नांदेड जिल्हा: महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवरील, मराठवाडा विभागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४९२ चौ. किमी. म्हणजे राज्याच्या ३·३८ टक्के व लोकसंख्या १३,९७,६७२ (१९७१) म्हणजे, राज्याच्या लोकसंख्येच्या २·७८ टक्के. विस्तार १८°१५ उ. ते १९° ५५ उ. अक्षांश व ७७°  पू. ते ७८° १५ पू. रेखांश यांदरम्यान. या जिल्ह्याच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्याचे आदिलाबाद व आग्नेयीस निझामाबाद हे जिल्हे असून दक्षिणेस कर्नाटक राज्याचा बीदर जिल्हा आणि आग्नेयीस व पश्चिमेस उस्मानाबाद, पश्चिमेस व वायव्येस परभणी व उत्तरेस यवतमाळ हे महाराष्ट्राचेच जिल्हे आहेत. या जिल्ह्याचे नांदेड, हदगाव, किनवट, भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड व कंधार हे आठ तालुके आहेत.

भूवर्णन: हा जिल्हा दख्खन पठाराचाच एक भाग आहे. उत्तरेकडील व दक्षिणेकडील काही भाग वगळल्यास सर्व जिल्हा सपाट व सुपीक आहे. उत्तरेकडील किनवट तालुक्यात सातमाळा (अजिंठा) च्या रांगा व त्याच्या दक्षिणेस निर्मळ डोंगररांगा आहेत. कंधार व मुखेड तालुक्यांत बालाघाट डोंगराच्या अखेरच्या टेकड्या आहेत. नांदेड, हदगाव, भोकर व दक्षिणेस किनवट (याचा दक्षिण भाग) तालुक्यांतून जिल्ह्यातील भाग किंवा ठाणवारी टेकड्यांची रांग जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात असून त्याची उंची ६४४ मी. आहे. उत्तर सीमेवरील पैनगंगा खोऱ्याच्या सखल भागाची उंची १५० ते ३०० मी. असून अन्यत्र जिल्ह्याची स. स. पासून सरासरी उंची ४०० मी. आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठी नदी गोदावरी परभणी जिल्ह्यातून येऊन या जिल्ह्याच्या मध्यातून वाहते व पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाते. आसना, सीता व सरस्वती या तिच्या या जिल्ह्यातील उत्तरेकडील उपनद्या असून, मांजरा नदी पूर्व सरहद्दीवर दक्षिणोत्तर वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळते. मन्याड (मनार) ही मांजरा नदीची उपनदी कंधार तालुक्यातून व नंतर मुखेड, देगलूर व बिलोली तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. दक्षिण भागात पूर्वेकडे वाहणारी लेंडी ही मांजरा नदीची उपनदी होय. हदगाव तालुक्यातून वाहणारी कयाधू ही पैनगंगेची उपनदी आहे. पैनगंगा ही जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे वर्धा नदीस मिळते.

हवामान: जिल्ह्याचे हवामान कोरडे व विषम असून मे महिन्यात तपमान ४०° से. पर्यंत असते. हिवाळा साधारण सौम्य असून तपमान १३° से. असते. पाऊस नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो. हिवाळ्यातही काही भागांत थोडा पाऊस पडतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. उत्तर भागात १२३·८ सेंमी. तर दक्षिण भागात ८५·५ सेंमी. अशी पावसाची सरासरी आहे.

जिल्ह्याचे सु. ८·२७% क्षेत्र जंगलांनी व्यापले असून किनवट तालुक्यात सर्वांत जास्त जंगल आहे. हदगाव व भोकर तालुक्यांतही काही भागांत जंगले आहेत. येथे सागाची झाडे व बांबूची बेटे आढळतात. कंधार तालुक्यात गवताची कुरणे आहेत.

