भोर : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्याचे मुख्य ठिकाण व भूतपूर्व ⇨भोर संस्थानाची राजधानी. हे पुण्याच्या

भोरचा राजवाडा

दक्षिणेस सु. ४० किमी. अंतरावर नीरा नदीकाठी पुणे-महाड रस्त्यावर (वरंधा घाटातून जाणाऱ्या) वसले आहे. लोकसंख्या १२,७३५ (१९८१).

येथील भोरेश्वराच्या प्राचीन शिवमंदिरावरून गावास भोर हे नाव पडले असल्याचा उल्लेख आहे. १८८५ साली येथे नगरपालिकेची स्थापना झाली. संस्थानी काळात शहराची विशेष प्रगती झाली. शंकरराव चिमणाजी ऊर्फ रावसाहेबांनी येथील देवालये, धर्मशाळा यांचा जीर्णोद्धार केला.

शहरात पाणीपुरवठा व जलनिःसारणाच्या सोयी आहेत. येथे प्राथमिक-माध्यमिक व महाविद्यालीन (कला व वाणिज्य) शिक्षणाच्या सोयी असून मुलींची स्वतंत्र शाळा व धार्मिक शिक्षणाची एक वेदशाळा आहे. तसेच एक सरकारी रुग्णालय व पशुवैद्यक चिकित्सालय असून श्रीमंत गंगुताई सार्वजनिक ग्रंथालय व राजवाड्यात एक खाजगी संग्रहालय आहे. भोर औद्योगिक दृष्ट्याही प्रगत झालेले असून येथे रंगाचा कारखाना, सोलापूर सूत गिरणी, बाँबे नेट व भोर इंडस्ट्रीज हे कारखाने आहेत.

भोरच्या उत्तरेस ६ किमी. अंतरावर ⇨भाटघर येथे येळवंडी नदीवर एक मोठे धरण बांधले आहे (१९२८). भोरच्या नैर्ऋत्येस सु. १५ किमी. वर असलेले अंबवडे गाव पर्यटनस्थळ असून येथे एक झुलता पूल-जिजीसाहेब झुलता पूल-आहे. १९३६ मध्ये हा पूल बांधण्यात आला. भोरला दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला शंकराजी नारायण (पंतसचिव घराण्यातील मूळ पुरुष) यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक उत्सव साजरा केला जातो. येथील भोरेश्वराचे मंदिर, रामबाग बंगला, राजवाडा इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत.

संकपाळ, ज. बा.