्माण झाले असल्यामुळे राजकीय नेते व लष्करी अधिकारी यांच्यातील व्यावसायिक भेद तसा फारसा मोठा नाही. दीर्घकाळपर्यंत देशात सुरक्षितता राखण्याच्या निमित्ताने जनतेशी सैन्याचा जवळचा संबंध येत गेला व लष्करात समाजातील स्तरांतील लोक असल्यामुळे राजकीय पक्षापेक्षा लष्ककरच लोकांची प्रातिनिधिक संस्था बनली आणि लोकशाही अपयशी झाल्यानंतर देशांत स्थैर्य व एकता टिकविण्यासाठी लष्कराने सत्ता ग्रहण केली.

फिलिपीन्स, सिंगापूर व मलेशिया यांमध्ये अद्याप लोकशाही टिकून आहे. फिलिपीन्सने अमेरिकेच्या धर्तीवर संविधान तयार केले आहे व तेथे द्विपक्षपद्धती अस्तित्वात आहे. मलेशियात तेथील वंशभेदांवर आधारलेले मलेय, चिनी व भारतीय या लोकांचे तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यांचेच संयुक्त सरकार १९५७ पासून अधिकारावर आहे. मलेशियातील चिनी लोकांना वरचढ न होऊ देण्यासाठी १९६३ साली मलाया व सिंगापूरमधील ली-कान-यूच्या पीपल्स ॲक्शन या पक्षाने सिंगापूरबाहेरही आपले जाळे पसरविण्यास सुरुवात करताच, मलेय पक्षांनाही आपल्या अस्तित्वास धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली. त्यामुळे १९६५ मध्ये सिंगापूरला या संघातून बाहेर पडावे लागले.

व्हिएटनाममधील युद्धामुळे आग्नेय आशिया हे शीतयुद्धाचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. देशातील डाव्या व उजव्या विचारसरणीच्या शक्तीत समतोल राखण्याच्या गरजेतून व वसाहतवादाची आठवण ताजी असल्यामुळे ब्रह्मदेश, लाओस, ख्मेर प्रजासत्ताक या देशांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततेची भूमिका स्वीकारली. थायलंड हे देश वसाहत नसल्यामुळे व फिलीपीन्समध्ये अमेरिकेने स्वीकारलेल्या सहानुभूतिपूर्ण धोरणामुळे या दोन्हीं देशांत पाश्चात्त्यविरोधी भावना निर्माण झाली नाही. मलेशिया, फिलिपीन्स व थायलंड या तिन्ही देशांना साम्यवादी चीनची तसेच चीनपुरस्कृत साम्यवादी पक्षांची भीती वाटत असल्यामुळे या देशांची परराष्ट्रनीती पाश्चात्त्यधार्जिणी राहिली आहे. थायलंड व फिलिपीन्स तर सीटो संघटनेचे सभासद आहेत.

१९६० नंतर इंडोनेशियात सूकार्नोवरील साम्यवादी पक्षाचा प्रभाव जसजसा वाढू लागला, तसतशी त्या देशाची परराष्ट्रनीती चीनकडे झुकू लागली. १९६३ मध्ये मलेशियाची स्थापना झाल्यावर सूकार्नोने त्याच्याविरोधी आक्रमक भूमिका स्वीकारली. १९६५ च्या अपयशी साम्यवादी क्रांतीनंतर इंडोनेशियाची ही नीती बदलली व आता त्याचे धोरण अमेरिकेच्या बाजूस कलले आहे. १९७० मध्ये प्रिन्स नरोत्तम सिहनूक यास पदच्युत केल्यानंतर ख्मेर प्रजासत्ताक व लाओसचे लष्करी नेते अमेरिकेस सर्वतोपरी साहाय्य करीत आहेत.

शीतयुद्धाशिवाय या प्रदेशातील देशांत परस्परसंघर्षाचे अनेक प्रश्न आहेत. इंडोनेशिया आणि फिलिपीन्स यांनी मलेशियातील अनुक्रमे सारावाक व सबा हे प्रांत आपले असल्याचा दावा केला आहे. ख्मेर प्रजासत्ताक व थायलंड यांतसुद्धा अंकोर मंदिराच्या मालकीसंबंधी भांडण आहे. ब्रह्मदेशाच्या सरहद्दीवरील बंडखोर लोकांस देण्यात येणाऱ्या मदतीवरून ब्रह्मदेशाने थायलंडचा अनेक वेळा निषेध केला. चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणाचीही काही देशांना भीती आहेच. या भागात असलेल्या चिनी वंशाच्या लोकांची संख्या पाहता ही भीती काल्पनिक नाही. परंतु एकमेकांतील संघर्षामुळे हे देश एकमेंकास सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

