मोझँबीक : आग्नेय आफ्रिकेतील २५ जून १९७५ रोजी स्वतंत्र झालेला एक प्रजासत्ताक देश. त्याआधी हा देश पोर्तुगालचा सागरपार साम्राज्यप्रदेश होता. त्यावेळी याला पोर्तुगीज पूर्व आफ्रिका म्हणून ओळखले जाई. क्षेत्रफळ ७,९९,३८० चौ. किमी. लोकसंख्या १३१·४ लक्ष (१९८३ अंदाज). अक्षवृत्तीय विस्तार १०º २७′ द. ते २६° ५२′ द. व रेखावृत्तीय विस्तार ३०º १२′ पू. ते ४०º ५१′ पू. यांदरम्यान. दक्षिणोत्तर कमाल लांबी १,७७० किमी. व पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,०९४ किमी. मोझँबीकच्या उत्तरेस टांझानिया, पूर्वेस हिंदी महासागर, दक्षिणेस द. आफ्रिका प्रजासत्ताक, नैर्ऋत्येस स्वाझीलँड, पश्चिमेस द. आफ्रिका प्रजासत्ताक, झिंबाब्वे आणि वायव्येय झँबिया व मालाबी हे देश आहेत. पूर्वेस हिंदी महासागराच्या मोझँबीक खाडीने, मोझँबीकजवळील आफ्रिकेची मुख्य भूमी मादागास्कर बेटापासून अलग केली आहे. देशाला सु. २,४७० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मापूतो (लोकसंख्या ८,५०,०००–१९८२) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण असून ते पूर्वी लोरेंसू मरकेश या नावाने ओळखले जाई.
भूवर्णन : दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वांत जास्त किनारी मैदानी प्रदेश मोझँबीकला लाभला असून, देशाचे जवळजवळ निम्मे क्षेत्र २३० मी. पेक्षा कमी उंचीचे आहे. या किनारी मैदानी प्रदेशाची सर्वाधिक रुंदी दक्षिण भागात असून, उत्तरेस ती कमीकमी होत गेलेली आहे. देशाच्या मध्य व उत्तर भागांतील किनारी मैदानी प्रदेशाला लागून अंतर्गत भागात १५० ते ६०० मी. उंचीचा पठारी प्रदेश आहे. या पठारी प्रदेशाची उंची पश्चिमेकडे वाढत जाऊन मालावी, झँबिया व झिंबाब्वे सरहद्दीदरम्यान हा पठारी भाग पर्वतीय प्रदेशात विलीन झालेला दिसतो. अगदी उत्तर भागात न्यासा सरोवराजवळील निसा प्रांतातील प्रदेशाची उंची १,७५० मी. पर्यंत वाढलेली असून, वायव्येय झँबिया-मालावी सरहद्दीजवळील टेटे प्रांतात प्रदेशाची उंची २,२०७ मी. पर्यंत वाढलेली दिसते.
मोझँबीकला लाभलेल्या लांबचलांब समुद्राकिनाऱ्यावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष आढळतात. अगदी दक्षिण भागात देल्गादू उपसागर असून आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील हा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरविभाग आहे. येथेच मोझँबीकची राजधानी मापूतो वसलेली आहे. देल्गादू उपसागरापासून झँबीझी त्रिभुज प्रदेशापर्यंतचा किनारा वालुकामय, दलदलयुक्त वाळूचे दांडे व कच्छ असलेला आहे. झँबीझी त्रिभुज प्रदेशाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वाळूच्या पट्ट्यांबराबरच खडकाळ समुद्रकडे, उंच भूशिरे व बेटे आढळतात. येथील बऱ्याचशा बेटांभोवती प्रवाळशैलभित्ती निर्माण झालेल्या आढळतात. मोझँबीक किनाऱ्यावर झँबीझीशिवाय इतर सु. ५० नद्या समुद्राला येऊन मिळतात.
देशातील नद्यांच्या खोऱ्यांत व त्रिभुज प्रदेशात गाळाची सुपीक मृदा असून, दक्षिण व मध्य मोझँबीकमध्ये वालुकामय व नापीक मृदा आढळतात. पठारी भागातील मृदा तिच्याखाली असलेल्या ग्रॅनाइट, नीस व शीस्टपासून तयार झालेल्या असून त्या निक्षालित आणि लोह व ॲल्युमिनियमचा अंश अधिक असलेल्या अशा आहेत. ह्या मृदा कमी सुपीक आहेत. लिंपोपो नदीच्या उत्तरेकडील अंतर्गत कोरड्या प्रदेशात वाळू व लोहमिश्रित मृदा आहेत. या मृदा अधिक क्षरणक्षम असल्याने प्रदेशाचा कोरडेपणा त्या अधिक वाढवितात.
देशामध्ये कोलंबाइट, टँटॅलाइट, वैदूर्य, फेल्स्पार, केओलीन, कोळसा, तांबे, बॉक्साइट, फ्ल्युओराइट, यूरेनियम, मायक्रोलाइट, हिरे, सोने, लोहखनिज, ग्रॅफाइट, मँगॅनीज, संगमरवर, ॲस्बेस्टस, नैसर्गिक वायू इ. खनिजे थोड्याफार प्रमाणात सापडतात. यांपैकी टँटॅलाइट खनिज आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे आहे.
हिंदी महासागराला मिळण्याऱ्या जवळजवळ ५० नद्या मोझँबीकमधून वाहतात. त्यांपैकी बऱ्याचशा नद्यांचा उगम देशाबाहेर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे रूवूमा, लिगोन्हा, लूर्यो, झँबीझी, पुंग्वे, साव्ह व लिंपोपो या देशातील प्रमुख नद्या आहेत. बहुतेक नद्या अनियमित पर्जन्याच्या प्रदेशातून वाहणाऱ्या असल्याने त्यांचा प्रवाहसुद्धा अनियमित स्वरूपाचा असतो. देशाच्या मध्य भागातून आग्नेय दिशेत वाहणारी झँबीझी ही सर्वांत मोठी नदी आहे. उत्तरेस टांझानिया, मोझँबीक सरहद्दीवरून रूवूमा नदी वाहते. लिंपोपो गी दक्षिण भागातून वाहणारी मुख्य नदी आहे. देशाच्या वायव्य भागात असलेले न्यासा (मालावी) हे सर्वांत मोठे सरोवर जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. झँबीझी नदीवर बांधण्यात आलेल्या कबॉर बास धरणामुळे त्याच नावाच्या सरोवराची निर्मिती झालेली आहे.
