एम्स : पश्चिम जर्मनीतील महत्त्वाची नदी. लांबी ३६८ किमी. जलवाहनक्षेत्र ११,९१३ चौ. किमी. नदीचा उगम वायव्य जर्मनीतील टॉइटोबुर्क पर्वताच्या दक्षिण उतारावर होतो. वेस्टफेलिया व हॅनोव्हर प्रांतांतून वायव्य व उत्तरवाहिनी होऊन ही उत्तर समुद्रास मिळते. मुखाजवळ हिचे दोन प्रवाह होऊन बॉर्कुम बेटाच्या दोहो बाजूंनी जातात. १८९२ ते १८९९ च्या दरम्यान जलवाहतुकीकरता हिच्या प्रवाहात ६९ किमी. कालवा बांधण्यात आला. तसेच वेस्टफेलियातील उद्योगांस संपूर्ण जर्मन जलमार्ग असावा म्हणून जगप्रसिद्ध डॉर्टमुड-एम्स कालवा बांधण्यात आला. याची लांबी २६७ किमी., रुंदी ३० मी. व खोली ३ मी. आहे. याच्या दोन्ही टोकांच्या पातळीत ७० मी. अंतर असल्याने यात १९ जलपाश (पाणशिड्या) बांधले आहेत. या कालव्याची एक शाखा हेन्‍रीखनबुर्कपासून हर्नवरून र्‍हाईनला मिळते. मुख्य कालवा व त्याची हर्नशाखा यांच्या पातळीतही १४ मी. अंतर असल्याने हेन्‍रीखनबुर्कपाशी एक अजस्त्र उद्वाहक (लिफ्ट) बांधावे लागले आहे. ही नदी व तिचे कालवे यांमुळे जर्मनीच्या उद्योग समूहास स्वस्त व सुलभ समुद्रमार्ग मिळाला असल्याने जर्मन जलमार्गाच्या जाळ्यात एम्सला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. एमडेन, लेअर, पापेनबुर्क ही तिच्या काठची प्रमुख शहरे होत. या नदीमार्गे रूरमधील कोळसा व कोक, स्वीडनमधील लोहधातुक, अन्नपदार्थ व इतर कच्चा माल यांची वाहतूक होते.

शहाणे, मो. ज्ञा.