वेस्ट इंडीज : अटलांटिक महासागरातील कॅरिबियन समुद्राची उत्तर व पूर्व सरहद्द बनलेली एक अर्धचंद्राकृती द्वीपमालिका. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडापासून ते दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतच्या सु. ३,२०० किमी. च्या सागरी प्रदेशात ही बेटे पसरली आहेत. फ्लॉरिडापासून १,९३० किमी. पर्यंत आग्नेय दिशेत, पुढे सु. ८०० किमी. दक्षिण दिशेत व त्यानंतर व्हेनझुएलाच्या उत्तर किनाऱ्यापजवळून पूर्व-पश्चिम अशी ही बेटे पसरली आहेत. मेक्सिको आणि मध्य अमेरिका यांच्या पूर्वेस ही बेटे येतात. या बेटांचे क्षेत्रफळ सु. २,३६,००० चौ. किमी. असून लोकसंख्या ३,३६,४०,००० (१९९० अंदाज) होती. (या द्वीपसमूहातील स्वतंत्र देशांवर, बहामा द्वीपसमूहावर विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत).

  उत्तरेकडील बहामा, मध्य भागाजवळील ग्रेटर अँटिलीस व आग्नेयीकडील लेसर अँटिलीस असे या बेटांचे प्रमुख तीन भाग पडतात. फ्लॉरिडापासून आग्नेय दिशेत बहामा बेटे पसरली असून या द्वीपसमूहामध्ये सु. ३,००० लहान बेटांचा व शैलभित्तींचा समावेश होतो. त्यांतील साधारण २० बेटांवर वस्ती आहे. बहामा आणि टूर्क्स व कायकोस हे यातील प्रमुख द्वीपसमूह आहेत. ग्रेटर अँटिलीस या मोठ्या द्वीपसमूहामध्ये क्यूबा, जमेका, हिस्पॅनीओला व प्वेर्त रीको ही मोठी बेटे येतात. त्यांपैकी हिस्पॅनीओला बेट राजकीयदृष्ट्या डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती अशा दोन देशांमध्ये विभागले आहे. क्यूबाने या द्वीपसमूहाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. प्वेर्त रीकोपासून दक्षिणेस त्रिनिदादपर्यंत वक्राकार पसरलेली असंख्य लहान बेटे लेसर अँटिलीसमध्ये येतात. व्हर्जिन बेटे, अँग्विला, सेंट कीट्‌स (सेंट क्रिस्तोफर) व नेव्हिस, अँटिग्वा व बारबूडा, मॉंटसेरात, ग्वादलूप, डोमिनिका, मार्तीनीक, सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ, बार्बेडोस व ग्रेनेडा या बेटांचा समावेश लेसर अँटिलीसमध्ये होतो. दक्षिण अमेरिकन समुद्रबुड जमिनीवर त्रिनिदादपासून पश्चिमेस आरूबापर्यंत पसरलेली बेटेही लेसर अँटिलीसमध्येच मोडतात. व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर पसरलेल्या या बेटांत त्रिनिदाद व टोबॅगो, मार्गारीटा, बॉनॅर, कुरासाऊँ व आरूबा या प्रमुख बेटांचा समावेश होतो.

क्रिस्तोफर कोलंबस हिंदुस्थानच्या शोधात आपल्या पहिल्या सफरीत सर्वप्रथम नव्या जगातील सॅन साल्व्हादोर येथे उतरला. पण तेथील परस्थिती पाहिल्यावर त्याला हा हिंदुस्थान नाही हे कळून चुकले. त्याने या प्रदेशाला वेस्ट इंडीज असे नाव दिले. भौगोलिकदृष्ट्या हा अमेरिकेचा भाग असला, तरी यूरोप, आफ्रिका व आशियाई देशांशी वेस्ट इंडीजची बरीच जवळीक आहे. यूरोपीयांच्या तर येथे दीर्घकाळ वसाहती होत्या. वांशिकदृष्ट्या वेस्ट इंडीजची आफ्रिकेशी जवळीक आहे. बर्म्यूडा बेटे हा प्राकृतिकदृष्ट्या जरी वेस्ट इंडीजचा भाग नसला, तरी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या वेस्ट इंडीज बेटांशी ह्याचे बरेच साधर्म्य आहे.

भूवर्णन : प्राकृतिकदृष्ट्या वेस्ट इंडीजचे (१) बहामा बेटे, (२) ग्रेटर अँटिलीस व (३) लेसर अँटिलीस असे मुख्य तीन विभाग पडतात. वेस्ट इंडीज बेटे म्हणजे इतिहासपूर्व काळात उत्तर व दक्षिण अमेरिकेला जोडणाऱ्या जलमग्न पर्वतश्रेणींचाच एक भाग आहे. दोन मुख्य पर्वतश्रेण्यांमुळे वेस्ट इंडीज बेटांची निर्मिती झालेली आहे. त्यांपैकी पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या पहिल्या श्रेणीमुळे ग्रेटर अँटिलीस बेटांची, तर उत्तर-दक्षिण दिशेत वक्राकार पसरलेल्या दुसऱ्या श्रेणीमुळे पूर्वेकडील लेसर अँटिलीस बेटांची निर्मिती झालेली आहे.

लेसर अँटिलीस या वक्राकार द्वीपमालिकेत दोन छोट्या द्वीपसमूहांचा समावेश होतो. त्यांपैकी वक्राच्या अंतर्गत बाजूचा पहिला समूह ग्रेनेडापासून उत्तरेस गेलला असून त्यातील ग्रेनेडीन्झ, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसीया, मार्तीनीक, डोमिनिका, ग्वादलूपचा पश्चिमेकडील अर्धा भाग, मॉंटसेरात, सेंट कीट्‌स व नेव्हिस बेटे आणि व्हर्जिन बेटांचा समावेश होतो. लेसर अँटिलीसमधील अंतर्गत द्वीपसमूहाच्या पूर्वेस कमी उंचीची प्रवाळ बेटे आढळतात, तो लेसर अँटिलीसमधील दुसरा द्वीपसमूह होय. बार्बेडोस, ग्वादलूपचा पूर्वेकडील अर्धा भाग, अँटिग्वा, बारबूडा व अँग्विला बेटांचा यात समावेश होतो. यांतील बहुतांश बेटे ज्वालामुखी क्रियेतून तर उर्वरित बेटे वारा व पाऊस यांच्या विदारण क्रियेमुळे पर्वतशिखरांची झीज होऊन निर्माण झाली आहेत. ती प्रामुख्याने प्रवाळ व चुनखडीयुक्त आहेत. बेटांच्या अंतर्गत भागात पर्वतीय प्रदेश, तर किनाऱ्यावर सुपीक व सखल किनारपट्ट्या व पांढऱ्या रेतीच्या पुळणी आढळतात. काही बेटांवर गाळाची सुपीक जमीन आहे. काही प्रवाळद्वीपे समुद्रसपाटीपासून थोड्याच उंचीची आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गवत व तुरळक वनस्पती आढळतात.