हवामान : मोझँबीकचे हवामान मूलतः उष्णकटिबंधीय प्रकारचे असले, तरी तपमान व पर्जन्यमान यांत प्रदेशानुसार भिन्नता आढळते. ऑक्टोबर ते मार्च हवामान उष्ण व आर्द्र असते, तर एप्रिल ते सप्टेंबर कोरडा ऋतू असतो. जुलैचे सरासरी तपमान २०° से., तर जानेवारीचे २७º से. असते. पर्जन्य अनियमित स्वरूपाचा असून वेगवेगळ्या भागांतील पर्जन्यमान ४१ ते १२२ सेंमी. यांदरम्यान आढळते. वार्षिक पर्जन्यवृष्टीपैकी ८०% पर्जन्यवृष्टी नोव्हेंबर ते मार्च या काळात होते. मध्यवर्ती किनारी प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान अधिक (१३२ सेंमी.) आहे. उत्तरेकडील व पश्चिमकडील पर्वतीय प्रदेशात सर्वाधिक (१६५ सेंमी). पर्जन्यवृष्टी होते. नैर्ऋत्य भागातील गेझ प्रांत व टेटे प्रांतातील झँबीझी खोरे हे कोरडे विभाग असून तेथे फक्त ३० सेंमी. एवढी वार्षिक पर्जन्यवृष्टी होते.
वनस्पती व प्राणी : मोझँबीकमध्ये जंगलाखालील क्षेत्र बरेच आहे. आर्द्र हवामानाच्या व सुपीक जमिनीच्या प्रदेशांत घनदाट अरण्ये असून कोरड्या व वाळूमिश्रित आणि खडकाळ जमिनीच्या भागात सेल्हाना प्रकारच्या वनस्पती आढळतात. नारळ, खजूर व ताड या वनस्पती पुष्कळ आहे. मॅहॉगनी, आयर्नवुड, एबनी, साग, रानकाजू, सीडार, चंदन, चीक देणारे कोपल व बाभूळ हे वनस्पतिप्रकार देशाच्या अरण्यमय प्रदेशात आढळतात. नद्यांकाठी व पाणथळ प्रदेशात बांबू व कुर्सळी गवत पुष्कळ आहे. सॅव्हाना व स्टेप अशा दोन्ही प्रकारच्या गवताळ प्रदेशांखाली बरेच क्षेत्र आहे.
प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जात असली, तरीही देशात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. येथील जंगलांत झेब्रा, रेडा, सिंह, चित्ता, कोल्हा, ठिपक्याठिपक्यांचा तरस, मुंगूस, कस्तुरी मांजर, विविध जातींचा हरणे आढळतात. नद्या व सरोवरांमध्ये मगरी, सुसरी व पाणघोडे असतात. यांशिवाय विविध प्रकारचे विषारी साप, कीटक व पक्षी येथे पहावयास मिळतात. प्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने विशिष्ट प्रदेश उद्याने किंवा अभयारण्ये म्हणून राखून ठेवले आहेत. देशाच्या उत्तर व ईशान्य भागांत आढळणारा गेंडा, द. आफ्रिका सरहद्द प्रदेशातील जिराफ व लिंपोपो आणि साव्ह नद्यांदरम्यानच्या प्रदेशात आढळणारा शहामृग यांचे कायद्यानेच संरक्षण करण्यात आले आहे. बेहराच्या वायव्येस असलेले गोरांगोसा राष्ट्रीय उद्यान हे देशातील प्रसिद्ध राखीव शिकार क्षेत्र आहे. त्याशिवाय दक्षिण भागात हत्तींचे मापूतो उद्यान व झँबीझी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस रेड्यांच्या संरक्षणसाठी मोरोमेऊ हे राखीव वनक्षेत्र ठेवण्यात आले आहे.
इतिहास व राज्यव्यवस्था : विद्यमान मोझँबीकच्या प्रदेशात ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती होती. इसवी सनाच्या प्रारंभापासून तेथे आदिम जमाती असल्याचे दिसते. ⇨ बुशमन जमातीचाही त्यात अंतर्भाव होता. इ. स. १००० च्या सुमारास या भागात बांतू लोक आले. त्यापुढील काळात अरब व्यापाऱ्यांनी सोफाल व इतर ठिकाणी व्यापारी ठाणी उभारून या प्रदेशाशी व्यापार वाढविला. सोळाव्या शतकांरभी पोर्तुगीज व्यापारी येथील किनारी भागात आले. सोने, हस्तिदंत तसेच गुलाम यांच्या व्यापाराची मोठी संधी या भागात त्यांना मिळाली. या व्यापारात अरबांना मागे टाकून पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले व हळूहळू शेती व मळे सुरू करून वसाहतींचा वाढ केली. या कृषी वसाहतींचे मालक (प्राझीरोस) पोर्तुगीज किंवा आफ्रिकन व पोर्तुगीज यांच्या संकरातून निर्मिण झालेले (मेस्टिझो) लोक होते. प्रत्येकाने खाजगी सैन्यही बाळगले होते. १७५२ पर्यंत पोर्तुगीज हिंदुस्थानच्या (गोव्याचा) एक भाग म्हणून मोझँबीकचा कारभार पाहिला जाई. १८०० पर्यंत स्थानिक लोकांच्या तीव्र विरोधामुळे पोर्तुगीजांची सत्ता किनारी प्रदेश व झँबीझी नदीखोऱ्यापुरतीचे मर्यादित राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अगदी उत्तरार्धात पोर्तुगीजांनी ग्रेट ब्रिटन व जर्मनी या साम्राज्यवादी प्रतिस्पर्ध्यांशी सरहद्दींबाबत करार केले व स्थानिक लोकांचा प्रतिकार मोडून काढला. मात्र वसाहतीवर सर्वंकष सत्ता व्यापारी कंपन्यांच्या हाती होती. स्थानिक लोकांवर भरमसाठ कर लादून व कृषी मळ्यांमध्ये काम करण्याची त्यांवर सक्ती करून कंपन्या स्वैरपणे वागत होत्या. १९२६ मधील पोर्तुगालमधील क्रांतीनंतर तेथील शासनाने मोझँबीकमध्ये प्रत्यक्ष हितसंबंध प्रस्थापित केले. त्यामुळे व्यापारी कंपन्याचा प्रभाव कमी होऊन १९५१ मध्ये मोझँबीक हा पोर्तुगालचा सागरपार प्रांत बनला. ‘पोर्तुगीज पूर्व आफ्रिका’ म्हणून या वसाहतीचा पूर्वी उल्लेख केला जाई.
