फ्रीपोर्ट : अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील स्टीव्हन्सन काउंटीची राजधानी. लोकसंख्या २७,७३६ (१९७०). हे शिकागोच्या वायव्येस सु. १६५ किमी. तर रॉकफर्डच्या पश्चिमेस सु. ४५ किमी. अंतरावर पेक्टॉनिका नदीवर वसले आहे.

विल्यम बेकरने १८३५ मध्ये वसविलेल्या या शहरात प्रथम पेनसिल्व्हेनियन जर्मनांनी वस्ती केली. १८३७ मध्ये याला काउंटीच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाल्यावर शहराचे ‘विनशीक’ हे नाव बदलून ‘फ्रीपोर्ट’ असे ठेवण्यात आले. १८५३ मध्ये लोहमार्ग चालू झाल्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला. २७ ऑगस्ट १८५८ रोजी अब्राहम लिंकन व स्टीव्हन डग्लस यांची गुलामगिरीवरील जाहीर वादविवादाची दुसरी फेरी येथेच झाली. त्याची स्मृती म्हणून येथील टेलर उद्यानात लिंकनचा ब्राँझ पुतळा उभारण्यात आलेला आहे.

फ्रीपोर्ट मुख्यतः शेतमालाची बाजारपेठ म्हणून व दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. याचा आसमंत कृषिउत्पादनासाठी प्रसिद्ध असून मका, गहू, ओट ही येथील मुख्य पिके आहेत. शिवाय अल्फाल्फा गवताचे उत्पादनही बरेच होते. शहरात दुग्धव्यवसाय, खाद्यपदार्थ, खेळणी, प्लॅस्टिक वस्तू, टायर, गुरांचे खाद्य व खते, रणगाडे, विद्युत् पंप, औषधे, सौंदर्यप्रसाधने, कृषिअवजारे इ. अनेक उद्योगधंदे चालतात. येथे एक उच्च माध्यमिक विद्यालयही आहे.

लिमये दि. ह.