पूर : नद्या, नाले, सरोवरे, सागर इत्यादींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन भोवतालचा प्रदेश जलमय होणे, याला पूर म्हणतात. नद्यांना अनेक कारणांनी पूर येतात. अतिवृष्टीमुळे त्याचप्रमाणे नदी हिमाच्छादित प्रदेशात उगम पावत असेल, तर बर्फ वितळून नदीला पूर येतात. नदीच्या मुखाजवळ सागरी भरतीच्या वेळीदेखील पाणी चढते. नदीच्या वरच्या भागातील बांध फुटला, तर तिचे अडविलेले पाणी नदीच्या खालच्या भागात वाहू लागते व आसपासचा प्रदेश जलमय होतो. उदा., १९६१ मध्ये ⇨ पानशेत धरण फुटून मोठा पूर आला होता. नदीच्या वरच्या टप्प्यात डोंगराळ भाग असेल, तर भूमिपातांमुळे म्हणजे तेथील कडे वगैरे कोसळून पुष्कळदा नदीपात्रात बांध निर्माण होतात. असे बांध कालांतराने फुटले, तर नदीला पूर येतो. मानवनिर्मित धरणाच्या जलाशयात कडे कोसळल्यामुळे त्या जलाशयातील पाणी धरणावरून वाहू लागते व त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूर येतो. उदा., १९६३ साली इटलीतील व्हाइओंट धरणाच्या जलाशयात कडे कोसळल्यामुळे जलाशय पूर्णपणे माती आणि दगडांनी भरून गेला. त्यामुळे जलाशयातील पाणी धरणावरून वाहू लागून नदीच्या खालच्या भागात प्रचंड पूर आला.

पुराच्या वेळी नदीची खननशक्ती बरीच वाढलेली असते. जमिनीचे ढाळमान अधिक असेल, तर पात्राचे अधिक प्रमाणात खनन होते आणि गोटे, वाळू, माती इ. ‘ओझे’ मोठ्या प्रमाणात ती वाहून नेते. ढाळमान कमी असेल, तर पाण्याचा वेग मंदावतो व नदीची ‘ओझे’ वाहण्याची शक्ती कमी होते. नदीच्या पात्रात वाळू, माती, गोटे इत्यादींचे संचयन होते. त्यामुळे पुष्कळदा नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि तिच्या वरच्या भागात पाणी फुगते. पुराच्या वेळी नदीकाठावरील ज्या भागात पाणी तुंबून राहते, तेथे प्रवाहाचा वेग कमी असल्यामुळे गाळ, माती इ. साठून पुराचे मैदान तयार होते. अशी मैदाने पुष्कळदा अत्यंत विस्तृत असतात. अमेरिकेतील ओहायओ शहराच्या खालच्या भागात निर्माण झालेले मिसिसिपी नदीचे पूरमैदान सु. १२९ किमी. रुंद आहे. तिच्या दोन्ही बाजूंस सामान्यपणे पूरतट तयार झालेले आढळतात. नदीचे पाणी वाढले, की काही वेळा हे पूरतट फुटतात व भोवतालच्या पूरमैदानात पाणी पसरते. ह्‌वांग हो, मिसिसिपी, पो, गंगा या नद्यांचे पूरतट वारंवार फुटत असल्याने त्यांच्या पूरमैदानांचे अतोनात नुकसान होते. पूरतटांच्याच अडथळ्यांमुळे पूरमैदानात पसरलेले पाणी पुष्कळदा नदीप्रवाहात लवकर परतू शकत नाही त्यामुळे पुराची अवस्था जास्त दिवस टिकते. १९७८ साली यमुनेला आलेला पूर यामुळेच दिल्ली येथे बरेच दिवस टिकून होता. प्रवाहाच्या वेगात अचानकपणे वाढ झाली, की त्यामुळे पूरतट कमकुवत ठिकाणी फुटतात आणि पुष्कळदा नदीचा उपप्रवाह निर्माण होतो. असा प्रवाह दुसऱ्या एखाद्या नदीला जाऊन मिळाला, की नदीचे अपहरण झाले, असे समजतात [→नदी अपहरण]. पूरमैदानांत दलदलींचे पट्टे, प्रवाहाची नागमोडी वळणे, धनुष्कोटी सरोवरे इत्यादींची निर्मिती होते.

