सामोआ :(पूर्वीचा पश्चिम सामोआ). पॅसिफिक महासागरातील एक स्वतंत्र देश. क्षेत्रफळ २,८३१ चौ. किमी. लोकसंख्या १,९४,३२० (२०१२). मध्य पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशिया द्वीपसमूहांपैकी सामोआ हा एक पंधरा बेटांचा द्वीपसमूह असून राजकीयदृष्ट्या हा द्वीपसमूह दोन भागांत विभागला आहे. त्यांपैकी पश्चिमेकडील द्वीपसमूह सामोआ (१ जानेवारी १९६२ नंतर) व पूर्वेकडील अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अखत्यारीतील द्वीपसमूह अमेरिकन सामोआ या नावाने ओळखला जातो. न्यूझीलंडच्या ईशान्येस २,९०० किमी. वर सामोआ बेटे (नऊ) असून त्यांच्या पूर्वेस अमेरिकन सामोआ बेटे (सहा) आहेत. सामोआमध्ये साव्हाई ई आणि ऊपोलू ही दोन प्रमुख व क्षेत्रफळाने मोठी बेटे असून त्याशिवाय ॲपालिमा, व्हानुआतापू , मानोनो, नामूआ, न्यू साफी व न्यूतेले या लहान बेटांचा समावेश होतो. त्यांपैकी साव्हाई ई, ऊपोलू, ॲपालिमा व मानोनो बेटांवर वसती आढळते. सामोआचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुकमे १३ ते १५  द. अक्षांश व १७१ ते १७३पू. रेखांश असा आहे. पूर्व आग्नेय-पश्चिम वायव्य विस्तार १५० किमी. तर उत्तर ईशान्य-दक्षिण नैऋर्त्य विस्तार ३९ किमी. आहे. एकूण भूक्षेत्रापैकी साव्हाई ई सर्वांत मोठे बेट असून त्याचे क्षेत्रफळ १,७०७·८ चौ. किमी., ऊपोलू बेटाचे १,११७·६ चौ. किमी. व इतर बेटांचे क्षेत्र ५·४ चौ. किमी. आहे. ऊपोलू बेटावरील आपीआ (लोकसंख्या ३८,८३६–२००१) हे सामोआच्या राजधानीचे ठिकाण होय.

भूवर्णन : सामोआमधील प्रमुख बेटे ज्वालामुखीतून निर्माण झालेली व पर्वतमय असून त्यांचे किनारे प्रवाळशैल भित्तींनी वेढलेले आहेत. साव्हाई ई व ऊपोलू ह्या दोन्हीही बेटांचे मध्यभाग उंच पर्वतीय प्रदेशांनी व्यापलेले आहेत. साव्हाई ई बेटावरील ज्वालामुखी निद्रिस्त असून मौंट अफी ज्वालामुखीचा उद्रेक १६९० मध्ये, मौंट मू ज्वालामुखीचा उद्रेक१९०२ मध्ये, तर माताव्हानू ज्वालामुखीचा उद्रेक १९०५–११ या कालावधीत झाला. सभोवताली लाव्हाजन्य पठारे आहेत. साव्हाई ई बेटावरील मौंट सिलिसिली हे सर्वोच्च शिखर (१,८५८ मी.) आहे. ऊपोलू बेटावरील मध्यवर्ती ज्वालामुखी श्रेणीची सर्वोच्च उंची मौंट फीटोची (१,११३ मी.) आहे. दोन्ही प्रमुख बेटांवर अनेक शीघ्रप्रवाही नद्या असून त्यांच्या मार्गांत धबधबे आढळतात. सामोआच्या सागरकिनाऱ्याची एकूण लांबी ४,०३२ किमी. आहे. बेटावरील ज्वालामुखी मृदा सुपीक परंतु सच्छिद्र आहे.

हवामान : सामोआचे हवामान उष्णकटिबंधीय व दमट सागरी स्वरूपाचे आहे. एप्रिल ते नोव्हेंबर हवामान कोरडे, तर नोव्हेंबर ते एप्रिल ते आर्द्र असते. नोव्हेंबर हा सर्वांत उष्ण, तर जुलै हा सर्वांत थंड महिना असतो. एप्रिल ते नोव्हेंबर या आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या काळात वातावरण थंड असते. या काळात तेथील तापमान २२°से. तर नोव्हेंबर ते एप्रिल या वर्षा ऋतूतील तापमान ३६° से. असते. जानेवारी ते मार्च यांदरम्यान येथे चक्री वादळे संभवतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २८७ सेंमी. असून त्यांपैकी दोन तृतीयांश पर्जन्यमान पावसाळ्यात आढळते.

