सोनमर्ग : बर्फाच्छादित पर्वतशिखरे.

सोनमर्ग : भारतातील जम्मू व काश्मीर राज्याच्या गंदेरबाल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व पर्यटन केंद्र. हे श्रीनगरच्या ईशान्येस सु. ८७ किमी. सस.पासून २,७४० मी. उंचीवर सिंद नदीकाठी वसलेले आहे. लोकसंख्या ३९२ (२०११). हे रस्त्यांनी जम्मू व काश्मीरमधील मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. श्रीनगरचा विमानतळ हा यास नजिकचा विमानतळ आहे. यास लडाखचे प्रवेशद्वार म्हणतात.

सोनमर्गला ऐतिहासिक महत्त्व असून काश्मीरमधून चीनला आखाती देशांस जोडणाऱ्या प्राचीन रेशीम रस्त्याचे प्रवेशद्वार म्हणून हे ओळखले जाते. प्रसिद्ध झोजी ला (खिंड) याच्या पूर्वेस १५ किमी. आहे. भारतीय सैन्याच्या दृष्टीने झोजी ला हे मोक्याचे ठिकाण आहे. सोनमर्गच्या आसमंतात कोलाहेई, माचोई या हिमनदींत सु. ५०० मी. पेक्षा जास्त उंचीची सिरबल, कोलाहेई, अमरनाथ, माचोई ही शिखरे आहेत.

कुरणे, फुलांनी आच्छादलेली शेते, हिमनद्या, बर्फाच्छादित पर्वत शिखरे, पाइन-फर वृक्षांची जंगले, धबधबे, सरोवरे यांमुळे सोनमर्ग निसर्गसुंदर बनलेले आहे. येथे बर्फाच्छादित पर्वतशिखरांवरून सूर्यकिरणे परावर्तित होतात व सोनमर्गचा परिसर झगमगीत होतो. सोनमर्गला ‘मेडो ऑफ गोल्ड’ असे म्हणतात. हिमवर्षावामुळे हिवाळ्यात राष्ट्रीय महामार्ग १ डी बंद केलेला असतो, त्यामुळे हिवाळ्यात सोनमर्गला भेट देणे दुर्लभ असते. सोनमर्गहून हिमाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. नजिकच्या नीलनाग सरोवरात स्नान केल्याने त्वचा विकार बरे होतात, अशी लोकांची धारणा आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे होते. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

गाडे, ना. स.