वेस्ट इंडीज बेटे

मार्तीनीक बेटांवरील मॉंपले व सेंट व्हिन्सेंटवरील मौंट सूफ्रीएअर हे जागृत ज्वालामुखी आहेत. हिस्पॅनीओला बेटावरील पर्वतश्रेणी ही द्वीपसमूहातील सर्वाधिक उंचीची पर्वतश्रेणी आहे. डोमिनिकन प्रजासत्ताकात ती कॉर्डिलेरा सेंट्रल नावाने, तर हैतीमध्ये मासिफ डू नॉर्ड नावाने ओळखली जाते. याच श्रेणीतील पीको द्वार्ते (उंची ३,१७५ मी.) हे वेस्ट इंडीजमधील सर्वोच्च शिखर आहे.

वेस्ट इंडीजमध्ये अनेक उत्कृष्ट बंदरे आहेत. तसेच अनेक बेटांच्या किनाऱ्यांवर उपसागर व खाड्या आढळतात. बऱ्याशा बेटांवरील नद्या शीघ्रवाही आहेत. त्यांतून केवळ पडावानेच वाहतूक करता येते. प्वेर्त रीको बेटाच्या उत्तरेस असलेला प्वेर्त रीको खंदक हा जगातील सर्वाधिक खोल महासागरीय खंदकांपैकी एक आहे. तेथील मिलवॉकी गर्तेची जलपृष्ठापासूनची खोली ८,६४८ मी. आहे.

काही अपवाद वगळता वेस्ट इंडीजमध्ये खनिज संपत्ती विशेष आढळत नाही. त्रिनिदाद बेटावर खनिज तेल मिळते. दुसऱ्या महायुद्धकाळापासून बॉक्साइट उत्पादनात जमेका बेट जगात अग्रेसर आहे. प्वेर्त रीकोवर तांबे सापडले आहे. क्यूबामध्ये तांबे, निकेल, मॅंगॅनीज, क्रोमियम व लोहखनिज सापडते. डोमिनिकन प्रजासत्ताकात काही प्रमाणात बॉक्साइट मिळते.

हवामान : बहामा बेटे वगळता इतर सर्व बेटे उष्ण कटिबंधात येतात. विषुववृत्ताजवळच्या स्थानामुळे व समुद्रसान्निध्यामुळे वेस्ट इंडीज बेटांवरील हवामान उष्णकटिबंधीय सागरी स्वरूपाचे आहे. ऋतुनुसार हवामानात विशेष बदल होत नाही. हवामान उष्णकटिबंधीय असले, तरी अटलांटिक महासागर व त्यावरून वर्षभर वाहणारे ईशन्य व्यापारी वारे यांमुळे येथे उष्णतेची तीव्रता कमी होते. त्यामुळे वर्षभर येथील हवामान सौम्य असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान २७°से. तर हिवाळ्यातील तापमान २४°से. राहते. वेस्ट इंडीजमध्ये ओला व कोरडा ऋतू अशी विभागणी केली जाते. बाष्पयुक्त व्यापारी वाऱ्यांमुळे वातसन्मुख बाजूकडील बेटांवर जोरदार पर्जन्यवृष्टी होते. वर्षभर सापेक्ष आर्द्रता जास्त राहते. ऋतू व पावसाचे प्रमाण यांतही बरीच प्रादेशिक भिन्नता आढळते. 

वार्षिक सरासरी पर्जन्यमान १५०सेंमी. असून काही पर्वतीय प्रदेशांत ५००सेंमी. पर्यंत पर्जन्यवृष्टी होते. अरण्यव्याप्त डोमिनिकावर वर्षात ५१°सेंमी. पेक्षाही अधिक पाऊस पडतो. त्याच्याजवळील बार्बेडोस व अँटिग्वा बेटांवर मात्र बराच कमी (अनुक्रमे १५०व ११०सेंमी.) पाऊस पडतो. जानेवारी ते एप्रिल दरम्यान व्यापारी वारे जोराने वाहतात. त्यांचे पासून पावसाच्या सरी पडून हवेत गारवा येतो. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात व शरद ऋतूच्या पूर्वार्धात जून ते ऑक्टोबर या काळात हरिकेन वादळांचा या बेटांना वारंवार तडाखा बसतो. या वादळांबरोबर येणारा मुसळधार पाऊस व अतिशय वेगाने वाहणारे वारे यांमुळे बरीच प्राणहानी होते, तसेच पिके व घरांचे नुकसान होते. हवामान खात्याकडून वादळासंबंधी पूर्वसूचना देण्यात प्रयत्न केला जातो. त्रिनिदाद व टोबॅगो बेट मात्र हरिकेन वादळांपासून मुक्त आहेत.

वेस्ट इंडीजच्या इतिहासात व्यापारी वाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. पूर्वेकडून कॅरिबियनमध्ये येण्यासाठी तसेच कॅरिबियनमधून फ्लॉरिडा सामुद्रधुनी व इतर पॅसेजमधून उत्तरेकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत येऊन बहामा ते लिस्बन व लंडन यांदरम्यानचा अटलांटिक महासागर पार करण्याच्या दृष्टीने व्यापारी वारे फार उपयुक्त ठरत असत. या बेटांच्या वाताभिमुख बाजूवरील सॅन वॉन व हाव्हॅना ही प्रमुख बंदरे जवळजवळ भूवेष्टित आहेत. जमेकामधील पोर्ट रॉयल, हिस्पॅनीओलावरील सांतो दोमिंगो, सेंट लुसीयामधील कॅस्त्री, मार्तीनीकमधील फॉर द फ्रान्स व त्रिनिदादवरील पोर्ट ऑफ स्पेन ही वातविमुख किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे असून त्यांनी वेस्ट इंडीजच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

वनस्पती व प्राणी : पूर्वी वेस्ट इंडीज बेटांवर बरीच अरण्ये होती परंतु ऊस लागवडीसाठी आणि इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीची धूप वाढली असून जमीन निकृष्ट बनली आहे. अलीकडे अनेक देशांनी वनसंवर्धनाचे कायदे केले आहेत. बहुतांश बेटांवरील पर्वतांच्या वातसन्मुख उतारांवर उष्णकटिबंधीय दाट अरण्ये व गवत आढळते. सखल, आर्द्र भागात उष्णकटिबंधीय वर्षारण्ये आहेत. किनारी भागात कच्छ वनश्री तसेच लिंबूवर्गीय व ताडवृक्ष आढळतात. लीवर्ड बेटांवर अर्ध-पानझडी वृक्ष आहेत. ग्रेटर अँटिलीसमधील अधिक उंचीच्या प्रदेशात मध्यकटिबंधीय व उपध्रुवीय प्रकारच्या वनस्पती आढळतता. वृक्षांचे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. बांबू, सीडार, मॅहॉगनी व पाइन वृक्ष दाट जंगलमय प्रदेशात आढळतात. बोगनव्हील, हिबीस्कस, ऑर्किड व पॉइनसेटिआ इ. फुलझाडे येथे पुष्कळ आहेत.