वनस्पती व प्राणी : सामोआ बेटांवर उष्णकटिबंधीय वर्षारण्ये असून त्यांचे सखोल प्रदेशातील, पर्वतीय प्रदेशातील व अधिक उंचीवरील अरण्ये असे तीन प्रकार पडतात. दलदलयुक्त प्रदेशात खारफुटी वने आढळतात. गवत व झुडुपेही मोठ्या प्रमाणावर वाढतात. येथे वृक्षांच्या ५३६ जाती आहेत. द्राक्षवेली मोठ्या प्रमाणावर वाढतात. किनाऱ्यावर नारळाच्या बागा आहेत. किनाऱ्यावरील बरीच अरण्ये वसाहती व शेतीसाठी तोडली गेली आहेत. कबूतर, रेल, बदक, दलदली कोंबड्या, कोकिळ, छोटे वाघूळ इ. उडणारे पक्षी व कोल्हे, पाल, सरडे, उंदीर, स्किंच, रानटी गुरे यांसारखे प्राणी सामोआमध्ये आढळतात.

इतिहास : पॉलिनीशियन लोकांनी सामोआ द्वीपसमूहावर इ. स. पू. सु. १००० च्या सुमारास वस्ती केल्याचे पुरावे मिळतात. सामोअन भाषा ही माओरी, ताहीतिअन, हवाई व टाँगा या भाषांच्या जवळची आहे. डच मार्गनिर्देशक याकॉप राग्वाँन याने बहुधा १७२२ मध्ये ही बेटे पाहिली असावीत. फ्रेंच समन्वेषक ल्वी आंत्वान दे बूगँव्हील हा या बेटांना भेट देणारा पहिला यूरोपियन होय (१७६८). येथील सामोअन लोक सुकाणूविरहित मचवा (कनू) वल्हविण्यात पटाईत होते, त्यामुळे या द्वीपसमूहाला मार्गनिर्देशकांचा द्वीपसमूह असे नाव पडले. झां फ्रा न्स्वा दे गालोप कोंत दे ला पॅरुझ याने १७८७ मध्ये या बेटांचे सर्वेक्षण केले.

लंडन मिशनरी सोसायटीच्या दोन सदस्यांनी १८३० मध्ये साव्हाई ई बेटावर वस्ती केली. १८३४ मध्ये सामोअन भाषा लिखित स्वरूपात आणली. १८३८-३९ मध्ये सामोआच्या प्रमुखांनी यूरोपीय देशांशी तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांशी व्यापारी करार केले. तसेच त्यांच्यातील परस्परसंबंधांचे स्वरूप ठरविले. शतकाच्या मध्यास यूरोपीय वसाहतकारी आणि व्यापारी प्रतिनिधींनी ऊपोलू बेटावरील आपीआ सभोवतालच्या प्रदेशात आपले लक्ष केंद्रित केले. १८४८–७३ या काळात सामोआला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तीव्र  लढा द्यावा लागला. संयुक्त संस्थानांचा विशेष प्रतिनिधी कर्नल ए. बी. स्टेनबर्जर याने १८७३ चा शांतता करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्टेनबर्जरने यूरोपियन पद्घतीचे संविधान तयार केले, तसेच तो येथील कार्यकारी अधिकारी बनला. १८७६ मध्ये ब्रिटनने त्याला अटक व हद्दपारी केली. येथे नव्याने पक्षीय वाद निर्माण होऊन ब्रिटिशांनी आपीआ येथे म्युनिसिपालीटीची स्थापना केली (१८७९). सामोआवरील आधिपत्यासाठी ब्रिटीश, जर्मन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यातील सत्तासंघर्ष चालूच राहिला. १६ मार्च १८८९ रोजी तीन जर्मन व तीन संयुक्त संस्थानांच्या युद्घनौका आपीआ बंदरामध्ये चक्री वादळात सापडून भरकटल्या किंवा समुद्रात बुडाल्या, तेव्हा हा संघर्ष शिगेला पोहोचला. या आपत्तीची परिणती बर्लिन करारामध्ये झाली (१८८९). या करारानुसार तीनही सत्ता सामोआच्या तटस्थतेस तसेच त्याला स्वातंत्र्य देण्यास राजी झाल्या. सामोआचा राजा व तीन सत्तास्पर्धक यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. १८९९ मध्ये तीनही सत्तास्पर्धक एकत्र येऊन त्यांनी १८८९ चा करार रद्द केला आणि पश्चिम सामोआ द्वीपसमूह जर्मनीला जोडला.