पूर्व आशिया : चीन, जपान, उत्तर व दक्षिण कोरिया हे पूर्व आशियाई देश होत. चीन व जपान हे आशियातील सर्वांत सामर्थ्यशाली देश आहेत. चीनची संस्कृती अतिप्राचीन आहे. इतर आशियाई देशांच्या तुलनेने यांच्या आधुनिकीकरणास पाश्चात्त्य देशांचा प्रत्यक्ष हातभार फार कमी लागला आहे. यांपैकी चीनला आपल्या आक्रमक साम्यवादी विचारप्रणालीमुळे महत्त्व मिळाले आहे तर जपान औद्योगिक क्रांतीने निर्माण झालेल्या आपल्या अपूर्व आर्थिक संपन्नतेमुळे बलवान राष्ट्र बनले आहे.

जपान हा जवळजवळ ३,४०० बेटांचा देश आहे, तर चीन खंडप्राय देश आहे. या दोहोंमध्ये सु. ७६० किमी.चा समुद्र असल्यामुळे जपान परकीय आक्रमणापासून सुरक्षित आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेचे वर्चस्व उत्पन्न झाले. हा १९४५ चा अपवाद सोडता जपानला आपल्या स्वातंत्र्यास कधीच पारखे व्हावे लागले नाही. या वेगळेपणामुळेच राष्ट्रीय ऐक्याची भावना जपानमध्ये अत्यंत तीव्र आहे. चीनच्या विस्तृतपणामुळे व त्याच्या समृद्ध संस्कृतीमुळे आग्नेय आशियावर त्याचा बराच मोठा प्रभाव पडला आहे.

जपान व चीन या दोन्ही देशांना प्राचीन काळापासून समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभला. प्राचीन काळापासून जपानवर एकाच वंशाचे राजे राज्य करीत आहेत. त्यामुळे जपानचे राजघराणे हे त्या राष्ट्राचे जणू प्रतीक बनले आहे. एकोणिसाव्या–विसाव्या शतकांतील जपानी राष्ट्रीय अस्मिता व राष्ट्रवाद या राजघराण्याशीच निगडित होता. याउलट चीनमध्ये इ.स.पू. दुसऱ्या शतकातील राजांपासून ते विसाव्या शतकातील मांचू राजांपर्यंत अनेत राजघराणी गादीवर आली. १९४९ नंतर चीन पूर्णतः लोकसत्ताक राज्य बनले.


भौगोलिक परिस्थितीमुळे चीनमध्ये सत्तेचे केंद्रीकरण अपरिहार्य झाले. मोठमोठ्या नद्यांना येणाऱ्या महापुरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व जलसिंचित शेतीसाठी अनेक ठिकाणी बांध घालावे लागतात. दक्षिणउत्तर दळणवळणासाठी या पश्चिमवाहिनी नद्यांना कालव्यांनी जोडणे आवश्यक होते. उत्तरेकडून होऊ पाहणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी प्राचीन काळी सु. २,४०० किमी. लांब भिंत बांधण्यात आली. या सर्व कामांसाठी सत्तेचे केंद्रीकरण जसे आवश्यक होते, तसेच प्रजेने या केंद्रीय सत्तेच्या सर्वच आज्ञांचे पूर्णतया पालन करणेही अनिवार्य होते. पारंपारिक चीनमध्ये कन्फ्यूशस पंथाचा प्रभाव होता. त्या पंथानुसार राजाने संयमाने राज्यकारभार करावा असे अपेक्षित होते. तथापि राजाचे अधिकार आणि आधिपत्य व प्रजेची कर्तव्ये यांवरच प्रत्यक्षात भर दिला जाई तेव्हा चिनी परंपरा व्यक्तिस्वातंत्र्य किंवा लोकशाहीस अनुकूल होती, असे म्हणता येणार नाही. चीनमध्ये व्यक्तीपेक्षा समष्टी व हक्कांपेक्षा कर्तव्यालाच जास्त महत्त्व होते.