दक्षिणेकडील निकृष्ट डोंगराळ जमीन वगळता जिल्ह्यात इतरत्र काळी–सुपीक जमीन आहे. ती विशेषतः गोदावरीच्या व तिच्या उपनद्यांच्या काठी आढळते. देगलूर तालुक्यातील काळी जमीन सर्वांत उत्तम आहे. भोकर व किनवट तालुक्यांतही डोंगराळ भाग वगळता बाकी सर्वत्र काळी–सुपीक जमीन आहे. जिल्ह्यात नाव घेण्याजोगी खनिजे नाहीत. फक्त चुनखडक, बेसाल्ट, वाळू, वालुकाश्म व विटांसाठी माती मिळते.

आर्थिक स्थिती: जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा सु. ७९·६% भाग १९७२–७३ मध्ये शेतीस योग्य होता व ७०·३% भाग प्रत्यक्ष लागवडीखाली होता. लागवडीखालील जमिनीपैकी फक्त २·५% जमीन ओलिताखाली होती. जिल्ह्यातील ८०% लोक शेती करतात. सर्व शेती पावसावर अवलंबून असते.

ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून १९७२–७३ मध्ये दोन्ही हंगाम मिळून एकूण २,९१,१०६ हे. म्हणजे शेतजमिनीपैकी ४०% जमीन या पिकाखाली होती. हदगाव व किनवट तालुके जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार होत. एकूण शेतजमिनीच्या / भागात कापूस होतो. बाजरी, तांदूळ, तूर, मूग, भुईमूग, करडई, जवस, उडीद व मिरची ही अन्य खरीप पिकेही काही भागांत होतात. रब्बीच्या पिकांत गहू, हरभरा व ज्वारी या पिकांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून कंधार व नांदेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. यांखेरीज केळी, द्राक्षे, पालेभाज्या इ. बागायती पिकेही जिल्ह्यात काही ठिकाणी काढतात. एकूण सु. ६८% जमिनीत अन्नधान्ये आणि बाकीच्या जमिनीत इतर पिके होतात. ओलिताखालील एकूण १८,६५४ हे. क्षेत्रापैकी ३,८६८ हे. कालव्यांखाली २,३७६ हे. तलावांखाली व ११,३८२ हे. विहिरींखाली होते. मन्याड नदीवरील बारुळ येथील प्रकल्प हा एकच नाव घेण्याजोगा प्रकल्प या जिल्ह्यात आहे.

पशुधन : १९७२ मध्ये जिल्ह्यात २,०७,४७९ बैल २,१९,५९० गाई व १,९१,६४२ बासरे होती. यांपैकी ६०७ बैल वळू म्हणून १,९८,४८९ बैल कामासाठी व ५,६४१ दोन्हींसाठी उपयोगी येणारे होते. ८६,२२७ गाई दुभत्या होत्या. ८५,८७८ म्हशी १,९४३ रेडे व ६५,८७३ पारडी होती. यांपैकी ४३४ रेडे वळू म्हणून १,०६७ रेडे कामासाठी व २६६ दोन्ही कामांसाठी उपयोगी होते. ४१,५९८ म्हशी दुभत्या होत्या. जिल्ह्यात सहकारी दुग्धव्यवसाय वाढत आहे. शिवाय ४१,०४७ मेंढ्या १,४२,३४६ शेळ्या व बोकड ५,९४५ इतर जनावरे व १,४५,१०९ कोंबड्या व बदके होती. १९७२ मध्ये जिल्ह्यात पशूंकरिता २ रुग्णालये, ५ दवाखाने, ४२ मदतकेंद्रे, १५ वैद्य आणि २६ कृत्रिम रेतनकेंद्रे होती.