या बेटांना जर्मन रक्षित राज्याचा दर्जा १८९९ मध्ये प्राप्त झाला. पहिल्या महायुद्घ काळात (१९१४–१८) न्यूझीलंडच्या सैन्याने जर्मनीकडून ही बेटे हस्तगत केली. राष्ट्रसंघाच्या महादेशानुसार १९१९ मध्ये न्यूझीलंडला शासकीय अधिकार प्राप्त झाले. न्यूझीलंडचे प्रशासकीय अधिकार ग्राह्य धरुन १९४६ मध्ये पश्चिम सामोआ संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विश्वस्त क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. पश्चिम सामोआत स्वायत्त प्रशासनाच्या दृष्टीने १९५४ पासून प्रयत्न सुरु झाले. त्याची फलश्रुती १९६० च्या स्वतंत्र राज्यघटनेत झाली. तिला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने सार्वमताद्वारे अनुमती देऊन (१९६१) पश्चिम सामोआ या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती १ जानेवारी १९६२ रोजी झाली. त्याचवर्षी सामोआचा न्यूझीलंडबरोबर एक मैत्री करार झाला, त्यानुसार सामोआने विनंती केल्यास विदेशी संबंधांबाबत न्यूझीलंड सामोआचे अधिकृत प्रतिनिधित्व करेल. सुरुवातीस राज्याच्या प्रमुखपदाची धुरा संयुक्त रीत्या दोन पारंपरिक राजांकडे होती (१९६३). त्यांपैकी एकाच्या निधनानंतर दुसरे मॉलिएटोआ तानु माफिली हे आजन्म राष्ट्रप्रमुख झाले. १९९७ मध्ये देशाचे पश्चिम सामोआऐवजी ‘सामोआ’ असे अधिकृत नाव स्वीकारण्यात आले.


सामोआत संविधात्मक राजेशाही अस्तित्वात आली. मॉलिएटोआ यांचे ११ मे २००७ रोजी निधन झाल्यानंतर विधानसभेकडून पाच वर्षांसाठी राज्य प्रमुखाची निवड केली जाऊ लागली. विधानसभेचे ४९ सदस्य असून त्यांपैकी सामोअनेतर व संमिश्र वांशिक समूहातून दोन आणि ४७ सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्घतीने पाच वर्षांसाठी निवडले जातात. विधानसभा सदस्यांकडून पंतप्रधानांची निवड केली जाते. पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडून प्रत्यक्ष राज्यकारभार पाहिला जातो. सामोअन ‘मताई’ म्हणजे कुटुंबाचा प्रमुख म्हणून ज्याला परंपरेने बिरुद प्राप्त झाले आहे, अशी व्यक्तीच निवडणुकीला उभे राहू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली देशातील न्यायव्यवस्था चालते.

आर्थिक स्थिती : सामोआ हा एक विकसनशील देश आहे. शेती तसेच लघुउद्योग, मासेमारी, लाकूडतोड व पर्यटन या व्यवसायांवर त्याची अर्थव्यवस्था आधारित आहे. परदेशातील कुटुंबियांकडून खाजगी रीत्या येणारी मदतही महत्त्वाची आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात सु. ४० टक्के वाटा कृषिक्षेत्राचा, २५ टक्के उद्योगांचा व ३५ टक्के सेवाक्षेत्राचा आहे. एकूण क्षेत्रफळापैकी दोन पंचमांश क्षेत्र कृषियोग्य आहे. सामोआतील चार पंचमांश क्षेत्र रुढिगत क्षेत्र असून ते क्षेत्र कुटुंबाचा किंवा खेड्याचा प्रमुख ( आईगा ) म्हणून मताईकडे भाडेपट्ट्याने असते. उर्वरित एक पंचमांश क्षेत्र पूर्ण मालकीचे किंवा सार्वजनिक आहे. देशातील एकूण श्रमिकांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश श्रमिक कृषिक्षेत्रात सामावलेले आहेत. नारळ, कोको, केळी, तारो, याम, भाकरीचे झाड, पॉ पाँ तसेच उष्णकटिबंधीय फळांचे उत्पादन येथे घेतले जाते. किनाऱ्यावर नारळाच्या बागा आहेत. सन २००२ मध्ये काही प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन हजार टन) : नारळ–१४०, केळी–२२, तारो–१७, खोबरे–११, अननस–५. सामोआत २,०१,००० डुकरे, २९,००० गुरे व ७,००० गाढवे असे पशुधन होते (२००३). देशातील १,७१,००० हे. क्षेत्र (एकूण भूक्षेत्राच्या ६०.४ टक्के) अरण्याखाली होते (२००५). लाकूडतोड व्यवसायातून स्थानिक उपयोगासाठी तसेच निर्यातीसाठी लाकडाचे उत्पादन घेतले जाते. सन २००३ मध्ये १३,१०० घ. मी. इतके इमारती लाकडाचे उत्पादन झाले. मासेमारी व्यवसायातून स्थानिक गरजा भागविल्या जातात. सर्वाधिक पकड टुना माशांची असते. सन २००४ मध्ये ४,७१९ टन मत्स्योत्पादन झाले.