मोझँबीकच्या सशस्त्र स्वातंत्र्य आंदोलनास प्रत्यक्षात १९६२ साली सुरुवात झाली. या वर्षीय देशातील तीन प्रमुख राजकीय संघटनांनी एकत्र येऊन ‘मोझँबीक लिबरेशन फ्रंट’ (फ्रेलिमो) ही राजकीय संघटना स्थापन केली. या आघाडीतर्फे गनिमी युद्धतंत्राचा अवलंब करण्यात आला. देशाच्या उतरेरकडील काबो देल्गादू येथे मोझँबीक गनिमी राष्ट्रसेनेने १९६४ पहिला उठाव केला. १९६८ पर्यंत देशाच्या विविध भागांत या आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले व देशाची एक-पंचमांश भूमी ताब्यात आली. या आघाडीचा अध्यक्ष एद्धार्दो माँदलेन याचा ३ फेब्रुवारी १९६९ रोजी दारेसलाम (टांझानिया) येथे खून झाला. त्यानंतर आघाडीचे नेतृत्व सॅमोरा माशेल यांनी केले (१९७०).
खुद्द पोर्तुगालमध्येच १९७४ साली राज्यक्रांती झाली. नव्या पोर्तुगीज राजवटीने ‘फ्रेलिमो’ च्या नेत्यांशी बोलणी केली. त्यांनुसार २४–२५ जून १९७५ च्या मध्यरात्री हा देश स्वतंत्र होऊन ‘मोझँबीक प्रजासत्ताका’ ची घोषणा करण्यात आली. सॅमोरा माशेल (१९३३–८६) हा त्याचा पहिला अध्यक्ष होय. स्वतंत्र मोझँबीकने ऱ्होडेशियातील स्वातंत्र्यवादी गनिमांना पाठिंबा दिला. देशाच्या पश्चिमेकडील ऱ्होडेशियन सरहद्दीवर गनिमांच्या हालचाली वाढल्या. १९७६ साली मोझँबीकने ऱ्होडेशियाला लागून असलेली सरहद्द बंद करून त्या देशाशी होणारे रेल्वेचे इतर दळणवळण थांबविले. तसेच देशातील ऱ्होडेशियन मालमत्तचे राष्ट्रीयीकरण केले.या संघर्षकाळात ऱ्होडेशियन भूसैन्याने व वायुदलाने मोझँबीकवर हल्ले केले आणि कृष्णवर्णीय गनिमांचे तेथील तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. १९८० साली ऱ्होडेशिया स्वतंत्र होऊन झिंबाब्वे या नावाने अस्तित्वात आला आणि हा संघर्ष रीतसर करार होऊन मिटला.
द.आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात अल्पसंख्य गोऱ्या लोकांची सत्ता होती. तेथील स्वातंत्र्यवादी राष्ट्रीय काँग्रेसचे कृष्णवर्णीय सदस्य मोझँबीकमध्ये आश्रय घेत असत. त्यामुळे द. आफ्रिकेच्या वायुदलाने मोझँबीकच्या मापूतो शहराच्या परिसरात १९८१ व १९८३ मध्ये अनेक वेळा विमानहल्ले केले. हा संघर्ष १६ मार्च १९८४ रोजी दोन्ही देशांतील अनाक्रमणाच्या करारनुसार तात्पुरता थांबला.
देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत समस्या निर्माण करणारी आणखी एक घटना म्हणजे १९७६ साली स्थापन झालेली ‘मोझँबीक राष्ट्रीय प्रतिरोध चळवळ’ ही संघटना होय. ही संघटना पोर्तुगीज वसाहतकार व व्यापारी यांनी गौरवर्णीय ऱ्होडेशियनांच्या मदतीने स्थापन केली, असे म्हटले जाते. या संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणावर देशात गनिमी कारवाया करण्यात आल्या. दक्षिणेकडील मापूतो व अगदी उत्तरेकडील प्रांत सोडले, तर देशात सर्वत्र या संघटनेने रेल्वेमार्ग उखडणे, पूल उडवणे, रस्ते व पाण्याचे नळ उद्ध्वस्त करणे, अशी विध्वंसक कृत्ये केली. पुढे ऱ्होडेशियाने मदत थांबविली, तरी द. आफ्रिकेकडून या संघटनेला मदत मिळाली. मालावीमध्ये या संघटनेची काही केंद्रेही होती. एकूण आर्थिक दुरवस्था, सामूहिक शेतीचा प्रयोग, १९७७–७९ मधील पुराची व १९७९ पासूनची अवर्षणाची आपत्ती यांमुळे जनतेत असंतोष वाढत होता. त्याचा फायदा वरील संघटनेला मिळाला असावा, असे म्हटले जाते.
तथापि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, द. आफ्रिका आणि मोझँबीक यांतील अनाक्रमणाच्या ‘एन्कोमाटी’ करारानुसार या अंतर्गत बंडाळीबाबत द. आफ्रिकेने पुरेसा प्रतिसाद दिला नाही, असे दिसते. १९८४ साली मोझँबीक शासन, राष्ट्रीय प्रतिरोध संघटनेचे सदस्य व द. आफ्रिकेचे प्रतिनिधी यांच्यात अनेक बैठकी व चर्चा झाल्या. १९८५ च्या प्रारंभी मोझँबीक व दक्षिण आफ्रिका यांचा संयुक्त सुरक्षा आयोग स्थापन करण्यात आला. तथापि प्रतिरोध संघटनेच्या विध्वंसक कारवाया चालूच राहिल्या. मोझँबीक शासनाच्या मते पोर्तुगालकडून प्रतिरोध संघटनेला छुपी मदत मिळते. १९७६–७७ मध्ये देशातील बहुतेक सर्व पोर्तुगीज लोक (२·५ लक्ष) पोर्तुगालला परतले. मोझँबीक शासनाचा वरील संशय त्यामुळे खरा असावा, असे वाटते.