जिल्ह्यात १९७१–७२ मध्ये ५४ कारखाने होते व त्यांत रोज ५,७६७ लोक काम करीत असत. नांदेड येथे मोठी कापडगिरणी असून १९६३ मध्ये मराठवाडा सहकारी सूतगिरणी नांदेड येथे नोंदली आहे. धर्माबाद, देगलूर, मुखेड, भोकर, पेठ उमरी इ. ठिकाणी हातमाग व्यवसाय चालतो. कापूस पिंजून त्याचे गठ्ठे बांधण्याचा उद्योग हंगामात सु. १,००० लोकांना रोजगार पुरवितो. कंधारजवळ कलंबर येथे सहकारी साखर कारखाना सुरू झाला असून गूळ करण्याचा उद्योग सु. ३,००० लोकांना हंगामी रोजगार देतो. नांदेड, देगलूर, कंधार, धर्माबाद येथे तेलघाण्या आहेत. काही ठिकाणी कातडी कामाचे लहान कारखाने असून सुतार, लोहार, तांबट व कुंभार यांस काम मिळते. किनवट व हदगाव तालुक्यांत तेथील जंगलांच्या आधारावर लाकूड कापण्याचा उद्योग चालतो. जिल्ह्यात १९७३–७४ मध्ये एकूण ३६,१०८ किवॉ. तास वीज वापरली गेली. त्यांपैकी ३,७१२ किवॉ. तास घरगुती कामासाठी ४,९१७ किवॉ. तास शेतीसाठी व २१,२६८ किवॉ. तास औद्योगिक उपयोगासाठी होती. नांदेड, किनवट, देगलूर येथे औष्णिक विद्युतकेंद्रे आहेत. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाची जलविद्युत दुसऱ्या योजनेपासून या जिल्ह्यालाही मिळू लागली. तथापि एकंदरीत हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेलाच आहे.

दळणवळण : जिल्ह्यात एकूण २०८ किमी. लांब रेल्वे असून जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे मनमाड–काचीगुडा हा लोहमार्ग जातो व त्यावर या जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, पेठ उमरी व धर्माबाद ही स्थानके आहेत. दुसरा लोहमार्ग मुदखेडहून आंध्र प्रदेशातील आदिलाबादकडे गेलेला आहे व त्यावर मुदखेड, भोकर व किनवट ही स्थानके आहेत. जिल्ह्यात मार्च १९७४ मध्ये एकूण ३,३७३·१७ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यांपैकी ६०८·४३ किमी. राज्यमहामार्ग ४६४·३४ किमी. प्रमुख जिल्हामार्ग १९८·२५ किमी. इतर जिल्हामार्ग २,१०२·१५ किमी. ग्राममार्ग होते. नगरपालिका मार्ग २३०·४६ किमी. होते. नांदेड विभागात (नांदेड, परभणी व अंशतः उस्मानाबाद व बीड जिल्हे) राज्य परिवहनाचे ३२३ मार्ग आहेत. १९७३–७४ साली राज्य परिवहनाद्वारे या विभागात दररोज सरासरी १,३५,७२५ उतारूंची वाहतूक झाली.

जिल्ह्यात १९७३–७४ मध्ये ३२८ डाकघरे २० तारघरे १,३०७ दूरध्वनी व १६,७२३ रेडिओ परवानाधारक होते. १,२४४ खेड्यांत ग्रामस्थांसाठी रेडिओ दिलेले होते.


