सुएझ : ईजिप्तमधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ४,८८,१२५ (२०११). हे कैरोच्या पूर्वेस १३० किमी. वर सुएझ कालव्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ वसलेले आहे. बुर इब्राहिम आणि बुर तौफिक ही दोन बंदरे आणि पूर्वेकडील वाळवंट मिळून हा एक ॲस सुएझस ( महकजह ) नावाचा राखीव सरसुभा आहे. याचे क्षेत्रफळ १७,८४० चौ.किमी. आहे. हे एक प्राचीन व्यापारी, केंद्र होते. ग्रीकांनी याचे क्लिस्मा, तर पुढे सातव्या शतकात मुसलमानांनी त्याचे कोल्सम असे नामकरण केले. ऑटोमन सम्राटांनी हा प्रदेश पादाक्रांत केल्यानंतर सुएझचा नाविकतळ म्हणून विकास झाला मात्र पुढे त्याचे महत्त्व कमी झाले. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर (१८६९) त्यास पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. आधुनिक सुएझ हे लोहमार्ग व रस्त्यांनी कैरोशी जोडलेले असून कैरोचे ते अधिक्रमण ( ट्रॅन्झिट ) बंदर आहे. अरब-इझ्राएलच्या युद्घात (१९६७–७५) इझ्राएलने सुएझ कालव्यासह त्याच्या परिसरातील शहरांवर बाँबहल्ला केला. त्यावेळी सुएझ कालव्यासह शहराचे अतिशय नुकसान झाले. याचा सुएझच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला. सुएझ कालवा १९७९ मध्ये खुला झाला आणि शहराची पुनर्रचना झाली. शहराला करमुक्त औद्योगिक क्षेत्र विभागाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे येथे उद्योग, व्यापार भरभराटीस येऊन यास पूर्वीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे खनिज तेल शुद्घीकरण कारखाने असून नळाद्वारे ते कैरोला पुरविले जाते. येथे जहाज दुरुस्ती कार्यशाळा असून कृत्रिम खते, वस्त्रे, औषधे इत्यादींचे निर्मिती उद्योग आहेत. मक्का या पवित्र स्थानाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचे हे प्रस्थान केंद्र आहे.

राऊत, अमोल