मोझँबीक स्वातंत्र्य आघाडीच्या १९७७ सालच्या तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनात ‘मार्क्सवादी-लेनिनवादी’ पक्ष असे नवे पक्षीय स्वरूप तिला देण्यात आले. त्यानुसार ग्रामपातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत लोकप्रतिनिधींची विधिमंडळे स्थापन करण्यात आली. १९८२ च्या या पक्षाच्या निर्णयानुसार सदस्यसंख्या विस्तृत करण्यात आली. चौथ्या काँग्रेस अधिवेशनात (१९८३) नवे आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले, तसेच पक्षाच्या केंद्रीय समितीत सदस्यसंख्या ५५ पासून १३० पर्यंत वाढविण्यात आली. शेतकरी, कामगार व गनिमी युद्धातील अनुभवी नेते यांचे वर्चस्व या समितीवर असून त्याआधीचे मंत्री, राज्यपाल व सेनाधिकारी यांचा प्रभाव कमी करण्यात आला आहे. २५ जून १९७५ रोजी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनी स्वीकारलेल्या संविधानानुसार शासनाची सर्व सत्ता मोझँबीक राष्ट्रीय चळवळीकडे आहे. १९७७ साली या चळवळीचे रूपांतर देशातील एकमेव राजकीय पक्ष म्हणून करण्यात आले. देशाचे विधिमंडळ एकसदनी असून त्यात जास्तीतजास्त २१० सदस्य असतात. वर्षांतून दोनदा विधानसभेची अधिवेशने भरतात. १९७५ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. अध्यक्षाच्या हाताखाली मंत्रिमंडळ असते तसेच उपमंत्री व ९ शासकीय सचिव अशी राजकीय यंत्रणा आढळते. देशातील एकसदनी विधानसभेचे बहुतेक सदस्य हे पक्षाचे सदस्य व पदाधिकारी असतात. पक्षातर्फेच विधानसभेचे सदस्य निवडण्यात येतात. प्रजासत्ताकाचा अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असून तो पक्षाचाही अध्यक्ष असतो. देशात विधानसभेचा एक कायम आयोग आहे. प्रांतिक शासनात पक्षसदस्य व शासकीय अधिकारी यांतून निवडलेल्या चौघांचे एक मंडळ कामकाज पाहण्यासाठी नेमण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यासाठी व शहरासाठीही अशा समित्या नेमण्याची योजना आहे. देशातील एकमेव पक्षाची मध्यवर्ती समिती १५ सदस्यांची आहे.
परराष्ट्रीय संबंध : परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत आर्थिक समस्या आणि देशांतर्गत प्रतिरोधी संघटनेच्या कारवाया हे जटिल प्रश्न प्रभावी ठरले आहेत. त्यामुळे १९८२ साली मोझँबीक शासनाने पोर्तुगालशी आणि फ्रान्सशी, तसेच प. जर्मनीशाही आर्थिक स्वरूपाचे मोठे करार केले. परिणामतः प. जर्मनीचा मोझँबीकविरुद्ध यूरोपीय आर्थिक संघटनेतील विरोध मावळला असून, त्या संघटनेच्या मदतीचा मार्ग आता खुला झाला आहे. अमेरिकेशीही मोझँबीक शासनाचे संबंध सुधारले आहेत. देशात अमेरिकन राजदूताची नेमणूक झालेली असून, अमेरिकन मदतीची शक्यता वाढली आहे. पू. जर्मनी व बल्गेरिया या पूर्व यूरोपीय समाजवादी देशांकडूनही, तसेच सोव्हिएट रशियाकडूनही या देशाला मदत मिळते.
आर्थिक स्थिती : पोर्तुगालच्या अंमलाखाली असताना मोझँबीकच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. उलट पोर्तुगालमधील उद्योगधंद्यांना पूरक ठरणारी कृषिउत्पादने घेण्यासाठी शेतकऱ्यांवर बंधने घालण्यात येत असत. शेती हा मोझँबीकच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार असून, देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ४४% उत्पादन शेतीपासून मिळते. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३०% क्षेत्र कृषीयोग्य असले, तरी केवळ ५% क्षेत्रच लागवडीखाली आहे. ५५% क्षेत्र कुरणांखाली आहे. शेती प्रामुख्याने उदरनिर्वाह स्वरूपाची आहे. काजू, ऊस, कापूस, नारळ, चहा , टॅपिओका, वाख (सिसाल) ही प्रमुख नगदी आणि मका व ज्वारी ही अन्नधान्याची मुख्य पिके आहेत. यांशिवाय केळी, तृणधान्ये, तांदूळ, भूईमुग, सूर्यफूल, बटाटे, रताळी, फळे इ. उत्पादनेही घेतली जातात. १९८१ मध्ये विविध शेतमालाचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : तृणधान्ये ४९५ चहा १८ मका २७० टॅपिओका २,८५० ऊस २,००० केळी ६५ सिसाल १२ तांदूळ १६२ भुईमूग ८० खोबरे ७० काजू ९५. काजू उत्पादनात मोझँबीक जगात अग्रेसर आहे. कुशल मजुरांचा तुटवडा, प्रतिकूल हवामान, तीव्र व दीर्घकाळ पडणारे दुष्काळ, पूर, चक्रीवादळ हे कृषिव्यवसायातील मुख्य अडथळे आहेत. यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने शासन वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करीत असून त्या दृष्टीने शासनाने १९७६ पासून सहकारी तत्त्वावर १,५०० खेडी वसविली व सरकारी शेतीची स्थापना केली. १९८० मध्ये १६५ शेती सहकारी संस्थांची स्थापना केली. त्यांची एकूण सदस्यसंख्या त्यावेळी १३,००० होती. तथापि काही सरकारी शेतीसंस्था किफायतशीर न ठरल्याने त्यांची शेतकऱ्यांना वैयक्तिक मालकी देण्यात आली (१९८४). १९८१ पासून पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे तसेच १९८४ मध्ये पूर आणि चक्रीवादळांमुळे कृषिउत्पादनांत बरीच घट झालेली दिसते.
मोझँबीकमध्ये पशुपालन व्यवसायाचा विकास होणे गरजेचे असले, तरी भांडवलाचा अभाव, गंभीर पशुरोगांच्या साथी, त्सेत्से माशीमुळे होणारा प्रादुर्भाव इ. कारणांमुळे पशुपालन व्यवसाय बराचसा दुर्लक्षित व त्यामुळे मर्यादित राहिला आहे. १९८२ मध्ये देशातील पशुधन आणि पशुजन्य उत्पादन पुढीलप्रमाणे झाले-पशुधन (संख्या हजारांमध्ये) : गाढवे २० गुरे १,४३० डुकरे १३० मेंढ्या ११० शेळ्या ३४५ कोंबड्या १८,००० व बदके ५८०. पशुजन्य उत्पादने (हजार मे. टनांमध्ये) : गोमांस ३८, शेळ्यांचे मांस २, डुकराचे मांस ९, कोंबड्यांचे मांस १७, गाईचे दूध ६६, शेळ्यांचे दूध ८, कोंबड्यांची अंडी १०·५ गुरांची कातडी ६·३.