वेस्ट इंडीज बेटांवर इग्वाना, अपॉसम, साप, वेगवेगळे सरडे, वेगवेगळ्या प्रकारचे कृंतक हे प्राणी तसेच विविध प्रकारचे पोपट, गाणारे पक्षी, आयबिस, फ्लेमिंगो, वटवाघूळ असे अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. मोठे रानटी प्राणी विशेष आढळत नाहीत. सभोवतालच्या समुद्रात टर्टल, शेलफिश, केमॅन, डॉल्फिन, रेड स्नॅपर, बोनिटो, उडणारे मासे असे विविध प्रकारचे जलचर आढळतात.


इतिहास व राजकीय स्थिती : सीबने हे वेस्ट इंडीजमधील मूळ रहिवासी आहेत. इतिहासपूर्व काळापासून ते या प्रदेशात रहात असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. इ.स.पू. सु. २०० ते इ.स. १००० या काळात दक्षिण अमेरिकेकडून आरावाक इंडियन वेस्ट इंडीज बेटांवर आले. ते प्रामुख्याने ग्रेटर अँटिलीसमध्ये स्थायिक झाले. इ. स. सु. १३०० च्या सुमारास आरावाक जमातींचा कॅरिब इंडियन या अधिक शूर जमातींशी संबंध आला. कॅरिब इंडियनांची वस्ती लेसर अँटिलीसमधील बेटांवर होती. कॅरिब लोकांनीच येथील समुद्राला कॅरिबियन असे नाव दिले. या दोन्ही गटांतील लोक शेती, मासेमारी, शिकार इ. व्यवसायही करीत होते. आरावाक लोकांचा अमेरिकेची मुख्य भूमी व आफ्रिकेशी व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळतात.

वेस्ट इंडीजमधील पहिली कायम स्वरूपी यूरोपीय वसाहत स्पॅनिशांनी १४९६ मध्ये हिस्पॅनीओला बेटावरील सांतो दोमिंगो येथे स्थापन केली. त्यानंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत बहुतेक सर्व वेस्ट इंडीज बेटांचे स्पॅनिशांनी समन्वेषण करून त्या सर्व बेटांवर स्पॅनिशांचा हक्क सांगितला. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्पॅनिशांनी क्यूबा, जमेका व प्वेर्त रीको बेटांवर वसाहतींची स्थापना केली. त्यांनी इंडियनांना गुलाम बनविले व सक्तीने त्यांना सोन्याच्या खाणींत काम करणे भाग पाडले. आजारपण, वाजवीपेक्षा जास्त कष्ट आणि निष्ठुरपणाची वागणूक यांमुळे बहुतेक सर्व इंडियन मरण पावले. वेस्ट इंडीजमधील संपत्तीविषयीची माहिती इतर यूरोपीय लोकांनाही मिळाली. इंग्लंड, फ्रान्स व नेदर्लंड्‌समधील चाचेगिरी करणाऱ्या लोकांनी स्पॅनिश जहाजे व बंदरांवर हल्ले करून त्यांची मौल्यवान संपत्ती लुटली. सतराव्या शतकात डेन, डच, इंग्रज व फ्रेंचांनी येथील लहानलहान बेटांवर आपापल्या वसाहतींची स्थापना केली. १६३०-४० या काळात डचांनी कुरासाऊँ, आरूबा, बॉनॅर, सेंट युस्टेटिअस, सेंट मार्टीन व साबा या बेटांवर हक्क सांगितला. त्याच कालावधीत ब्रिटिशांनी बार्बेडोस, नेव्हिस, अँटिग्वा व मॉंटसेरात बेटांवर, तर फ्रेंचांनी मार्तीनीक व ग्वादलूपवर आपला हक्क सांगितला. ऑलिव्हर क्रॉमवेलच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हिस्पॅनीओला जिंकण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु स्पॅनिशांच्या प्रतिकारामुळे इंग्रजांना फक्त जमेका घेता आले. १६५० च्या दशकात स्पॅनिशांच्या कॅरिबियनमधील मक्तेदारीला खिंडार पडले. १६९७ मध्ये फ्रेंचांनी हिस्पॅनीओलाच्या काही भागावर ताबा मिळविला. १६९७ ते १८१४ या कालावधीत कॅरिबियन प्रदेशातील हक्कांवरून ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांच्यात अनेक प्रकारचे तंटे निर्माण झाले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अठराव्या शतकापर्यंतच्या कालावधीत वसाहतकारांनी वेस्ट इंडीजमधील साखरउत्पादनातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळविला. त्याशिवाय निर्यातीच्या दृष्टीने तंबाखू व नीळ उत्पादनेही घेतली. येथील ऊस मळ्यामंध्ये काम करण्यासाठी लक्षावधी कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांना गुलाम म्हणून आणले.

एकोणिसाव्या शतकात अनेक बेटांवरील वसाहतवादी सत्ता दुर्बल होऊ लागल्या. ट्यूसॅं लूव्हर्टर यांच्या नेतृत्वाखाली हिस्पॅनीओला बेटावरील गुलामांनी फ्रेंच सत्तेविरुद्ध उठाव केला तेव्हा हैती हा वेस्ट इंडीजमधील पहिला देश स्वतंत्र झाला. इ. स. १८४४ मध्ये डोमिनिकन प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश म्हणून हैतीपासून वेगळा झाला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सर्व वेस्ट इंडीज बेटांवरील गुलामगिरी संपुष्टात आली. मजूरपुरवठा बंद झाल्यामुळे येथील मळेवाल्यांचे शेतातील उत्पादन बरेच घटले. १८९८ मध्ये संयुक्त संस्थानांचा वेस्ट इंडीजमधील हस्तक्षेप वाढला. त्याच वर्षी क्यूबा हा स्वतंत्र देश बनला, तर प्वेर्त रीको ही संयुक्त संस्थानांची वसाहत बनली. १९१७ मध्ये डेर्न्माकने व्हर्जिन बेटे संयुक्त संस्थानांना विकली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात क्यूबा, डोमिनिकन प्रजासत्ताक व हैतीमध्ये हुकूमशाही राजवट राहिली. १९५९ मध्ये फिडेल कास्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्यूबामध्ये क्रांती होऊन बातीस्ता याची हुकूमशाही नष्ट झाली.

