धरमशाला परिसर : एक दृश्य

धरमशाला :  धर्मशाळा. हिमाचल प्रदेश राज्याच्या कांग्रा जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १०,९३९ (१९७१). हे या जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गिरिस्थान असून ते कांग्राच्या ईशान्येस सु. २६ किमी आहे. या गिरिस्थानाचे दोन भाग असून वरच्या भागाची उंची सु. २,१६८ मी. व खालच्या भागाची उंची १,३७२ मी. आहे. येथे पूर्वी हिंदूंची एक धर्मशाळा (विश्रांतिगृह) होती. त्यावरूनच या ठिकाणाला धरमशाला असे नाव पडले असावे. इंग्रजांच्या अमदानीत येथे स्थापन झालेली लष्करी छावणी, आल्हाददायक हवामान आणि सृष्टीसौंदर्य यांमुळे लवकरच हे पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र बनले. १८५५ पासून हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे झाले. १८६७ पासून येथे नगरपालिका आहे. ४ एप्रिल १९०५ च्या भूकंपाने शहराची बरीच हानी झाली. हिमालयातील धवलधार पर्वतरांगेच्या उतारावर ते वसले असून सभोवतालचा भाग पाइन व ओक वृक्षांच्या अरण्यांनी व्यापलेला आहे. येथील शिखरे जवळजवळ सहा महिने बर्फाच्छादितच असतात. येथील भागसूनाथाचे देऊळ व त्याच नावाचा धबधबा प्रेक्षणीय आहे. धरमशाला दक्षिणेस होशियारपूरमार्गे, तर पश्चिमेस पठाणकोटमार्गे मैदानी प्रदेशाशी जोडलेले आहे. आसपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांशी दूरध्वनीने संपर्क साधता येतो. येथे सोडावॉटरच्या बाटल्या भरण्याचा उद्योग चालत असून जवळच स्लेट पाटीच्या दगडांची खाण आहे. पंजाब विद्यापीठाशी संलग्न असलेली दोन महाविद्यालये येथे आहेत.

चौधरी, वसंत