उद्योग : कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व जलविद्युत्शक्ती ही प्रमुख शक्तिसाधने देशात उपलब्ध आहेत. कोळशाचे उत्पादन तर १८५६ पासून घेतले जात आहे. देशात सु. ४० कोटी टन कोळशाचे साठे असून १९८१ मध्ये ४·५ लक्ष मे. टन एवढे कोळशाचे उत्पादन झाले. १९७८ मध्ये कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. देशाच्या उत्तरेकडील किनारी भागात खनिज तेलाचे विस्तीर्ण साठे आढळून आले आहेत. मोझँबीकने १९८१ मध्ये सु. ५ लक्ष टन अशोधित तेलाची आयात केली. देशात नैसर्गिक वायूचा साठा सु. १,१३,२६,७२० लक्ष घ. मी. आहे. बेहरा-मुटारे (झिंबाब्वे) यांदरम्यान नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी ३११ किमी. लांबीचे नळ टाकलेले आहेत. टेटे परगण्यात असलेल्या कबॉर बास धरणावर १,८०० कोटी किवॉ. ता. एवढ्या वार्षिक क्षमतेचा जलविद्युत्निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे (१९७५). देशातील एकूण विद्युत्शक्तीपैकी ९७% जलविद्युत् असून काही विजेची मोझँबीक निर्यातही करतो. देशात खनिज संपत्तीचे साठे भरपूर असले, तरी उद्योगधंद्यांच्या बाबतीत देश अविकसितच राहिला आहे. झँबीझा, नांपूला आणि टेटे प्रांतांमध्ये कोलंबाइट, टँटॅलाइट, वैदूर्य, फेल्स्पार, केओलीन, कोळसा व बहुमोल रत्न-खनिजे आणि मनीका प्रांतामध्ये तांबे, बॉक्साइट, फ्ल्युओराइट व अँथोफिलाइट या खनिजांचे साठे आहेत. टँटॅलाइटच्या जागतिक उत्पादनापैकी दोन-तृतीयांश उत्पादन एकट्या मोझँबीकमधून होत असून, त्याचा उपयोग पोलाद उद्योगात होतो. वदूर्य उत्पादनात मोझँबीकचा जगात दुसरा क्रमांक आहे. १९८१ मध्ये ४·६ लक्ष मे. टन एवढे कोळशाचे उत्पादन झाले. देशातील एकूण लाकूड उत्पादनापैकी बहुतेक लाकूड इंधन व बांधकामासाठी स्थानिक लोक वापरतात. झँबीझा प्रांतात आणि बेहरा लोहमार्गावर लाकूड उद्योग एकवटलेला असून त्यातील बरेचसे लाकूड द. आफ्रिकेच्या बाजारपेठेत पाठविले जाते. १९८२ मध्ये लाकडी ओंडक्यांचे एकूण उत्पादन १,३७,२६,००० घ.मी. व कापीव लाकडाचे एकूण उत्पादन ४३,००० घ.मी. झाले. लाकडी ओंडक्यांच्या एकूण उत्पादनापैकी ४०% इंधनासाठी वापरले जाते.
हिंदी महासागर किनाऱ्यावरील इतर कोणत्याही आफ्रिकन राष्ट्रापेक्षा मोझँबीकला सर्वांत अधिक लांबीचा समुद्रकिनारा व सर्वाधिक सागरमग्न खंडभूमी लाभलेली आहे. यांशिवाय मोझँबीकला न्यासा सरोवर व इतर अनेक अंतर्गत जलाशयांचे भाग लाभलेले आहेत. त्यामुळे मासेमारी विकासास खूपच वाव आहे. १९८० मध्ये हिंदी महासागरात ३१,७०० मे. टन व अंतर्गत जलाशयांत ५,००० मे.टन असे एकूण ३६,७०० मे. टन मासे पकडण्यात आले. यांपैकी जवळ-जवळ निम्मे मासे निर्यात केले जातात. निर्यातीत लॉब्स्टर व प्रॉन माशांचे प्रमण अधिक असते. सोव्हिएट मासेमारी बोटींना मोझँबीकच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्यास परवानगी दिली जाते. तथापि त्यासाठी पकडलेल्या माशांपैकी काही भाग मोझँबीकला द्यावा लागतो.
औद्योगिक दृष्ट्या मोझँबीक मागासलेला राहण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात पोर्तुगालने स्थानिक लोकांपेक्षा पोर्तुगाल व द. आफ्रिका यांना फायदेशीर ठरणारे औद्यौगिक धोरण अनुसरले. कच्चा माल प्रक्रियेसाठी पोर्तुगालकडे व त्यांवर प्रक्रिया करून पक्का माल पुन्हा मोझँबीककडे पाठविला जाई. मोझँबीकमध्ये अलीकडच्या काळात काही कृषीउत्पादन प्रक्रिया उद्योग, तेलशुद्धीकरण, मद्यनिर्मिती आणि खाणकाम आदींचा विकास करण्यात आला आहे. साखरनिर्मिती, काजूप्रक्रिया, गहूप्रक्रिया, सूतकताई आणि विणाई हे येथील प्रमुख कृषीउत्पादन प्रक्रिया उद्योग आहेत. पोर्तुगीज मालकी संपुष्टात आल्यानंतर येथील बऱ्याच निर्मिती उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. देशाच्या गरजेइतके सिमेंट व खत उत्पादन केले जाते. मापूतो येथे तेलशुद्धीकरण कारखाना असून, तेथील खनिज तेल उत्पादने द. आफ्रिका व स्वाझीलँड यांच्याकडे निर्यात केली जातात. शेजारील देशांना निर्यात करण्यासाठी रेल्वे एंजिने, डबे इत्यादींचे उत्पादन केले जाते. १९८१ मध्ये महत्त्वाची औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन मे. टनांमध्ये) सिमेंट २·६० लक्ष परिष्कृत साखर १·७७ लक्ष, साबण व निर्मलक २८,७९० अमोनियम सल्फेट १४,९०० गंधकाम्ल १३,६०० सुपर फॉस्फेट ६,००० टायर १·६६ लक्ष नग सायकली ११,००० नग आगपेट्या ८·५ कोटी नग चाकू (मॅशे) ४६,२०० नग. एकूण कामकारी लोकांपैकी ९०% लोक शेती व मासेमारी व्यवसायांत गुंतले आहेत. १९८० पासून शेतमजुरांसाठी देशपातळीवर किमान मजुरीचा दर ठरविण्यात आला आहे. कामगारांना संप करण्याचा हक्क दिलेला नाही.