निर्मिती उद्योगांत विविधता आणणे हे शासनाचे धोरण आहे. कृषि-उत्पादने व अरण्योत्पादनांवर आधारित उद्योगांबरोबरच अन्नप्रक्रिया, हस्तकला, विद्युत् साहित्य, कापड, पादत्राणे, पशुखाद्य, नारळाची उत्पादने, दारु गाळणे, फळे व त्यांचे रस हवाबंद डब्यात भरणे इ. उद्योगही येथे चालतात. पर्यटन हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. सन २००३ मध्ये ९२,००० पर्यटकांनी या बेटांना भेट दिली असून त्यापासून ४५०ल. अमेरिकी डॉलर इतके उत्पन्न मिळाले. पॅसिफिकमधील इतर बेटांच्या तुलनेत येथील दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. १९८० व १९९० च्या दशकांत स्थूल राष्ट्रीय उत्पादनात अल्प वाढ झाली. वित्तीय विभागात नियमितता आणणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न चालू आहेत. येथील विद्युत् उत्पादन १,१०० ल. किवॉ. तास इतके होते (२००४).

टाला हे सामोआचे अधिकृत चलन आहे. १ जुलैला वित्तीय वर्ष सुरु होते. सेंट्रल बँक ऑफ सामोआ (स्था. १९८४) ह्या मध्यवर्ती बँकेकडून चलन निर्गमित केले जाते. विकास बँक, औद्योगिक बँक, इंटरनॅशनल बिझिनेस बँक कार्पोरेशन, नॅशनल बँक ऑफ सामोआ, सामोआ कमर्शिअल बँक व वेस्ट पॅक बँक ऑफ सामोआ या व्यापारी बँका येथे आहेत. देशातील कामगार संख्या ५२,९४५ होती (२००१).

सामोआचे सन २००५ मधील एकूण आयातमूल्य ६४७ द. ल. टाला व निर्यातमूल्य २३६ द. ल. टाला होते. यंत्रे व वाहतूक सामग्री , खाद्यपदार्थ, इंधन, निर्मितीवस्तू यांची आयात, तर नारळ व नारळाची उत्पादने, ताडतेल, तारो, टामू, कॉफी, बिअर व सिगारेटी यांची निर्यात केली जाते. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अमेरिकन सामोआ, फिजी, जपान, तैवान, सिंगापूर, इंडोनेशिया यांच्याशी सामोआचा विदेश व्यापार चालतो.

देशात ७९० किमी. लांबीचे रस्ते होते (२००२). प्रवासी मोटारगाड्या ३,४०० आणि ट्रक व मोठ्या प्रवासी गाड्या ३,२०० होत्या (१९९८). आपीआ व आसाक येथे खोल सागरी बंदरे आहेत. नियमित जलवाहतूकमार्गांनी ही बेटे जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, फिजी बेटे, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडशी जोडलेली आहेत. आपीआ (फाले ओलो) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