जपानमध्ये नवव्या शतकापासून राजाकडे नाममात्रच सत्ता असून तिचा प्रत्यक्ष वापर सरदारवर्गच करीत असे किंबहुना १६०३ पर्यंत जपानमध्ये सत्ता विकेंद्रित स्वरूपात होती. नंतर तेथे एक प्रकारची केंद्रित सरंजामशाही स्थापन झाली. यात तोकुगावा घराण्याचा प्रमुख हा ‘शोगुन’ म्हणजेच सत्ताधारी वंशपरंपरागत अधिकारी असे. समाजाची विभागणी पुढील चार वर्गांत झाली होती: सामुराई (लढवय्ये), शेतकरी, कारागीर व व्यापारी. चिनी परंपरेत बुद्धिजीवी, सरकारी अधिकारी व उमराव या वर्गांना श्रेष्ठ स्थान असे. जरी सरकारी परीक्षेच्या कसोटीस उतरणाऱ्या कोणासही अधिकारी वर्गात प्रवेश असला, तरी श्रीमंत व उच्च वर्गीयांची मुलेच बहुधा त्या कसोटीस उतरत असत.

१९११ नंतर चीनमध्ये मर्यादित स्वरूपात संसदीय लोकशाही अंमलात आल्यानंतरही उच्चभ्रूंचे हे विशेष स्थान तसेच राहिले. सन-यत्-सेन (१८६६–१९२५) या राष्ट्रीय नेत्यानेसुद्धा लोकशाही आणण्यापूर्वी काही काळपर्यंत लोकशिक्षण देणाऱ्या अशा वर्गाच्या हुकूमशाहाची गरज मान्य केली होती. उच्च वर्गाच्या श्रेष्ठत्वाची व त्यांच्या राजकीय अधिकारांची परंपरा आजसुद्धा साम्यवादी पक्षाच्या रूपाने चीनमध्येच अस्तित्वात असल्याचे दिसते.

आपल्या खंडप्राय विस्तारामुळे व संस्कृतीच्या प्राचीनत्वामुळे चिनी लोकांत एक प्रकारचा आत्मकेंद्रितपणा आला आहे. त्यांच्या मते सुसंस्कृत जग चीनपुरतेच मर्यादित होते. चीन हेच विश्वसत्तेचे केंद्र, अशी त्यांची भावना असल्यामुळे इतर देशांनी चीनचे वर्चस्व नाममात्र तरी मान्य करावे, अशी त्यांची अपेक्षा असे. एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत तंत्रविद्या आणि वैज्ञानिक प्रगती यांनी पाश्चात्त्य देशांना एक आगळेच सामर्थ्य लाभले व पाश्चात्त्य संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. त्यामुळे दुखावलेल्या स्वाभिमानातूनच चीनमध्ये पुन्हा आक्रमक राष्ट्रवाद निर्माण झाला.

वंशश्रेष्ठत्वाची कल्पना जपानी राष्ट्रवादामध्ये अंतर्भूत होती. यामुळेच विसाव्या शतकात पूर्व आशियात आपल्या अधिकाराखाली विशालतर पूर्व आशियाई सहसंपन्नता क्षेत्र (ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरिटी स्फिअर) स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा जपानने बाळगली.

पाश्चात्त्यांच्या संपर्काचे भिन्नभिन्न परिणाम चीन व जपानवर झाले. पाश्चात्त्यांशी आलेल्या संबंधानंतरसुद्धा जपानी परंपरेत खंड न पडता त्यातूनच नव जपानची निर्मिती झाली. याउलट चीनमध्ये त्याचे दूरगामी परिणाम झाले व चिनी समाजाची व राज्यव्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक ठरले. १८५४ मध्ये अमेरिकन कमांडर पेरी याने पाश्चात्त्य देशांशी व्यापार करण्यासाठी जपानला भाग पाडले, तेव्हा पाश्चात्त्य तंत्रविद्येच्या श्रेष्ठत्वाची जाणीव जपानी सरदारांना झाली. यानंतर जपानच्या प्रतिष्ठेचा व त्याच्याविषयी लोकांच्या मनात असलेल्या श्रद्धेचा उपयोग करून घेण्यात आला. सरंजामशाही व समाजाची वर्गवार विभागणी रद्द झाली. लोकशिक्षण, सक्तीचे लष्करी शिक्षण, उद्योगधंदे, आधुनिक दळणवळणाची साधने यांची सुरुवात झाली. या सर्वांसाठी लागणारी नवी नोकरशाही निर्माण झाली. १८८९ मध्ये नवे संविधान मान्य झाले. त्यानुसार राजा सार्वभौम सत्ताधीश असला, तरी प्रत्यक्षात काही प्रमुख मुलकी व लष्करी अधिकारी, उमराव वर्ग, पक्षनेते, व्यापारी व भांडवलदार वर्ग हे सत्तेतील भागीदार ठरतात. १९३२ पर्यंत उदारमतवादी पक्षनेते, अधिकारी आणि उमराव यांची सत्तेसाठी चुरस होती. १९३२ नंतर आत्यंतिक राष्ट्रवाद्यांची व लष्करी अधिकाऱ्यांची सत्तेवरील पकड वाढत गेली. यासाठी योग्य असेच विस्तारवादी व आक्रमक परराष्ट्रीय धोरण नेत्यांनी आखले. १९३७ मध्ये चीनवर आक्रमण करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांनी दडपशाहीचा अवलंब करून व पक्षनेत्यांना दहशत दाखवून आपली सत्ता मान्य करावयास सर्वांना भाग पाडले. याच काळात आक्रमक राष्ट्रवादाचा लोकांत प्रचार करण्यात आला आणि राष्ट्राचे प्रतीक म्हणून राजास प्रमुख स्थान देण्यात आले.

