खडकवासला : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ९,२७० (१९७१). हे पुण्याच्या १७ किमी. नैर्ऋत्येस असून मुठा नदीवर येथे १८७९ साली ३२·६ मी. उंचीचे धरण बांधण्यात आले.

'सूदान ब्लॉक' - राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला

पुणे शहराला यातूनच पाणीपुरवठा होतो. १९६१ साली ⇨पानशेतबरोबर खडकवासला धरणही फुटले. चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर खडकवासल्यामध्ये दुरुस्त्या आणि सुधारणा करून धरण ८२३ मी. लांब व ५८ मी. उंच करावयाचे, तसेच १२७ किमी. लांबीचा उजवीकडील कालवा व २९ किमी.चा डावीकडील कालवा यांनी २२,२९८ हे. प्रदेश जलसिंचनयुक्त करण्याचा सु. १६·७ कोटी रुपयांचा प्रकल्प जवळजवळ पूर्ण होत आला आहे. खडकवासल्याच्या रम्य परिसरामुळेच येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी– नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी– स्थापण्यात आली. त्यामुळे खडकवासल्याचे महत्त्व खूप वाढले आहे. अकादमीशिवाय येथे संरक्षणविभागाची अनेक कार्यालये आहेत. खडकवासल्याची दुसरी महत्त्वाची संस्था म्हणजे विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणारे मध्यवर्ती जल व शक्तिसंशोधन केंद्र होय.

शाह, र. रू.