लोक व समाजजीवन: या जिल्ह्यात एकूण ११ शहरे व १,३२८ खेडी आहेत. शहरी लोकसंख्येचे प्रमाण दर चौ. किमी. ला ८९३ व ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ११४ आहे. एकूण ६५९ खेड्यांचे विद्युतीकरण झाले. जिल्ह्यात मुख्यतः मराठी, उर्दू, तेलुगू या भाषा व वंजारी ही बोली असून त्या बोलणाऱ्यांचे एकूण लोकसंख्येशी शेकडा प्रमाण अनुक्रमे ७३·२८, १०·८४, ६·३४, व ४·५६ आहे. यांशिवाय कानडी, हिंदी, गोंडी, पंजाबी, गुजराती व इतर सु. २५ भाषा व बोली अल्प प्रमाणात चालू आहेत. बहुतेक लोकांना मातृभाषेशिवाय आणखी एक–दोन तरी भाषा समजतात. १९७१ मध्ये जिल्ह्यात १,९५,००० लोक शेतकरी २,०१,१०० शेतमजूर पशुपालन, जंगल व्यवसाय, मासेमारी इ. ७,८०० खाणकाम करणारे ४०० घरगुती व्यवसायांत १४,२०० इतर व्यवसायांत १५,७०० बांधकामात ६,२०० वाणिज्य व व्यापार २०,८०० दळणवळण ५,२०० याप्रमाणे एकूण कामकरी ४,९७,६०० व काम न करणारे लोक ९,००,२०० होते. नांदेड येथे इतिहास मंडळ, चित्रशाळा, गायन–वादन विद्यालय, संस्कृत पाठशाळा, अनेक शिक्षणसंस्था, नाट्यसंघ, महिलासंघ, वाचनालये, बालकमंदिरे इ. विविध सांस्कृतिक संस्था आहेत.

शिक्षण: १९७१ मध्ये जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण पुरुषांत ३४·६४% स्त्रियांत १०·३६% व एकूण लोकसंख्येच्या २२·७८% होते. १९७२–७३ साली जिल्ह्यात १६ पूर्वप्राथमिक शाळांतून ७०४ विद्यार्थी व १९ शिक्षक होते. १,६१३ प्राथमिक शाळा, १५६ माध्यमिक शाळा आणि १४ उच्च शिक्षणसंस्था होत्या व त्यांमधून अनुक्रमे १,२९,४३१ ४९,३६० ८,५८२ विद्यार्थी आणि ४,२४७ २,४१९ ३२४ शिक्षक होते. १९६१ च्या मानाने १९७१ मध्ये सर्व विभागांत विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी उच्च शिक्षणाबाबत ही वाढ डोळ्यात भरण्याजोगी आहे. मागासवर्गीयांच्या व अनुसूचित जातिजमातींच्या विद्यार्थ्यास शिक्षणाबाबत अनेक सवलती व मदत देण्यात येते.

धर्म: जिल्ह्यात १९७१ मध्ये ७,१४,८२० पुरुष व ६,८२,९४२ स्त्रियांपैकी निरनिराळ्या धर्मांच्या पुरुषांची व स्त्रियांची संख्या पुढीलप्रमाणे होती. हिंदू ५,५६,६८१ व ५,२१,५४२ मुस्लिम ८२,८६१ व ७९,३१० शीख ३,२४५ ल २,२२१ बौद्ध ६८,७६१ व ६६,३२४ जैन २,३७० व २,८०२ ख्रिश्चन ६२३ व ५६७ इतर १५ व १३ आणि धर्म न नोंदलेली २६४ व १६३. या निरनिराळ्या धर्मांच्या लोकांच्या चालीरीती, राहणी, सणवार व उत्सव इ. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील त्या त्या धर्मांच्या लोकांप्रमाणेच आहेत.

आरोग्य: जिल्ह्यात १९७३–७४ साली २ रुग्णालये, ३६ दवाखाने, ९ प्रसूतिगृहे, १ आरोग्यकेंद्र, ५९ डॉक्टर व ३२८ परिचारिका होत्या. ११ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ३१ वैद्य व रुग्णालयांत सु. ४५० खाटा होत्या. १९७३ मधील जिल्ह्यातील मृत्यूच्या एकूण रोगकारणांपैकी श्वसनेंद्रियांचे रोग, क्षय आमांश, हगवण वगैरे आतड्याचे रोग, मुदतीचा ताप, कर्करोग, हिवताप व न्युमोनिया असा क्रम लागतो. देवीरोगाचे बहुतेक निर्मूलन झालेले दिसते. देवीसाठी व पटकीसाठी प्रतिबंधक लस टोचण्यात येते. १९७३–७४ मध्ये जिल्ह्यात १३ कुटुंबनियोजन केंद्रे होती व तेथे त्या वर्षी, १,२७१ पुरुषांच्या व ७५० स्त्रियांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