सागरी किनारपट्टीवरील प्रदेशांत निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे समुद्रात प्रचंड लाटांची निर्मिती होते. त्या लाटा किनाऱ्यालगतच्या भूप्रदेशात घुसून तो भाग जलमय करतात. अनेकदा अशा चक्री वादळांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होऊन तेथील नद्यांना पूर येतात. असे पूर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वारंवार संभवतात. १९७० मध्ये बंगालच्या उपसागरात उद्‌भवलेल्या चक्री वादळामुळे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात मोठा पूर आला होता. अशाच प्रकारची ‘हरिकेन’ व ‘टायफून’ ही वादळे अनुक्रमे वेस्ट इंडीज व ईस्ट इंडीज या बेटांदरम्यान निर्माण होतात. सागरतळाशी भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना ‘सुनामी’ लाटा म्हणतात. त्यांच्या निर्मितीमुळेही किनारपट्टीचा भाग जलमय होतो. जपानचा किनारा व पॅसिफिक महासागरातील काही भागांत अशा लाटांची निर्मिती होते. १८९६ मध्ये निर्माण झालेल्या सुनामी लाटेच्या जपानमधील सु. ११,००० घरे व २७,००० लोकांना तडाखा बसला. १९४६ मध्ये सुनामी लाटांमुळे जपानच्या होन्शू व शिकोकू या बेटांवर पूर येऊन सु. १,००,००० लोक निराधार झाले. इंडोनेशियातील जावा-सुमात्रा या बेटांदरम्यानच्या क्राकाटाऊ बेटावरील १८८३ मधील ज्वालामुखी उद्रेकाने निर्माण झालेल्या लाटा द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणवल्या होत्या. त्यांत दोन बेटे नष्ट झाली आणि सु. ३६,००० लोक मृत्यूमुखी पडले. काही वेळा सरोवरांतील पाण्याची पातळी वाढून त्यांच्या आसपासचा प्रदेश जलमय होण्याची शक्यता असते, पण असे प्रकार विरळ असतात. अतिवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील एअर सरोवराची व्याप्ती १९५१ मध्ये ७,५०० चौ. किमी. पर्यंत वाढली होती.

पुराची तीव्रता पर्जन्याचा कालावधी व जमिनीचे स्वरूप यांवर अवलंबून असते. वनस्पतींच्या अडथळ्यांमुळे पुराचा वेग मंद होत जातो व त्यामुळे जमिनीची धूपही कमी होते. तथापि दिवसेंदिवस जगातील जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याने पुराची तीव्रता व प्रमाण वाढत चालले आहे. अपक्षरण क्रियेमुळे नदीच्या पात्राची जलधारणक्षमता कमी होऊन पुराचे प्रमाण वाढते. पुराच्या वेळी नदीची वहनशक्ती वाढते. प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास वहनक्षमता वेगाच्या ६४ पटींनी वाढते. पुरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करताना पूराधीन प्रदेशातील जलविज्ञान, मृद्संधारण, पर्जन्यमान, तपमान, आर्द्रता, बाष्पीभवन यांसारख्या गोष्टींचा काटेकोरपणे विचार करावा लागतो. जमिनीखालून वाहणारे पाण्याचे प्रवाह, त्यांचा वेग, जमिनीची धूप व तत्सम घटकांची आकडेवार व तपशीलवार माहिती गोळा करणे आवश्यक असते. पुराचे मोजमाप करण्याकरिता जलातिप्रवाहाची खोली (डेफ्थ ऑफ ओव्हरफ्लो) विचारात घ्यावी लागते. ही खोली जलौघाचा वेग (रेट ऑफ फ्लो) व पात्राची धारणाशक्ती यांवर अवलंबून असते. किनारपट्टीवरील जलातिप्रवाहाची खोली ही वायुभार, वाऱ्याची तीव्रता व किनारपट्टीची रचना यांवर अवलंबून असते.

996 - 1


पुराचे मोजमाप प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते : (१) पुराच्या वेळी नदीतील पाण्याच्या पातळीची उंची मोजणे व (२) नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाहमान मोजणे. नदीवरील पुलाच्या भिंतीवर किंवा किनाऱ्यालगतच्या मजबूत भिंतीवर उंचीच्या खुणा करण्याची पारंपरिक पद्धत आहे. जेथे हे शक्य नसेल, तेथे किनाऱ्यावर खांब रोवून त्याच्यावर उंचीच्या खुणा करतात. त्यांना पूरमापक म्हणतात. मोठ्या शहरांजवळून वाहणाऱ्या नद्यांवर असे पूरमापक बसविलेले असतात.  अशा पूरमापकांवर कोणत्या पातळीपर्यंत पाणी आले असता शहरास पुराचा धोका आहे, हे कळू शकते. त्या पातळीला धोकादर्शक पातळी असे म्हणतात.

पाण्याची उंची मोजून नदीतील पाण्याचे प्रवाहमान कळत नाही. त्यासाठी प्रवाहमार्गाच्या छेदाचा नकाशा काढून त्यावर पूरपातळी आखतात. त्यावरून पुराच्या वेळचे नदीच्या प्रवाहमार्गाचे क्षेत्रफळ काढता येते. पुराच्या वेळचा नदीच्या पाण्याचा वेग प्रवाह मापकाच्या साहाय्याने मोजतात. पाण्याचा वेग व प्रवाहमार्ग यांवरून प्रवाहमान पुढील सूत्राने काढता येते :

Q = A ×V

Q = नदीतील प्रवाहमान (घन मीटर / सेकंदमध्ये)

A = नदीच्या प्रवाहमार्गाचे क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये)

V = नदीच्या प्रवाहाचा वेग (मीटर / सेकंदमध्ये).

नदीचा प्रवाहमार्ग आणि नदीतील पाण्याचा वेग मोजण्यासाठी बहुतेक सर्व नद्यांवर आता मापन केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यांनी केलेल्या मोजमापावरून पुराच्या वेळची पाण्याची उंची व प्रवाहमान कळू शकते.

किनारपट्टीवरील पूर बहुतांशी समुद्रातील लाटांमुळे निर्माण होतो. त्याचे मापन लाटांच्या समुद्रसपाटीवरील उंचीवरून आणि त्याच्या अंतर्भागातील व्याप्तीवरून केले जाते.

पुराच्या मोजमापावरून पुराचे मान समजत नाही. पुराचे मान म्हणजे एखाद्या नदीवर, दिलेल्या कालखंडात येऊ शकणाऱ्या मोठ्यांत मोठ्या पुराचे मोजमाप. उदा., शंभर वर्षांचा कालखंड घेतला, तर त्या कालखंडात येऊ शकणारा मोठा पूर हा १० वर्षांच्या कालखंडात येऊ शकणाऱ्या पुरापेक्षा निश्चितच मोठा असेल. तो किती पट असू शकेल, हे त्या नदीचे गुणधर्म, तिच्या पाणलोटक्षेत्रात पडणारा पाऊस व तेथील हवामानातील घटक यांवर अवलंबून असते. शंभर वर्षांत येऊ शकणारा मोठ्यांत मोठा पूर हा त्या नदीचा शतकवर्षीय पूर होय. पूर्वीच्या काही वर्षांची (किमान ३० ते ४० वर्षांची) पुराची मोजमापे माहीत असल्यास संख्याशास्त्राच्या नियमानुसार शतकवर्षीय, सहस्त्रवर्षीय पुरांचे मान ठरविता येते.

नदीवर धरण, पूल यांसारखे कोणतेही महत्वाचे बांधकाम करावयाचे असेल, तर त्या नदीच्या पुराचे मान लक्षात घ्यावे लागते. समुद्रकिनाऱ्यावरील बंदराचे बांधकाम करताना तेथील किनाऱ्यावर येऊ शकणाऱ्या मोठ्यांत मोठ्या लाटांचा व त्यामुळे समुद्राच्या पातळीत होऊ शकणाऱ्या वाढीचा अभ्यास करावा लागतो. पूरमानाचा कालखंड ठरविताना धरणाचे किंवा पुलाचे महत्व, त्याखाली असणारी शहरे व गावे, संभाव्य पुरामुळे होणाऱ्या हानीची तीव्रता इ. गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. धरण जर मनुष्यवस्तीपासून दूर असेल व ते फुटले असता येणाऱ्या पुराने मोठी हानी होण्याची शक्यता नसेल, तर पुराचा कालखंड (पुराचे मान) कमी म्हणजे ५० ते १०० वर्षांपर्यंत घेता येतो. महत्त्वाच्या धरणांबाबत तो १०० ते २०० वर्षांचा घेतात. फारच महत्त्वाच्या व प्रचंड धरणांच्या बाबतीत तो ५०० वर्षांपर्यंत घेतला जातो.

जेवढा कालखंड मोठा, तेवढे पुराचे मान मोठे व पुरात वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाहमान मोठे. त्यामुळे नदीवर बांधलेले बांधकाम त्या मोठ्या कालखंडातील पुराला तोंड देण्यासारखे बळकट व मोठे असावे लागते.

पूर जितकी मोठा, तितकी तो येण्याची शक्यता कमी असते. ज्याप्रमाणे पूर्वीच्या मोजमापांवरून शतकवर्षीय तसेच सहस्त्रवर्षीय पुराचे मान काढता येते, त्याचप्रमाणे एखाद्या पुराचे मोजमाप दिले असता, तो पूर त्या नदीवर किती वर्षांच्या कालखंडात येऊ शकेल हे सांगता येते. एखादा पूर येऊन गेल्यानंतर पुन्हा तेवढा पूर येण्याकरिता जो कालखंड लागतो, त्या कालखंडाला त्या पुराचा प्रत्यावर्तन काल असे म्हणतात. शतकवर्षीय पुराचा प्रत्यावर्तन काल १०० वर्षे असतो.

पुरांमुळे अर्थातच जीवितहानी व वित्तहानी होत असते तथापि पुष्कळदा नियमितपणे येणारे मर्यादित पूर उपयुक्तही ठरतात. उदा., ईजिप्तमधील आस्वान धरण बांधण्यापूर्वी नाईल नदीला वसंत ऋतूत येणारा मोसमी पूर तिच्या त्रिभुज प्रदेशातील ओल टिकविण्यास उपयुक्त मानला जात असे. आग्नेय आशियातील मेकाँग नदीच्या पात्रातील टॉनले सॅप सरोवरामुळे मेकाँग नदीचा पूर काबूत राहतो व सरोवरातील पाणी कोरड्या ऋतूत शेतीला वापरता येते. म्हणूनच या सरोवराला मेकाँगचे पूरनियंत्रक तळे म्हणतात. तथापि चीनमधील यांगत्सी, ह्‌वांग या नद्यांना येणाऱ्या महापुरांनी नित्यनेमाने अपरिमित हानी होत असते. म्हणूनच ह्‌वांग नदीला ‘अश्रूंची नदी’ म्हटले जाते. १९११ मध्ये यांगत्सी नदीला आलेल्या पुरामुळे १३० किमी. लांबीचे व ५३ किमी. रुंदीचे तळे निर्माण होऊन एक लाख लोक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानात १९७३ मध्ये सिंधू नदीला अतिवृष्टीमुळे पूर येऊन २,३०० लोक मृत्युमुखी पडले. अतिवृष्टीमुळे अत्यंत हानिकारक ठरलेल्या पुरांमध्ये सीन नदीवरील पॅरिस (१६५८, १९१०), व्हिश्चला नदीवरील वॉर्सा (१८६१, १९६४), टायबर नदीवरील रोम (१५३०, १५५७) येथील पुरांची गणना होते. बर्फाच्या अडथळ्यामुळे आलेले डॅन्यूब नदीचे पूर (१३४२, १४०२, १५०१ व १८३०) अत्यंत नुकसानकारक ठरल्याची नोंद आहे. समुद्रलाटांमुळे इंग्लंड, बेल्जियम, नेदर्लंड्‌स येथे मोठ्या प्रमाणावर पुराचे तडाखे बसले होते (१०९९, १९५३). भूकंपामुळे पर्वतप्राय सागरी लाटा निर्माण होऊन लिस्बन शहराचे (१७५५) व हवाई बेटांचे (१९४६) प्रचंड नुकसान झाले.

भारतातही पुरांचा धोका कायमचाच आहे. विशेषतः उत्तर व पूर्व भारतांतील ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, कोसी, गंडक, दामोदर इ. नद्यांना प्रचंड पूर येतात. त्यामुळे देशातील पुरांमुळे होणाऱ्या एकूण नुकसानीच्या ९०% नुकसान त्या  प्रदेशात होते. तापीचे व नर्मदेचे खालचे खोरे तसेच महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांतही पुराचे धोके संभवतात. पंजाब-हरयाणांत, विशेषतः रोहटक, हिस्सार, गुरगाव इ. निकृष्ट जलवहन प्रदेशांत, अतिवृष्टीमुळे पूर येतात. १९५४ मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरात सु. ३२,००० चौ. किमी. प्रदेश जलमय झाला व १२.८ लक्ष लोकसंख्येला उपद्रव पोहोचला. १९५६ मध्ये दामोदर व तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे प. बंगालच्या दक्षिण भागातील सु. २५,००० चौ. किमी. प्रदेश जलमय झाला.


भारतात ६७ लक्ष हे. क्षेत्र पुराच्या धोक्याच्या कक्षेत येते. देशातील सु. ६०% नुकसान नदीच्या पुरांमुळे व सुमारे ४०% नुकसान अतिवृष्टी व वादळे यांमुळे होते. दरवर्षी साधारणपणे सरासरी ७८ लक्ष हे. क्षेत्रफळातील २.४ कोटी लोकसंख्येला पुराचा तडाखा बसतोच. सु. २३ ते ७८ लक्ष हे. जमिनीतील पीक वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी सरासरी २४० कोटी किंमतीच्या मालमत्तेची हानी होते. गेल्या २५ वर्षांत देशाने पूरनियंत्रण योजनांसाठी ६३० कोटी रुपये खर्च केले असले, तरी या समस्येचा आवाका लक्षात घेता हे प्रयत्न थिटेच पडले आहेत. भारतात १९५३ ते १९७१ या काळात नदीपुरांमुळे झालेले प्रतिवर्षाचे सरासरी नुकसान १९६ कोटी रुपयांचे आहे. १९७१ साली देशाच्या सर्व भागांत पुरांची आपत्ती ओढवली व त्यामुळे ६३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. १९७७ साली पुरांमुळे झालेले पिकांचे नुकसान २२४ कोटी रुपयांचे होते. बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळांमुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वरचेवर अतिवृष्टी होऊन प्रदेश जलमय होतो. १९ नोव्हेंबर १९७७ साली आंध्र प्रदेशात चक्री वादळाने केलेला प्रलय अत्यंत भीषण होता. या वादळातील राक्षसी लाटेची लांबी ८० किमी., रुंदी १६ किमी. व उंची ५.८ मी. होती. समुद्रापासून आत १६ किमी. भूभागावर तिचा तडाखा बसला. अवघ्या ८० मिनिटांत या अक्राळविक्राळ भीमकाय लाटेने दहा हजार लोकांचा बळी घेतला, १५० खेडी जमीनदोस्त केली व एक लाखाहून अधिक गुरेढोरे प्राणास मुकली.

भारतातील काही प्रलयकारी पूर 

नदीचे नाव

वर्ष

स्थळ

कमाल पूर मऱ्यादा

(मीटरमध्ये)

गंगेचे खोरे 

यमूना

राप्ती

यमुना

गंगा

कोसी

गंगा

१९२४

१९२५

१५ऑक्टोबर          १९५६

१७ जून                 १९६३

५ ऑक्टोबर           १९६८

६ ऑगस्ट              १९७१

ताजेवाला

बर्ड्‌सपेट

दिल्ली

गढमुक्तेश्वर

बाराक्षेत्र

पाटणा

३८५.८६

७६.६४

२०६.४४

१९९.०२

१३१.८३

४९.६५

ब्रह्मपुत्रा खोरे 

सुबनसिरी

मानस

ब्रह्मपुत्रा

तिस्ता

ब्रह्मपुत्रा

९ ऑगस्ट              १९५७

२५ मे                    १९६२

२३ ऑगस्ट            १९६२

५ ऑक्टोबर           १९६८

१७जुलै                 १९६९

भोनीपारघाट

माथनगुरी

गौहाती

जलपैगुरी

दिब्रुगड

९६.८७

१००.५८

५१.०६

४२.६०

१०५.४६

सिंधू खोरे 

रावी

बिआस

सतलज

५ ऑक्टोबर           १९५५

६ ऑक्टोबर           १९५५

६ ऑक्टोबर           १९५५

माधोपूर

मंडी मैदान

हरिके

३४९.७६

२१५.१७

२११.१९

इतर नद्या 

कृष्णा

महानदी

सुवर्णरेखा

गोदावरी

कावेरी

नर्मदा

७ ऑक्टोबर           १९०३

१९२५

१९४३

१६ ऑगस्ट            १९५३

२० ऑगस्ट            १९६१

७ सप्टेंबर              १९७०

विजयवाडा

नारज

राजघाट

धवलेश्वरम्‌

मेत्तूर धरण

भडोच

२४.३०

२७.८६

६.२५

१७.७५

२४२.२५

१२.६५

पुरामुळे फार मोठी हानी घडून येते. प्राणहानीबरोबरच शेती, रस्ते, दळणवळणाची साधने, वस्त्या आणि गावे उद्‌ध्वस्त होतात. रोगराईही पसरते. पुरामुळे पुष्कळदा नदीचा मार्गही बदलून जातो.

भारतातील कोसी नदीने गेल्या २०० वर्षांतच १२० किमी. रुंदीच्या भागात आपले पात्र बदलले आहे. चीनमधील ह्‌वांग नदीने अशा प्रकारे आजवर सु. १,००० किमी. पर्यंत आपला मार्ग बदललेला आहे. काही वेळा तिने उत्तरेस तिन्‌त्सिन शहरापर्यंत व दक्षिणेस यांगत्सी नदीपर्यंत मार्ग बदलल्याचे दिसून येते. पुरांची नोंद चीन व ईजिप्त या देशांत चांगल्या प्रकारे ठेवलेली आढळते. गेल्या दोन हजार वर्षांत चीनमध्ये १,६२१ पुरांची नोंद केलेली आढळते.

उकिडवे, नि. ना. गुजर, वि. गो.