एरिडू : प्राचीन सुमेरियन नगर. इराकच्या नासिरिया जिल्ह्यातील एका वाळवंटात, अबू शाहरेन नावाच्या पुरातात्त्विक टेकडीजवळ याचे अवशेष मिळाले आहेत. एरिडू पूर्वी समुद्रकिनाऱ्यावर व युफ्रेटीस नदीवर असल्याचा उल्लेख मिळतो परंतु आता हे स्थान इराणच्या आखातापासून २०८ किमी. आत आहे. इ. स. पू. ८००० मध्ये ह्याची स्थापना व इ. स. पू. ५००० मध्ये याची भरभराट झाली असावी. सुमेरियन जलदेवता ‘इआ’ अथवा ‘एन्की’ हिचे क्षेत्र म्हणून हे अत्यंत पवित्र स्थळ मानण्यात येत असे. हे प्रागैतिहासिक काळातीळ सुसंस्कृत व प्रगत नगर असल्याची साक्ष येथील जुने कलाकुसरीचे कुंभारकाम, विशेषत: मातीच्या भांड्यांवरील विविध प्राण्यांच्या चित्राकृती, भौमितिक रेखाकृति व मुक्तपणे रेखाटलेल्या रंगाकृती देतात. इतिहासकालात याचे महत्त्व कमी झाले.

जोशी, चंद्रहास