जिल्ह्यात १९७३–७४ मध्ये १,०८३ ग्रामपंचायती व ११ नगरपालिका होत्या शिवाय जिल्हा परिषद, तालुका पंचायती याही आहेत. जिल्ह्यात ७७ बँका व ४४ छापखाने असून ३ मराठी दैनिके ९ मराठी साप्ताहिके व १ पाक्षिक ही प्रसिद्ध होतात. पूर्वीच्या निजामशाहीतील व महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरील हा जिल्हा असल्याने येथील संस्कृती महाराष्ट्रातील इतर भागांतील संस्कृतींपेक्षा थोडी वेगळी आढळते.

खेळ व मनोरंजन: खेड्यापाड्यांतून मुलामुलींचे शिवाशिवी, लंगडी, हुतुतू, विटीदांडू, पोहणे, सुरपारंब्या, फुगड्या, झिम्मा इ. जुने खेळ असतात त्याचप्रमाणे शाळा–कॉलेजांतून लंगडी, खोखो, हुतुतू इ. देशी व पायचेंडू, कडीचेंडू, क्रिकेट इ. परदेशी खेळ प्रचलित आहेत. सिनेमा सर्वत्र लोकप्रिय करमणूक आहे. नाटके विशेषतः शहरी भागात जास्त. खेड्यांतून, विशेषतः जत्रा, उत्सव वगैरे प्रसंगी, कुस्त्यांचे फड व तमाशा लोकप्रिय आहेत. अलीकडे शाळा–कॉलेजांतून देशी खेळांस व व्यायामप्रकारांस उत्तेजन मिळत आहे. तथापि सुसंघटित खेळांच्या दृष्टीने जिल्हा मागासलेलाच आहे. जिल्ह्यात एकूण १६ चित्रपटगृहे व नाट्यगृहे असून ७ फिरती चित्रपटगृहे आहेत.

प्रेक्षणीय स्थळे: नांदेड तालुक्यातील अर्धापूर येथील केशवराज मठ, दर्गा, बारुळ येथील मन्याड नदीवरील धरण, देगलूर येथील गुंडा महाराजांचा मठ व जुनी मशीद हदगाव येथील दत्तमंदिर, कंधार येथील किल्ला, कुंडलवाडी येथील कुंडलेश्वर मंदिर, माहूर येथील दत्तात्रेयाचे जन्मस्थान समजले जाणारे दत्तशिखर व रेणुका देवीचे मंदिर, मालेगाव येथील खंडोबाचे देवालय, मुदखेड येथील अपरंपार स्वामींची समाधी, काझिपुरा मशीद व देवीचे मंदिर मुखेड येथील दशरथेश्वर महादेव व वीरभद्र मंदिरे, नांदेड येथील अमृतसरच्या खालोखाल महत्त्वाचे शिखांचे गुरुद्वार, नगिना घाट, किल्ला, हिंदूंची अनेक देवालये, जामा मशीद, बडी दर्गा इ. मुस्लिमांची पवित्र स्थाने, तामसा येथील बारालिंग मंदिर व गौतम तीर्थ, पेठ उमरी येथील बाबा महाराजांची समाधी, उनकदेव येथील उनकेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारची दोन उष्णोदकाची कुंडे ही प्रेक्षणीय होत.

शिंदे, सु. द. कुमठेकर, ज. ब.

कंधारचा किल्ला नांदेड शहराच्या एका भागाचे विहंगम दृश्य
मन्याड नदीप्रकल्प, बारूळ कलंबराचा सहकारी साखर कारखाना
दत्तमंदिर, माहूर नगिना घाट, नांदेड
उनकदेव येथील उष्णोदक कुंड उस्मानशाही कापड गिरणीतील एक दृश्य, नांदेड
कापसाची बाजारपेठ, नांदेड