व्यापार, वाणिज्य व अर्थ : मापूतो, बेहरा व नांपूला ही देशातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मापूतो व बेइरा ही उत्कृष्ट बंदरेही आहेत. अंतर्गत व्यापाराबरोबरच शेजारील देशांशीही येथून व्यापार चालतो. किंमत नियंत्रण आणि उपभोग्य वस्तू व औद्यौगिक कच्चा माल यांचा तुटवडा यांमुळे १९८० पासून काळा बाजार खूपच वाढला आहे. १९८१ पासून ११ आवश्यक वस्तूंसाठी शिधावाटप पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. मोझँबीक प्रामुख्याने कृषिउत्पादनांची निर्यात करतो व खनिज तेल, धान्य, कच्चा माल, यंत्रे वाहतूक साधने व मूलभूत वस्तुनिर्मिती माल यांची आयात करतो. १९८१ मध्ये देशाने ३८·६४ कोटी डॉलरची निर्यात व ७०·५६ कोटी डॉलरची आयात केली, म्हणजेच ३१·९२ कोटी डॉलर एवढा तुटीचा व्यापार झाला. मोझँबीक जास्तीतजास्त आयात द. आफ्रिकेकडून करतो, तर पोर्तुगाल व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांना जास्तीतजास्त निर्यात करतो. देशाचा देवघेवींचा ताळेबंद नेहमीच तुटीचा राहिलेला आहे. फ्रेलिमो पक्षाने १९६४ मध्ये जेव्हा गनिमी कारवाया सुरू केल्या, तेव्हा व्यवहारशेष १·५ कोटी डॉलर तुटीचा होता. ही तूट १९६९ मध्ये ५·२८ कोटी डॉलर आणि १९७० मध्ये ६·४८ कोटी डॉलरवर गेली. १९७०–७१ मध्ये यावर कडक प्रतिबंधात्मक उपाय योजून ७५% तूट कमी करण्यात आली. त्यानंतर लष्करी साहित्य, यंत्रे यांच्या मागणीत वाढ झाल्याने पुन्हा तूट वाढली. स्वातंत्र्योत्तर काळात खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे पुन्हा तूट वाढून ती १९७९ मध्ये १९·२३ कोटी डॉलर, १९८० मध्ये १८·५१ कोटी डॉलर, तर १९८१ मध्ये १८·७६ कोटी डॉलर झाली. १९८० मध्ये देशावर ४५·४ कोटी डॉलर एवढे परकीय कर्ज होते.
पोर्तुगीज नॅशनल ओव्हरसीज बँकेचे राष्ट्रीयीकरण करून तिचे ‘बँक ऑफ मोझँबीक’ मध्ये रूपांतर करण्यात आले (१९७५). हीच देशाची मध्यवर्ती बँक होय. या बँकेचे मध्यवर्ती कार्यालय मापूतो येथे असून तिच्या ३९ स्थानिक शाखा होत्या (१९८२). याशिवाय पाच खाजगी व्यापारी बँकांचेही राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे (१९७८). याच वर्षी ‘बँको पॉप्युलर दे देसेनव्हॉल्व्हिर्मेतो’ या दुसऱ्या स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली. देशात रोखेबाजार चालत नाही. १९७७ मध्ये सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन मध्यवर्ती विमा कंपनीची स्थापना करण्यात आली.
पूर्वी ‘एस्कूदो’ हे देशाचे चलन होते. एस्कूदोच्या दर्शनी किंमतीबरोबरचेच मेटिकल (मेटिकैस) हे चलन शासनाने जून १९८० पासून सुरू केले आहे. एका मेटिकलचे १०० सेंटाव्हो होतात १०, २०, व ५० सेंटाव्होंची आणि १, २.५, ५, १० व २० मेटिकलची नाणी, तर ५० १०० ५०० १,००० मेटिकलच्या नोटा आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ५०·९४ मेटिकल व एक अमेरिकी डॉलर = ४३·९६ मेटिकल किंवा १,००० मेटिकल = १९·६३ स्टर्लिंग पौंड = २२·७५ डॉलर असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८४).
राष्ट्रीय अर्थकारण : मोझँबीकचे १९८२ चे अंदाजपत्रक १,८५० कोटी मेटिकल महसुलाचे व २,१३७ कोटी मेटिकल खर्चाचे होते. संरक्षण, आरोग्य व शिक्षण, शेती, उद्योग, ऊर्जा साधनांचा विकास, वाहतूक ह्या खर्चाच्या मुख्य बाबी आहेत. पोर्तुगीज अंमलाखाली असताना कर आकारणी व वसुलीत कमालीची असमानता व भ्रष्टाचार होता. स्वातंत्र्योत्तर काळात करांचे प्रमाण वाढविण्यात आले व उद्गामी पद्धतीने कर आकारणी करण्यात येऊ लागली. मजुरी, वेतन व इतर उत्पन्ने, खरेदी, विक्री, तेल उत्पादन इत्यादींवर करआकारणी केली जाते, कोणत्याही वस्तूंच्या आयातीसाठी परवान्याची आवश्यकता असते. पश्चिमी राष्ट्रांतील भांडवलदारांना गुंतविण्यात मोझँबीक शासन प्रोत्साहन देत आहे. ‘झँबीझी हायड्रोइलेक्ट्रिक’ या आंतरराष्ट्रीय भागीदारी कंपनीने मोझँबीकमधील कबॉर बास धरणाची बांधणी केली आहे. १९८२ मध्ये सु. १०० पाश्चिमात्य कंपन्यांनी मोझँबीकमध्ये भांडवल गुंतविण्याचे करार केलेले आहेत. १९८३ मध्ये मोझँबीकने १८ देशांशी विकास मदत करार केलेले असून स्वीडन हा सर्वाधिक मदत देणारा देश आहे.
