लाट : भारतातील एक प्राचीन देश. याच्या विस्ताराविषयी भिन्न मते आढळतात. वात्स्यायनाच्या कामसूत्रात लाट देश माळव्याच्या पश्चिमेला असल्याचा उल्लेख मिळतो. टॉलेमीच्या मते मही व तापी या नद्यांदरम्यानच्या गुजरात राज्याचा दक्षिण भाग व खानदेश यांचा त्यात समावेश होता. जर्मन संशोधक प्रा. ब्‍यूलर यांच्या मते मध्य गुजरात म्हणजे ‘लाट देश’ असावा. त्यात मही व किम या नद्यांदरम्यानच्या जिल्ह्यांचा समावेश होता. भडोच हे त्या देशातील प्रमुख शहर होते. स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस यांनी सुरत, भडोच, खेडा व बडोदे (काही भाग) या जिल्ह्यांचा त्यात अंतर्भाव होता, असे अँटिकिटीज ऑफ काठेवाड अँड कच्छ या ग्रंथात लिहिले आहे. कर्नल यूल यांनी मार्को पोलो या ग्रंथात लाड (लाट) हे गुजरात व उत्तर कोकण या प्रदेशाचे जुने नाव असल्याचे म्हटले आहे.

मंदसोर तसेच पुलकेशीच्या ऐहोळ येथील शिलालेखांत या देशाचा उल्लेख आढळतो. धौली व गिरनार शिलालेखांवरून याची अनुक्रमे लाठिका व राष्टिका अशीही नावे आहेत. बडोदे येथे सापडलेल्या ताम्रपटावर लाट अथवा लाटेश्वर साम्राज्याच्या एलापूर या राजधानीचा उल्लेख मिळतो. परंतु या साम्राज्याविषयी अन्य खात्रीलायक पुरावे उपलब्ध नाहीत. हा देश सातव्या शतकात चालुक्यांच्या ताब्यात असल्याचा काही ऐतिहासिक पुराव्यांत उल्लेख आहे. संस्कृत साहित्यशास्त्रकार राजशेखर यांच्या विद्धशालभंजिका ह्या ग्रंथात ‘लाट’चा उल्लेख ‘लाड’ असा आहे. लाट हा शब्द लाट्यायनचा अपभ्रंश असावा असे मानतात. ‘लाट्यायन’ ही ब्राह्मणांची एक पोटशाखा असून ते लाड या नावानेही ओळखले जातात. दक्षिण गुजरातमधील त्यांच्या वास्तव्यामुळे त्या भागाला ‘लाट देश’ असे नाव पडले असावे. याच प्रदेशातील नागर ब्राह्मणांनी नागरी लिपी शोधली, असा नागर ब्राह्मणांचा दावा आहे.

चौंडे, मा. ल. सावंत, प्र. रा.