वेस्ट इंडीजमधील अनेक बेटे १९४५ नंतर स्वतंत्र झाली किंवा आपल्या अंतर्गत व्यवहारात त्यांनी अधिकार प्राप्त केले. १९५० च्या दशकात पूर्वार्धात नेदर्लंड्‌स अँटिलीस व प्वेर्त रीको यांनी जवळजवळ संपूर्ण स्वयंशासन प्रस्थापित केले. अँटिग्वा, बार्बेडोस, डोमिनिका, ग्रेनेडा, जमेका, मॉंटसेरात, सेंट कीट्‌स व नेव्हिस, अँग्विला, सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट आणि त्रिनिदाद व टोबॅगो या दहा ब्रिटिश वसाहतींनी मिळून वेस्ट इंडीज फेडरेशनची स्थापना केली (१९५८). १९६२ मध्ये जमेका आणि त्रिनिदाद व टोबॅगो स्वतंत्र झाल्यानंतर फेडरेशन विसर्जित करण्यात आले. १९६६ मध्ये बार्बेडोसला स्वातंत्र्य मिळाले.

अँटिग्वा, डोमिनिका, ग्रेनेडा, सेंट कीट्‌स – नेव्हिस – अँग्विला, सेंट लुसीया व सेंट व्हिन्सेंट ही बेटे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात ग्रेट ब्रिटनची सहयोगी राज्ये बनली. या सहा राज्यांना वेस्ट इंडीज असोसिएटेड स्टेट्‌स म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७३ मध्ये बहामा बेटे, १९७४ मध्ये ग्रेनेडा, १९७८ मध्ये डोमिनिका, १९७९ मध्ये सेंट लुसीया व सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्झ बेटे स्वतंत्र झाली. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीसच वेस्ट इंडीज असोसिएटेड स्टेट्‌समधील सेंट कीट्‌स – नेव्हिस – अँग्विला वगळता बाकी सर्व राज्ये स्वतंत्र राष्ट्रे बनली. १९८१ मध्ये अँटिग्वा व बारबूडा स्वतंत्र झाली. १९८० मध्ये सेंट कीट्‌स – नेव्हिस – अँग्विलामधून अँग्विला अधिकृतपणे बाहेर पडून ब्रिटनचा स्वतंत्र अवलंबी प्रदेश बनला तर उर्वरित सेंट कीट्‌स – नेव्हिस हे ब्रिटनचे सहयोगी राज्य म्हणून राहिले. १९८३ मध्ये सेंट कीट्‌स व नेव्हिस बेटे स्वतंत्र झाली. वेस्ट इंडीजमधील बहुतेक सर्व देश राष्ट्रकुलाचे सभासद आहेत.

ऑगस्ट १९९९ मध्ये वेस्ट इंडीजमधील बहुतांश बेटे स्वतंत्र देश म्हणून अत्सित्त्वात होती. उर्वरित बेटे ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्‌स, फ्रान्स किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचे सहयोगी प्रदेश किंवा त्यांच्या सत्तेखाली आहेत. अँग्विला, मॉंटसेरात (दोन्ही लीवर्ड बेटे), बर्म्यूडा, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, केमॅन बेटे, टूर्क्स आणि कायकोस बेटे ही सर्व ब्रिटनच्या सत्तेखाली येतात. आरुबा, कुरासाऊँ, बॉनॅर, सिंट युस्टेशस, साबा ही बेटे व सिंट मार्टन बेटाचा दक्षिण भाग या बेटांवर नेदर्लंड्‌सचा अंमल आहे. ग्वादलूप व त्याची अंकित बेटे आणि मार्तीनीक बेटे यांवर फ्रान्सची सत्ता असून व्हर्जिन आयलंड्‌स ऑफ युनायटेड स्टेट्‌स ही संयुक्त संस्थानांच्या आधिपत्याखाली असणारी बेटे आहेत. प्वेर्त रीको हा स्वयंशासित, परंतु संयुक्त संस्थानांचा स्वतंत्र सहयोगी प्रदेश आहे. मार्गारेट बेट व्हेनेझुएलाच्या ताब्यात आहे.

आर्थिक स्थिती : शेती हा वेस्ट इंडीजमधील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून एकूण कामकरी लोकांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेती व्यवसायात गुंतले आहेत. सुमारे ३० टक्के लोक शासकीय सेवा, पर्यटन व इतर सेवाव्यवसायांत तर उर्वरित लोकांपैकी सर्वाधिक लोक कारखानदारी, खाणकाम व मासेमारी व्यवसायांत गुंतले आहेत. ऊस हे वेस्ट इंडीज बेटांवरील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने निर्यातीच्या दृष्टीने विस्तृत क्षेत्रातून ऊसाचे उत्पादन घेतले जाते. उसाबरोबरच केळी, लिंबूवर्गीय फळे, कॉफी, कोको, कापूस, तंबाखू व मसाल्याचे पदार्थ ही निर्यातीसाठी घेतली जाणारी प्रमुख पिके आहेत. कोबी, गाजर, रताळी, टोमॅटो, कसावा, द्विदल धान्ये, मका व इतर अन्नधान्याची पिके सर्वत्र घेतली जातात. लहानलहान बेटांवरील तीव्र पर्वतउतारांवरील शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांतूनही पिके घेतली जातात. अनेक बेटांवर तेथील लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उत्पादन होत नसल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. उसाची प्रथम लागवड बार्बेडोसमध्ये करण्यात आली. त्यानंतर इतर बेटांवर त्याचा प्रसार झाला. काही बेटे विशिष्ट पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी ग्रेनेडा जायफळासाठी, सेंट व्हिन्सेंट आरारूटसाठी, डोमिनिका व्हॅनिलासाठी, मॉंटसेरात व अँटिग्वा कापसासाठी, त्रिनिदाद कोकोसाठी व जमेका पिमेंटो (जमेका मिरी) उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आज अनेक बेटांवर शेतीशिवाय कारखानदारी व व्यापारातही वाढ झालेली आहे.

वेस्ट इंडीजच्या सभोवतालच्या सागरी भागात बोनिटो, शार्क, टूना तसेच क्लॅम, खेकडे, शेवंडे व यांसारखे कवचधारी जलचर आढळतात. पकडलेले बहुतेक सर्व जलचर स्थानिक बाजारपेठेतच विकले जातात.