व्यापारासाठी व धर्मप्रसाराच्या निमित्ताने चीन व पाश्चात्त्य जगाचा संबंध बऱ्याच काळापासून असला, तरी खऱ्या अर्थाने मांचू राजांच्या काळातच पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव चीनवर पडला. पाश्चात्त्य देशांच्या परस्पर स्पर्धेमुळे चीन औपचारिक रीत्या वसाहत बनला नाही. परंतु १९४९ पर्यंत त्याचे आर्थिक शोषण मात्र होत गेले. १८३९–४२ मधील अफूच्या युद्धानंतर चीनबरोबर तिन-त्सिन करार (१८५८) करून अनेक राजकीय, आर्थिक विशेषाधिकार व सवलती पाश्चात्त्य देशांनी मिळविल्या. यासाठी त्यांनी बळाचाही वापर केला. पाश्चात्त्य देशांच्या या चढाओढीत जपानही सामील झाला. १८९४-९५ च्या चीन-जपान युद्धानंतर फॉर्मोसा व इतर चिनी बेटे जपानने आपल्या ताब्यात घेतली. पहिल्या महायुद्धात चीन दोस्त राष्ट्रांकडून लढत असूनही, जर्मनीच्या ताब्यातील चीनमधील प्रदेश मिळविण्याचा कट जपानने इतर दोस्त राष्ट्रांबरोबर रचला होता.

पाश्चात्त्य देशांनी व जपानने चालवलेल्या या शोषणाची प्रतिक्रिया म्हणून चीनमध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. सन-यत्-सेन या प्रसिद्ध चिनी नेत्याने मांचू राजेशाहीविरुद्ध चळवळ सुरू केली. मांचू साम्राज्य आधीच मोडकळीस आले होते. १९११ मध्ये बंड झाल्याबरोबर ते कोलमडले. यानंतर १९४९ पर्यंत चीनमध्ये अराजकता होती. अनेक प्रांतांत लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे सत्ता प्रस्थापित केली. क्वोमिंतांग (राष्ट्रीय) व साम्यवादी पक्षात यादवी युद्ध झाले. यात भर म्हणून जपानने १९३१ मध्ये मांचूरिया प्रांतावर व १९३७ मध्ये सबंध चीनवर आक्रमण केले. आधुनिक चीनवर या घटनांचे दूरगामी परिणाम झाले.

रशियातील (कॉमिंटर्न) आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेच्या प्रोत्साहनाने १९२१ मध्ये चिनी साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचे धोरण रशियाचे हित लक्षात घेऊनच आखले जात असे. १९२१ ते २७ व १९३३ ते ४५ या कालखंडांत हे धोरण रशियास हव्या असलेल्या सहकार्याचे होते. त्या काळात इतर देशांतील साम्यवादी पक्षांनी आक्रमक क्रांतिकारक धोरण टाळून इतर राष्ट्रवादी गटांबरोबर समझोता करावा व संयुक्त आघाडी बनवावी, अशी रशियाची अपेक्षा होती. हे धोरण चीनमध्ये सपशेल फसले. १९२३-२४ मध्ये सन-यत्-सेनशी वाटाघाटी होऊन साम्यवादी पक्ष क्वोमिंतांग पक्षास मिळाला. रशियाने लष्करी प्रशिक्षण व शस्त्रास्त्राच्या स्वरूपात क्वोमिंतांग पक्षास मदत केली. परंतु साम्यवाद्यांच्या हेतूबद्दल क्वोमिंतांग नेत्यांच्या मनातील संशय नाहीसा झाला नाही. १९२६ साली चँग-कै-शेकच्या नेतृत्वाखाली साम्यवाद्यांनी उत्तरेची मोहीम हाती घेतली व शांघाय शहर काबीज केले पण चँगने १९२७ मध्ये तेथील व्यापाऱ्यांशी संगनमत करून अनेक साम्यवादी नेत्यांची कत्तल केली. क्वोमिंतांग सैन्याच्या दुसऱ्या गटाने वूहान शहर गाठले, पण तेथेही साम्यवाद्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.