वाहतूक व दळणवळण : मोझँबीकच्या अर्थव्यवस्थेत वाहतुकीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कारण स्थानिक वापराबरोबरच मालावी, झँबिया, झिंबाब्वे व स्वाझीलँड व खंडांतर्गत स्थान असलेले शेजारील देश व द. आफ्रिका मोझँबीकमधील वाहतूक मार्गाचा विशेष उपयोग करतात. त्यामुळे लोहमार्गाचा चांगला विकास झालेला आहे. लोहमार्गांनी शेजारील देश मोझँबीकमधील बंदरांशी जोडलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात लोहमार्ग वाहतूक व्यवस्था शासनाने आपल्या ताब्यात घेतलेली आहे. १९७६–७९ या काळात झिंबाब्वेची मापूतो व बेहरा ह्या बंदरांशी चालणारी लोहमार्ग वाहतूक तोडण्यात आली होती. १९८४ मध्ये राज्याच्या मालकीचे एकूण ३,८४३ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. १९८४ मध्ये रेल्वेने ५४·१२ लक्ष प्रवाशांची वाहतूक केली. मोझँबीकमधील लोहमार्ग विकासासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळाली असली, तरी रस्त्यांचा मात्र विशेष विकास झालेला नाही. सर्व प्रकारच्या रस्त्यांची एकूण लांबी ३९,१७३ किमी. होती (१९७४). अलीकडच्या काळात मोझँबीक व शेजारील देशांदरम्यानच्या रस्त्यांची बांधणी केली जात आहे. मापूतो हे आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे व बहूद्देशीय बंदर आहे. येथे माल चढ-उताराच्या आणि साठवणीच्या उत्तम सोयी आहेत. द. आफ्रिका, स्वाझीलँड, झँबिया, मालावी व झाईरे हे देश या बंदराचा विशेष उपयोग करतात. द.आफ्रिकेच्या आर्थिक सहाय्याने मापूचो बंदराचा विकास व दोन्ही देशांदरम्यानच्या इतर वाहतूक मार्गाचा विकास करण्याबाबत द. आफ्रिका-मोझँबीक एकमत झाले आहे. याशिवाय बेहरा, नाकाला व केलीमाने ही बंदरे महत्त्वाची आहेत. १९८१ मध्ये वेगवेगळ्या बंदरांतून मिळून एकूण ८६ लक्ष टन मालाची वाहतूक झाली. राज्याच्या मालकीच्या मोझँबीक एअरलाइन्स (एल्एएम) कडून अंतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूक केली जाते. देशात एकूण तीन आंतरराष्ट्रीय आणि इतर १६ विमानतळ आहेत. त्यांपैकी मापूतो व बेहरा हे मुख्य आंतराष्ट्रीय विमानतळ आहेत. टपाल व तारसेवा शासनाच्या मालकीची आहे. देशात एकूण २,७५,००० रेडीओ संच १,००० दूरचित्रवाणी संच (१९८४) व ५१,६०० दूरध्वनी संच (१९८०) होते. ‘रेडिओ मोझँबीक’ ह्या अधिकृत आकाशवाणी केंद्राकडून पोर्तुगीज, इंग्रजी आणि स्थानिक भाषांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात. १९८१ पासून दूरचित्रवाणी सेवा सूरू झाली आहे.
लोक व समाजजीवन : मोझँबीकची लोकसंख्या १३१·४ लक्ष (१९८३ अंदाज) असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स १४ आहे. १०% लोकसंख्या नागरी असून ७०% लोकसंख्या मध्य व दक्षिण किनारी प्रांतांमध्ये आढळते (१९८०). बहुतेक नागरी केंद्रे किनारी भागातच आढळतात. १९७५–८० या काळातील सरासरी जन्मप्रमाण दर हजारी ४४·८ व मृत्युप्रमाण दर हजारी १९ होते. लोकसंख्या वाढीचा वेग २·६% होता (१९८०). एप्रिल १९७४ मधील पोर्तुगीज क्रांतीपूर्वी ९६% लोक आफ्रिकन होते त्यानंतर आफ्रिकन लोकांचे प्रमाण वाढले. देशात मुख्य १० आफ्रिकन वांशिक गटांचे लोक आढळतात. त्यांपैकी झँबीझी नदीच्या उत्तरेस राहणारे माकुआ-लोम्वे हा सर्वांत मोठा गट असून, एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण ३८% आहे. झँबीझीच्या दक्षिणेस टोंगा हा मुख्य आफ्रिकन गट असून एकूण लोकसंख्येत त्याचे प्रमाण २४% आहे. शोना-कारंगे यांचे प्रमाण १०% असून ते मध्य भागात राहतात. याशिवाय न्यासा प्रांतातील याऊ (अजवा), रूवूमा नदीखोऱ्यातील माकोंडे, उत्तर व दक्षिण भागांतील एन्गोनी, उत्तर भागातील मारावी, इन्यँनाने प्रांतातील चोपी हे मुख्य वांशिक गट आहेत. याशिवाय १९८० मध्ये एकूण लोकसंख्येत १५,००० भारतीय १०,००० यूरोपीय आणि ३५,००० यूरोपीय व आफ्रिकन मिश्र गटांतील लोक राहत होते. मोझँबीक हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्यानंतर शारनाने चर्चच्या शाळा व रूग्णालये यांचे राष्ट्रीयीकरण केले. एकूण लोकसंख्येत सर्वाधिक लोक (६०%) परंपरागत आफ्रिकन धार्मिक गटांचे असून त्यांखालोखाल (ख्रिश्वन, प्रामुख्याने रोमन कॅथलिक (१८%) व इस्लाम धर्मियांची (१६%) संख्या आहे. १९०९ च्या सुमारास द. मोझँबीकमधील सु. एक लक्ष लोकांना द. आफ्रिकेतल खाणीत काम मिळाले. त्यावेळी मोझँबीकेमधील लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. १९७९–८० मध्ये करारावर गेलेल्या मजुरांची संख्या ४२,००० होती. याशिवाय हजारो मोझँबीकवासियांनी द. आफ्रिकेत बेकायदेशीर रीत्या घरगडी म्हणून कामे स्वीकारलेली आहेत. १९७४ ते १९७६ च्या काळात एकूण २·५० लक्ष पोर्तुगीजांपैकी २·३५ लक्ष पोर्तुगीजांनी मोझँबीकमधून पळ काढला. ऱ्होडेशियातून आलेले १·५० लक्ष निर्वासित १९८० मधील झिंबाब्वेच्या स्वातंत्र्यानंतर परत आपल्या देशात गेले.