वेस्ट इंडीज बेटांवर खनिजसंपत्ती विशेष आढळत नाही. कुरासाऊँ व आरूबा बेटांवर खनिज तेलसाठे आहेत. त्रिनिदादमध्ये डांबर व खनिज तेल सापडते. बॉक्साइट उत्पादनात जमेकाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. क्यूबा बेटावर लोहखनिज व निकेलचे साठे आहेत. खनिजांवर प्रक्रिया करणारे कारखाने वेस्ट इंडीजमध्ये स्थापन झालेले आहेत. कुरासाऊँ आरूबा व त्रिनिदाद बेटांवर खनिज तेलशुद्धीकरण कारखाने आहेत. १९३० च्या दशकातील आर्थिक मंदीमुळे वेस्ट इंडीजमधील नवीन कारखानदारी व व्यापारी विकास रोखला गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर प्वेर्त रीकोने आर्थिक नियोजन कार्यक्रमांद्वारे अनेक कारखान्यांची स्थापना केली. जमेका, त्रिनिदाद, मार्तीनीक व अँटिग्वा या बेटांनीही आपापल्या औद्योगिक विकासकार्यक्रमांचे नियोजन करून विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मूलभूत भांडवली वस्तूंची आयात करून अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. १९६० च्या दशकाच्या अखेरीपासून वेस्ट इंडीजची काही अंशी भरभराट होऊ लागली. उत्तर अमेरिकेतील समृद्ध बाजारपेठेचा प्वेर्त रीकोतील उद्योगधंद्यांना जो फायदा मिळाला आहे, तो वेस्ट इंडीजमधील इतर बेटांना मिळालेला नाही. जमेका, बार्बेडोस, त्रिनिदाद व टोबॅगो, प्वेर्त रीको व नेदर्लंड्‌स अँटिलीसमधील लोकांनी खाणकाम उद्योगांचा विकास केलेला आहे. तरीही एकूण अर्थव्यवस्थेत कारखानदारी व्यवसायाचे प्रमाण फारच कमी आहे.

कारखानदारीला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने काही उद्योगांना आयकरात तात्पुरती सवलत, कारखानदारी यंत्रसामुग्री व विशिष्ट कच्च्या मालाच्या आयातीवर जकात – सवलत देण्यात येते. खाद्यपदार्थ, लाकडी सामान, सिमेंट, काच, कापड, साबण, साखर-प्रक्रिया, औषधे, मीठ, विद्युत्‌ उपकरणांचे सुटे भाग, रम व मळी निर्मिती इ. उद्योगधंदे काही बेटांवर स्थापन झालेले आहेत. औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी कॅरिबियन देशांनी मिळून काही आर्थिक संघटनांची स्थापना केली. वेस्ट इंडीजमधील औद्योगिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १९६८ मध्ये बारा देशांनी मिळून ‘कॅरिबियन फ्री ट्रेड एरिया’ या संघनेची स्थापना केली. त्यातील बार्बेडोस, गुयाना, जमेका आणि त्रिनिदाद व टोबॅगो या चार देशांनी इंग्रजी भाषिक देशांदरम्यान परस्परसहकार्य व व्यापारवृद्धीसाठी ‘कॅरिबियन कम्युनिस्ट अँड कॉमन मार्केट’ या जकात संघाची स्थापना केली (१९७३). या संघातील देशांदरम्यान खुला व्यापार असून संघाबाहेरील देशांत उत्पादित होणाऱ्या मालावर समान जकातदराची तरतूद आहे. या संघात कॅरिबियन फ्री ट्रेड एरिया संघटनेतील उर्वरित सर्व देश १९७५ मध्ये सामील झाले. आफ्रिकन, कॅरिबियन व पॅसिफिक राज्यांच्या गटांनी मिळून १९७५ चा ‘लोमे कन्व्हेन्शन’ हा यूरोपीयन इकॉनॉमिक कम्युनिटीबरोबरचा सवलतीच्या जकातीचा करार केला आहे. १९६९ मध्ये कॅरिबियन रिजनल डेव्हलपमेंट बॅंकेची स्थापना करण्यात आली. ही बॅंक उद्योगाच्या स्थापनेसाठी कर्ज देते. कॅरिकॉम व इतर प्रादेशिक आर्थिक संघटनासुद्धा औद्योगिक विकासाचा प्रयत्न करीत आहेत. संयुक्त संस्थानांच्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक विकासात तुलनेने प्वेर्त रीको अधिक यशस्वी झाला आहे. ब्रिटन किंवा उत्तर अमेरिकेत गेलेल्या वेस्ट इंडियन लोकांकडून स्वदेशी येणारा पैसा हा काही बेटांवरील लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात उत्तर अमेरिका व यूरोपीय देशांची जी भरभराट झाली, तिचा वेगवेगळ्या माध्यमांतून वेस्ट इंडीज बेटांना फायदा झाला. युद्धोत्तर काळात सर्वत्र वेस्ट इंडीज बेटांना पर्यटन व्यवसायाचा फायदा मिळू लागला. आज पर्यटन हा शेती व्यवसायानंतर दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय बनला आहे. दरवर्षी आठ दशलक्षपेक्षा अधिक पर्यटक या बेटांना भेटी देतात. पर्यटन व्यवसायामुळे कारखानदारी व व्यापारी विकासाला उत्तेजन मिळाले.

क्यूबाची केंद्रीय योजनाबद्ध अर्थव्यवस्था वगळता इतरत्र प्रामुख्याने मुक्त अर्थव्यवस्था आहे. या प्रदेशाची अर्थव्यवस्था काही वस्तूंच्या, सामान्यपणे कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. परिणामत: परदेशातील आर्थिक घडामोडींचे पडसाद या बेटांच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. वेस्ट इंडीजच्या अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी व प्रामुख्याने निर्मितीउद्योगांच्या विकासासाठी संयुक्त संस्थांनांनी १९८४ मध्ये ‘कॅरिबियन बेसिन इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमाला सुरुवात केली. या योजनेनुसार वेस्ट इंडीजमधील विविध उत्पादने विना-जकात संयुक्त संस्थानांच्या बाजारपेठेत नेता येतात.

वेस्ट इंडीजमधील केळी, खनिज तेलउत्पादने, रम, कोको, मसाल्याचे पदार्थ, साखर या प्रमुख उत्पादनांची निर्यात केली जाते. मोटारगाड्या, यंत्रे, अन्नपदार्थ व कच्चा मालाची वेस्ट इंडीजमध्ये आयात केली जाते. मुख्य व्यापार कॅनडा, ग्रेट ब्रिटन व संयुक्त संस्थानांशी चालतो.

वेस्ट इंडीजमधील प्रमुख शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. प्रादेशिक हवाईमार्गांनी लहानलहान बेटेही एकमेकांशी जोडली आहेत. जगभरातील माल व प्रवासी वाहतूक करणारी जहाजे येथील बंदरात येत असतात. अनेक बेटांवरील फरसबंदी रस्त्यांनी महत्त्वाची शहरे ग्रामीण भागांशी जोडलेली आहेत. या बेटांसाठी संयुक्त संस्थाने व यूरोपीय देश उपग्रहांद्वारे आकाशवाणी व दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रसारित करतात. बहुतांश बेटांवरून किमान एक दैनिक वृत्तपत्र निघते.

