चूझेंजी सरोवर व केगोन धबधबा यांच्या निसर्गरम्य परिसरातील निको.

निको : जपानच्या होन्शू प्रांतातील टोचिगी जिह्यातील शहर. लोकसंख्या २८,५०२ (१९७०). हे टोकिओच्या उत्तरेस १४५ किमी.वर डाइया नदीकाठी वसले आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेले हे शहर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने जपानच्या सांस्कृतिक व धार्मिक जीवनात याला विशेष महत्त्व असून, जपानी नागरिकांनीच नव्हे तर अन्य देशीय हौशी प्रवाशांनीही हे गजबजलेले असते. येथील अनेक देवालयांपैकी चौथ्या शतकातील शिंतोपंथीय देऊळ व आठव्या शतकातील बुद्धमंदिर विख्यात आहे. सतराव्या शतकात येथील प्राचीन देवळे मागे पडून टोकुगावा वंशातील लष्करी प्रशासकांची स्मारके महत्पदास चढली. त्यांपैकी टोकुगावा वंशातील टोशोगू व ईयाशू यांची स्मारके, त्यांतील गहिरे रंग व कलाकुसरीच्या कामामुळे प्रमुख आकर्षणे ठरली आहेत. या स्मारकांच्या परिसरात जपानी सीडार वृक्षांची राईच असल्याने त्यांची शोभा वाढली आहे. या शहराच्या परिसरातच निकोचे राष्ट्रीय उपवन, पर्वतावरील गरम पाण्याचे झरे, टोकिओ विद्यापीठाचे निको वनस्पतिउद्यान, केगोन धबधबा आणि चूझेंजी सरोवर ही रम्य स्थाने आहेत. यांवरून निको पाहिल्याशिवाय ‘केक्को’ (सुंदर) ह्या शब्दाचा उच्चार करू नका असे जपानी लोक म्हणतात, त्यातील मर्म पटते.

ओक, द. ह.