सिएरा नेव्हाडा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्याच्या पूर्व भागातील मोठी पर्वतरांग. ही रांग कोस्ट रेंजच्या पूर्वेस, वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली असून सु. ६८८ किमी. लांब व ८० ते १२८ किमी. रुंद आहे. या रांगेमुळे राज्याच्या पश्चिम भागातील ‘सेंट्रल व्हॅली’ व पूर्व भागातील ‘ग्रेट बेसिन’ हे भाग एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ‘सिएरा नेव्हाडा’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘करवतीच्या दातांसारखी हिमाच्छादित पर्वतरांग’ असा आहे. सिएरा नेव्हाडा रांग उत्तरेस लॅसन शिखरापासून ( कॅस्केड पर्वताचे दक्षिण टोक ) दक्षिणेस टेहाचॅपी खिंडीपर्यंत पसरलेली असून, पुढे नैर्ऋत्येस टेहाचॅपी डोंगररांगेद्वारा कोस्ट रेंजला जोडली गेली आहे. या रांगेच्या उत्तरेस कॅस्केड पर्वताच्या दक्षिण भागातील ३,२४० मी. उंचीचा मौंट लॅसन हा कॅलिफोर्नियातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. त्याचे १९१४ व १९१७ मध्ये विनाशकारी उद्रेक झाले होते. मौंट व्हिटने (४,४१८ मी.) हे सिएरा नेव्हाडा रांगेतील सर्वोच्च शिखर तिच्या दक्षिण भागात असून, ३,१०० मी.हून जास्त उंचीची अन्य अठ्ठावीस शिखरे आहेत. या रांगेमध्ये १,३५० मी. उंचीपर्यंत पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते परंतु पर्वताच्या शिखरांवर मात्र ते प्रमाण कमी असते. पश्चिम भागाच्या मानाने पूर्वे कडील शिखरांवर पाऊस कमी पडतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो. हा राज्याचा पाण्याचा मुख्य आधार आहे. डोनर खिंड व ताहो सरोवर परिसरात वार्षिक हिमवर्षाव ९ ते १२ मी. असतो. हिवाळ्यातील जास्तीत जास्त हिमवर्षाव १८ मी. झाल्याची नोंद आहे. सिएरा नेव्हाडा पर्वतरांगेच्या पश्चिम उतारावरुन अनेक नद्या वाहतात. त्यांमध्ये सॅन वॉकीन, सॅक्रामेंटो या मुख्य असून फीदर, अमेरिकन, टूऑलमी, किंग्ज व त्यांच्या उपनद्यांचा समावेश होतो. ओवेन्स वॉकर, कार्सन, टूकी या पूर्व उतारावरुन वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पर्वतावरील हजारो चौ. किमी. प्रदेश व्यापणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांपैकी सीक्वाया हे प्रचंड पुरातन वृक्ष जगप्रसिद्घ आहेत. याशिवाय पाँडेरोझा, पाइन, स्प्रूस, डग्लसफर, हेमलॉक, सीडार, मॅपल, ओक या जातींचे वृक्ष आहेत. सिएरा नेव्हाडा पर्वतात योसेमिटी, सीक्वाया आणि किंग्ज कॅन्यन ही तीन राष्ट्री य उद्याने आहेत. तसेच अनेक नैसर्गिक सरोवरे असून त्यांतील पूर्व सीमेवरचे १,९३० मी. उंचीवरील ४९० मी. खोल असलेले स्वच्छ निळसर पाण्याचे सुंदर ताहो सरोवर आहे. श्वास रोखून धरावा लागेल अशा नद्यांनी निर्माण केलेल्या खोल प्लाइस्टोसीन काळातील हिमनद्यांमुळे निर्माण झालेल्या ‘यू’ आकाराच्या दऱ्या, उंच उभे कडे, विस्तीर्ण कुरणे, सुंदर सरोवरे आणि योसेमिटी दरीतील उंचावरुन पडणारे धबधबे ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

कुंभारगावकर, य. रा.