लोक व समाजजीवन : वेस्ट इंडीजमधील एकूण लोकसंख्येपैकी सु. ७० टक्के लोक क्यूबा, डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती या बेटांवर राहतात. क्यूबा बेटावर एकूण लोकसंख्येपैकी सु. एक तृतीयांश लोक राहतात. संपूर्ण प्रदेशातील सु. ४० टक्के लोक ग्रामीण भागात तर सु. ६० टक्के लोक नागरी भागात राहतात. वेस्ट इंडीजमधील मूळ रहिवासी तर काही शतकांपूर्वीच नामशेष झालेले आहेत. केवळ कॅरिब इंडियन जमातीचे काही लोक असून तेही डोमिनिकावरील एकाकी अशा पर्वतीय प्रदेशात राहतात. आज वेस्ट इंडीजमध्ये विभिन्न वंशाच्या लोकांचे मिश्रण आढळते. तसेच वेगवेगळ्या बेटांवरील वांशिक रचनेतही भिन्नता आढळते. बहुसंख्य लोक आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्या कृष्णवंशीय लोकांचे वंशज आहेत. बाकीचे लोक ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश या वसाहतवाल्यांचे वंशज किंवा आफ्रिकी व यूरोपीय यांच्या संकरातून निर्माण झालेले मिश्रवंशीय आहेत. सु. ६० टक्के लोक कृष्णवर्णीय आफ्रिकी किंवा मिश्र वांशिक गटांचे वारस, ३५ टक्के यूरोपीय वांशिक गटांचे, तर ५ टक्के आशियाई वांशिक गटांचे आहेत (१९८३ अंदाज).

वेस्ट इंडीजमधील गुलामगिरी संपुष्टात आल्यानंतर जगातील वेगवेगळ्या प्रदेशांतून ५ ते १० वर्षांच्या करारावर येथे कामगार आणण्यात आले. त्यांत चिनी लोकांबरोबरच मादीरा बेटांवरून पोर्तुगीज व कानेरी बेटांवरून स्पॅनिश लोक येथे आले.

भारतासारख्या देशांतून हजारो लोक वेस्ट इंडीजमध्ये व प्रामुख्याने लेसर अँटिलीसमध्ये कामगार म्हणून गेले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत ही प्रक्रिया चालू होती. त्यांचे वंशज जमेका, मार्तीनीक, ग्वादलूप व त्रिनिदाद बेटांवर अधिक प्रमाणात आढळतात. अनेक उच्च पदांवर भारतीय वंशाचे लोक दिसतात. एकोणिसाव्या शतकात क्यूबा व जमेका येथे आलेल्या चिनी लोकांचा, सुरुवातीला रस्ते -निर्मितीस व नंतर ऊस तोडणीसाठी वापर करण्यात आला. जमेकाच्या एकूण लोकसंख्येत ७८% कृष्णवर्णीय, १७% मुलॅटो, १% श्वेतवर्णीय, १%चिनी व ३% ईस्ट इंडियन व इतर लोक आहेत. क्यूबा, डोमिनिकन प्रजासत्ताक व प्वेर्त रीकोमधील बहुसंख्य स्पॅनिशांचे वारस आहेत. त्यांपैकी क्यूबा व प्वेर्त रीकोवर ७० टक्के लोक श्वेतवर्णीय आहेत. आरूबा व कुरासाऊँ या बेटांवर भिन्न वंशीय लोकवस्ती असली, तरी डच लोकांचे आधिक्य आहे. हिस्पॅनीओला बेटाच्या पश्चिमेकडील हैतीमध्ये कृष्णवर्णीय बहुसंख्य आहेत, तर पूर्वेकडील डोमिनिकन प्रजासत्ताकात मिश्रवंशीय लोक आढळतात.

वेस्ट इंडीजमधील बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. स्पॅनिश व फ्रेंच भाषिक बेटांवर रोमन कॅथलिकांचे प्रमाण अधिक आहे. इंग्लिश व डच भाषिक बेटांवर कॅथलिक व प्रोटेस्टंटपंथीय लोकांचे मिश्रण आढळते. त्याशिवाय हिंदू, ज्यू व मुस्लिम लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. वेगवेगळ्या बेटांवरील अनेक लोक आफ्रिकन धार्मिक परंपरा पाळतात. अनेक बेटांवर वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मप्रमाण व मृत्युप्रमाणात घट झाली. प्वेर्त रीकोवरील लोकांनी संयुक्त संस्थानांकडे, तर इंग्लिश भाषिक बेटांवरील लोकांनी ब्रिटनकडे केलेल्या स्थलांतरामुळे लोकसंख्यावाढीचे प्रमाण बरेच कमी झाले. अशा स्थलांतरामुळे सेंट कीट्‌स बेटावरील लोकसंख्या वाढीचा दर निम्म्याने तर जमेका, बार्बेडोस व अँटिग्वा बेटांवरील वाढीचा दर एक तृतीयांशाने खाली आला. १९६२ मध्ये वेस्ट इंडियनांच्या ब्रिटनकडे होणाऱ्या स्थलांतराला ब्रिटनने मर्यादा घातल्या. तसेच १९६५ मध्ये संयुक्त संस्थानांनी पहिल्यांदा पश्चिम गोलार्धातील देशांकडून होणाऱ्या स्थलांतरावर निर्बंध घातले. मृत्युप्रमाणही (विशेषत: बालमृत्युप्रमाण) घटत राहिले. बाहेरच्या देशांकडे होणारे स्थलांतर घटले व तुलनेने जन्मप्रमाण अधिक राहिले. त्यामुळे येथील लोकसंख्या वेगाने वाढू लागली. त्यासाठी शासनाने कुटुंबनियोजनाचे कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही बेटांवरील जन्मदर कमी झाला. बहुतेक बेटांवर आरोग्य, शिक्षण व निवासादी सामाजिक सेवांवर फार मोठा खर्च करावा लागत आहेत. बेटाबेटांवरील लोकसंख्येच्या घनतेत भिन्नता आढळते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला क्यूबामध्ये ८७, डोमिनिका बेटावर ११६, डोमिनिकन प्रजासत्ताकात १३१, हैतीमध्ये २२६ तर बार्बेडोसमध्ये ५९६ होती (१९८३).

