व्होरोशीलव्हग्रॅड : लुगान्स्क. युक्रेनमधील लुगान्स्क (व्होरोशील व्हग्रॅड) प्रांताची राजधानी. लोकसंख्या ५,०४,००० (१९९१). डोनेट्‌स या द्रोणी प्रदेशात लुगान नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. रॉस्टॉव्हच्या वायव्येस १५६ किमी., तर ॲझॉव्ह समुद्रापासून ईशान्येस सु. १६० किमी. अंतराववर हे शहर आहे. काळ्या समुद्रातील आरमाराला युद्धसाहित्य पुरविण्यासाठी इ. स. १७९५मध्ये येथे लोखंडाचा कारखाना उभारण्यात आला. सुरुवातीला हे लुगान्स्क या नावाने ओळखले जाई. १९३५ मध्ये क्ल्यीमेंट यिफ्र्येमव्ह्यिच व्हरशिलॉव्ह या रशियन फील्ड मार्शल व राजकीय मुत्सद्याच्या नावावरून या शहराला व्होरोशीलव्हग्रॅड हे नाव देण्यात आले. १९८९ नंतर मात्र लुगान्स्क हेच नाव कायम करण्यात आले.

डोनेट्‌स कोळसा – क्षेत्राचा १८९० च्या दशकात विकास घडून आला. पुढे दक्षिण रशियातील औद्योगिक केंद्रांशी हे शहर लोहमार्गांनी जोडण्यात आले. १८९६ मध्ये येथे वाफेवरील रेल्वे इंजिनांचा कारखाना सुरू झाला. या कारखान्यातून सध्या डीझेल इंजिनांची निर्मिती केली जात असून देशातील हा सर्वांत मोठा रेल्वे इंजीननिर्मिती कारखाना आहे. रेल्वे डबे, लोखंडी नळ्या, कोळसा-खाणकामाची सामग्री, मोटारींचे सुटे भाग, यंत्रे-निर्मिती व दुरुस्ती, बांधकामाचे साहित्य, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ-निर्मिती, लाकूडकाम व कोळसा खाणकाम इ. उद्योगधंदे येथे चालतात. येथे विशेष शिक्षण-प्रशिक्षणाची अनेक विद्यालये व संस्था आहेत. येथील युक्रेनियन व रशियन थिएटर, तसेच वस्तुसंग्रहालये उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत