वुस्टर–२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मॅसॅचूसेट्‌स राज्यातील वुस्टर परगण्याचे मुख्य ठिकाण व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. राज्यातील हे प्रमुख औद्योगिक, व्यापारी, वितरण व शैक्षणिक केंद्र आहे. लोकसंख्या १,६९,७५९ (१९९०). बॉस्टन शहराच्या पश्चिमेस ६४ किमी., ब्लॅकस्टोन नदीकाठावरील टेकड्यांच्या भागात बॉस्टन व स्प्रिंगफील्ड यांपासून साधारण मध्यावर हे शहर आहे. वुस्टर हा एक मोठा नागरी विभाग असून त्यात होल्डन, श्रूझबरी बॉइल्झ्‌टन, मिलबरी, ऑबर्न व लेस्टर या नगरांचा समावेश होतो. शहर परिसरात बरीच सरोवरे व तलाव आहेत, त्यांपैकी क्विन्सिगमंड हे ११ किमी. लांबीचे सरोवर शहराच्या पूर्व सरहद्दीलगत आहे.

इ. स. १६७३ मध्ये पश्चिम मॅसॅचूसेट्‌सच्या मूळ वसाहतवाल्यांनी येथे क्विन्सिगमंड हे गाव वसविले. वसाहतवाल्यांविरोधी झालेल्या किंग फिलिपच्या (अमेरिकेन इंडियन नेता) युध्दात (१६७५-७६) येथील मूळ वसाहतीची बरीच नासधूस झाली. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्‌स याने ‘मॅसॅचूसेट्‌स बे कॉलनी’चे चार्टर रद्द केले (१६८४), त्यामुळे क्विन्सिगमंडच्या लोकांनी चिडून या गावाचे नाव वुस्टर असे बदलले. इंग्लंडमधील वुस्टरवरून याला हे नाव देण्यात आले. १६७३–७५ आणि १६८३–१७०२ असे दोन वेळचे येथील वसाहतीचे प्रयत्न असफल झाल्यानंतर १७१३ मध्ये येथे कायम स्वरूपी वसाहतीची स्थापना करण्यात आली. १७२२ मध्ये याला नगराचा दर्जा प्राप्त झाला, तर १७३१ मध्ये याच नावाच्या परगण्याचे हे मुख्य ठिकाण बनले. अमेरिकन क्रांतीच्या काळात वुस्टर हे गुप्तहेरांचे तसेच गुलामगिरी विरोधी चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी गुलामांची वाहतूक करणारी येथील भुयारी रेल्वे बंद पाडली. मॅसॅचूसेट्‌समधील फ्री-सॉइल पार्टीनेही गुलामांच्या व्यापाराला विरोध केला होता. १८४८ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. वुस्टरमध्ये १८५० च्या राष्ट्रीय कराराने स्त्रियांना प्रथमच मताधिकार प्राप्त झाला. १९५३ मध्ये शहराला वादळाचा जोरदार तडाखा बसून फार मोटी प्राणहानी व वित्तहानी झाली होती.

इ. स. १७८९ मध्ये येथे सुती कापडनिर्मितीस प्रारंभ झाला. संयुक्त संस्थानांतील सुती-मखमली (कॉर्डुरॉय) कापडाचे पहिले उत्पादन येथूनच झाले. बाष्पाच्या अभावी सुरूवातीला या उद्योगाचा विकास खुंटला तरी नंतरच्या काळात बाष्पशक्तीच्या वापराला झालेला प्रारंभ व वुस्टर वसाहत ते प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड) यांना जोडणाऱ्या ब्लॅकस्टोन कालव्याचा शुभारंभ (१८२८) यांमुळे वुस्टरच्या औद्योगिक विकासास गती आली. त्यानंतरच्या लोहमार्ग सुविधांमुळेही शहराच्या विकासाला आणखीनच फायदा मिळाला. त्यामुळे १९०० पर्यंत आयरिश, कॅनडियन व स्वीडिश लोक मोठ्या संख्येने येथे आले. परिणामतः वुस्टरची लोकसंख्या वाढली. त्यापाठोपाठ विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इटालियन, पोलिश, लिथ्युएनियन, ग्रीक, आर्मेनियन, सिरियन व लेबानी वसाहतकरी येथे आले. त्यामुळे १९५० पर्यंत वुस्टरची लोकसंख्या २,०२,००० पर्यंत पोहोचली. मात्र १९६० च्या दशकापासून काही आर्थिक प्रश्नांमुळे लोकसंख्या घटत गेली. शहरात विविध प्रकारचे सु. साडेचारशेपेक्षा जास्त निर्मितीउद्योग आहेत. विविध प्रकारची यंत्रसामग्री व यंत्रांचे सुटे भाग, धातूच्या वस्तू, रसायने, प्लॅस्टिके, औषधे, विद्युत्‌ उपकरणे, वस्त्रे, चामड्याच्या वस्तू, कागद, परिशुध्दी उपकरणे, शास्त्रीय उपकरणे, लाकडी कलाकाम, काच इत्यादींची निर्मिती, तसेच छपाई व प्रकाशन असे विविध उद्योग शहरात चालतात. येथे विमा, बँका, शिक्षण व संशोधन या क्षेत्रांत गुंतलेल्या लोकांची संख्या मोठी आहे.

शहरात कॉलेज ऑफ द होली क्रॉस (१८४३, जून न्यू इंग्लंड कॅथलिक कॉलेज), वुस्टर स्टेट कॉलेज (१८७१), क्विन्सिगमंड कम्युनिटी कॉलेज (१९६३), सेंट्रल न्यू इंग्लंड कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी (१९७१) तसेच मॅसॅचूसेट्‌स विद्यापीठाचे वैद्यकीय विद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. येथील अमेरिकन ॲन्टिक्वेरिअन सोसायटीत (१८१२) दुर्मिळ व मौल्यवान वस्तूंचा फार मोठा संग्रह जतन केला आहे. येथील वुस्टर फौंडेशन फॉर इक्स्पेरिमेन्टल बॉयॉलॉजी संस्थेत जन्मनियंत्रणाच्या औषधी गोळ्या पहिल्यांदा तयार करण्यात आल्या. शहरात बरीच रूग्णालये आहेत. वुस्टर आर्ट म्यूझीयम येथे श्रेष्ठ दर्जाच्या डच, ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच व अमेरिकन चित्रकारांच्या रंगीत चित्रांचा संग्रह आहे. हिगिन्स आर्मरी म्यूझीयम, मेकॅनिक्स हॉल (कला केंद्र), वुस्टर फ्री पब्लिक लायब्ररी, वुस्टर क्राफ्ट सेंटर, वुस्टर हिस्टॉरिकल सोसायटी म्यूझीयम, नॅचरल हिस्टरी सोसायटीज सायन्स म्यूझीयम, वुस्टर सायन्स सेंटर या काही प्रमुख संस्था शहरात कार्यरत आहेत. वुस्टरमधील डॅनियल चेस्टर फ्रेंच, मॉरीस स्टर्न, रँडॉल्फ रॉजर्स व चेम ग्रॉस यांच्या शिल्पकला विशेष उल्लेखनीय आहेत.

शहरात शंभराहून अधिक चर्च तसेच काही सिनॅगॉग आहेत. एडवर्ड एव्हरट हेल या धर्मोपदेशकाचे १८४२–५६ या काळात येथे वास्तव्य होते. १८५८ मध्ये वुस्टर संगीत महोत्सवाची येथे स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी ऑक्टोबरात होणारा संयुक्त संस्थानांतील हा अशा प्रकारचा सर्वांत जुना महोत्सव समजला जातो. या महोत्सवात जगप्रसिध्द कलाकार भाग घेतात. इतिहासतज्ञ जॉर्ज बँक्रॉफ्ट आणि रॉकेट संशोधक रॉबर्ट गॉडर्ड यांचे वुस्टर हे जन्मस्थान आहे. शहरात अनेक प्रेक्षणीय वास्तू, सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, प्राणिसंग्रहालये असून क्विन्सिगमंड सरोवराजवळील क्विन्सिगमंड उद्यान प्रसिध्द आहे. सिटी हॉल, वुस्टर कोर्ट हाउस या वास्तू उल्लेखनीय आहेत. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व विमानमार्ग अशा सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गांचे हे प्रमुख केंद्र आहे.

चौधरी, वसंत