वेस्ट इंडीजमधील जवळजवळ निम्मे लोक शेतकरी आहेत. शिवाय सधन लोकांच्या ऊस व कॉफी मळ्यांत अनेकजण काम करतात. परंतु काही लोक आपल्या मालकीच्या किंवा भाडेपट्ट्याने घेतलेल्या लहानलहान जमिनीच्या तुकड्यांत शेती व पशुपालन व्यवसाय करतात ग्रामीण भागातील बरेच लोक एक किंवा दोन खोल्यांच्या झोपड्यांत राहतात, तर सधन शेतकरी लाकूड किंवा कॉंक्रीटपासून बनविलेल्या कौलारू किंवा सिमेंटच्या सुंदर व प्रशस्त घरात राहतात. वेस्ट इंडीजमधील बहुतेक प्रमुख शहरे किनारी प्रदेशात वसली आहेत. नागरी केंद्रांमधील अनेक लोक हॉटेल किंवा पर्यटन उद्योगाशी निगडित व्यवसायांत तसेच कारखाने, दुकाने किंवा प्रशासकीय सेवेत काम करतात. अनेक श्रीमंत लोकांनी आपली सुंदर घरे समुद्रकिनाऱ्यावरील टेकड्यांच्या उतारांवर बांधलेली आढळतात. पोशाखाच्या बाबतीत वेस्ट इंडीजमधील लोक अत्यंत जागरूक असतात. बहुतांश वेस्ट इंडियन लोकांच्या आहारात भात, मासे, रताळी, खेकडे, कडधान्ये, उष्णकटिबंधीय फळे (उदा., केळी, आंबा, संत्रे) यांचा समावेश असतो.


भाषा व साहित्य : वेस्ट इंडीजमध्ये अनेक भाषा व बोली बोलल्या जातात. त्यांमधून यूरोपीयांचा सांस्कृतिक प्रभाव प्रतिबिंबित होतो. क्यूबा, डोमिनिकन प्रजासत्ताक व प्वेर्त रीकोवरील बहुतांश लोक स्पॅनिश भाषा बोलतात. आरूबा व नेदर्लंड्‌स अँटिलीसमध्ये डच ही प्रमुख भाषा तर हैती, ग्वादलूप व मार्तीनीक बेटांवर फ्रेंच ही अधिकृत भाषा आहे. क्रीओल ही अनेकांची सामान्य भाषा झाली आहे. क्रीओल ही वेगवेगळ्या भाषांच्या मिश्रणातून निर्माण झालेली भाषा असून तिचे वेगवेगळे प्रकार आहेत. आफ्रिकन व मुख्यत: इंग्लिश व फ्रेंच शब्दांच्या मिश्रणातून निर्माण झालेली पॅट्‌वा ही बोली अनेक वेस्ट इंडियन लोक बोलतात. डच, इंग्लिश, पोर्तुगीज व स्पॅनिश भाषांच्या मिश्रणातून निर्माण झालेली पॅपियामेन्टो बोली प्रामुख्याने आरूबा व नेदर्लंड्‌स अँटिलीसमध्ये अधिक आढळते. कुरासाऊँवरील लोक डच, इंग्लिश व स्पॅनिश भाषा उत्तम रीतीने बोलत असले, तरी प्रामुख्याने ते पॅपियामेन्टो भाषेचा अधिक वापर करतात. ब्रिटिश वसाहती असणाऱ्या प्रदेशात इंग्रजी महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात इंग्रजीचा प्रसार वाढत आहे.

कवी एम. सेझर (मार्तीनीक), जीन प्राइस मार्स (हैती), होसे मार्ती, होसे हेरेदिया, लेखक व मानवशास्त्रज्ञ फर्नांदो ऑर्टीस व कादंबरीकार आलेजो कार्‌पेंटर (क्यूबा), व्ही. एस. नाय्‌पॉल (त्रिनिदाद) व जॉर्ज लेमिंग (बार्बेडोस), लघुकथालेखक ह्वान बॉस (डोमिनिकन प्रजासत्ताक) व जॉन हर्न (जमेका) ह्या वेस्ट इंडीजमधील साहित्य – क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत. यांशिवाय कास्तेल्यानोस, ट्रेलेस इ. लेखक व आंजेलो, वाल्डारामा, मेलेरो, मारेल (क्यूबा) हे चित्रकार उल्लेखनीय आहेत. होसे मार्ती याने वयाच्या पंधराव्या वर्षी अनेक कविता रचल्या. सोळाव्या वर्षी लिहिलेली अबदाली ही नाट्यरूप कविता त्यातील आशयामुळे खूपच गाजली. त्याच्या इतरही काही कविता विशेष लोकप्रिय ठरल्या. व्ही. एस्‌. नायपॉल या प्रसिद्ध साहित्यिकाला १९९३ मध्ये डेव्हिड कोहेन हे साहित्य पारितोषिक व २००२ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.

समृद्ध ग्रंथालये हा वेस्ट इंडीजचा एक फार मोठा सांस्कृतिक ठेवा असून `त्रिनिदाद पब्लिक लायब्ररी’, ‘द कार्नेजी फ्री लायब्ररी’ ही सार्वजनिक ग्रंथालये प्रसिद्ध आहेत. द बार्बेडोस म्यूझीअम अँड हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये चित्रपत्रिका, प्रतिकृती आणि कलाकृतींच्या विविध नमुन्यांप्रमाणे अनेक मौलिक ग्रंथही आहेत. ‘प्रिमिओ कॅसा द ला अमेरिकाज’ ही ग्रंथोत्तेजक सांस्कृतिक संस्था महत्त्वाचे कार्य करीत आहे.

नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्रे शासकीय व्यवस्थेप्रमाणे चालविली जातात. वेस्ट इंडीजमधून अनेक दैनिके व नियतकालिके निघतात.

शिक्षण : यूरोपीयांच्या संस्कारांमुळे आरंभापासून वेस्ट इंडीजमध्ये शिक्षणाच्या प्रसाराला चालना मिळाली. सांतो दोमिंगो (डोमिनिकन प्रजासत्ताक) येथे वेस्ट इंडीजमधील पहिल्या विश्वविद्यालयाची स्थापना झाली (इ. स . १५३८). येथे १९७० अखेर साक्षरतेचे प्रमाण ९५% होते. ६ ते १५ वयोगटातील मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आहे. अनेक धार्मिक संस्थांनी चालविलेल्या खाजगी शाळांतून दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक बेटांवर तांत्रिक शिक्षणाच्या सोयी आहेत. जमेका, त्रिनिदाद व टोबॅगो इ. बेटांवर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडीजच्या मोठ्या शिक्षणशाखा आहेत.