१९२७–३३ या काळात आक्रमक क्रांतीचे धोरण साम्यवादी संघटनेने स्वीकारले. मार्क्सने अशी क्रांती मजूरवर्गाकडून सरळ आंदोलनाने घडून येईल, असे भाकीत केले होते. चीनमधील मजूरवर्ग अत्यंत अल्प व बलहीन असल्यामुळे चिनी साम्यवादी पक्षाचे अशा क्रांतीचे प्रयत्न १९२७ व १९२९ मध्ये फसले. क्वोमिंतांग सैन्याने कँटन शहरात ५,००० बंडखोर साम्यवाद्यांची कत्तल केली. चीनसारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांकडूनच व ग्रामीण भागातच क्रांती होऊ शकेल, अशी साम्यवादी पक्षातील माओ-त्से-तुंग व त्याच्या अनुयायांची खात्री होती. हूनान प्रांतात १९२७ मध्ये अशा प्रकारची क्रांती घडवून आणून शेतजमिनीचे शेतकऱ्यांत वाटप करण्यात आले. दक्षिण जिआंगसी प्रांतातही १९२९ मध्ये असाच प्रयत्न करण्यात आला.

चीनमध्ये उघड युद्ध करण्यापेक्षा गनिमी लढा देणे जास्त योग्य आहे, असेही माओचे मत होते. परंतु रशियाप्रणीत चिनी साम्यवादी पक्षाने हे मत फेटाळले व क्वोमिंतांग सैन्याशी उघड सामना देण्याचे ठरविले. क्वोमिंतांग सैन्यापुढे लाल सैन्याचा निभाव लागला नाही, तेव्हा १९३४ मध्ये जिआंगसी प्रांत सोडून माओने एक लक्ष सैन्यासह उत्तर शान्सी प्रांतात सु. ९,६०० किमी. दीर्घ प्रयाण (लाँग मार्च) केले. या दिव्यानंतर माओ व माओवादाचे वर्चस्व चिनी साम्यवादी पक्षावर अबाधितपणे स्थापन झाले व रशियाधार्जिण्या गटास शह मिळाला.

जपानी आक्रमणाचा संयुक्त रीत्या प्रतिकार करण्यासाठी चँगच्या पक्षाला साम्यवादी पक्षाशी समेट करणे भाग पाडले. १९३७ मध्ये जपानने समुद्रालगतच्या चिनी प्रांतावर व मांचूरियावर ताबा मिळविला. चँगने आपले सरकार पीकिंगहून चुंगकिंगला हलविले. याउलट साम्यवादी सैन्य ग्रामीण भागात जपानशी लढा देत राहिले. जपानशी सहकार्य करणाऱ्या जमीनदारांच्या जमिनी काढून शेतकऱ्यांस देण्यात आल्या. माओने मवाळ धोरण आखून इतर गटांशीही मिळते घेतले. त्यामुळे साम्यवाद्यांची शक्ती वाढली. १९४५ पर्यंत एक चतुर्थांश चीन साम्यवाद्यांच्या हातात पडला होता. जपानी शरणागतीनंतर संपूर्ण चीनचा ताबा मिळविण्यात चॅंगला अपयश आले व साम्यवाद्यांचा विजय झाला. अमेरिकेच्या साहाय्याने चॅंगने फॉर्मोसा बेटावर आश्रय घेतला. १९४९ मध्ये फॉर्मोसाशिवाय सर्व चीन साम्यवादी हुकमतीखाली आला.

१९११ ते ४९ या काळातील क्वोमिंतांगच्या लोकशाहीचा अनुभव फारसा उत्तेजनकारक नव्हता. अकार्यक्षम, भ्रष्टाचारी व फुटीर राजकारणामुळे लोकशाहीबद्दल चिनी लोकांच्या मनात नावड निर्माण झाल्यास नवल नाही. शिवाय चँगचे सरकारही प्रातिनिधिक नव्हते. तेव्हा १९४९ मध्ये चिनी लोकांपुढे लोकशाही व साम्यवादी हुकूमशाही असे पर्याय नसून, त्यांना चँगची भ्रष्ट हुकूमशाही व राजकीय स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीशी वचनबद्ध असलेला साम्यवाद यांतूनच निवड करणे भाग होते.