स्वातंत्र्योत्तरकाळात शासनाने युद्धात जखमी झालेल्यांचे पुनर्वसन केले व अनाथालये स्थापन केली. वेश्या व दारूड्यांसाठी पुनर्वसन केंद्रे स्थापन केली असून, त्यांत त्यांना साक्षर बनविले जाते व नंतर राजकीय शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. स्त्रियांना समान हक्क दिले आहेत. स्त्रियांची प्रजोत्पादनक्षमता ६.१ आहे. फक्त मातेच्या जीविताला धोका असेल, तरच गर्भपातास कायदेशीर मान्यता मिळते. स्वातंत्र्यानंतर बहुतेक पोर्तुगीज मोझँबीक सोडून गेल्याने डॉक्टरांची संख्या सु. ५०० वरून ८० पर्यंत घटली. बालमृत्यूंचे प्रमाण दर हजारी ११५ होते (१९८०). १९७० चे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत अंदाजे ४४ वर्षे व स्त्रियांच्या बाबतीत अंदाजे ४८ वर्षे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या कामास विशेष अग्रक्रम देण्यात आला आहे. धनुर्वात, देवी, क्षयरोग यांची लस टोचून या रोगांना आळा घालण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तथापि या बाबतीत औषधांचा व प्रशिक्षित डॉक्टरांचा तुटवडा ही मोझँबीकमधील गंभीर समस्या बनली आहे. देशात एकूण ३६५ डॉक्टर, ४० रूग्णालये व एक हजारावर आरोग्य केंद्रे (१९८१) असून ९६ दंतवैद्यक, ४५७ प्रसाविका आणि २,१५६ परिचारिका (१९८०) होत्या. देशातील दर ३५,००० लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण होते (१९८१).
पोर्तुगीज ही देशाची अधिकृत भाषा आहे. याशिवाय वेगवेगळ्या आफ्रिकी वांशिक गटांतील लोक आपापल्या बोलीभाषांचा वापर करतात. त्यांत टोंगान, शांगन आणि मूचोपे या भाषा अधिक बोलल्या जातात. नोतीसिआस दे बेइरा, ए त्रीबूना, नोतीसिआस, दायरीओ दो मोझँबीक ही दैनिक वृत्तपत्रे, दायरिओ तेंपो, दोमिंगो ही साप्ताहिके मोझँबीकमधून प्रकाशित होतात. बोलेतिम दा रिपब्लिका दे मोझँबीक हे शासकीय वृत्तपत्र (जर्नल) आहे (१९८१). ‘नँशनल लायबरी ऑफ मोझँबीक’ (स्था. १९६१) हे प्रसिद्ध ग्रंथालय असून त्यात १,१०,००० ग्रंथ होते (१९८२).
निसर्गेतिहास वर्णन आणि मानववंश वर्णनात्मक वस्तुसंग्रहालय, खनिजविषयक ‘फ्रेर दे आंद्रादे म्यूझीयम’ व ‘मिलिटरी हिस्टरी म्यूझीयम’ ही मापूतो येथील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये आहेत. मनीका येथे निसर्गेतिहास वस्तुसंग्रहालय व मापूतोजवळ ‘ईस्ला दा ईन्याका’ हे सागरी जीवशास्त्रविषयक वस्तुसंग्रहालय आहे. याशिवाय बेहरा व नांपूला येथेही वस्तुसंग्रहालये आहेत. देशात ३१ चित्रपटगृहे असून त्यांत २०,१९५ प्रेक्षक बसण्याची सोय आहे.
मोझँबीकमध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येला शिक्षणविषयक सोयी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. देशात ६७% लोकसंख्या निरक्षर होती (१९८०). सर्व पातळ्यांवर शिक्षणाचा साक्षरतेचा प्रसार करण्याचे शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देशातील ८,५२८ प्राथमिक शाळांत २९,६३४ शिक्षक व १४,०२,९७५ विद्यार्थी १३६ माध्यमिक शाळांत २,५२३ शिक्षक व १,०६,५४१ विद्यार्थी ३६ तांत्रिक शाळांत ८८२ शिक्षक व १३,७९५ विद्यार्थी २६ शिक्षक-प्रशिक्षण विद्यालयांत ३४६ शिक्षक व ५,८३२ विद्यार्थी आणि एका उच्च शिक्षणसंस्थेत ३५२ शिक्षक आणि १,१०६ विद्यार्थी होते (१९८३). प्रौढ शिक्षणावरही विशेष भर देण्यात आला आहे.
पर्यटन : स्वातंत्र्यपूर्वकाळात पर्यटन हा परकीय चलन मिळवून देणारा मुख्य व्यवसाय होता. बेइरा व दक्षिण किनाऱ्यावरील पुळणी येथे झिंबाब्वे व द. आफ्रिका ह्यांमधील पुष्कळ पर्यटक येत असत. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच ह्या व्यवसायात कमालीची घट झाली. १९७४ मध्ये ७०,००० पर्यटक देशात येऊन गेले तर १९८१ मध्ये केवळ १,००० पर्यटक देशात आले. १९८२ पासून पर्यटन व्यवसायाचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ईन्याका बेटावरील पर्यटन विकासासाठी मोझँबीक आणि दक्षिण आफ्रिका यांनी संयुक्त पर्यटन कंपनीची स्थापनी आहे (१९८४). याशिवाय येथे राज्य पर्यटन कंपनीही आहे. तथापि सुरक्षिततेचा अभाव हा पर्यटन व्यवसायाच्या विकासातील मुख्य अडसर आहे. प्रत्येक परदेशी नागरिकाला मोझँबीकमध्ये येण्यासाठी प्रवेशपत्र घेण्याची आवश्यकता असते. बेइरा झिंबाब्वे यांच्या साधारण मध्यावर असणारे गोरांगोसा राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य व समुद्र किनाऱ्यावरील सुंदर पुळणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षण आहेत. राजधानी मापूतोशिवाय नापूला (लोकसंख्या १,२६,१२६–१९७०), बेइरा (३,५०,०००–१९८०) व केलीमाने (१,८४,०००–१९८०) ही देशातील महत्त्वाची शहरे आहेत.
संदर्भ : 1. Henriksen, T. H. Mozambique: A History, London, 1978.
2. Mondlane, E. The Struggle for Mozambique, London, 1983.
3. Munslow, B. Mozambique: The Revolution and its Origins, London, 1983.
चौधरी, वसत जाधव, रा. ग.
“