कला, क्रीडा व मनोरंजन : वेस्ट इंडीजमधील वेगवेगळ्या देशांत व बेटांवर कुलपरंपरा व भाषा यांमध्ये भिन्नता आढळत असली, तरी नृत्य, गायन, वादन, खेळ, मनोरंजन, सण, समारंभ इ. सांस्कृतिक घटकांमध्ये साम्य आढळते. या सांस्कृतिक जीवनपद्धतीवर आफ्रिकी, अमेरिकी इंडियन, यूरोपीय व काही प्रमाणात आशियाई सांस्कृतिक जीवनपद्धतीचा परिणाम झालेला दिसतो. संगीत हे मनोरंजनाचे प्रमुख क्षेत्र आहे. बहुतांश लोक पारंपरिक गीते व नृत्ये यांत भाग घेतात. येथे वाद्यवादनही लोकप्रिय आहे.

कॅलिप्सो व रूम्बा हे वेस्ट इंडीजमधील लोकप्रिय संगीतप्रकार आहेत. याशिवाय सोन, ग्वाराचा, बोलेरो, कॉंगा, डान्सॉन, चा-चा-चा हे संगीतप्रकार येथे प्रचारात आहेत. लोकप्रिय संगीत रचनाकार म्हणून अर्नेस्ट लेक्युओना, पाब्लो मीलानेसी व सील्व्ह्यो रॉद्रीगेस हे प्रसिद्ध आहेत. आलीद्या ऑलॉन्सोने राष्ट्रीय बॅलेची स्थापना करून बॅले प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. नृत्यप्रकारांमध्ये रूम्बाचे वैशिष्ट्य पाश्चात्य देशांतील रसिकांनाही आकृष्ट करणारे ठरले. नवे वर्ष आणि फेब्रुवारीतील कार्निव्हलमध्ये नृत्याला प्राधान्य असते. एलिनिस कॅटो व कॅन्युट कॅलिस्टे हे येथील जगप्रसिद्ध चित्रकार असून, त्यांनी काढलेली, विशेषत: आदिमानवाची, चित्रे प्रसिद्ध आहेत. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ जमेका’ या संस्थेतर्फे दरवर्षी येथील चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते.

वेस्ट इंडीजमध्ये पारंपरिक धर्तीवरची नाटके कित्येक वर्षांपासून होत होती. नॅशनल शिएटरच्या निर्मितीनंतर ज्वलंत सामाजिक विषयांवरील नाटके प्रयोगरूपाने येत आहेत. १९७६ पासून वेस्ट इंडीजमध्ये रंगभूमीच्या विकासाची सुविहीत आखणी केली गेली. वेस्ट इंडीजमध्ये उत्कृष्ट दर्जाचे अनुबोधपट निघाले आहेत. १९५९ मध्ये क्यूबन इन्स्टिटयूट ऑफ सिनिमॅटोग्राफिक अँड इंडस्ट्रीची स्थापना झाल्यापासून इतर व्यावसायिक चित्रपटही निघू लागले आहेत. या संस्थेच्या चार्ली चॅप्लिन थिएटरमध्ये देशी चित्रपटांप्रमाणेच जगातील निवडक, उतकृष्ट चित्रपट दाखविले जातात. या संस्थेतर्फे दरवर्षी चित्रपट-दूरचित्रवाणी महोत्सव भरविला जातो. लॅटिन अमेरिकेतील हा सर्वांत मोठा महोत्सव मानला जातो.

क्रिकेट, बास्केटबॉल, बेसबॉल, सॉकर, मुष्टियुद्ध, व्यायामी खेळ हे वेस्ट इंडीजमधील लोकप्रिय खेळ आहेत. पूर्वी कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा खेळ खूप लोकप्रिय होता. परंतु आता तेथील सरकारने या खेळावर बंदी घातली आहे. जमेका येथील सबीना पार्कवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे सामने होतात. येथील वॉलकॉट, गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, फ्रॅंक वॉरेल इ. क्रिकेटपटूंनी या खेळात जागतिक कीर्ती मिळवलेली आहे. सोनी रामाधीन, रोहन कन्हाय, चंदरपॉल असे मूळ भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटपटू वेस्ट इंडीजच्या संघातून खेळतात. टूर्क्स आणि कायकोस बेटांवर जलक्रीडा हा मनोरंजनाचा प्रकार आहे. नेदर्लंड्‌स अँटिलीसच्या सागरी किनारऱ्यावर दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘द बॉनॅर इंटरनॅशनल सेलिंग रिगाटा’ ही शीडजहाज शर्यतींची जत्रा भरते.

महत्त्वाची स्थळे : वेस्ट इंडीजमधील राजधानीची शहरे अशी : सेंट जॉन्स (लोकसंख्या–३०,०००–१९९५–अँटिग्वा व बारबूडा), नॅसॉ (१,७८,०००–१९९६–बहामा), ब्रिजटाउन (६,७२०–१९९०–बार्बेडोस), हाव्हॅना (२१,२४,०००–१९९१–क्यूबा), रोझो (१५,८५३ –१९९१–डोमिनिका), सांतो दोमिंगो (२०,५५,०००–१९९१–डोमिनिकन प्रजासत्ताक), सेंट जॉर्जेस (३५,७४२–१९९५–ग्रेनेडा), पोर्त–ओ–प्रिन्स (१२,५५,०७८–१९९२–हैती), किंग्स्टन (महानगरीय ५,८७,७९८–१९९१–जमेका), बासटेर (१२,६०५–१९९४–सेंट कीट्‌स व नेव्हिस), कॅस्त्री (५३,८८३–१९९२–सेंट लूसीया), किंग्स्टाउन (२६,२२३–१९९१–सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ), पोर्ट ऑफ स्पेन (५८,४००–१९९० –त्रिनिदाद व टोबॅगो). अवलंबी प्रदेशांच्या राजधान्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत : द व्हॅली (५९५–१९९२–अँग्विला), ओरान्यस्टाट (२०,०४६–१९९१–आरुबा), जॉर्जटाउन (१२,९२१–१९८९– केमॅन बेटे), बास तेअर (१४,००३–१९९० ग्वादलूप), फॉर द फ्रान्स (१,०१,५४०–१९९०–मार्तीनीक बेटे), प्लीमथ (१,४७८ – १९८०–मॉंट्सेरात), व्हिलेमस्टाट (५०,००० – १९७० – नेदरलॅंड्स अँटिलीस), सॅन वॉन (४,३७,७४५ – १९९० – प्वेर्त रीको), ग्रॅंड टूर्क (३,७६१–१९९०–टूर्क्स व कायकोस बेटे), शार्लट अमाल्या (१२,३३१–१९९०–सं. सं. ची व्हर्जिन बेटे), रोड टाउन (७,९७४–२०००–ब्रिटिश व्हर्जिन बेटे). वेस्ट इंडीजमधील बेटांच्या किनाऱ्यांवरील विस्तृत पुळणी पर्यटकांची प्रमुख आकर्षण केंद्रे आहेत.

चौधरी, वसंत