पिनँग : मलेशियाच्या पिनँग राज्याच्या राजधानीचे ठिकाण व एक खुले बंदर. जॉर्ज टाउन याही नावाने हे ओळखले जात असले, तरी प्रामुख्याने शहरातील व्यापारपेठेलाच उद्देशून ते वापरले जाते. हे मलेशियाच्या मुख्य भूमीपासून वायव्येस पाच किमी. वर असलेल्या पिनँग या डोंगराळ बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर वसले आहे. हे मलेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहरअसून, त्याची लोकसंख्या २,७०,३७८ उपनगरांसह ३,३२,१२८ (१९७०) आहे. १७८६मध्ये केडाहच्या सुलतानाकडून पिनँग बेट ब्रिटीश ईस्टइंडिया कंपनीच्या ताब्यात आले. तत्कालीन भारत–चीन समुद्रमार्गावर या बेटाचे लष्करी व व्यापारी महत्त्व ओळखून ब्रिटीश कॅ. फ्रान्सिस लाइट याने तेथे या शहराची उभारणीकेली. दक्षिणेकडील उथळ समद्रमार्ग टाळण्यासाठी सामान्यपणे पिनँग सामुद्रधुनीतूनच जहाज वाहतूक अधिक होते. हे शहर या सामुद्रधुनीच्या उत्तर टोकाशी वसलेले असल्याने साहजिकच त्याचे महत्त्व वाढले. पुढे सिंगापूरच्या विकासानंतर पिनँगचे लष्करी व व्यापारी महत्त्व कमी झाले. सिंगापूर–बँकॉक रस्ता व लोहमार्ग यांचा फाटा पिनँगला जात असून सामुद्रधुनीपलीकडे मलेशियाच्या मुख्य भूमीवरील प्राईव बटरवर्थशी फेरी वाहतूक चालते. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. येथे चिनी व्यापाऱ्याची संख्या अधिक असून त्यांखालोखाल भारतीय व मलायी व्यापारी आढळतात. १९६७ मध्ये येथे वांशिक दंगल उसळली होती.

मलायी लोकांची वैशिष्ट्यपूर्ण झोपडी, पिनँग.

कथिल-प्रगलन, साबणकारखाने, भात सडण्याच्या व खोबरेल तेलाच्या गिरण्या, वेताच्या व बांबूच्या वस्तूंची निर्मिती  इ. उद्योगधंदे येथे चालतात. आसमंतात रबर, नारळ, ऊस, अननस, मसाल्याचे पदार्थ यांचे उत्पादन होते. या बंदरातून मुख्यत: कथिल, रबर, सुपारी, खोबरे व खोबऱ्याचे तेल, मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात केली जाते. येथे शंभरांवर पॅगोडे व मंदिरे असून त्यांतील प्रसिद्ध सर्पमंदिरात जिवंत साप सोडलेले आहेत. येथील सेंट जॉर्ज चर्च (१८१७), कॉर्नवॉलिस किल्ला या वसाहतकालीन वास्तू आणि १०,००० बुद्धमूर्ती असलेला बॅन हूड पॅगोडा इ. प्रेक्षणीय आहेत. येथे पिनँग विद्यापीठ असून पश्चिमेस ६·५ किमी. वरील निसर्गरम्य पिनँग टेकडी (८३०मी.) पर्यटनकेंद्र म्हणून उल्लेखनीय आहे.

चौधरी, वसंत