दोडाबेट्टा : निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर. हे पश्चिम घाटातील अनाईमुडी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून उंची २,६३७ मी. आहे. हे तमिळनाडू राज्याच्या निलगिरी जिल्ह्यात ऊटकमंड तालुक्यात अनाईमुडीच्या दक्षिणेस सु. १६० किमी.वर आहे. निळसर व करड्या रंगाच्या ग्रॅनाइटी खडकांनी युक्त असलेल्या या श्रेणीची उंची सभोवतालच्या प्रदेशापेक्षा तीव्रतेने वाढत गेलेली आहे. दोडाबेट्टा हे गवताने आच्छादलेले असून याच्या परिसरात सिंकोनाची फार मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असून येथे वेधशाळा आहे. उन्हाळ्यामध्ये खास गिर्यारोहणासाठी कित्येक पर्यटक येथे येतात.

मांढरे, जयवंत