विदेह : उत्तर भारतातील एक प्राचीन जनपद. विदेघ या नावानेही ते ओळखले जात होते. वेगवेगळ्या काळांत या प्रदेशाच्या विस्तारात बदल होत गेल्याचे दिसून येते, परंतु सामान्यपणे बिहार राज्यातील संपूर्ण तिरहूत प्रांत विदेह प्रदेशात समाविष्ट होता. काही तज्ञांच्या मते बिहार व प.बंगाल राज्यांतील दरभंगा, चंपारण्य आणि मुझफरपूर (उत्तर भाग) या जिल्ह्यांचा, तसेच नेपाळचा दक्षिणेकडील काही भाग यांचा विदेह प्रदेशात समावेश होता असे दिसते. पश्चिमेस गंडकी नदी (सदानीरा), उत्तरेस हिनालयाच्या रांगा, पूर्वेस कोशिकी (कोसी) व दक्षिणेस गंगा नदी यांनी विदेह प्रदेश सीमित झाला होता, असे उल्लेख पुराणादी ग्रंथात आढळतात. मिथिला अथवा ⇨जनकपूर (सांप्रत नेपाळमध्ये) ही विदेहची राजधानी होती. जनकपुरला विदेहनगर या नावानेही संबोधले जात होते.

पुराणांतील उल्लेखांनुसार विदेह ही कोसल जनपदाची एक शाखा होती. रामायणातील वर्णनानुसार कोसलाधिपती रामाची भार्या सीता ही विदेहाधिपती जनकाची कन्या होती. त्यावरून तिचे ‘वैदेही’ हेही एक नाव प्रचलित आहे. प्रसिद्ध औपनिषदिक ऋषी याज्ञवल्क्य हा विदेहचाच रहिवासी होता. काही लोककथांनुसार व शतपथ ब्राह्मणातील उल्लेखानुसार विदेघ माथव (माधव) हा पुरुष कोसल व विदेह या दोन्ही जनपदांचा संस्थापक होता असे दिसते. वसिष्ठ ऋषीच्या शापामुळे निमि हा सूर्यवंशी राजा मरण पावला व त्याने पुन्हा देह स्वीकारला नाही त्यामुळे त्याच्या मिथि या पुत्रापासून पुढील वंशास ‘विदेह’ हे नाव पडले व त्यांचे राज्य तो ‘विदेह देश’ अशीही एक कथा प्रचलित आहे. पूर्वी हा देश काही वेळा मिथिला या नावानेही ओळखला जात होता असे दिसून येते.

शतपथ ब्राह्मणातील उल्लेखानुसार विदेह हे संस्कृत अध्ययनाचे महत्त्वाचे केंद्र होते. ब्राह्मण काळात कुरुक्षेत्राला जे धार्मिक आणि राजकीय महत्त्व होते, ते उपनिषदांच्या काळात विदेहाला प्राप्त झाले होते. त्या काळात विदेहमध्ये जनकवंशीय राजे राज्य करीत होते. बृहदारण्यकातील उल्लेखावरून तत्त्वज्ञ व धर्मवेत्ता जनक हा क्षत्रीय राजा कुरु-पांचालांच्या ब्राह्मणांनाही धर्मविद्येत मागे टाकत होता व त्यांच्या अग्निहोत्र विषयातील चुका दाखवून देत होता असे दिसून येते. त्याकाळचे ब्राह्मण ‘ब्रह्मोद्य’ ही विषय राजा जनकाकडून समजावून घेत असत. जनकाच्या या विद्वत्तेमुळेच त्याकाळी विदेहची खूप कीर्ती झाली होती. औपनिषदिक तत्त्वज्ञानाच्या वाढीत विदेहला बरेच श्रेय आहे.

बौद्धकाळात या प्रवेशद्वार वृज्जींचा (वज्जींचा) अंमल होता व विदेह हा समृद्ध प्रदेश होता. तक्षशिला, इंद्रप्रस्थ, श्रावस्ती इ. शहरांशी मोठ्या प्रमाणात त्याचा व्यापार चालत होता असे अनेक जातक कथांतील उल्लेखांवरून दिसून येते. इ. स. नवव्या शतकात मगधच्या पाल घराण्याने व त्यानंतर १०६९ मध्ये बंगालच्या बल्लाळ सेनाने मिथिला हे विदेहच्या राजधानीचे शहर घेतल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. जनकपूर (मिथिला) नंतर बनारस ही वि देहाची राजधानी होती, असा मोनिअर-विल्यम्सच्या मॉडर्न इंडिया या ग्रंथात उल्लेख आला आहे.

चौंडे, मा. ल.