माथेरान येथील एक कढामाथेरान : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध गिरिस्थान. लोकसंख्या ३,९२० (१९८१). मुंबईच्या पूर्वेस सु.५० किमी., समुद्रसपाटीपासून ७५० मी. उंचीवर हे एका रुंद ⇨ मेसावर वसलेले आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरील नेरळ या प्रस्थानकापासून अरुंदमापी लोहमार्गाने माथेरानला जाता येते. नेरळ-माथेरान हे लोहमार्ग अंतर २१ किमी. आहे नेरळहून माथेरानपर्यंत मोटारीकरिता रस्ता असला, तरी मोटारींना माथेरान गावात प्रवेशबंदी आहे. मुंबई–पुणे राष्ट्रीय हमरस्त्यावरील चौक येथून पाऊलवाटेनेही माथेरानला जाता येते. हौशी प्रवासी व गिर्यारोहक नेरळहून जवळच्या मार्गाने (११ किमी.) माथेरानला पायी जातात.

या प्रदेशाच्या माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले असे म्हणतात. धनगरांचे आद्य मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) हे नाव रूढ झाले, अशी येथील धनगर समाजाची समजूत आहे.

मे १८५० मध्ये मुंबई नागरी सेवेतील ह्यू मॅलेट या अधिकाऱ्याने प्रथम या स्थानाला भेट दिली व याचे गिरिस्थान म्हणून महत्त्व ओळखले. लॉर्ड एल्‌फिन्स्टन याने १८५४ मध्ये तेथे एक बंगलाही बांधला. तेव्हापासून या गिरिस्थानाकडे अधिकाधिक लोक आकृष्ट होऊ लागले. येथील सृष्टिसौंदर्याने मोहित होऊन सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधणीचे श्रेय त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन याच्याकडे जाते. १९०५ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. माथेरानच्या परिसरात धनगर, ठाकूर व कातकरी या लोकांचे वास्तव्य आहे.

माथेरान गिरिस्थानाच्या माथ्याचा विस्तार २०·७ चौ. किमी. असून याच्या दोन अंगांना दोन कटक आहेत. मेसाच्या कडांच्या बाजूला अनेक सौंदर्यस्थळे (पॉइंट्स) असून हार्ट, पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉर्क्युपाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल इ. ठिकाणे प्रसिद्ध आहेत. येथे शार्लट सरोवर तसेच इतर अकरा झरे असून त्यांपैकी हॅरिसन व मॅलेट हे उल्लेखनीय आहेत. येथे मारुती, राम तसेच पिसारनाथ यांची मंदिरे आहेत.

माथेरान वेगवेगळ्या टोकांवरून हिरवीगार वनश्री व परिसर यांचे विहंगम दृश्य दिसते. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, मोहक सृष्टिसौंदर्य व मुंबईचे सान्निध्य यांमुळे या थंड हवेच्या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेले, निवासगृहे, उपहारगृहे व भोजनालये, बाजार, उद्याने इ. सोयी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे येथे एक विश्रामगृह आहे. गावात रुग्णालय, दवाखाने, शाळा यांसारख्या नागरी सुविधाही आहेत. पर्यटकांचा हंगाम जवळजवळ वर्षभर, विशेषतः ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि एप्रिल ते जून, असतो.

चौधरी, वसंत