लोक व समाजजीवन : सामोआच्या १,९४,३२० या एकूण लोकसंख्येत ऊपोलू बेटाची (मानोनो व ॲपालिमासह) १,३४,०२४ तर साव्हाई ई बेटाची लोकसंख्या ४२,८२४ होती (२००१) कारण साव्हाई ई बेटावरुन लाव्हारस वाहत असल्यामुळे बरेचसे क्षेत्र नापिक झाले आहे. त्यामुळे या बेटावर लोकसंख्या तुरळक झाली आहे. ग्रा मीण भागात ८० टक्के लोक राहतात. जन्मप्रमाण दरहजारी २२·१ व मृत्युमान ५·३ असून सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६९·७९ वर्षे, तर स्त्रियांच्या बाबतीत ७६·६८ वर्षे होते (२०१२). १९९२–२००२ या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर ०·५९ टक्के होता. बालमृत्युमान दर हजारी २४ (२००५) आणि प्रसूतिमान ३·१३ होते (२०१२). साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या बाबतीत ९९·७ टक्के व स्त्रियांच्या बाबतीत ९८·७ टक्के होते (२०१२). सामोअन व इंग्रजी ह्या अधिकृत भाषा आहेत.

सामोअन लोक प्रामुख्याने ख्रिश्चन असून त्यांपैकी तीन चतुर्थांश प्रॉटेस्टंट व उर्वरित रोमन कॅथलिक आहेत. सामोअन लोक प्रामुख्याने पॉलिनीशियन वंशाचे असून त्यांची टाँगा लोकांशी तसेच न्यूझीलंडमधील माओरी यांच्याशी विशेष सजातीय जवळीक आहे. त्याशिवाय मिश्र यूरोपॉलिनीशियन, यूरोपियन, पॅसिफिकमधील इतर द्वीपवासीय व चिनी हे अल्पसंख्यांक आहेत.

येथील लोकजीवनावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असला, तरी विशेषतः ग्रा मीण भागात परंपरागत संस्कृती अद्यापि अवशिष्ट आहे. खेड्यां त रविवारी आणि संध्याकाळी सायंप्रार्थनेची घंटा नियमितपणे वाजविली जाते. काव्हा मद्यपान उत्सव खेड्यां मध्ये साजरा केला जातो. नामांकित पाहुण्यांसाठी शासनही या उत्सवाचे आयोजन करते. आईगा म्हणजे सामोअन कुटुंब. या कुटुंबाच्या किंवा गावाच्या प्रमुखाला परंपरेने प्रमुख म्हणून बिरुद प्राप्त झाले आहे. अशा सामोअन मुख्य व्यक्तीला मताई म्हणतात. आईगामधील व्यक्तींकडून मताईची निवड केली जाते. मिश्र व बिगर सामोअन वस्ती वगळता सर्वत्र मताई व आईगा अशी सामाजिक पद्घती रुढ आहे. शिष्टाचार, संभाषण आणि सामाजिक परस्परसंबंध यांबाबतचे नियम सर्वत्र कोटेकोरपणे पाळले जातात. [⟶ सामोअन].

न्यूझीलंडच्या धर्तीवर येथील शिक्षणपद्घती आहे. शिक्षण जरी ऐच्छिक असले, तरी मुलांचा शिक्षणाकडे ओढा आढळतो. माध्यमिक, व्यावसायिक व शिक्षक-प्रशिक्षण विद्यालये येथे आहेत. देशातील प्राथमिक शाळांत ३८,९४६ विद्यार्थी व १,४४६ शिक्षक आणि माध्यमिक शाळांमध्ये १४,१५९ विद्यार्थी व ७४९ शिक्षक होते (२००२). येथील सामोआ राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना १९८४ मध्ये झाली असून त्यात ६१४ विद्यार्थी व ३० अध्यापक होते (१९९४-९५). साउथ पॅसिफिक विद्यापीठाचे कृषिविद्यालय आपीआ येथे आहे. तंत्रनिकेतन संस्थेत व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.

देशात ३३ सार्वजनिक रुग्णालये, १ खाजगी रुग्णालय, ११ जिल्हा रुग्णालये व १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ४३ डॉक्टर, ६ दंतवैद्यक, ३३३ परिचारिका व १३ प्रसविका होत्या (२००२). येथील राष्ट्रीय वस्तुसंगहालय व सांस्कृतिक केंद्राची स्थापना १९८४ मध्ये करण्यात आली आहे. राजधानी आपीआशिवाय असाऊ व तागा ही प्रमुख शहरे आहेत. (चित्रपत्रे).

चौधरी, वसंत


सामोआ

राजधानी आपीआ, एक दृश्य.आपीआ येथील स्वातंत्र्यदिनाचे दृश्य.

मॉर्मन प्रार्थनास्थळ, आपीआ.

साव्हाई ई बेटावरील एक निसर्गसुंदर खेडे.