चीनमध्ये आज साम्यवादी पक्षाची हुकूमशाही आहे. सैन्य, सरकारी संस्था या सर्व स्तरांवर पक्षाचे प्रतिनिधी असल्यामुळे सर्व प्रकारच्या धोरणांवर पक्षाची विलक्षण पकड आहे. पक्ष अनुयायांची संख्या ५० हून (१९२१) १७ लक्षांपर्यंत (१९६१) गेली असली, तरी प्रत्यक्षात पक्षातील पॉलिटब्यूरो व स्थायी समितीवर असणारे मूठभर लोक यांच्या हातातच सर्वंकष सत्ता आहे. यांपैकी बहुतेक जणांचे वय साठ वर्षांहून अधिक आहे. त्यामुळे नेते व अनुयायांमध्ये एका पिढीहून जास्त अंतर आहे.

१९४९ नंतर जमीनदार व श्रींमत शेतकर्‍यांच्या जमिनीचे फेरवाटप करण्यात आले व सामुदायिक शेती अंमलात आली. १९५३ नंतरच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात रशियाच्या साहाय्याने यंत्रोत्पादक उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले. १९५६ पर्यंत खाजगी मालकी उद्योगधंदेसुद्धा सरकारी नियंत्रणाखाली आणले गेले. १९५८ नंतर आर्थिक क्षेत्रात चीनने उंच उडी (बिग लिप) घेण्याच्या प्रयत्नात सामुदायिक कम्युन्स अस्तित्वात आली व त्यामुळे खाजगी मालमत्ता जवळजवळ नष्ट झाली व कुटुंबव्यवस्था खिळखिळी झाली. ह्या योजनेस फारसे यश आले नाही. बुद्धिजीवी वर्गांत, पक्षांत व शेतकऱ्यांत असंतोष पसरला. याविरुद्ध माओने १९६६ मध्ये सांस्कृतिक क्रांतीची मोहीम सुरू केली.

लोकजीवनात क्रांतिकारक प्रेरणा चिरस्थायी करणे, हे या क्रांतीचे उद्दिष्ट होते. पक्षातून नोकरशाही, पांढरपेशा व रूढिप्रिय वृत्तीच्या लोकांची हकालपट्टी करून पक्षाचे शुद्धीकरण माओस करावयाचे होते. देशाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत आर्थिक प्रगतीपेक्षा शुद्ध तत्त्वप्रणालीचे महत्त्व अधिक आहे, हे त्याला ठसवावयाचे होते. पक्षातील गतिमानता नष्ट होऊन स्थित्यंतराबद्दल अप्रियता वाढत असल्याची जाणीव माओस झाली होती. या शुद्धीकरणाच्या मोहिमेत प्रथम माओने युवक व विद्यार्थ्यांच्या लाल सैनिकांची मदत घेतली. पक्षातील बड्या लोकांवर टीकेची झोड उठविण्यास त्यांना प्रवृत्त करण्यात आले. याचा परिणाम म्हणून पक्षाच्या पॉलिटब्यूरोमधील ३० सदस्यांपैकी ११ सदस्यांना पदच्युत करण्यात आले. १९६८ मध्ये सांस्कृतिक क्रांतीची परिणती अराजकतेत होऊ लागली तेव्हा सैन्यास आवाहन करण्यात आले व परिस्थिती सुस्थिर करण्यात आली. १९६८ नंतर मात्र पक्षात व सरकारी संस्थांत सैन्याचे प्राबल्य वाढले आहे. १९६९ मध्ये पक्षाच्या मध्यवर्ती समितीत ४४ टक्के प्रतिनिधित्व सैन्यास मिळाले असून पॉलिटब्यूरोतील २६ पैकी १३ सदस्य सेनाधिकारी आहेत.

१९४५ ते ५२ च्या दरम्यान जपान अमेरिकेच्या अधिकाराखाली होता. या काळात अमेरिकेने जपानची लष्कर यंत्रणा मोडली व आर्थिक विकेंद्रीकरण केले. परंतु १९५० नंतर अमेरिकेचे धोरण बदलले व चीनला शह देण्यासाठी म्हणून जपानला बलवान करण्याचे ठरले. नव्या संविधानानुसार युद्ध करण्यावर व सैन्य उभारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जपान-अमेरिका तहानुसार जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारलेली आहे. आर्थिक क्षेत्रात मात्र जपानने नेत्रदीपक प्रगती केली. आज जपानचे राष्ट्रीय उत्पन्न अमेरिकेच्या खालोखाल व जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग दरसाल १४-१५ टक्के आहे. १९५४ पासून जपानवर रूढिप्रिय लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचीच सत्ता आहे. मात्र संसदीय लोकशाहीच्या संकेताप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्य व विरोधी पक्षांस कार्य करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जपानमध्ये समाजवादी व साम्यवादी पक्षही कार्य करतात.

१९४९ ते ५९ या पहिल्या दशकात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात फॉर्मोसातील चॅंगच्या सत्तेपासून आपले संरक्षण करण्याचे, जमल्यास फॉर्मोसा काबीज करण्याचे चीनचे उद्दिष्ट होते. चीनभोवती अमेरिकेने निर्माण केलेले पाश्चात्त्यधार्जिण्या राष्ट्रांचे कडे तोडून आशियाई देशांचे नेतृत्व करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. त्याचबरोबर चिनी पद्धतीची साम्यवादी क्रांती इतर आशियाई राष्ट्रांत व्हावी, अशीही चीनची इच्छा आहे. अमेरिकेपासून रक्षण करण्यासाठी व आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी सुरुवातीस चीन रशियावर विसंबून होता. परंतु १९५९ नंतर अनेक बाबतींत रशिया व चीन यांतील मतभेद वाढीस लागले. सरहद्दीसंबंधीचा संघर्ष, साम्यवादी विचारप्रणालीबाबत मतभेद हे त्यातील प्रमुख मुद्दे आहेत. अण्वस्त्रे बनविण्यासाठी तांत्रिक मदत करण्यास रशियाने चीनला नकार दिला व १९५४ नंतर रशियाने अमेरिकेबरोबर शांततापूर्ण सह-अस्तित्त्वाचे धोरण स्वीकारल्यापासून रशिया-चीन मैत्रीस ओहोटी लागली.


१९५० च्या कोरिया युद्धात व १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनने मर्यादित सैन्यबळाचा उपयोग केला असला, तरी प्रत्यक्षपणे युद्धात न गुंतण्याचेच चीनने एकंदर धोरण दिसते. साम्यवादी क्रांतीची बीजे त्या त्या देशातच रुजली व वाढली पाहिजेत त्यांची परदेशातून आयात करणे अशक्यप्राय आहे, असे चीनला वाटते. साम्यवादी पक्षास युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याचे, त्या त्या राष्ट्रातील गनिमी युद्धास मार्गदर्शन वा उत्तेजन देण्याचे व शक्य असल्यास शस्त्रपुरवठा करण्यापुरतेच चीनचे आक्रमक धोरण आहे. उलट आशियातील रशियाचा प्रभाव कमी करण्यासाठी चीन अमेरिकेशी सहकार्य करू पाहत आहे. या दृष्टीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी चीनला १९७१ मध्ये दिलेली भेट महत्त्वाची ठरते.

आशियाई ऐक्याचा प्रश्न: आशिया खंडास यूरोप किंवा अमेरिकेसारखे स्वतःचे सांस्कृतिक वा राजकीय व्यक्तिमत्व लाभले नाही. यातील काही प्रदेश आधुनिक तर काही रूढिनिष्ठ, काही श्रींमत तर काही दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. काही देशांनी लोकशाही पद्धती, तर काहींनी एकाधिकार पद्धती स्वीकारलेली आहे. साम्यवादी व भांडवलशाही विचारप्रणालींतील संघर्षाने या आडव्या आणि उभ्या विभाजनात आणखीनच गुंतागुंत निर्माण झाली आहे. वसाहतवादाचा कटू अनुभव व त्यातून निर्माण झालेला पाश्चात्त्यविरोधी राष्ट्रवाद हेच आशियाई देशांच्या राजकारणातील सामान्य घटक आहेत.

आशियाई देशांतील राष्ट्रवाद हाच त्यांच्या ऐक्याच्या मार्गातील अडथळा आहे. १९४९ ची भारतातील व १९५५ ची बांडुंग येथील आशियाई देशांची परिषद सोडल्यास, त्यानंतर या देशांची परिषद बोलावणेसुद्धा त्यांच्या आपसातील दुहीमुळे अशक्यप्राय झाले आहे. आशियाई देश याहून कायम स्वरूपाची आंतरराष्ट्रीय राजकीय संस्था निर्माण करू शकले नाहीत.

आर्थिक क्षेत्रात व प्रादेशिक स्तरावर मात्र थोडे यश आशियाई देशांना प्राप्त झाले. १९६६ साली आशियाई विकास बॅंक स्थापन झाली. आग्नेय आशियात मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर व थायलंड या देशांनी आपल्या आर्थिक प्रगतीसाठी व सहकार्यासाठी असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशिअन नेशन्स नावाची संस्था स्थापन केली आहे (१९६७). परंतु तिचे यश मर्यादित आहे. पश्चिम आशियात पाकिस्तान, तुर्कस्तान व इराण या देशांनी रीजनल को-ऑपरेशन फॉर इकॉनामिक डेव्हलपमेंट नावाची आर्थिक संघटना स्थापन करून सहकार्य करण्याचे ठरविले आहे. आशियाई देशांची अर्थव्यवस्था एकमेंकास पूरक नसून तिच्यात एक प्रकारची विधायक स्पर्धा आहे. बहुतेक देश कृषिप्रधान असून कच्च्या मालाची निर्यात करणारे आहेत. त्यामुळे यूरोपीयन कॉमन मार्केट कम्युनिटी सारखी एकात्मता त्यांच्यात येणे कठीण आहे. या सर्वच देशांकडे भांडवलाची व तंत्रज्ञांची वाण असल्यामुळे उद्योगधंद्यांच्या क्षेत्रांतील सहकार्यावरही मर्यादा पडतात.

पश्चिम यूरोपीय देशांना युद्धोत्तर काळात रशियाच्या आक्रमणाच्या भीतीने एकत्र आणले व त्यामुळे यूरोपीयन कॉमन मार्केट कम्युनिटीची निर्मिती झाली. आशियाई देशांस अशा प्रकारचा समान धोका जाणवत नाही. काही देशांना चीनची भीती वाटत असली, तरी अनेक देशांच्या सीमा चीनशी भिडलेल्या नाहीत व दूरवर असलेल्या त्या देशांवर आक्रमण करण्याइतके सामर्थ्य चीनने अजून मिळवलेले नाही. याउलट कित्येक देशांना आपल्या शेजारच्या देशांकडूनच आक्रमणहोईल की काय अशी भीती वाटते. त्यांच्या आत्मकेंद्रित व संकुचित राष्ट्रवादाकडे पाहता ही भीती अगदीच निराधार नाही. यामुळे ह्या देशांना एका साखळीत गोवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. साम्यवादी चीनच्या सामर्थ्यास आळा घालण्यासाठी १९५४ साली आग्नेय आशियाई संघटना (सीटो) स्थापन झाली. परंतु थायलंड, पाकिस्तान व फिलिपीन्स हे तीनच आशियाई देश या संघटनेत येऊ शकले. १९४५ मध्ये स्थापन झालेल्या अरब लीग ह्या संघटनेत जरी सर्व अरब देश असले, तरी आपआपसांतील दुहीमुळे ही संघटना पूर्णपणे निष्क्रिय बनली आहे. ब्रिटनने स्थापलेल्या मध्य-आशियाई संरक्षण संघटनेत (सेंटो) फक्त इराण, पाकिस्तान व तुर्कस्तान एवढेच आशियाई देश आहेत. अशा प्रयत्नात रशियालाही फारसे यश मिळेल, असे दिसत नाही. १९६८ साली रशियन साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस ब्रेझनेव्ह यांनी आशियाई देशांच्या सामूहिक संरक्षणाची योजना मांडली परंतु त्यास आशियाई देशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

(चित्रपत्र २३, २४, २५, २६).

 

मोरखंडीकर, रा. शा.

 

संदर्भ :  1. Barnett, Doak, Communist China and Asia, New York, 1961.

            2. Brecher, Michael, Nehru A Political Biography, London, 1959.

            3. Cressey, G. B. Asia’s Lands and Peoples, New York, 1963.

            4. deBary, W. T. Ed. Sources of Indian Tradition, New York, 1958.

            5. Emerson, Rupert, From Empire to Nation, Cambridge, 1960.

            6. Gabriel, A. Almand, James Coleman, S. Ed. The Politics of the Developing Areas, Princeton, 1960.

            7. Kahin, George M. Major Government of Asia, New York, 1963.

            8. Morris-Jones, W. H. The Government and Politics of India, London, 1964.

            9. Pye, Lucian W. South East Asia’s Political Systems, Englewood Cliffs, 1967.

          10. Sayeed, Khalid B. The Political System of Pakistan, Boston, 1967.

          11. Scalpino, Rober A. Ed. The Communist Revolution in Asia, Englewood Cliffs, 1969.

          12. Schwartz, Benjamin I. Chinese Communism and the Rise of Mao, Cambridge, 1964.

          13. Sharabi, H. B. Government and politics of the Middle East in the 20th Century, Princeton, 1962.

          14. Stamp, L.d. Asia, London, 1962. 

          15. Waller, D. J. The Government and Politics of Communist China, London, 1970.

          16. Ward, Robert E. Macridis, Roy C. Ed. Modern Political System: Asia, Englewood Cliffs, 1963.

          17. Wriggins, Howard W. Ceylon: Dilemmas of New Nation, Princeton, 1960.

          १८. जावडेकर, शं. दा. आधुनिक भारत, पुणे, १९५३.